Wednesday, July 11, 2018

एक तरी वारी अनुभवावी

अवघा रंग एक झाला... 
आनंदाचे डोही आनंद तरंग... 


"निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम", "ज्ञानोबा माऊली तुकाराम" "पुंडलीक वरदा हारी विठठल"चा जयघोषात आणि आसमंत व्यापून टाकणारा टाळ-मृदुंगांचा गजरात पावलं देवाचिया गावा, पंढरपुरास निघतात.. असं म्हणतात कि "एक तरी ओवी गुणगुणावी" आणि तसेच "एक तरी वारी अनुभवावी" ही!!!.. पण अगदीच वारी नाही तरी वारीचा एक टप्पा अनुभवावा अशी मनापासून इच्छा होती. दर वर्षी वारीचे फोटो, बातम्या पहिल्या, वाचल्या कि मन कासावीस व्हायचे.. ह्यावेळी पण नाही जमणार? मग हे मी कधी अनुभवणार?.. अजुनही मी तुकोबांच्या देहूला, ज्ञानोबांच्या अलकापुरीला आणि विठुरायाच्या वैकुंठनगरीला गेलेले नाही.. मग तरीही ही ओढ का? माझ्या सारख्या नास्तिक मुलीला असणारी हि अनामिक ओढ मलाही बुचकळ्यात टाकणारी होती..  

हेच ते वर्ष आणि हीच ती वेळ.. ९ जुलै २०१८.. वारीचा पुणे ते सासवड टप्पा करायचाच.. आता माघार नाही.. मी आणि बाबा वारीला गेलो आहोत हे स्वप्न मी गेली कित्त्येक वर्षे पहात होते..  ते आता मी प्रत्यक्षात जगणार होते.. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करताना बाबांना अशी मी भेट देऊ शकणार हा आनंद बरोबरीने होताच.. येतील त्याना घेऊन नाहीतर आम्ही दोघे वारी चा हा टप्पा करायचा असे ठरले.. व्हाट्स अँप ग्रुप्स वर पोस्ट्स गेल्या.. दोनाचे तीन (मी, बाबा, चारुता), तीनचे पाच (मधुरा, निरंजन) जण झालो.. होताहोता १० जणांचा ग्रुप जमला.. पंचाहत्तर वर्षाच्या बाबांना हे जमणार आहे कि नाही ह्या बद्दल प्रत्येकजण शकांक होता.. बाबा हे आरामात करू शकतील ह्यावर माझा विश्वास होता आणि माऊली त्यांच्या कडून करून घेतील हा बाबांचा विश्वास होता.. 

माऊलीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी घरातून सकाळी ६ वाजता निघालो. पालखीला कधी, कोठे आणि कसे गाठायचे ह्याचे जोरदार प्लॅनिंग आधीपासून केले होते.. साडे सहा पर्यंत पुलगेट पाशी पोचायचे आणि पालखीची वाट पाहायची.. पुलगेट जसे जवळ येत होते तशी धडधड वाढत होती.. "ती बघ पालखी“ ह्या शब्दांनी शरीरात एक कंपन निर्माण झाले.. खरंच, खरंच का हे घडते आहे? क्षणभर काही सुचेना, पुढचे काही दिसेना.. जेव्हा समजले तेव्हा डोळ्यांच्या कडा ओलसर जाणवल्या.. आणि कळले कि ती पालखी माऊलींची नसून मुक्ताईची आहे.. माऊलीच्या रथाच्या पुढे मानाच्या दिंड्या, मुक्ताईची पालखी,  भालदार चोपदार असतात आणि अश्याच असंख्य दिंड्या मागे हि असतात.. रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची गर्दी ओसंडुन वाहत होती.. त्यात आमच्या सारखी अनेक हौशी, नवखी लोक ही होती.. जणु काही वैष्णवांचा महापूर लोटलेला आहे.. 

