Wednesday, June 29, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं.. (पुस्तकं ६ ते ९)

 ६. यक्षांची देणगी.. जयंत नारळीकर.. 




जयंत नारळीकरांच्या काल्पनिक विज्ञानकथांचा हा कथासंग्रह.. हा कथासंग्रह हातात पडला तेव्हा मन थोडं साशंक होत.. मी आणि विज्ञान एकमेकांपासून कोसो दूर.. पण सगळे लेखनप्रकार वाचून पाहायचे म्हणून हे वाचायला घेतलं आणि प्रत्येक कथेत गुंतून पडले.. हे श्रेय केवळ लेखकाचं.. 

जयंत नारळीकरांनी प्रास्ताविकात म्हटलं आहे कि विज्ञानकथा लिहायची कल्पना त्यांना एका खगोलशास्त्राच्या परिसंवादात चाललेल्या कंटाळवाण्या भाषणात आली.. आणि त्यांनी त्यावेळी 'कृष्णविवर' ही कथा त्या परिसंवादातच लिहायला घेतली.. रिकामपणाची कामगिरी म्हणून हाती घेतलेला हा उपक्रम दोन दिवसात पूर्ण पण  झाला.. 

विसावं शतक हे विज्ञानयुग म्हणून ओळखलं जातं.. ह्या विज्ञानामुळं, त्याच्या अनेक शोधांमुळं मानवाच्या आयुष्यात, त्याच्या दिनचर्येत बरेच अचंबित करणारे बदल घडले.. एकीकडे विज्ञानाचे हे चमत्कार तर दुसरीकडे अंधश्रद्धा, रूढीपरंपरा ह्यात अडकलेला सामान्य माणूस.. हे बदल पचवायचे असतील तर वैज्ञानिक शोध आणि त्याचं तंत्रज्ञान याचं ज्ञान सामान्य माणसाला असणं आवश्यक आहे.. आणि ह्या विचारातून ह्या कथा लिहिल्या गेल्या.. 

ह्या कथासंग्रहाची पहिली आवृत्ती १९७९ मधली.. ह्या कथा त्यापूर्वीच्या इतरत्र प्रकाशित झालेल्या.. तरी त्या आत्ताच्या काळात वाचताना सुद्धा मजा आली.. 

कथा १.. यक्षांची देणगी: पृथ्वीपलीकडे जीवनसृष्टी असेल का?.. हा ह्या कथेचा विषय.. जो खगोलशास्त्र, जीवशास्त्र संख्याशास्त्र, तंत्रशास्त्र ह्या सगळ्या अंगानं विचार करून लिहिला आहे.. अशी जीवसृष्टी असेल तर ती ताऱ्यांपासून ऊर्जा घेत असेल.. नैसर्गिक बदलामुळं जर त्या सृष्टीला ताऱ्यापासून ऊर्जा मिळणे बंद झाले तर.. ते पृथ्वीवर ताबा मिळवल्याचा प्रयत्न करतील.. आणि मग काय होईल?... अशी ही कथा... 

कथा २.. कृष्णविवर: एखादी मोठ्ठी वस्तू स्वतःच्या गुरुत्वाकर्षणाने संकुचित होत गेली तर ती बाहेरून दिसेनाशी होते.. ते गुरुत्वाकर्षण इतके प्रचंड असते कि प्रकाश सुद्धा त्या वस्तूकडे खेचला जातो.. अश्या वस्तूला कृष्णविवर (black hole) म्हणतात.. ह्या सिद्धांतावर आधारित ही गोष्ट.. कथेच्या नायकाचे यान अश्या कृष्णविवरात अडकते आणि मग काय होते...

