४९. युगांत.. महेश एलकुंचवार..
युगांत.. नाटककार महेश एलकुंचवार यांची 'वाडा चिरेबंदी'-'मग्न तळ्याकाठी'-'युगांत' अशी तीन नाटकं असलेली नाट्यत्रयी.. आठ-नऊ तासांची ही नाट्यत्रयी करण्याचं धाडस दिग्दर्शक चंद्रशेखर कुलकर्णी, लेखक महेश एलकुंचवार आणि निर्माते अरुण काकडे करू जाणे.. १९९४ साली हे नाटक रंगभूमीवर आलं आणि मराठी नाट्य रसिकांनी ह्या अनोख्या नाट्यप्रयोगाला बऱ्यापैकी प्रतिसाद पण दिला.. हे नाटक मला पाहायला जरी मिळालं नसलं तरी २८-२९ वर्ष उशिरा का होईना वाचलं तरी.. 'बेटर लेट देन नेवर' असं नक्कीच वाटलं..
विदर्भातील धरणगावकर देशपांडे कुटुंबातील तीन पिढय़ांचं असलेलं हे चित्रण.. 'वाडा चिरेबंदी' मध्ये कुटुंबप्रमुख व्यंकटेश उर्फ तात्याजी निवर्तल्यानंतर त्यांची पत्नी, तीन मुलगे आणि एक मुलगी यांच्यातील मानसिक-भावनिक संघर्ष पाहायला मिळतो तर 'मग्न तळ्याकाठी' मध्ये तिसऱ्या पिढीतील.. 'युगांत' हा थोडासा निराशावादी, फिलोसोफिकॅल.. ह्या त्रियीचे काळ, विषय, प्रसंग म्हटलं तर वेगळे नि म्हटलं तर एकमेकात गुंतलेले.. शहर-खेडं, जगण्यातलं कटू वास्तव आणि त्याच बरोबर जपलेला खानदानी खोटा बडेजाव, मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था, सरकारी अनास्था, आर्थिक आणि सामाजिक विदारक परिस्थिती आणि त्यामुळं होणारी स्थित्यंतरं.. आणि ह्या भोवतालच्या परिस्थितीला शरण गेलेली नाटकातील पात्रं.. सगळीच ना पूर्ण चांगली ना पूर्ण वाईट..
पुस्तक वाचताना प्रसंग अक्षरशः डोळ्यासमोर उभे राहतात.. पुस्तकाच्या सुरुवातीलाच कलाकार आणि त्यानं साकारलेलं पात्र अशी ओळख करून दिल्यानं, नाटक वाचताना प्रत्येक पात्राला एक चेहरा, लकब, आवाज मिळतो.. आणि ते पात्र सजीव होऊन वावरू लागतं..
सुनील बर्वेंनी 'युगांत' ह्या नाट्यत्रयीला ही पुनर्जीवन दिलं तर काय मज्जा येईल..
-मी मधुरा..
************************************************
५०. पर्व.. डॉ. एस. एल. भैरप्पा..
अनुवादिका.. सौ. उमा कुलकर्णी..
पन्नास पुस्तकांच्या वाचन संकल्पातील हे पन्नासावं पुस्तक!.. खूप वेगवेगळे लेखक, लेखनप्रकार, लेखन विषय वाचायला मिळले.. याबद्दल सविस्तर नंतर लिहीनच..
डॉ. एस. एल. भैरप्पा, जेष्ठ कन्नड साहित्यिक यांचं मी वाचलेलं हे दुसरं पुस्तक.. 'वंशवृक्ष' वाचून अक्षरशः भारावले होते मी.. 'महाभारत' आणि 'डॉ. एस. एल. भैरप्पा'- काय नवीन लिहिलं असेल ह्यांनी?.. ह्याची खूप उत्सुकता होती.. ७७६ पानांची ही कादंबरी.. आभाळा एवढ्या उंचीची पात्रं, त्यांची जीवनमूल्यं, त्याचे संघर्ष, चमत्कार-शाप-वरदान या पलीकडं जाऊन प्रत्येक पात्राचा घेतलेला शोध.. मानववंशशास्त्र, समाजशास्त्र यातून त्यांच्या वर्तनाची लावलेली संगती.. महाभारताची विलक्षण प्रत्ययकारी अनुभूती देणाऱ्या ह्या कलाकृतीचा रसपूर्ण, सहज सुंदर मराठी अनुवाद केलाय सौ. उमा कुलकर्णी यांनी..
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर वयोवृद्ध भीष्म, रथात उभा कृष्ण आणि काहीतरी विचार करणाऱ्या द्रौपदीचा चेहरा.. आत्ता काहीतरी ते सांगतील, बोलतील असा.. कधी एकदा हे पुस्तक वाचेन असं झालं होतं.. पण वाचलेलेच विषय, व्यक्तिचरित्र ह्या संकल्पात वाचायचे नाहीत ठरवल्यानं मागं पडलेलं हे पुस्तक शेवटी वाचायला घेतलंच.. महाभारत युद्ध आणि त्या मागची थोडी पार्श्वभूमी असं कथानक असलेलं हे 'पर्व'.. प्रत्येक पात्राच्या नजरेतून, आठवणींतून लिहिलं गेलेलं.. आणि पुढं पुढं सरकत जाणारं.. एखाद्या साखळी सारखं.. भीष्म, कृष्ण, कुंती, द्रौपदी, कर्ण, पांडव, दुर्योधन, धृतराष्ट्र, सात्यकी, विदुर अशी अनेक पात्रं येत जात राहतात.. थोडक्यात 'पर्व' म्हणजे ह्या कथानायकांच्या नजरेतून घडलेलं महाभारत युद्ध..
महाभारत म्हटलं कि समोर उभी राहतात ती अनेक पात्रं.. त्यांच्या अनेक बाजू.. अनेक विचार.. अनेक कथा.. आणि त्यातून आपल्या मनांत रेखाटल्या गेलेल्या त्यांच्या प्रतिमा.. काही काळ्या तर काही पांढऱ्या.. काही देवतुल्य तर काही दुष्ट, राक्षसी.. पण 'पर्व' मध्ये भैरप्पांनी या सर्व पात्रांना माणूस म्हणून एकाच पातळीवर तोललं आहे.. त्यांच्या चुका, त्यांच्यातील कमकुवतपणा, त्यांच्यातील धाडस शक्ती, त्यांनी केलेलं काम त्यामागची त्यांची विचारधारा याचा अभ्यास करून.. आणि हीच ह्या पुस्तकाची जमेची बाजू.. जी इतर महाभारत पुस्तकांपेक्षा 'पर्व' ला वेगळं करते.. यांत कोणी देव नाही, कोणाला उगीचच मोठठं केलं नाही.. षडरिपूनी बनलेला माणूस म्हणून सगळ्यांकडं पाहताना कुठं ही मूळ गाभ्याला धक्का लागलेला नाही.. प्रेम, वासना, मनाची गुरफट यातून कादंबरीला वेगळीच दिशा मिळते.. ही एक कादंबरी आहे.. महाभारताचा अभ्यास किंवा त्यातील बारकावे नाहीत हे मात्र लक्षात घेऊन वाचायला हवे..
सुरुवातीची ५०० पानं तहानभूक हरपून वाचून काढली.. पण कादंबरीत जसं युद्ध सुरु झालं तशी ती रटाळ होऊ लागली.. हळूहळू पकड ढिली झाली.. आणि नुसत्या ओळी वाचून पुस्तक संपवलं..
-मी मधुरा..
************************************************