जसजशी पालखी जवळ येत होती तसतशी मनातली घालमेल वाढत होती.. हे विहंगम दृश्य परत दिसेल न दिसेल म्हणून रेकॉर्डिंग करण्यात गुंतलेले हात नमस्कारासाठी कधी जोडले गेले कळालेच नाही.. थोड्यावेळात पालखी अगदी नजरेसमोर आली आणि माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यास गर्दीतून वाट काढत पुढे गेले.. "पाया पडू गेले तव पाउलचि न दिसे..".. हे नक्की काय होतंय?.. माऊलींच्या पादुका दर्शनाने मनावर कसलं संमोहन केलं?.. टाळ मृदंगाच्या ध्वनीने आणि वैष्णवांच्या या अफाट जनसागराच्या दर्शनाने शरीराला आणि मनाला अचानक टवटवी कशी आली?... फारशी गर्दी, गडबड गोंधळ न आवडणारी मी खरंच ती मी होते का?.. सारी स्पर्शेंद्रिये जशी गोठून गेली होती.. एका जागी थिजून मी हा सारा सोहळा एकटक पाहत होते.. म्हटलं तर मनाला काहीतरी जाणवत होतं, म्हटंल तर मन जाणीवांच्या पलीकडे गेलं होतं.. क्षणभर वाटलं आपणही माऊलींच्या पादुकांवर वाहिलेलं एखादं फुल व्हाव, मग भलेही दुसर्‍या दिवशी निर्माल्य झाले तरी चालेल.. वारकरीच्या डोक्यावरची तुळस होऊन अशीच पूर्ण वारी अनुभवावी.. आणि त्यात गैर काय आहे? हे ही एक प्रकारचे समर्पणच नाही का?.. अंतर्मनाचा शोध घेण्याची हि एक संधी तर नाही ना? 



पालखीचे दर्शन घेऊन, पालखी बरोबर हडपसर पर्यंत चालून आम्ही सासवडची वाट धरली.. एकाच ध्येयाने, एकाच ओढीने सगळा वारकरी, माळकरी, वैष्णव समुदाय चालत होता.. त्यात ना गरीब-श्रीमंत भेदभाव होता ना बाई-पुरुष, त्यात कोणी लहान होता ना कोणी मोठ्ठा, ना कोणती जात होती ना कोणता पंथ.. सगळे विठ्ठलाच्या ओढीने विठ्ठलमय होऊन गेले होते.. प्रत्येकजण एकमेकात माऊलीला बघत होता.. "अवघा रंग एक झाला, अंगी रंगला श्रीरंग".. ह्याची प्रचिती क्षणोक्षणी येत होती.. 

प्रतिकूल परिस्थितीत केवळ अफाट इच्छा शक्ती आणि समर्पणाच्या भावनेने सतत पुढे पुढे चालत राहून विठ्ठलाला भेटणे.. हाच एक ध्यास..

जाऊ देवाचिया गावा, घेऊ तेथेचि विसावा
देवा सांगु सुख दुःख, देव निवारील भूक

ह्या एक दिवसाच्या वारीच्या अनुभवामुळे मला काय मिळाले? पुढे ह्या अनुभवाने माझ्यात काय बदल होणार? मी माझ्या कामक्रोधीं विकारांवर विजय मिळवणार का? मी हि प्रतिकूल परिस्थितीत अशीच वागेन का? हे सगळे विचार सध्या तरी अनुत्तरित आहेत.. आजच हे असे विचार का यावेत?..  हा या वारी सोहळ्याचा तर चमत्कार नसेल ना?.. दिंडी आणि यातील वारकर्‍यांची निर्मळता तर मनाला खजील करत नसेल ना?.. अंतर्मुख होऊन विचार करायला प्रवृत्त करत नसेल ना? वैष्णवांच्या संगतीत, टाळ-मृदंगाच्या गजरात, माऊलीच्या पालखीसोबत मनाचा कमकुवतपणा जाणवायला लागलाय.. आत काही तरी हललंय हे नक्की.. 


-मी मधुरा.. 
१० जुलै २०१८