कथा ३.. उजव्या सोंडेचा गणपती: मोबियस पट्टीचा उपयोग करून एखादा चपटया वस्तूला थ्री डायमेंशन मध्ये रूपांतरित करता येते.. तसेच त्या पट्टीचा वापर करून थ्री डायमेंशन चे फोर डायमेंशन मध्ये रुपांतर केले तर डाव्याचं उजव्यात आणि उजव्याचं डाव्यातं रूपांतर झाल्यासारखं वाटेल.. 'आशेर पेरेस' ह्या गणिती सिद्धांतावर ही कथा आहे.. हा सिद्धांत वापरून डाव्या सोंडेच्या गणपतीचं रूपांतर उजव्या सोंडेच्या गणपतीत होतं.. 

कथा ४.. गंगाधरपंतांचे पानिपत: माझी आवडती कथा.. ही कथा क्वांटम थिअरी वर आधारित आहे.. अमुक एक कारणामुळं अमुक एक घडेल.. किंवा ठराविक कारणामुळं ठराविकच काही घडेल.. असं न होता एकाच कारणामुळं एका ऐवजी अनेक संभाव्य गोष्टी घडू शकतात आणि त्या गोष्टींना स्वतःचं असं एक विश्व असतं पण आपल्याला दर्शक म्हणून एकच दिसतं.. असं क्वांटम थेअरी सांगते.. आणि हीच थेअरी पानिपत युद्धाला लावून ही कथा लिहिली आहे.. पानिपत युद्धात मराठे हरलेच नाहीत आणि अख्या हिंदुस्थानात मराठी राजवट आहे.. आणि मग आत्ताचं जग कसं असेल.. ही कथा आहे.. 

कथा ५.. धूमकेतू: धूमकेतू ही गुरुत्वाकर्षणामुळं फिरणारी निर्जीव वस्तू.. तो सूर्यमालेत लांबून येतो आणि सूर्याभोवती चक्कर मारून निघून जातो.. तो बाकी ग्रहांच्या मानानं आकारानं लहान असला तरी त्याचं शेपूट पुष्कळ लांब असू शकतं.. (सूर्य पृथ्वी अंतरा इतके सुद्धा).. हे धूमकेतू पृथ्वीवर आदळले तर प्रचंड नुकसान, प्राणहानी होण्याची शक्यता असते.. आणि ह्याच शक्यतेच्या आधारावर ही गोष्ट आहे.. धूमकेतू मागे जनसमुदायात असलेले गैरसमज कथेत येतात.. 

कथा ६.. पुनरागमन: तंत्रशास्त्रात जसजशी प्रगती होईल जसतशी जीवनात यांत्रिकपणा येण्याची शक्यता असते.. अश्या तऱ्हेचे अतिप्रगत जीवन कंटाळवाणे होईल का? ह्या विचारातील ही कथा.. ह्या कथेचा नायक करटक आणि त्याचा मित्र दमनक परग्रहावरून पृथ्वीवर ती त्यांना राहण्यासाठी योग्य आहे का ते पाहायला येतात.. यांत्रिक जीवनाला कंटाळला करटक पृथ्वीवरील जीवनाच्या प्रेमात पडतो आणि पुढे काय होते अशी ही कथा.. 

कथा ७.. दृष्टीआड सृष्टी: मंगळाच्या पृष्ठभागाची तपासणी करून तिथे जीवसृष्टी नसेल असा निष्कर्ष व्हायकिंग यानाने काढला.. पण त्याच्या पृष्ठभागाखाली एखादी वस्ती असू शकेल का ह्या विचारातून ही कथा लिहिली आहे.. 

कथा ८.. धोंडू: आकाशातून एक प्रकाशाचा गोळा जमिनीवर पडतो.. तो सूर्यमालेत फिरणारा एक दगड असतो.. पण त्या दगडात शास्त्रज्ञांना जीवसृष्टीचे घटक सापडतात.. त्यामुळे सूर्यमालेपलीकडील विश्वात जीवसृष्टीला पोषक वातावरण असेल का? रासायनिक अणूंपासून जीवसृष्टी निर्माण करून उत्तम मेंदूची घडवणूक करून परिपूर्ण जीव निर्माण करता येईल का?.. आणि असे झाले तर काय? अशी ही कथा.. 

