Monday, May 30, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं.. (पुस्तकं १ ते ५)

 . ओंकाराची रेख जना.. मंजुश्री गोखले.. 




स्त्री आणि शूद्र असून ही युगप्रवर्तक अभंगरचना करणाऱ्या संत जनाबाईं यांची जीवनयात्रा.. 

भागवत संप्रदायातील पहिली स्त्री संत.. संत जनाबाई.. यांच्या बद्दल फारशी माहिती नसल्याने कुतूहलापोटी हे पुस्तक विकत घेतलं.. नुकतंच पुणे-सासवड वारीत चालल्याने ह्या भागवत संप्रदायातील माऊलींना भेटून प्रभावित ही झाले होते.. साल होते २०१८.. वाचू वाचू म्हणून मागं पडलेलं पुस्तक ह्या निमित्त्यानं हातात घेतलं.. हातात घेतलं खरं.. पण त्याची फिकट पिवळ्या रंगाची पाने पाहून, एकदा मनात विचार आला.. हे राहूदे सध्या दुसरं कोणतं तरी वाचू.. पण ह्या ५० पुस्तकं वाचण्यामागं कोणतं ही पुस्तक.. नो बार.. असल्यानं वाचायचंच असं ठरवलं.. आणि मी वेड्यासारखी वाचतच बसले.. दोन दिवसांत ३०८ पानांची कादंबरी मी वाचून काढली.. पहाटे २-३ वाजेपर्यंत वाचलेली अलीकडची पहिलीच कादंबरी.. लेखिकेच्या ओघवत्या लेखणीची कमाल कि ह्या प्रतिभावंत संत जनाबाईच्या जीवनपटाची.. 

संतांची चरित्र असतात पण संत जनाबाईचा आयुष्यपट इतक्या छान खुबीने कथानकात गुंफला आहे की ह्याला कादंबरी म्हणावंसं वाटलं.. कथानकाला थोडं वजन येण्यासाठी एक काल्पनिक पात्र 'भागाबाई' काहीसं नकारात्मक असं दाखवलं आहे.. 

कथा आहे १२व्या शतकातील.. एका अस्पृश्य कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या जनेला तिचे वडील पंढरपुरात दामाशेटीच्या (संत नामदेवांचे वडील) घरी आणून सोडतात.. नामदेवांच्या बरोबर सावलीसारखी राहून त्यांच्याबरोबर भक्तिमार्गावर चालत राहून तिचे जीवन कसं सार्थकी लागतं.. इतकीच काय ती कथा.. त्यांच्या ओव्यांभोवती ही  कथा अगदी बेमालूमपणे गुंफली आहे.. 

'जनी म्हणे जोड झाली विठोबाची।दासी नामाची म्हणोनिया।.. ही जनाची पहिली ओळख.. दासी ह्याचा अर्थ सेवा करणारी शिष्या.. नंतर ती तिच्या अश्या अनेक ओव्यां- अभंगातून भेटत राहते.. विठ्ठलाची निस्सीम भक्त होऊन तर कधी त्याची सखी होऊन तर कधी 'बाप रखुमाई वर। माझे निजाचे माहेर। असं म्हणत एक अल्लड मुलगी बनून.. 

संत ज्ञानेश्वरांनी जनाबाईंना पहिल्यांदा संत म्हणून संबोधलं आणि तीच कीर्तन ऐकल्यावर तिला 'ओंकाराची रेख' म्हणून नावाजलं ही!!.. हे सगळेच प्रसंग खूप कलात्मकरित्या लिहिले आहेत.. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताई यांचे जन्मशक सांगणारा अभंग.. एक ऐतिहासिक दस्तावेज.. 
शालिवाहन शके।अकराशे नव्वद।
निवृत्ती आनंदे। प्रगटले।।
त्र्यानवाच्या साली। ज्ञानेश्वर प्रगटले।
सोपान देखिले।शहान्नवात।।
नव्व्यान्नव साली। मुक्ताई देखिली।
जनी म्हणे केली। मात त्यांनी।।

असे अनेक अभंग ओव्या वाचायला मजा येते.. परत परत वाचाव्याशा वाटतात.. 

