ॐ
सातव्या अध्यायात श्रीभगवान चराचरांत असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचं स्वरूप सांगतात.. एकदा का हे ज्ञान प्राप्त झालं कि ज्ञानी व्यक्तीला आपल्यात असणारं ईशतत्व चराचरांत वास करत असल्याचा प्रत्यय येतो.. आणि असे हे ज्ञान, प्रापंचिक ज्ञान आणि ब्रह्मज्ञान रूपानं उकलून ही सांगतात.. परा-अपरा तत्व, साधक आणि त्याच्या नानाविध भक्तीचे मार्ग सांगून अध्यायाची सांगता करताना श्रीभगवान म्हणतात,"जे मला भौतिक सृष्टीचा संचालक (अधिभूत), देवतांचा नियंत्रक (अधिदैव), सर्व यज्ञांचा अद्धिदाता भगवंत (अधियज्ञ) म्हणून जाणतात ते अंतसमयी पण मला जाणू शकतात".. ह्या वक्तव्यानं विचारात पडलेल्या अर्जुनाच्या प्रश्नानं "अक्षरब्रह्मयोग" ह्या अध्यायाची सुरुवात होते.. हा अध्याय मुख्यत्वेकरून, सर्वोच्च अविनाशी तत्व जे 'ब्रह्म', मूर्त आत्म्याचं अस्तित्व म्हणजे 'अध्यात्म', मनुष्याची उत्पत्ती आणि विकास ज्यावर अवलंबून असतो ते 'सकामकर्म' यावर भाष्य करतो.. मृत्युसाठीचा योग्य-अयोग्य काळ आणि त्याचा मुक्ती आणि पुनर्जन्म ह्याच्याशी असणारा संबंध सांगून ह्या अध्यायाची सांगता होते..
नको गोंधळून जावू पार्था, सांगतो तुज ब्रह्माण्ड गुपित
श्रेष्ठ अविनाशी जीव असतो ‘ब्रह्म’ अन अस्तित्व ‘अध्यात्म’
शब्द, मन, शरीर, इंद्रिये हे जीवात्म्याचे अध्यात्म तू जाण
अन सकाम कर्मे त्याची असती देहाच्या उत्पत्तीचे कारण ।।१।।
विनाशी अशी भौतिक प्रकृती म्हणती त्यास ‘अधिभूत’
देवदेवता ग्रहलोक सामावता होते विराट ‘अधिदैवत’
‘अधियज्ञ’ जो भावनासागर कर्मसाक्षी भगवंत
देहामध्ये राहून करतो जीवात्म्यास सोबत ।।२।।
अर्पून मन-बुद्धी भगवंताठायी सदैव त्याचे स्मरण
अंतकाळी नाम घेता होशील परमात्म्यात विलीन
प्रयाणकाले स्मरण ज्याचे त्या स्वरूपा पावे
करता प्राण स्थिर अंजचक्रे योग अन एकाग्रभावे ।।३।।
ब्रह्म जरी अद्वितीय तरी अनेक अभिव्यक्ती रूप
प्रत्येक रुपा संगे जोडला पुनः परतीचा लोक
ब्रह्मदेवा सुद्धा नाही चुकला जन्म-मृत्यूचा फेरा
पुनर्जन्म न कधी धडे जाता निजधामी जीवात्मा ।।४।।
अनंत भक्ती जरी होतसे प्राप्ती निजधामाची
पुनर्जन्म का मोक्ष ठरवे वेळ देहत्यागाची
अंधारातून प्रयाण म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा
अन प्रकाशातून जाते भगवंतप्राप्तीच्या द्वारा ।।५।।
जाणूनी हा 'अक्षरब्रह्मयोग' प्रभुमुखातून
पाहू परमात्मा स्वरूप, अंतसमयी जपता भगवंत नामस्मरणातून
करुनी सेवा, सकाम कर्मे, भजन, कीर्तन अन सगुण ध्यानधारणा
हरी ॐ तद् सद्
॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
********************
No comments:
Post a Comment