कथा ९.. पुत्रवती भव: नावाप्रमाणेच ही नवीन जीवाच्या जन्माची कथा आहे.. नवीन होणाऱ्या बाळाचे लिंग कोणते असावे हे निसर्गाने अजुनी तरी आपल्याकडे ठेवले आहे.. पण जीवनिर्मितीतल्या 'क्रोमोसोम'वर कंट्रोल आणला तर नवीन जीवाचे लिंग समागमापूर्वीच ठरवता येईल का? मुलगा हवा असेल तर पुरुषातील X क्रोमोसोम वर कंट्रोल ठेवायचा आणि मुलगी हवी असेल तर Y वर.. शरद नावाचा शास्त्रज्ञ असा शोध लावतो आणि मग काय होते.. अशी ही कथा.. 

कथा १०.. ट्रॉयचा घोडा: पायोनियर १० हे यान १९७२ मध्ये आपले ग्रहमंडल ओलांडून ते दूरवर जावे ह्या हेतूने केप केनेडीहून पाठवले होते.जर हे यान २०५० मध्ये पृथ्वीच्या दिशेने परत यायला निघाले तर काय होईल? अशी ही कथा.. 

कथा ११.. नौलखा हाराचे प्रकरण: शेरलॉक होमची अनसॉल्व्हड केस.. 'टाईम मशीन' मधून भविष्यकाळात गेल्या नंतर परत वर्तमानात येता येईल का? दिलेल्या कंडिशन्स मध्ये फरक पडला तर कदाचित नाही.. हरवलेला नौलखा हार टाईम मशीन मधून ऑलरेडी तीन पिढ्या पुढे पोचला आहे.. त्यामुळे तो शेरलॉक ला मिळत नाही.. ही गोष्ट वाचताना शाळेतले दिवस आठवले.. 

कथा १२.. अखेरचा पर्याय: भविष्यकाळात आपण इतके यंत्रावलंबी झालेलो असू यंत्रे बंद पडणे हा युद्धाचा प्रकार असू शकेल.. कदाचित ही यंत्रे सौरशक्तीवर चालत असतील.. शत्रुदेशाला असह्यस्थितीत आणून सोडायला ही शक्तिकेंद्रे बंद करायची.. ह्यावर आधारित ही कथा.. 

-मी मधुरा.. 

****************************************************

७. नातिचरामि.. मेघना पेठे.. 



बुकगंगावर पुस्तकं शोधत असताना 'नातिचरामि' ह्या नावानं माझं लक्ष वेधलं.. ह्या नावाचा नक्की अर्थ काय?.. पुस्तकाच्या मलपृष्ठावरून पण काही अंदाज बांधता येईना.. मग गूगलबाबांची मदत घेतली.. 'धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि'... विवाहाच्या वेळी पतीनं पत्नीला द्यायचं वचन.. इतकी काय ती माहिती मिळाली.. आणि 'इंटरेस्टिंग' असा शेरा मारून पुढं गेले.. नंतर पोर्टलॅंडच्या लोकल लायब्ररीत 'नातिचरामि' showcase stand वर दिमाखात उभं असलेलं दिसलं.. 

'नातिचरामि' ही कादंबरी असली तरी रूढ अर्थाने कादंबरीच्या साच्यात बसणारी नाही.. विशिष्ट कथानक, त्याचा आरंभ, मध्य, शेवट अशा टप्प्यांतून ही कादंबरी पुढं सरकत नाही.. तर नायिका मीरा, घटस्फोटानंतरच तिचं आयुष्य आणि समाज व्यवस्थेतील स्त्री-पुरुष नातेबंधांच्या आखलेल्या चौकटींना झुगारून देत पुरुषी सामर्थ्य रचनेला शह देण्याचा तिचा वैचारिक संघर्ष ह्यातून ती आकार घेते.. 

