Friday, August 6, 2021

पदरावरती जर्तारीचा मोर नाचरा हवा..

आज ७ ऑगस्ट.. नॅशनल हॅन्डलूम डे.. 




वर्षभरात असे कित्त्येक दिवस येतात अन जातात ही.. 'काय एक एक फॅड' म्हणून आपण त्याकडं दुर्लक्ष ही करतो.. पण ह्या दिवसाकडं, माझं विशेष लक्ष वेधलं गेलं ते त्यातील 'हॅन्डलूम' ह्या शब्दामुळं.. हॅन्डलूम वरील माझ्या प्रेमामुळं.. नॅशनल हॅन्डलूम डे म्हणून ७ ऑगस्टच का? तर त्याला मोठठं ऐतिहासिक कारण आहे.. साधारण एकशे सोळा वर्षांपूर्वी, ७ ऑगस्ट १९०५ मध्ये कोलकत्तात स्वदेशी आंदोलन सुरु झाले.. परदेशी वस्तूंवर बहिष्कार आणि स्वदेशीचा अवलंब हे ह्या आंदोलनाचं स्वरूप होतं.. म्हणून हा दिवस..  
 
"हॅन्डलूम" ह्या शब्दाशी, माझी ओळख करून दिली ती माझ्या जावेनं, मंजिरीनं.. तिच्या साड्यांच्या व्यवसायानं.. (Manjiri Silks).. साडी आवडू लागली ती सासूबाईंमुळं आणि साड्यांवर प्रेम करू लागले ते मंजिरीमुळं असं म्हटलं तर वावगं होणार नाही.. लग्न करून मंजिरी घरी आली ती सोबत साड्यांची असंख्य दालनं  घेऊनच.. तिच्या बरोबर त्या दालनांमधून मनसोक्त फिरताना नानाविध साड्यांशी ओळख झाली.. साड्यांबद्दलचा तिचा अभ्यास, त्याचा आवाका पाहताना नवल वाटायचं.. नारायणपेठ, कांजीवरम, पैठणी, गडवाल, इरकल, कलमकारी अश्या अनेक साड्यांचे पोत तिच्यामुळं कळू लागले.. कस्टमर्सना साडी प्युअर सिल्क हॅन्डलूम आहे, किंवा हॅन्डलूम कॉटन आहे हे सांगताना हॅन्डलूम ह्या शब्दावर तिचा असणारा जोर विशेष जाणवायचा.. 'हॅन्डलूम'मुळं ह्या साड्या महाग असल्यातरी तितक्याच मौल्यवान असतात हे लक्षात आलं आणि हॅन्डलूम बद्दल अधिक उत्सुकता निर्माण झाली.. 

हॅन्डलूमची डाय हार्ड फॅन झाले ती नारायणपेठ ट्रिप मध्ये.. तिथल्या लूम्स पाहिल्यावर, तिथल्या लूम्सवर काम करणारे विणकर पाहिल्यावर, त्यांचे कष्ट, त्यांचे  विणकाम, कलेबद्दलची आसक्ती पाहिल्यावर.. त्यांच्या बोलण्यातून त्यांची कलेवरची निष्ठा, त्या कलेच्या परंपरेचे जतन आणि संगोपनासाठीचे प्रयत्न समजल्यावर त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडलं गेलं.. एक हॅन्डलूम साडी विणण्यासाठी तीन ते चार आठवडे लागतात आणि हा वेळ कारागिरी नुसार कमी जास्त होऊ शकतो.. वंशपरंपरागत मिळालेला ह्या कलेचा वारसा ही घराणी जपत आहेत.. संपूर्ण कुटुंबे ह्या लूम्स वर काम करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.. जेव्हा अशी हातानं विणलेली साडी आपण नेसतो तेव्हा फक्त सहा वार कापड नेसत नसतो तर कोणाच्या तरी विचारप्रक्रियेला, कोणाच्या तरी कौशल्याला मूर्त रूप देत असतो आणि त्याच बरोबर विणकरांच्या कुटुंबाला जगण्यासाठी मदत ही करत असतो.. 

