३७. स्मृतिचित्रे.. लक्ष्मीबाई टिळक..
रेव्हरंड टिळक अर्थात नारायण वामन टिळक.. एकोणिसाव्या शतकातील मराठीतील प्रसिद्ध कवी.. त्यांच्या पत्नीनं लक्ष्मीबाईनी लिहिलेलं अविस्मरणीय आत्मकथन म्हणजे स्मृतिचित्रे.. हिंदू संस्कारांमध्ये वाढलेली एक स्त्री विक्षिप्त पतीला साथ देताना कशी बदलत जाते आणि स्वतःचा कसा विकास करत जाते याचा उत्तम आलेख म्हणजे स्मृतिचित्रे..
१८५७चा बंडाचा काळ.. एका महाराचं पाणी अंगावर उडाल्यानं विटाळ झाला म्हणून कडक सोवळं पाळणारे वडील.. ह्या सोवळ्याच्या जाचात अडकलेलं लक्ष्मीबाईंचं बालपण.. कोणाचीही घुसमट व्हावी, विकृती निर्माण व्हावी असं वातावरण.. पण लक्ष्मीबाईनी ते सर्व सहजतेनं स्वीकारलं ते केवळ त्यांच्या खेळकर आणि आनंदी स्वभावामुळं.. त्या स्वतःच्या स्वभावाचं वर्णन मनानं व शरीरानं चिवट असं करतात.. जातीभेदाच्या भक्कम भिंती, त्यात वडिलांचं कडक सोवळं, जबाबदारीपासून भरकटलेलं त्यांच वागणं.. त्यामुळं लक्षमीबाईंना त्यांच्या आत्यानं सांभाळलं.. आणि पुढं एक गोत्री असणाऱ्या टिळकांशी विवाह करण्यासाठी आत्यानं त्यांना दत्तक ही घेतलं.. लग्न झाल्यावर त्यांच्या परिस्थितीत काहीच फरक पडला नाही.. 'सासुरवास' ह्या प्रकरणात त्यांनी सासऱ्यांचा लहरीपणा आणि झालेला जाच ह्याचं चित्रण केलंय.. त्यांच्या सासूबाई कविता करायच्या, बायबल वाचायच्या, शिवण टिपण करायच्या.. हे सासऱ्यांना आवडत नसल्यानं त्यांनी त्यांचा खूप छळ केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ही झाला.. लक्ष्मीबाईंचे कधी सासरी कोड कौतुक झालं नाही.. ‘मोलाची दळणी करा नि लुगडी घ्या, बांगड्या भरा’ इति सासरे.. नवऱ्यानं कामात केलेली थोडी मदत हाच काय तो ओलावा.. असं त्या लिहितात.. लाडू लपवून ठेवून सुनेवर केलेला चोरीचा आरोप, मुलात आणि सुनेत भांडण लावण्याचा केलेला प्रयत्न.. असे बरेच कटू प्रसंग त्या लिहितात.. पण कुठंच सासऱ्यांबद्दल अपशब्द वापरत नाहीत..
कविता करणारे, कवितेत स्वतःला विसरणारे, पटकन दुसऱ्यावर विश्वास टाकणारे, भोळे मालमनाचे टिळक.. त्यामुळं येणाऱ्या अनेक अडचणींना लक्ष्मीबाईंना तोंड द्यावे लागे.. टिळकांच्या स्वभावाचे अनेक पैलू पुस्तकात दिसतात.. बोलता बोलता कविता करणारे टिळक, रागात-चिडल्यावर कविता करणारे टिळक उत्तम कीर्तनकार ही होते.. पैसा जोडावा, साठवावा हा स्वभाव नसल्यानं कायमच गरिबीच्या छायेत असणारा संसार संभाळताना होणारी दमछाक, होणारी भांडणं यांचं खुमासदार वर्णन त्यांनी केलं आहे.. लक्ष्मीबाईंनी संसारात न गुरफटता शिकावं, मोठठं व्हावं असं टिळकांना वाटे.. टिळक फक्त दोनच गोष्टीना घाबरत.. एक देव आणि दुसरे लक्ष्मीबाई..