मीराच्या आत्मनिवेदनातून कादंबरीची सुरुवात होते.. नुकताच घटस्फोट झालेली मीरा तिच्या पण पूर्वी दोघांच्या असणाऱ्या घरात एकटीच परतते.. घरात आत्तापर्यंत असणारं त्याचं अस्तित्व आणि आता त्याचं नसणं, ते रिकामपण, ती पोकळी, त्यातून येणारी एकटेपणाची जाणीव तिला बोलतं करते.. मग भूतकाळ ती वर्तमान म्हणून जगत राहते.. भूतकाळातले तिचे नि तिच्या नवर्‍याच्या आठवणींचे तुकडे जोडता जोडता ती आपल्या विस्कटून गेलेल्या भावविश्वात डोकावते.. तिच्या भावविश्वाला जरी धक्का लागला असला तरी घटस्पोटामुळं तिचं आयुष्य उद्धवस्त झालंय हे तिला मान्य नाही..

मीरा स्वत:ला, स्वत:च्या इच्छा-आकांक्षा-अपेक्षांना प्राधान्य देऊन, आड येणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक संकेत, नीतिनियम, मूल्यआचारांच्या संकल्पना तडा देत, तीच आयुष्य ती निडरपणे जगत राहते.. स्वत:शीच वाद-संवाद करत बुरसटलेल्या समाजाशी संघर्ष करत राहते.. तिचा हा संघर्ष अगदी लग्नसंस्थेपासून सुरू होतो.. लग्नसंस्थेचं फोलपण तिला तिच्या नुकत्याच झालेल्या घटस्फोटात दिसतं आणि हीच तिच्यातील सामर्थ्याची पहिली खूण!!.. स्वत:च्या लैंगिक इच्छांचा हवा तसा सन्मान करते आणि एकूणच समाजव्यवस्थेच्या अनेक स्तरांवरील बंधनांची कुंपणं उखडून टाकते.. तिच्या विवाहित 'पुरुष'मित्राला 'लग्न नाही केलं आपण तरी एकत्र राहू शकतो' आणि त्यात काहीच अनैतिक नाही असं सांगते.. थोडक्यात, ही मीरा स्वतंत्र विचारांनी जगणारी आणि तितक्याच उत्कटपणे जगण्याचे मार्ग आपलेसे करणारी आहे..  

मीराच्या आत्मनिवेदनातून ही कादंबरी पुढे सरकत असल्यानं मीराचं व्यक्तिमत्त्व हा या कादंबरीचा गाभा आहे.. आणि ते अतिशय प्रभावीपणे अनेक कंगोऱ्यांसह लेखिकेनं उभा केला आहे..  मीराचा हा स्वतंत्र, धाडसी दृष्टिकोन कमालीचा मुक्त आहे.. तो तिच्यासारख्या अनेक घटस्फोटित स्त्रियांच्या दृष्टिकोनांशी मिळता जुळता वा त्याचं प्रतिनिधित्व करणारा नसेलही, तो तीव्रही असेल, टोकाचाही असेल पण हा दृष्टिकोन एका स्त्रीनं पुरुषी सामर्थ्याला, वर्चस्वाला दिलेलं आव्हान आहे.. आणि हे या कादंबरीचं वैशिष्टय आहे.. वेगळेपण आहे..

नायिका म्हणजे मीरा बरोबर इतर स्त्री व्यक्तिरेखा ही अधूनमधून कादंबरीत डोकावतात.. त्यांना फारसं महत्व नसलं तरी लेखिका त्यांना चेहरे द्यायला यशस्वी झाली आहे.. त्या मानाने पुरुष व्यक्तिरेखा धूसर वाटतात.. त्याच्यातील 'पुरुषी मनोवृत्ती'च ठळकपणे दिसून येते.. त्यांचं सर्वांगीण व्यक्तित्व उभंच राहत नाही.. 

मीराची व्यक्तिरेखा मांडतानाची, कादंबरीचा विषय मांडतानाची सुरुवातीची पंधरा वीस पानं खूप कंटाळवाणी वाटतात.. तसाच शेवटही उरकल्यासारखा वाटतो.. मीराचा तिच्या तिशीपासून सुरु झालेला प्रवास एकदम साठीत येऊन थांबतो.. साठाव्या वाढदिवसादिवशी, तिच्या मित्राबरोबर आठवणींचे अन्वय लावत बसलेली मीरा तिच्या आक्रमक, स्वतंत्र वृत्तीशी विसंगत वाटते.. अशा शेवटामुळं कादंबरीवरची पकड ढिली होऊन जाते..  

