Wednesday, April 9, 2025

अध्याय १ 'अर्जुनविषादयोग'

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय १ 'अर्जुनविषादयोग'



अध्यायाची सुरुवात होते महाराज धृतराष्ट्राच्या प्रश्नानं.. कुरुक्षेत्रावर होणाऱ्या युद्धाच्या उत्सुकतेपोटी महाराज संजयला प्रश्न विचारतात.. संजय- महाराज धृतराष्ट्राचा सारथी- ज्याला वेदव्यासांकडून दिव्यदृष्टीचं वरदान मिळलं आहे.. ह्या दिव्यशक्तीचा उपयोग संजय फक्त आणि फक्त युद्धभूमी कुरुक्षेत्रावर काय घडतं हे सांगण्यासाठीच करणार आहे.. 

४७ श्लोक संख्या असलेला हा अध्याय दोन भागात विभागलेला आहे.. पहिल्या भागात संजयच्या तोंडी युद्धभूमीचं वर्णन, कौरव-पांडव दोन्ही पक्षातील शूरवीरांची नावं, शंखध्वनी, दुर्योधन-अर्जुन यांनी केलेलं सैन्याचं निरीक्षण तर दुसऱ्या भागात फक्त अर्जुनविषाद.. दोन्ही बाजूचं अफाट सैन्य पाहून, युध्दामुळं होणाऱ्या भयानक संहाराची कल्पना आल्यावर, अर्जुनाच्या मनातील भावकल्लोळ म्हणजेच अर्जुनविषाद.. अशी ह्या अध्यायाची थोडक्यात मांडणी..

तर महाराज धृतराष्ट्र संजयला विचारतात,
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥१।। 
युद्धाला उत्सुक असणारी माझी आणि पांडूची मुलं धर्मक्षेत्र (सरस्वती यमुना संगम क्षेत्र) असणाऱ्या कुरुक्षेत्रावर काय करत आहेत? 
जन्मांध असलेला धृतराष्ट्र, दुर्दैवानं पुत्रप्रेमानं ही आंधळा झाला असला तरी बुद्धीनं, मनानं आंधळा नक्कीच नाही.. त्याला पूर्णपणे माहिती आहे की दुर्योधन अधर्मी आहे.. आणि शेवटी धर्माचाच विजय होणार आहे.. तरीही पुत्रहट्टापोटी 'शांती' ऐवजी 'युद्धा'चा निर्णय घेतल्यानं ह्या धर्मयुद्धाबद्दलची थोडी भीती, थोडी उत्सुकता, थोडी विवशता त्यांच्या वागण्यातून जाणवते.. म्हणूनच महाराज धृतराष्ट्र संजयला, दुर्योधन आणि पांडव काय करत आहेत? अशी हेतुपूर्वक विचारणा करतात.. 

विषण्ण आणि उद्विग्न झालेल्या आपल्या महाराजांना संजय सांगतो, "पांडवांच्या सैन्याची पाहणी करून, युवराज दुर्योधन, गुरुवर्य द्रोणाचार्यांकडं युद्धभूमीवरील परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेले आहेत.. आज पहिल्या दिवशी पांडवांनी, द्रुपदकुमार 'द्रुष्टद्युम्न'च्या नेतृत्वाखाली युद्धाची व्युहरचना केली आहे..".. युद्धात व्युहरचनेला खूप महत्व आहे. व्युहरचना म्हणजे सैन्याची अशी रचना की ज्यात शत्रूला घुसणं असंभव आणि घुसता आलंच तर बाहेर पडणं केवळ अशक्य! 

पुढं संजय सांगतो, "युवराज दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांना सांगत आहेत की पांडवांच्या सैन्यात भीमार्जुनासारखेच पराक्रमी आणि महान शूरवीर, *युयुधान, *विराट आणि *द्रुपद ह्यासारखे महारथी आणि *चेतिकान, *धृष्टकेतू, *काशीराज असे पराक्रमी राजे आहेत.. तसेच सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू आणि पाच *द्रौपदीपुत्र जे पराक्रमी आहेत".. 

युद्धभूमीवर काय घडतं आहे हे सांगताना संजय म्हणतो...  