देशातील विविधता जशी प्रांतागणिक बदलत जाते तसेच हॅन्डलूम विणकाम ही बदलताना दिसते. तिथली संस्कृतीक वारसा, architecture, कला यांचा  प्रभाव विणकामात दिसून येतो.. उदाहरणादाखल, बनारसी साडीवरील पानाफुलांनी बनलेल्या जाळ्या किंवा बनारसी घाट, केरळच्या कसाऊ साडीवरील बाहुल्यांचे मोटिफ किंवा साऊथच्या साडीमध्ये असणारे सोनेरी जरीकाम.. तसेच तिथल्या हवामानाप्रमाणे सिल्क, कॉटन, लिनन अशी माध्यमही बदलताना दिसतात. माझ्या मते, ह्या नुसत्या साड्या नाहीत तर सहा वारामध्ये सामावलेला समृद्ध असा वारसा आहे.. 

विविध प्रांतातील विणकरांची कला एकत्र पाहायची संधी म्हणजे हॅन्डलूम प्रदर्शन.. हॅन्डलूम बद्दल आस्था असणाऱ्यांसाठी नक्की हा स्वर्गच असेल.. अमेरिकेत असल्याने भले अश्या प्रदर्शनांना माझं जाणं झालं नाही पण माझ्यासाठी मंजिरीचं 'Manjiri Silks' किसी एक्सिबिशन से कम नहीं हैं.. हलक्या फुलक्या नारायणपेठ, कलमकारी, इकत पासून पैठणी, गडवाल ते कांजीवरम अश्या उत्तम सिल्कच्या, नानाविध पोतांच्या, रंगसंगतींच्या हॅन्डलूम, हॅन्ड पिक्ड साड्या मंजिरीकडे पाहायला मिळतात आणि मला माझा स्वर्ग भेटतो.. 

हॅन्डमेड (हातानं केलेल्या) आणि हॅन्ड वुवन (हातानं विणलेल्या) वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी, विणकरांचा सन्मान करण्यासाठी, युनिअन गव्हर्मेंटने घोषित केलेला  "हॅन्डलूम डे" नक्कीच स्वागतार्ह्य आहे. 

अश्या ह्या हॅन्डलूम विणकरांना, त्यांच्या कलेला मानाचा मुजरा 🙏







-मी मधुरा.. 
७ ऑगस्ट २०२१

Sunday, August 1, 2021

मन उधाण "मैत्री"चे…

💕Happy Friendship Day Everyone!!💕

"मैत्री"



कुणी मित्र म्हणतं तर कुणी मैत्रीण.. कुणी दोस्त म्हणतं तर कुणी यार.. कुणी ‘ए भिडू’ असं म्हणत खांद्यावर हात ठेवतं तर कुणी 'कशी आहेस?' असं म्हणतं मिठी मारतं.. कुणी काहीही म्हणो पण ही एक भावना आहे, हे एक भावविश्व आहे.. "मैत्री"चं!!.. 

आपल्या आनंदात सहभागी होणारी आणि दु:खातही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असणारी अशी ही "मैत्री"!!!.. ही मैत्री जगावीच लागते.. अनुभवावीच लागते.. 

                    प्रत्येकानं प्रेमात पडावंच असं काही नाही 
                    पण पडावं प्रेमात "मैत्री"च्या असंच आहे काही.. 

                    प्रियकर-प्रेयसी हवीच असं काही नाही 
                    पण हवी एकादी समजूतदार "मैत्री" असंच आहे काही.. 

                    सतत हातात हात असावाच असं काही नाही 
                    पण असावी सोबत, साथ न सोडणाऱ्या "मैत्री"ची असंच आहे काही.. 

                    मनातलं सार सांगावंच असं काही नाही 
                    पण न सांगता, नकळत उमजत जावं "मैत्री"त असंच आहे काही.. 

                    गिफ्ट्स, प्रॉमिसेस द्यावीतच असं काही नाही 
                    पण द्यावा जीवाला जीव, ओतावा जीव "मैत्री"त असंच आहे काही.. 

मैत्रत्वाची भावना जपणाऱ्या सर्वांना मैत्रीदिनाचा खूप खूप शुभेच्छा!!

-मी मधुरा.. 
१ ऑगस्ट २०२१