टिळकांचं धर्मांतर.. लक्ष्मीबाईंच्या जीवनातील खडतर काळ.. निर्जीव ओंडक्यासमान झालेलं त्यांचं आयुष्य.. त्यांचा कशावरच ताबा नसल्यानं त्या वेड्या होतील की काय अशी त्यांच्या बहिणीला वाटणारी भीती.. पण त्या काळात त्यांना तारलं ते त्यांच्या माहेरच्या माणसांनी आणि त्यांच्या दुःखाला वाट मिळाली ती त्यांच्या कवितानं.. कालांतरानं नवराबायकोत पत्रव्यवहार सुरू झाला.. धर्मांतरानंतरची त्यांची झालेली भेट त्यांनी भावस्पर्शी शब्दात मांडलीय.. ह्या आत्मचरित्रात अनेक लोकांची गर्दी दिसून येते.. अनेक नावं अधून मधून डोकावत राहतात.. सुरुवातीला मी नावांचा संबंध लावायचा प्रयत्न केला पण तो नंतर सोडून दिला..
लक्ष्मीबाईंचं धर्मांतर.. टिळकांच्या बरोबर वावरताना अगदी टप्प्याटप्पानं, सहजपणे त्यांनी धर्मांतर केलं असं जाणवलं.. त्यांनी स्वतःमध्ये घडवलेला बदल, त्यांची विचारप्रक्रिया ‘दोघांचा एक संवाद’ या प्रकरणात वाचायला मिळतो.. पक्षी, प्राणी ह्यामध्ये जसा भेद नाही तास माणसांत पण नसावा.. ह्या विचारानं त्यांनी सगळ्या समाजाच्या हातचं खायला प्यायला हरकत घेतली नाही.. बदलत्या विचाराबरोबर बदलत जाणारा संसार आणि बदलत जाणारा समाजीक विचार याचं समर्पक चित्रण पहायला मिळतं.. त्याच्या उभयतांच्या स्वभावाबद्दल ‘फिकिरीची माळ माझ्या गळ्यात घातली व बेफिकिरीची माळ त्यांच्या गळ्यात घातली’ असं त्या लिहितात.. सेवाभाव, दुसऱ्यांना मदत करणं, येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी सदैव घर खुलं असणं, मानापमान-कीर्ती ह्याची पर्वा नसणं असे अनेक पैलू दिसून येतात..
'स्मृतिचित्रे'ची खासियत म्हणजे टिळकांच्या कवितांची, त्यांनी रचलेल्या अभंगांची लयलूट.. त्याचं ख्रिस्त धर्माचं लिखाण वाचताना त्या लिखाणावर हिंदू धर्माची पकड जाणवते.. त्यांनी सांगितलेला ख्रिस्त धर्म का हिंदी ख्रिस्त धर्म असल्यानं टिळक ख्रिस्त धर्मच्या मुख्य प्रवाहापासून लांब राहिले.. ‘ख्रिस्तायन’ हा ग्रंथ पूर्ण करण्याचा ध्यास टिळकांनी घेतला होता.. पण त्यांच्या मृत्यूनंतर तो अपुरा ग्रंथ लक्ष्मीबाईंनी पूर्ण केला.. टिळकांनी ‘ख्रिस्तायन’चे साडेदहा अध्याय लिहिले तर लक्ष्मीबाईनी तो ग्रंथ पुढे चौसष्ठ अध्याय लिहून पूर्ण केला.. एका अशिक्षित बाईनं हे काम अशा प्रकारे पूर्ण करावं.. ही केवढी मोठ्ठी विद्वत्ता!!
स्वतंत्र बाण्याच्या लक्ष्मीबाईंनी ठामपणे निर्णय घेत, कलंदर पतीशी, गरिबीशी झगडत स्वतःची बौद्धिक, अध्यात्मिक प्रगती केली ह्याला तोड नाही.. ‘स्मृतिचित्रे’ म्हणजे प्रांजळपणे व पारदर्शकपणे लिहिलेल्या आठवणी..