ज्ञानेश्वरांनी जनाबाईंना ओंकाराची रेख म्हटलं पण त्याचा अर्थ लेखिकेनं कादंबरीच्या शेवटी जनाबाई जेव्हा विठ्ठलाला विचारते मी कोण आहे? शूद्र असूनही मी तुला इतकी प्रिय का आहे? तेव्हा कळतो.. जनाबाईंच्या ह्या प्रश्नाला उत्तर देताना विठ्ठल म्हणतो.. "जने तू माझी तुळस आहेस.. आणि हे तुला झालेलं आत्मज्ञान म्हणजेच अध्यात्म.. ओंकार हा आत्मज्ञानाचा पाया.. आणि ओंकार हे माझंच रूप.. माझ्या रूपाची, भक्तीची,अभंगातून केलेली अभिव्यक्ती म्हणजे ओंकाराचं रेखाटन.. आणि ती तुझ्या अभंगातून आविष्कृत होते म्हणून तू 'ओंकाराची रेख' आहेस.."

संत नामदेव परिवाराचे अभिन्न अंग असणारी संत जनाबाई आणि त्यावेळचा चतुर्वर्ण, श्रद्धा अंधश्रद्धा, कर्मकांड असलेला काळ छान उभा केला आहे.. श्रद्धा, भक्ती सात्विक शक्ती पानोपानी दिसून येते.. यादवकाळातील पांढरी अलौकिक अनुभवासह सजीव केली आहे.. 

-मी मधुरा..

************************************************

. शोध.. मुरलीधर खैरनार.. 




ही गोष्ट सुरु होते १६७० साली.. जेव्हा शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरत लुटलं तेव्हा.. ह्या लुटीतला प्रचंड ऐवज स्वराज्यात परत आलाच नाही.. मग तो कुठं गायब झाला?.. ह्या लुटलेल्या ऐवजाचा तीनशे चाळीस वर्षानंतर घेतलेला शोध म्हणजे ही "शोध" कादंबरी.. 

शिवकालीन अस्सल संदर्भ असलेली ही पाचशे पानी कादंबरी झपाटलेल्या सारखी वाचून काढली.. काय नव्हतं त्यात??.. श्वास रोखून धरायला लावणारी रहस्यं.. उत्कंठा वाढवणारा वेगवान घटनाक्रम.. बुद्धिमत्ता, कूटनीती, धाडस, साहस यांनी भरपूर बहात्तर तास चाललेला रोमांचक थरार.. 

वर्तमानातील वास्तवाच्या, टेकनॉलॉजीच्या पार्श्वभूमीवर आधारित असं हे अस्सल मराठी थ्रिलर वाचताना आपण ह्यातील एक पात्रच बनून जातो!!.. ह्या कादंबरीतील तीन मुख्य पात्रं वगळता बाकी सगळी पात्रं काल्पनिक असली तरी वेगळी नक्कीच वाटत नाहीत.. लेखकानं तिथल्या प्रत्येक ठिकाणांचं, स्थळांचं वर्णन इतक्या सहजतेनं, बारीक तपशिलांसह केलं आहे कि त्या कथानकांबरोवर आपण ही तिथंच आहोत असं वाटतं.. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडतंय असं वाटतं.. त्यामुळं वाचता वाचता आपण त्यात हरवून जातो.. हा खूप छान अनुभव होता.. 

ह्या कादंबरी बद्दल फार काही बोलणं म्हणजे त्याच्या वाचनातील आनंद हिराहून घेण्यासारखं आहे.. शिवकाळाबद्दल आस्था असणाऱ्यांनी नक्की वाचावीच अशी कादंबरी!!.. इतकंच सांगून थांबते.. 

-मी मधुरा.. 

*****************************************************

. एका तेलियाने.. गिरीश कुबेर..




रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर "एका तेलियाने" वाचायला मजा आली.. तेलाचं राजकारण समजून घेता आलं.. २५० पानाचं हे पुस्तक विषयामुळं सुरुवातीला जड वाटलं तरी भाषा अतिशय रंजक असल्यानं कुठंही कंटाळवाणं झालं नाही.. 

हे पुस्तक मुख्यत्वे करून फिरतं ते सौदी अरेबियाचे तेलमंत्री यामानी यांच्याभोवती.. ज्याने जवळपास आख्ख्या जगाची तेलसमस्या एकाकी हाताळली.. ती देखील थोडीथोडकी नव्हे तर तब्बल २५ वर्षे!.. अनेकदा जीवावर बेतूनही ते मागे हटले नाहीत. 

आखाती देशातल्या तेल राजकारणाचे पैलु लेखकानं छान उलगडले आहेत.. सौदी अरेबियाचे राजे फैजल आणि त्यांचे तेलमंत्री यामानी..  तेल कंपन्यांची आणि अमेरिकेची दुटप्पी राजनिती.. पश्चिम अशियात जम रोवता यावा यासाठी केलेलं गलिच्छ राजकारण (त्यातूनच पुढे लादेन नावाचा भस्मासूर निर्माण झाला)..  तेलामुळे आलेला पैशाचा महापूर आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या.. गडाफीचा आतातायीपणा..  रोनाल्ड रेगन, जिमी कार्टर यांनी केलेल्या चुका या सगळ्याचा उहापोह म्हणजे हे पुस्तक!