पांडवांच्या सैन्याचा आढावा घेऊन झाल्यावर, दुर्योधन त्याच्या सैन्यातील पराक्रमी, रथी, महारथींवर नजर टाकतो.. शत्रूपक्षाचं जसं परीक्षण केलं तसंच तटस्थपणे स्वतःच्या सैन्याचं परीक्षण करताना तो गुरु द्रोणाचार्यांना म्हणतो, "आपल्या सैन्यात तुम्ही स्वतः, पितामह भीष्म, कर्ण, सदाविजयी कृपाचार्य, अश्वथामा, *विकर्ण, *भूरिश्रवा असे युद्धात नेहमी विजयी होणारे महारथी आहेत.. तसेच ह्या सगळ्या शूरवीर, रथी-महारथी बरोबरच, माझ्यासाठी जीवाची पर्वा न करणारे अनेक राजे, महाराजे सैन्यात आहेत.. " असं म्हणून गर्वानं दुर्योधन आपल्या अवाढव्य सैन्येवर नजर टाकतो.. 

दुर्योधन दोन्ही पक्षाच्या शक्तीचा तुलनात्मक अंदाज घेत अहंकारानं म्हणतो की, कुरुसैन्याचं नेतृत्व पितामह भीष्म करत आहेत तर त्या पांडव सैन्याचं नेतृत्व भीम.. पितामह भीष्मांसारखा महानुभवी महायोद्धा रक्षक असल्यानं कौरवसैन्याची शक्ती अपरिमित आहे.. पितामहांच्या उपस्थितीत भीम नगण्यच असल्यानं पांडव सैन्याला अगदी सहज हरवू शकू.. जोवर पितामह भीष्म आहेत तोवर कुरुसैना अजय आहे.. त्यामुळं पितामहांच्या सुरक्षिततेची सूचना देत त्यांना पूर्ण सहाय्य करा असं सांगतो..

दुर्योधनाच्या वक्तव्यानं आनंदीत पितामहांनी सिंहगर्जनेसमान आपला शंख वाजवून युद्धाची घोषणा केली.. 
सर्वात जेष्ठ असणाऱ्या पितामहांनी कौरवांकडून युद्धघोषणा केल्यावर आता पांडवांकडून ही युद्धघोषणा झाली.. पांढऱ्या शुभ्र घोडांच्या रथावर असलेल्या श्रीकृष्णानं प्रथम आणि नंतर अर्जुनानं आपले अलौकिक शंख वाजवून उत्घोषणा केली.. श्रीकृष्णानं पांचजन्य, अर्जुनानं देवदत्त, भीमानं पौंड्र, युधिष्टीरानं अनंतविजय, आणि नकुल सहदेवानी सुघोष आणि मणिपुष्प नामक शंख वाजवले.. महाधनुर्धर काशीनरेश, श्रेष्ठ योद्धा शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, अपराजित सात्यकी, द्रुपद, द्रुपदीचे पुत्र, सुभद्रेचा महाबाहू पुत्र यांनी आपापले शंख वाजवले.. प्रत्येक शंखाचा वेगळा नाद, प्रत्येकाची उपस्थिती दाखवत होता..

नंतर इतर योद्ध्यांची शंख, ढोल, भेरी, नगारे, तुताऱ्या, रणशिंगे अशी रणवाद्य एकत्र वाजू लागली.. ह्या भयावह आवाजानं धरणी आकाश कंपायमान झालं.. पांडवपक्षाच्या बाजूनं करण्यांत आलेल्या शंखध्वनीमुळं धृतराष्ट्रपुत्रांची हृदयं विदीर्ण झाली..   

हनुमानाचं चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ अर्जुन धनुष्यबाण हाती घेऊन लढावयास सिद्ध होतो.. आणि युद्धासाठी सुसज्ज असलेली कुरुसैना पाहून, श्रीकृष्णाला त्यांचा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध घेऊन जाण्यास सांगतो.. जेणेकरून तो संपूर्ण कुरुसैन्याचं निरीक्षण करू शकेल.. कोणाकोणाशी त्याला युद्ध करायचं आहे याचा अंदाज घेऊ शकेल.. दुर्बुद्धी दुर्योधनाच्या हट्टापायी सुरु झालेल्या युद्धात त्याला साथ देण्यासाठी आलेल्या शूरवीर, महारथींना तो पाहू शकेल.. 