-मी मधुरा..
************************************************
३८. दास डोंगरी राहातो.. गो. नी. दांडेकर..
दास डोंगरी राहातो.. एका लोकोत्तर व्यक्तीमत्वाचा शोध घेणारं 'गो. नी. दांडेकर' यांचं हे अनोखं पुस्तक!.. श्रीसमर्थांचं लीळाचरित्र!!.. रामदासाचं चरित्र सांगणारी एक रसाळ कादंबरी..
पुस्तकाची सुरुवात होते ती अजुनी अंगाची हळद न निघालेल्या आणि नाशिकच्या रामाला भेटण्याची आस असणाऱ्या नारायणाच्या प्रवासानं!.. बोहल्यावर चढेपर्यंत तुझं सगळं ऐकेन हे नारायणानं आईला दिलेलं वचन आणि पुढं 'सावध रे सावध' या शब्दांनी त्याचं बदललेलं आयुष्य.. मनात वसणारा राम मंदिरातल्या मूर्तीत न दिसल्यानं कासावीस झालेला नारायण रामाचा शोध घेत नाशिकात राहतो.. हनुमानाच्या प्रेरणेनं नारायणाचा रामदास होतो.. मग धर्मशाळेत राहून, माधुकरी मागून, प्राचीन ग्रंथांचं वाचन अभ्यास करत त्याच वेगळं जीवन सुरु होतं.. यतींसमवेत शास्त्रचर्चा, मुनींशी परमार्थचिंतन, एकांतात रघुवीरस्मरण, प्रसंगी लहानमुलांबरोबर हास्यविनोद आणि त्यातून समाज प्रबोधन असा दिनक्रम.. नारायण ते रामदास ते रामदासस्वामी ते समर्थ असा हा त्यांचा प्रवास त्यांच्याच श्लोकातून, ओव्यांतून, काव्यांतून उलगडत जातो..
संसारात राहून परमार्थ कसा करावा हे सांगणारे समर्थ, स्वराज्याच्या पायाबांधणीत तितक्याच ताकतीने उभे होते.. निश्चयाचा महामेरू। बहुजनास आधारु। अखंड स्थितीचा निर्धारु। श्रीमंत योगी।।.. असे राजांबद्दल काढलेले उद्गार असतील किंवा मराठा तितुका मिळवावा।आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा।.. महाराष्ट्रधर्म, त्याचा कुलाचार सांगणं असो.. शिवाजी महाराज आणि रामदासस्वामी यांच्यातील प्रसंग गोनीदांनी खूप छान रेखाटले आहेत..
.. पण.. हे चरित्र अपूर्ण वाटते.. त्यांचा दासबोध लिहिण्यापर्यंतचाच प्रवास ह्यात आहे.. सज्जनगड आणि आणि त्यांचे शेवटचे दिवस नसल्याची रुखरुख वाटते..
-मी मधुरा..
************************************************
३९. अपूर्वरंग ४ जपान.. मीना प्रभू..
'पन्नास पुस्तकं' वाचन संकल्प.. पस्तीस पुस्तकं वाचून झाली तरी अजुनी प्रवासवर्णन वाचायचं राहिलंच.. पु.लं. नंतर फारशी प्रवासवर्णनं वाचलीच नाहीत.. कधीतरी एखादं दुसरं वाचलं असेल पण फारसं आवडलं नाही.. मी जसा प्रवास करायला लागले, वेगवेगळे देश फिरायला लागले तसं सुरुवातीला प्रवासाच्या टिपण्या, नोंदी नंतर प्रवासवर्णन लिहू लागले.. प्रवासवर्णन हे माहितीप्रत वर्णन असावं त्याचा शोऑफ होणार नाही ह्याची खबरदारी लिहिताना घेतली गेली पाहिजे.. आणि तेच कोठेतरी सोशल मीडियामुळं हरवताना दिसतंय.. असो.. तर डिसेंबर मधल्या भारतवारीत माझ्या गोड मैत्रिणीनं लतानं मला हे 'अपूर्वरंग ४ जपान' पुस्तक भेट म्हणून दिलं.. आणि माझी मीना प्रभूंशी ओळख झाली..