अश्या मर्यादा असूनही 'नातिचरामि' वाचकाला गुंतवून ठेवते.. 

(According to Book 'नातिचरामि' म्हणजे Till death do us apart.. )

-मी मधुरा.. 

************************************************

८. बाजिंद.. पै. गणेश मानुगडे.. 


'बाजिंद' पुस्तकाच्या मुखपृष्टाकडं पाहून उत्सुकतेनं हे पुस्तकं हातात घेतलं.. पैलवान लेखक आणि ऐतिहासिक कादंबरी हे समीकरण ही जरा वेगळं वाटलं.. 

'बाजिंद' ही शिवकालीन ऐतिहासिक कादंबरी असली तरी एक काल्पनिक रहस्यकथा आहे.. आदिलशाहीत सुभेदार असलेले 'येसोजी शिर्के' यांची 'यशवंतमाची' स्वराज्यात सामील होतानाचे ऐतिहासिक संदर्भ घेऊन, त्यात काही काल्पनिक तर काही खऱ्या पात्रांचा आधार घेऊन कथानक छान गुंफलं आहे.. 

कथेची सुरुवात होते ती एका जंगली प्राण्यांच्या सुळसुळाटानं हैराण झालेल्या पण खाऊन पिऊन सुखी असलेल्या धनगरवाडीत.. टकमक टोकावरून कडेकोट झालेल्यांच्या रक्ताला सोकावलेले हे जंगली प्राणी..  ह्या प्राण्यांच्या बंदोबस्ताचं गाऱ्हाणं घेऊन, रायगडावर सरकार दरबारी जाण्याचं सखाराम धनगर व त्याचे तीन साथीदार ठरवतात.. आणि सुरु होतो त्यांचा धनगरवाडी ते रायगड हा रोमांचकारी प्रवास!! 

स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख असलेल्या बहिर्जी नाईकांच्या चेल्यानं, खंडोजीनं त्यांना रायगडावर पोहचवण्यास केलेली मदत.. त्यानं प्रवासात सांगितलेली शिवाजी महाराज व शिर्केच्या वैराची, त्यांच्या लढाईची गोष्ट.. शिर्केकन्या सावित्री आणि खंडोजी यांची प्रेमकथा.. प्राणी-पक्षी यांची भाषा जाणणारा सुपर हिरो 'बाजिंद' अश्या अनेक उपकथानकांच्या जोडीनं गुंफलेली अशी ही ऊत्कंठावर्धक कादंबरी..

शिवरायांचं गुप्तहेर खातं कसं काम करायचं याचा कादंबरीतील अनुभव रोमांचीत करतो.. सर्वोत्तम हेरखातं असलेली इस्त्राईलची 'मोसाद' ही संघटना शिवरायांना आणि बहिर्जी नाईकांना आपला आदर्श मानते.. आणि त्यांच्या शिकवणुकीतून चहुबाजुंनी असणाऱ्या अरबी राष्ट्रांच्या वेढ्यात सुद्धा स्वतंत्र ज्यू राष्ट्राची निर्मिती करते.. हे वाचून अभिमानानं उर भरून येतो.. कथेचा शेवट हा बाणूरगड, सांगली येथे बहिर्जी नायकांच्या समाधीपाशी वर्तमानात होतो.. त्यावेळी सखाराम धनगरांचा वैशज किसन, बाजीराव नावाच्या भारताच्या गुप्तहेर खात्यात काम करणाऱ्या युवकाला बहिर्जी नायकांबद्दल भरभरून सांगतो.. त्यांना आदरांजली देतो..      

अलंकारीक वा ऐतिहासिक भाषा न वापरता असलेली साधी सोपी ओघवती भाषा, कथा मांडण्याची पद्धत,  ऐतिहासिक आणि काल्पनिक गोष्टीचा केलेला उत्तम संगम.. ह्या पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत.. 