अर्जुनाच्या सांगण्यानुसार श्रीकृष्ण दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ उभा करतात.. कौरवांच्या सैन्यात पितामह भीष्म, सोमदत्त-भूरिश्रवा सारखे पितातुल्य व्यक्ती, द्रोणाचार्य-कृपाचार्य सारखे गुरु, शल्य-शकुनी सारखे मामा, दुर्योधन-विकर्ण सारखे भाऊ, लक्ष्मणा सारखे पुत्र, अश्वत्थामा सारखा मित्र, कृतवर्मा सारखे हितचिंतक आणि बाकी सगळे सगेसोयरे पाहून अर्जुन करुणेनं व्याकुळ होतो.. ह्या धर्मयुद्धात एक मोठ्ठा परिवार दुभागाला गेला होता.. काही आप्तस्वकीय एकीकडं तर उरलेले दुसरीकडं.. प्रत्येकाला निर्णय घ्यायचा होता.. कोणाकडून युद्ध करायचं?? काहींनी तो निर्णय स्वखुशीनं घेतला, तर काहींनी भीतीपोटी तर काहींनी इतर काही कारणास्तव.. पण हे सगळे ह्या युद्धात ओढले गेले होते.. हे सगेसोयरे, हितचिंतक, मित्रपरिवार काही त्याचे शत्रू नव्हते, मग ह्या सगळ्यांबरोबर युद्ध का करायचं? ह्या विचाराबरोबरच अर्जुनाचा विषाद सुरु होतो..

सगळ्या आप्तस्वकीयांना युद्धासाठी सज्ज पाहून अर्जुनाची गात्रं क्षीण झाली, तोंड कोरडं पडलं, शरीराला कंप सुटला आणि गांडीव धनुष्य हातातून गळून पडलं.. त्याच्या सर्वांगाचा दाह झाला, मन भरकटू लागलं आणि त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं.. 
हे युद्ध कशासाठी लढलं जातंय?... इतका संहार खरोखर अपरिहार्य आहे का?.. राज्य मिळवण्यासाठी आपल्याच बांधवांना मारणं हा धर्म आहे का?.. जर असेल तर अधर्म म्हणजे काय?.. हिंसा टाळणं धर्म कि अधर्म?.. नेमका कोणता धर्म पाळायचा?.. ह्या संहारानं राज्यसुख मिळेल पण बांधवांच्या मृत्यूचं दुःखही.. तर मग सुख-दुःख म्हणजे नक्की काय?.. संहार करणं हे पाप असेल तर मग हे धर्मयुद्ध कसं?... माझ्या हातून पाप होतंय हे कळतंय, ह्यामुळं माझ्या संपूर्ण कुळाचा नाश होणार हे दिसतंय मग मी हे युद्ध का करू?

.. आणि शेवटी "हे युद्ध करण्यापेक्षा, दुर्योधनाकडून असा मी निहत्ता असतानाच मारला गेलो तर मला जास्ती आनंद होईल.." असे म्हणून अर्जुन त्याच्या रथाच्या मागील बाजूस हताश होऊन बसतो...

हे हताश होणं अर्जुनाच्या दुर्बलतेमुळं लक्षण नाही तर त्याच्यातील सहृदयतेचं लक्षण आहे..  कितीही हताश झाला तरी त्याला त्याच्या सामर्थ्यावर विश्वास आहे.. त्यानं जर युद्ध केलं तर तो ते जिंकेलच हा आत्मविश्वास पण आहे.. पण त्या युद्धासाठी द्यावी लागणारी आप्तस्वकीयांची आहुती त्याला मान्य नाही आणि हाच त्याचा विषाद आहे.. आणि इथचं अध्यायाची सांगता होते.. 

तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं ह्या अध्यायात विशेष काहीच नाही.. युद्धभूमी आणि भयानं ग्रासलेल्या अर्जुनाचे प्रश्न इतकंच काय ते.. मग केवळ गीतेचा पहिला अध्याय म्हणून, भगवद् गीतेचं कथानक म्हणून हा महत्वाचा आहे का?.. तर नक्कीच नाही.. ह्या अध्यायात सातत्यानं अर्जुनाचा विलाप मांडला असल्यानं हा अध्याय एक रडगाणं आणि अर्जुन एक भावनिकमूर्ख असं वाटू शकतं.. पण दृष्टीकोन बदलला तर अर्जुनाचा विवेक दिसून येतो.. त्याच्याकडं असणारी योग्य-अयोग्य जाणण्याची बुद्धी, चांगल्या वाईट परिणामांचा पुरेसा विचार करण्यासाठी असणारा संयम दिसून येतो.. 

