आज वॅलेंटाईन्स डे..
'तो' आणि 'ती' त्यांच्या नेहमीच्याच ठिकाणी भेटणार..
नदीकिनारी बसून एकमेकांच्या सोबतीनं सूर्यास्त पाहणं त्यांच्या खास आवडीचं..
त्याला झालेला उशीर आणि त्याची वाट पाहत नदीच्या पाण्याकडे पाहत बसलेली 'ती'.. कसल्यातरी विचारात..
"हॅपी वॅलेंटाईन्स डे स्वीट".. तिच्या जवळ बसत तिच्या कानात 'तो' पुटपुटला..
त्याच्याकडे लक्ष न देत 'ती' विचारती झाली.. "सांग ना, प्रेम म्हणजे काय?"
तो: "हे काय आत्ता मध्येच?"
ती: "ए सांग ना.. असं काय करतोस.."
तो: "ते शब्दांत कसं सांगू?"
ती: "जमेल तुला.. जमेल तसं सांग.."
तो: "जाऊ दे ना. उगाच कशाला टाइमपास.."
"ठीक आहे मग.. मी जाते.." म्हणत 'ती' उठती झाली ..
तो: "थांब ना.. लगेच काय जाते?"
ती: "मला प्रेम म्हणजे काय ते सांग, नाहीतर मी निघाले.."
तो: "हे चिटिंगाय राव.."
ती: "असेल ही.."
तो: "थांब ना जरा.. विचार तरी करुदे.. अशी थोडी जवळ बस.. "
ती: "लाडात नको येवूस.. आधी सांग प्रेम म्हणजे काय?.. "
तो: "तू अशी इथं असावी असं वाटणं म्हणजे प्रेम.."
ती: ".. म्हणजे मी इथं असेन तरच प्रेम?.. आणि इथून गेले की प्रेम संपलं?"
तो: "असं कसं? तू नसताना ही असणारच की प्रेम!.."
ती: "तेच तर विचारतेय ना.. मी नसताना माझ्यावर प्रेम असणार म्हणजे नेमकं काय असणार?"
तो: "म्हणजे तेच गं.. तू नसताना ही तू इथं असावीस असं वाटणं.."
ती: ".. म्हणजे चोवीस तास तुझ्या सोबत असणं.. फक्त 'माझी सोबत' म्हणजे प्रेम?"
तो: "नुसती सोबत नाही गं.."
ती: "तसे अनेक लोक असतातच की, आपल्या सोबत.. चोवीस तास.. जन्मापासून आई, बाबा, भावंडं.. मग मी काय वेगळी?.. आणि माझ्यावरचे प्रेम?"
तो: "अशी चिडू नकोस ना.."
ती: "तू सांगणार आहेस की नाहीस?.. "
"चल मी निघते."
तो: "अरे, काय डोक्यात एकच घेऊन बसली आहेस?.. एक तर इतक्या दिवसांनी भेटतोय.. त्यात ही परीक्षा कसली घेतीयस?..
..आणि मला सांग, आपलं काही अडलंय का आजवर प्रेम म्हणजे काय माहिती नसल्यानं? मग? बस ना शांत..
मला पडू दे तुझ्या मांडीवर डोके ठेवून.."
ती: "चल मी जाते.. "
तो: "अरे थांब थांब.. सांगतो मला जमेल तसं.."
'ती' त्याच्या बाजूला बसत.. "हं.. सांग.. "
तो: "..म्हणजे.. बघ हं.. नानाविध रंगांची उधळण करत अस्ताला जाणारा हा सूर्य.. ही पाखरांची धांदल.. हा भुरभुरता शीतल वारा.. ही फिकट पोपटी चमचमती पानं आणि त्या पानांमधून डोकावणारी फुल.. अशा ह्या प्रसन्न संध्याकाळी, लुसलुशीत गवतावर मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून पहूडलोय.. आणि असंच एखादं पाखरु त्या समोरच्या फांदीवर बसून अशीच छान शीळ घालतंय.."