शेवटी... 

बाजिंद पूर्वार्ध समाप्त 
उत्तरार्ध थोड्याच दिवसांत.. 

असं लिहिल्यानं पुढच्या पुस्तकाची उत्सुकता वाढली आहे.. 

-मी मधुरा.. 

***************************************************************

९. कादंबरी : एक.. विजय तेंडुलकर.. 




विजय तेंडुलकर आणि कादंबरी हे समीकरण तसं नाही पटणारं.. पण जेव्हा 'कादंबरी : एक' ही कादंबरी लोकल लायब्ररीत पहिली तेव्हा विश्वासच बसला नाही.. सखाराम बायंडर, घाशीराम कोतवाल, शांतता कोर्ट सुरु आहे ही त्यांची नाटकं youtube वर पाहिलेली असल्यानं ते फक्त नाटककार म्हणूनच माहिती होते.. सामाजिक विषय हाताळणारे नाटककार.. तसं त्यांचं कोणतंच लेखन साहित्य वाचलेलं नव्हतं.. गूगल बाबांच्या नुसार तेंडुलकरांनी फक्त दोनच कादंबऱ्या लिहिल्या.. 'कादंबरी : एक' आणि 'कादंबरी : दोन'.. एक विषय कौटुंबिक तर दुसरा राजकीय..

'कादंबरी : एक' ही कादंबरी आहे नव्वद दशकातल्या एका आधुनिक चौकोनी कुटुंबाची.. एका कुटुंबप्रमुखाची.. त्याच्या आत्मकथनातून पुढं सरकत जाणारी.. डायरी लिहावी अश्या सध्या सरळ भाषेत लिहिलेली.. त्याच्या आयुष्यात रोज घडण्याऱ्या घटना, त्यांचा तर्क वितर्क हा गाभा असणारी अशी ही २६२ पानांची कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते.. नियम फक्त एकच.. त्या पात्राकडं तटस्थ दृष्टीनं पाहायचं.. 

पन्नाशी उलटलेल्या, व्यवसायातून निवृत्त झालेल्या 'प्रभाकर सुर्वे'च्या दिनचर्येतून कादंबरीची सुरुवात होते आणि हळूहळू त्याच्या कुटुंबाची ओळख होत जाते.. गृहिणी असणारी त्याची बायको, फिल्म इंडस्ट्रीमध्ये जम बसवू पाहणारा डायरेक्टर मुलगा दीपक आणि स्वतःचा बिझनेस करणारी, स्वतंत्र विचारांची, स्त्रीवादी इंजिनिअर मुलगी सुजाता.. सुखवस्तू असं हे चौकोनी कुटुंब.. घडणाऱ्या घटनांच्या मालिकेतून उलघडत जातात ह्या कुटुंबातील नातेसंबंध, नात्याची अपरिहार्यता आणि नात्यांची गुंतागुंत.. आणि त्यातून निर्माण होणारे स्त्री-पुरुष नात्यांचे अनेक पदर..

वैयक्तिक पातळीवर घडणाऱ्या घटनांतून कधी हट्टी, कधी मायाळू, कधी काळजी करणारा तर कधी चक्क उर्मट अहंकारी प्रभाकर डोकावत राहतो.. तर कधी वासनामय प्रभाकर पाहायला मिळतो.. (१९९६ मध्ये पहिली आवृत्ती जेव्हा आली तेव्हा वासनाप्रधान लिखाणामुळं ही कादंबरी वादग्रस्त झाली होती.. )

"निघण्याचे गाव आणि पोचण्याचे गाव या दरम्यान अनेक गावे असतात. इतकेच नव्हे तर गावांमध्ये गावे असतात. ती पाहावीत." 
कादंबरीच्या पहिल्या पानावर लिहिलेलं हे मला खूप भावलं.. 'जगण्याचं सूत्र' असं काही.. 

-मी मधुरा..  

*********************************************************