'अपूर्वरंग' या मालिकेतील हे शेवटचं पुस्तक!.. जपान.. पूर्व आशियाचा मुकुटमणी असणारा, शून्यातून उभा राहिलेला, अध्यात्म पासून ते तंत्रज्ञानापर्यंत वावर असणारा देश म्हणजे जपान.. जपानच काय पण इतर हि पूर्वेकडील देश मी अजुनी पाहिलेले नाहीत.. त्यामुळं ह्या देशाबद्दल, आपल्या भारतीय संस्कृतीच्या जवळ जाणाऱ्या संस्कृतीबद्दल वाचण्याची उत्सुकता होतीच.. आणि मीनाताईंच्या लेखणीनं ती पुरी पण झाली.. जपलेल्या श्रद्धाळू परंपरे बरोबरच वेगानं वाढणारं तंत्रज्ञान-आधुनिकीकरण यांची सांगड घालताना जपानी माणसाची होणारी धालमेल उदाहरण देऊन त्या सहज दाखवतात.. 'साकारा'च वर्णन तर केवळ अप्रतिम.. इकडं ही चेरी ब्लॉसम पाहिला आहे पण 'साकारा' पाहायला तरी जपानला जायलाचं हवं.. काही वेळा पाल्हाळ वाटलं तरी आपण त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष फिरतोय असं ही वाटलं..
आता अपूर्वरंग मधली बाकी तीन पुस्तकं ही सवडीनं नक्की वाचेन..
-मी मधुरा..
************************************************
४०. वंशवृक्ष.. डॉ. एस. एल. भैरप्पा..
अनुवाद.. सौ. उमा कुलकर्णी..
डॉ. एस. एल. भैरप्पा.. जेष्ठ कन्नड साहित्यिक.. आणि 'वंशवृक्ष' ही त्यांची 'कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार (१९६६)' विजेती कांदबरी!.. सनातन धर्मपरंपरा आणि आधुनिक काळातील बदलती जीवन-मूल्ये यांतील संघर्ष आणि त्यांचे कौटुंबिक पातळीवर उमटणारे भावकल्लोळ प्रभावीपणे चित्रित करणारी अशी ही कलाकृती.. साहित्य अकादमीचा पहिला अनुवाद पुरस्कार (१९८९) आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळणारी अशी ही कलाकृती!.. मराठीतील ह्या सन्मानांसाठी 'एस.एल.भैरप्पा'नी रेखाटलेल्या भक्कम व्यक्तीरेखा आणि मूळ कादंबरीतील रसोत्कटता अनुवादातही जशीच्या तशी ठेवण्याचं कौशल्य सौ. उमा कुलकर्णींचं!
वंशवृक्ष.. सनातन धर्म आणि परंपरेवर भाष्य करणारी तसेच आध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अंतर्दृष्टी असणारी संवेदनशील कादंबरी.. बहुपत्नीत्व, विधवा पुनर्विवाह, विवाह संस्कार, वंशवृद्धी असे बहुस्तरीय कथानक असणारी १९६५ सालातील ही कादंबरी त्या काळाच्या बराच पुढचा विचार मांडणारी.. अपत्त्यावर पहिला अधिकार कोणाचा?.. पित्याचा की मातेचा? बीजाचा की क्षेत्राचा?.. महाभारतापासून उद्भवलेला हा प्रश्न डॉ. भैरप्पानी आधुनिक काळाची पार्श्वभूमी घेऊन चर्चिला आहे.. वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्री-त्यांची पत्नी भागीरथम्मा-बालमैत्रीण लक्ष्मी, इतिहास संशोधक सदाशिव-नागलक्ष्मी करुणारत्ने आणि साहित्याचा प्राध्यापक राज-कत्त्यायनी नंजुंड यांच्या नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा हा प्रश्न कसाला लागतो तेव्हा भैरप्पांच्या प्रतिभेची उंची या कादंबरीत पानोपानी जाणवते..
वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्री, इतिहास संशोधक सदाशिव आणि आधुनिक विचारमूल्ये असणारी कत्त्यायनी असे तीन जीवनप्रवाह आणि ह्या जीवन प्रवाहातील अनेक पात्रं, आणि त्या पात्रांचा असणारा स्वतःचा दृष्टीकोन, त्यांची स्वतःची मूल्ये आणि सामाजिक मूल्ये ह्यांचा हा संघर्ष.. वैयक्तिक सुखाच्या पूर्ततेसाठी परंपरेनं प्रस्थापित सामाजिक मूल्यांना आव्हान केल्यानं होणारी नैतिक कोंडी याचं हे चित्रण.. वेदविद्यापारंगत श्रीनिवास श्रोत्रीची विधवा सून कात्यायनीनं स्वतःच्या सुखासाठी आपल्या तीन वर्षाच्या मुलाला मागं ठेवून पुनर्विवाह करणं.. इतिहास संशोधनाला मदत होईल म्हणून श्रीलंकन मुलीला सदाशिवनं द्वितीय भार्या म्हणून आणणं.. आणि श्रीनिवास श्रोत्रींची सनातन जीवनपद्धती आणि त्यांचं संन्यास घेणं.. आपल्या सुखांसाठी, महत्वाकांक्षेसाठी प्रत्येक पात्रांनी घेतलेले निर्णय त्या पात्रांना रंजक बनवतात..
३२२ पानांचं हे पुस्तक अक्षरशः दोन दिवसांत वाचून काढलं.. मूळ कन्नड भाषेतील हा 'वंशवृक्ष' संस्कृत, हिंदी, मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे..
-मी मधुरा..
************************************************
४१. तत्वमसि.. ध्रुव भट्ट..
अनुवाद.. अंजनी नरवणे..
'तत्वमसि'.. आशयघन कविता आणि गूढ-रहस्यमयी कादंबऱ्या लिहिणारे ध्रुव भट्ट यांची 'साहित्यिक अकादमी पुरस्कार' मिळालेली अजुनी एक कादंबरी!.. ह्या शृंखलेतील त्यांची तिसरी कादंबरी.. प्रत्येक कादंबरीचा विषय वेगळा, कथानक वेगळं.. तिथं स्वतः जाऊन, राहून, अनुभव घेऊन लिहिल्यानं सत्याच्या जवळ जाणारं कथानक.. कधी गीरचं अभयारण्य तर कधी गुजरात कच्छ भागातील पाड्या.. आता तत्वमसि मध्ये काय?.. नर्मदा नदी, नर्मदेच्या खोऱ्यात राहणारे आदिवासी, परिक्रमावासी, आश्रम.. आणि गूढ रहस्य..
ध्रुव भट्टांच्या शिरस्तेप्रमाणे कथानायकाला ह्या ही कादंबरीत नाव नाही.. तर, विदेशात राहणारा, जन्मानं भारतीय असणारा, 'मानव संसाधन विकास' (human resource development ) ह्या विषयाचा अभ्यास करणारा असा हा तत्वमसीचा कथानायक जो आपल्या अमेरिकन प्रोफेसरांच्या सांगण्यावरून आदिवासींबद्दल संशोधन करायला भारतात येतो.. काहीसा अनिच्छेनेच.. भावनांमध्ये वाहवत न जाणारा, तर्कसंगत विचार करणारा, देव आणि धर्म ह्या भ्रामक कल्पना मानणारा, विज्ञानवादी कथानायक माँ नर्मदेच्या सानिध्यात येतो आणि सुरु होतो त्याचा त्याला अंतर्बाह्य बदलणारा रहस्यमयी अद्भुत प्रवास..