ती: "हं.. पुढं.. "
'तो' तिचा हात हातात घेत.. "आसपास असं काही तरी स्वर्गीय घडत असतं तेंव्हा, आत कुठेतरी काहीतरी हलतं.. तेंव्हा अत्यंत तीव्रतेनं वाटतं की तू हवीस!!.. तू हवीसच आत्ता इथं!!.. हे जे काही मी बघतोय,अनुभवतोय माझ्या डोळ्यांनी, ह्यातून मिळणारा सुकून, ह्यातून मिळणारा आनंद तुझ्याही मनात झिरपायला हवा..आत्ता या क्षणी.. हा आनंद, हे सुख मला तुझ्या सोबत अनुभवायचय.. म्हणजे तू नसशील तरी तो आनंद, ते सुख, सुखच असेल, पण तू असशील सोबत, अशी इथं, माझा हात हातात घेऊन, माझ्या खांद्यावर डोकं टेकून,.. तर तो क्षण अमृताचा होऊन जाईल.. "
"आहाहा.. सुंदर.. बोलत रहा.. " त्याचं डोकं मांडीवर घेऊन, त्याच्या केसातून बोटं फिरवत 'ती'..
'तो' तिच्या डोळ्यात पाहत..
"मस्त वाटतंय.. तर मी काय सांगत होतो.. हा असा एकच क्षण नाही तर..
भर दुपारी, रणरणत्या उन्हांत, झाडाखालचा किर्र गारवा अंगात झिरपत जाताना तू हवी असतेस..
गर्द रानात, संथ तालात टपटपणारा पाऊस झेलायला तुझाच दुपट्टा हवा असतो..
आमरसाचा पहिला थेंब तुझ्या ओठांवरुन टिपायचा असतो.. झणझणीत रश्श्याचा भुरका घेऊन डोळ्यांत आलेले पाणी पुसायला तुझी बोटं हवी असतात..
शब्दांच्या खेळात, मनाचे एकेक पापुद्रे उलगडत, अचानक एखाद्या ओळीत मन सुन्न करुन टाकणारे काही वाचतो, तेंव्हा तुझा हात माझ्या हातात हवा असतो..
तुझ्या हृदयाचे ठोके ही जिथे ऐकू येतील अशा निरवततेत तुझ्या श्वासोच्छ्वासाच्या लयीमध्ये मला कंप पावायला तूच हवी असतेस..
ती मनातून उठणारी स्पंदनं, संक्रमित व्हावीत त्या क्षणी, तुझ्याही मनात असे वाटतं.. "
ती: "कसलं बोलतोयस यार तू.. एखादी कविताच ऐकतीय असं वाटतंय.. मला तू आवडतोस का तुझं बोलणं.. हेच कळत नाही.. तू बोलत रहा.."
तो: "येडोबा, अजून काय बोलू? हेच तर प्रेम असतं.. "
ती: "ए.. सॉरी सॉरी.. मी मध्येच बोलले.. तू कर ना कंटिन्यू.. प्लीजSSS.. "
तो: "कुठल्या तरी अनोळखी गावाच्या तिठ्यावर, बुलेटला टेकून चहाचे फुरके मारत असताना, त्या फाटक्या टपरीवरच्या रेडिओ वर, अचानक लताचं आर्तमधुर गाणं मनाचा ठाव घेतं आणि अस्तित्वाचे भोवरे गरगरू लागतात तेव्हा तुझा हात हवासा वाटतो स्थिरतेसाठी.. दिवस उतरवून ठेवताना, ऐकलेल्या तलतच्या गाण्याला, रातराणीचा गंध मिठी मारतो तेंव्हा, माझ्या सोबत गुदमरायला तूच हवी असतेस.. "
आणि रतीक्लांत चेहऱ्यावर दहिवरानं येणारं ओलेतं स्मित तुझ्याच ओठांवर पाहायला आवडतं.. तूच हवी असतेस. तू हवीच असतेस.. हे जे तुझे क्षण असतील माझ्या आयुष्यातील, तेच माझं जगणं असेल.."
"..आणि हेच अलौकिक क्षण म्हणजेच प्रेम.. तुझ्या असण्याचं अमृत प्यालेले, अमर झालेले.. तुझ्या शिवाय विफल भासणारे.. तू पूर्ण करतेस माझं अपूर्णत्व, तेंव्हा ते प्रेम असतं, समजलं?.."
'ती' खाली वाकून त्याच्या कपाळाचे दीर्घ चुंबन घेत, "मी आहे, मी असेन, कायम तुझ्या सोबत.. खरं तर तुझ्यातच आहे माझं असणं, माझं मी पण.. हॅपी वॅलेंटाईन्स डे डार्लिंग .."
-मी मधुरा..
१४ फेब्रुवारी २०२२
(अज्ञात लेखकाच्या कथा संलकल्पनेवर आधारित )
*****************************************************************