रथी-महारथी, योद्धे अपरिमित शक्ती आणि दिव्यास्त्रांनी सज्ज होते.. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या स्वार्थानं, सूडानं पेटलेला होता.. पण ह्या युध्दामुळं होणाऱ्या संहाराचं भान ह्यांतील किती जणांना होतं? फक्त एकटा अर्जुनच युद्धाची आणि संहाराची परिहार्यता पडताळून पहात होता.. तो दुबळा किंवा कमकुवत मनाचा आहे म्हणून नाही तर त्याला त्याच्या संहारक क्षमतेवर दृढ विश्वास होता म्हणून.. संहाराच्या विपरीत परिणामांची त्याला जाणीव होती म्हणून.. त्यामुळंच फक्त सर्वशक्तिशाली योद्धा म्हणूनच नव्हे तर परिपक्व, प्रगल्भ, विवेकी अर्जुन ह्या अध्यायात दिसून येतो..

केवळ आपला सखा केशव 'युद्ध कर' म्हणतो म्हणून त्यानं युद्ध केलं नाही.. कारण त्याला युद्धाच्या नैतिक उत्तरदायित्वाची जाणीव होती.. त्यामुळं प्रत्येक दृष्टिकोनातून समाधानकारक उत्तरं मिळाल्याशिवाय त्याला शस्त्र उचलायची भीती वाटत होती.. त्याच्या या विषादाच्या समाधानासाठी श्रीकृष्णासारख्या परमावताराला सुद्धा १७ अध्याय विस्तृतपणे मांडावे लागले.. ते केवळ अर्जुनासारखा जिज्ञासू, ज्ञानाचा उपासक होता म्हणूनच.. कारण जितकी जिज्ञासा मोठी तितका ज्ञानाचा आवाका ही!..
थोडक्यात, भगवद् गीता ही अर्जुनाच्या विषादाचं, जिज्ञासेचं फलित आहे..  

कुरुक्षेत्री धर्मयुद्ध होतसे

संजय सांगितो धृतराष्ट्रासी

आप्तेष्टा पाहूनी विषाद होई

अर्जुन टाकीतो धनुष्यासी ।।१।। 


हरी  तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  

    

*अध्यायांत उल्लेखलेले शूरवीर..
  • युयुधान : यादव सैन्यातील एक प्रमुख सेनापती व कृष्णाचा परम भक्त/सारथी (सात्यकी).. जो संपूर्ण युद्धकाळ (१८ दिवस) युद्धभूमीवर होता.. 
  • विराट : मत्स्य नरेश.. पांडव अज्ञातवासात तिथंच होते.. विराट कन्या उत्तराचा विवाह अर्जुन पुत्र अभिमन्यूशी झाला होता.. 
  • धृष्टकेतू : चेदी नरेश.. शिशुपालचा पुत्र.. १४ दिवशी द्रोणाचार्यांकडून मारला गेला..
  • चेकीतान : धृष्टकेतूचा पुत्र.. शेवटच्या दिवशी दुर्योधनाकडून मारला गेला.. 
  • पुरुजित : कुंतिभोजचा पुत्र, कुंतीचा भाऊ.. द्रोणाचार्यांकडून मारला गेला..
  • शैब्य : शिबी नरेश पुत्र.. कृष्ण भार्या मित्रविंद्या चं घराणं 
  • युधामन्यू आणि उत्तमौजा : पांचलातील वीरबंधू 
  • सौभद्र : सुभद्राचा पुत्र अभिमन्यू 
  • द्रौपदेय : द्रौपदी पुत्र.. प्रतिविंध्य, सुतसोमा, श्रुतकर्म, शतानिका, श्रुतसेन.. अश्वत्थामाकडून मारले गेले.. 
  • विकर्ण : १०० कौरवांतील एक.. 
  • सोमदत्ति : बहालीक नरेश सोमदत्ताचा पुत्र.. भूरिश्रवा 
  • अर्थातच द्रोणाचार्य, भीष्म, द्रुपद, भीम, अर्जुन, काशी नरेश, कुंतीभोज, कर्ण, अश्वत्थामा यांचा ही उल्लेख आहे..   



-मी मधुरा.. 

************************************************


No comments:

Post a Comment