अठरा वर्षांनी भारतात आलेला कथानायक नर्मदेच्या खोऱ्यात असणऱ्या जंगलातील आदिवासी विकास केंद्रात दाखल होतो तोच मनात आदिवासींबद्दल पूर्वग्रह घेऊन.. दगडाला देव मानणारे, नर्मदा नदीला देवी मानणारे हे अडाणी आदिवासी.. ज्यांच्याशी त्याचा काहीच संबंध नाही.. जायचं, राहायचं, संशोधन करायचं आणि उपकाराखातर एक शाळा सुरु करून त्यांना थोडं शहाणं करायचा प्रयत्न करायचा आणि अमेरिकेला परतायचं.. पण जेव्हा त्याचा आदिवासी जीवनाशी जवळून संबंध येतो तेव्हा त्याचं आयुष्य ठवळून निघतं.. मी कोण? माझं भोवतालचं जग आणि माझी त्याच्याशी असलेली बांधिलकी कोणती? श्रद्धा असावी का नसावी? भारतीय संस्कृती म्हणजे काय? मुक्ती, पुण्य म्हणजे काय?.. असे पूर्वी न पडलेले प्रश्न त्याला पडतात..
एकमेकांसाठी जगणारी, तडजोड करणारी, वेळ प्रसंगी परक्यांना ही आयुष्यभरासाठी आश्रय देणारी माणसं.. उच्चशिक्षित पण केवळ आपल्या आईबाबांचा वारसा चालवण्यासाठी आदिवासी लोकांची निस्वार्थपणे सेवा करणारी सुप्रिया.. एका दुर्गम खेड्यातील शाळा बंद होऊ नये म्हणून प्रयत्न करणारे विष्णू गुरुजी आणि शाळेत येणाऱ्या उपाशी पोरांना जेवू घालणारी त्यांची पत्नी विद्या.. निराधार स्त्रियांचे रक्षण आणि पोषण करणारी कालेवाली माँ.. निःशुल्क तत्वावर लोकांचा उपचार करणारे वैद्य.. संस्कृती, धर्म आणि मानवता ह्याचे रहस्य उलगडून सांगणारे शास्त्रीजी.. तारण ठेवायला ज्यांच्याकडं काहीच नाही अश्या आदिवासीना कर्ज देणारे गुप्ताजी आणि त्याचं कर्ज फेडायला येणारे आदिवासी.. असे अनेक असामान्य लोक.. निबिड अरण्यात राहताना ह्या आदिवासींमध्ये असणाऱ्या श्रद्धा-अंधश्रद्धाच बळ देतात.. विश्वास ठेवणं, श्रद्धा असणं म्हणजे अडाणी नाही.. एकेमेकांना साथ देणारे, प्रामाणिक, परंपरेनं आखून दिलेल्या मार्गावर निष्ठेनं चालणारे आदिवासी किती खरे आहेत ह्याचा अनुभव त्याला येतो..
'नर्मदा परिक्रमा'.. नर्मदा परिक्रमावासी.. आणि त्यांची सेवा करणारे खोऱ्यातील आश्रम.. आणि ही संस्कृती जपून ठेवायला मदत करणारे आदिवासी.. हे सगळं पाहताना कथानायक गोंधळून जातो.. परिक्रमेमध्ये कधीतरी होणारे नर्मदेचे प्रत्यक्ष दर्शन ही त्याला अंधश्रद्धा वाटते.. 'श्रद्धा अंधश्रद्धेपेक्षा संस्कृती जपणं महत्वाचं' ह्या सुप्रियानं दिलेल्या उत्तरानं तो अजूनच भांभावून जातो आणि स्वतः अनुभव घ्यायचं ठरवतो आणि त्याला नर्मदेचं असणं जाणवतं.. नर्मदेची परिक्रमा करता करता आपणच नर्मदा होणं किंवा सगळीकडं नर्मदाच दिसणं.. म्हणजे नर्मदा ह्या तत्वाशी समर्पण.. म्हणजेच तत्वमसि..
'तत्वमसि' कादंबरीवरील 'रेवा' ह्या गुजराती चित्रपटाला २०१८ मध्ये राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं आहे..
-मी मधुरा..
************************************************