रंजक, उद्बोधक आणि माहितीपूर्ण असलेलं हे पुस्तक वाचल्यावर जगातल्या बर्‍याच घटना, युद्धं, करार, आंतरराष्ट्रीय संबंध हे तेलाच्या हितसंबंधाभोवती कसे फिरतात हे कळतं.. देश-देशांतल्या तणावांची दृष्य कारणं काहीही असली तरी त्याच्या मुळाशी तेलाचं राजकारण, हितसंबंध हे एकमेव कारण आहे असं वाटू लागतं..

हे पुस्तक वाचल्यावर, इतिहासाकडं थोड्या वेगळ्या दृष्टीनं पाहताना, भारतीय उपखंडात विशेषतः तुर्कस्तान इराणचा प्रदेशातील मागच्या घटना पाहता, ब्रिटिशांची 'द ग्रेट गेम' ही रशियाविरुद्धची काही शतकं चालू असलेली स्ट्रॅटेजी असावी असं वाटतं.. त्या ग्रेट गेमचा भाग म्हणूनच इंग्रजांनी पाकिस्तानची निर्मिती केली.. जिना-बिना ही नावापुरती प्यादी होती. बलुचिस्तानातील 'गदर' बंदराला रशियाचा संपर्क मिळू नये म्हणून शेकडो वर्षे ब्रिटन धडपडतय.. डुरांड लाईन आखून पाक-अफगाणिस्तान (आणि भारतालाही) कायमची डोकेदुखी निर्माण करणं हा त्याच गेमचा भाग.. हा इतिहास आपल्याकडे फारसा चर्चिला जात नाही.. जीनाला शिव्या दिल्या, भारत सरकरच्या नावानं खडे फोडले की आपला पश्चिम आशियाचा अभ्यास संपतो..


-मी मधुरा…

****************************************************************

. दुनियादारी.. सुहास शिरवळकर.. 


२०१३ साली "दुनियादारी" चित्रपट आला आणि दुनियादारी ह्या शब्दाच्या व्याप्तीशी आणि त्याच्या कर्ता करविता "सुशि" शी माझी ओळख झाली.. चित्रपट थेट काळजात घुसला.. कॉलेजच्या विश्वात घेऊन जाणारी कथा, त्यातील गाणी आणि कलाकार सगळीच भट्टी जमली होती.. म्हणून कादंबरी वाचावी, सुशि ला जवळून अनुभवावं असं त्यावेळी काही वाटलं  नाही.. पण "दुनियादारी" वाचली नसती तर एका मोठ्ठ्या रोमांचक अनुभवाला मुकले असते हे नक्की!! 

सुशिंची दुनियादारी जरी सत्तरच्या शतकातील असली तरी ती वाचताना मला माझं नव्वदच्या दशकातील कॉलेज दिसलं.. त्यामुळेच कि काय पण २७२ पानांची ही कादंबरी एका बैठकीत नाही पण दोन बैठकीत हपापल्यासारखी वाचून संपवली.. पुण्यातील S.P.कॉलेज आणि तिथल्या घटना, तिथले विद्यार्थी जरी कादंबरीच्या केंद्रस्थानी असले तरी हे नाट्य देशातील कोणत्याही कॉलेजमध्ये घडू शकतं.. काल्पनिक आणि सत्याची अप्रतिम सरमिसळ असलेलं हे कथानक कोणत्याही शहरात, कोणत्याही कॉलेजात, कोणत्याही घरात, कोणाच्याही अवती भवती घडणारं आहे.. दोस्ती-यारी, दुष्मनी, आनंद- दु:ख, हेवे-दावे, प्रेम-मत्सर अशा अनेक भावनांचा इथं कल्लोळ आहे.. दोन पिढ्या आणि त्यामधील नातेसंबंध.. त्यांच्यात पडत चाललेलं भावनिक अंतर याचाही वेधलाय.. 

सुरुवातीला भाषा, तोंडच्या शिव्या ह्याची सवय व्हायला वेळ लागला पण तीच भाषा नंतर प्रवाही आणि तरुण, ताजी आणि बिनधास्त वाटू लागली.. थोडक्यात भाषा हा कादंबरीचा आत्मा वाटला.. कोणत्याही क्षणी उठावं आणि दुनियादारीच्या या कट्ट्यावर जाऊन बसावं!.. इतकं साधं आणि सहज आहे.. तुमची, माझी, आपल्या मित्रांची काहीशी काल्पनिक पण प्रातिनिधिक असलेली सत्य अमर कथा आहे.. 

चित्रपट आधी पाहिलेला असल्यानं पुस्तक वाचताना बॅकग्राऊंड ला चित्रपटाचा ट्रॅक सुरु होता.. आणि त्याच बरोबर तुलना करणं ही.. पण मध्येच कोठंतरी हे सगळं थांबलं आणि फक्त मी त्या कथेत वावरत राहिले.. गुंतत राहिले.. इतकं कि त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन गेलं.. चित्रपट चांगला कि पुस्तक, आधी पुस्तक वाचून चित्रपट पहावा कि चित्रपट पाहून पुस्तक वाचावं.. ह्या सगळ्यांच्या पलीकडं जाऊन मनात घर करून राहिली ती "दुनियादारी"!!..  

पुस्तकात काय आहे हे सांगायला शब्द मिळत नाहीत इतकी ती खोल विचार करायला लावते.. तिच्याबरोबर जगायला लावते.. अनुभवायला लावते..  'लावते' हा शब्दच योग्य आहे कारण एकदा का ती वाचायला सुरुवात केली कि आपण त्यात गुंतत जातो.. 

सुशिंनी वयाच्या केवळ २४व्या वर्षी लिहिलेली ही मास्टर पीस कादंबरी!.. ती वाचताना त्यातील पात्रांशी एवढं एकरूप होऊन जायला होत कि ती पात्र आपल्या आजूबाजूला वावरू लागतात.. काही पात्रांमध्ये आपण स्वताला पाहतो तर काहीमध्ये आपल्या मित्रमैत्रिणींना.. तर काहीमध्ये आपल्या निकटवासीयांना.. पात्रं एवढी जिवंत रेखाटली आहेत कि कुणा न कुणाची तरी आठवण व्हावीच.. अगदी आपल्या कॉलेज मध्यल्या कट्ट्याची पण!.. 

श्रेयस तळवलकर - साधा, सालस, निरागस - कॉलेजमध्ये नुकताच जाऊ लागलेला असा कथा नायक.. तसं पाहायला गेलं तर कथेला एकच असा नायक नाही.. सगळीच पात्रं कोणत्या ना कोणत्या अँगलने कथा नायक म्हणून समोर येतात.. S.P.कॉलेज, DSP उर्फ दिग्या, शिरीन, मिनू, राणी मां, नितीन, अश्य्क्या, साईनाथ, MK ह्या सगळ्याबरोबर दुनियादारी माहित नसलेला श्रेयस, त्याचं आयुष्य कसं मार्गावर आणतो, त्याच दुनियादारीत कसा जगतो ,रमतो ते अक्षरशः जिवंत केलय.. 

प्रत्येक पात्राबद्दल लिहायचं म्हटलं तर प्रत्येकाची एक वेगळी कथा तयार होईल.. मित्रांसाठी जीव टाकणारा, चार फटके द्यायची व घ्याच्यची हिम्मत असणारा बिनधास्त, बेताल, निर्भीड दिग्या मनाला चटका लावतो. MK तर कादंबरीचा गाभा आहे.. त्याचे आणि श्रेयसचे संवाद, एकेकाळी प्रेम केलेल्या व ती न मिळाल्यामुळे दारूलाच सोबत करून सगळं आयुष्य जाळून टाकणाऱ्या, जगण्याची भन्नाट philosophy सांगणाऱ्या बेवड्या MKच्या आपण प्रेमात पडतो.. कट्ट्यावरचे अवली मित्र, समंजस मैत्रीण, न आवडणारा पण बेहद्द प्रेम करणारा नवरा असूनही आयुष्यात काहीतरी राहून गेल्यामुळे दुखी असलेली राणीमा.. सगळंच बेस्ट.. प्रत्येकजण आपापल्या जागी कधी बरोबर कधी चूक.. एकंदरीत ज्याच्या त्याच्या दृष्टीने सगळंच बरोबर.. म्हणूनच हि "दुनियादारी".. 

-मी मधुरा.. 

****************************************************************

५. "मी अत्रे बोलतोय".. प्रल्हाद केशव अत्रे.. 




'प्रल्हाद केशव अत्रे' उर्फ आचार्य अत्रे यांचं खूपच कमी लिखाण मी वाचलं आहे.. कदाचित माझ्या पिढीचे पु.ल. देशपांडे हे दैवत असल्यानं त्यांच्या पुढं बाकी विनोदी लेखक कधी वाचलेच गेले नाहीत.. ह्या वर्षी पन्नास पुस्तकं वाचायचा जेव्हा संकल्प केला तेव्हा वाचलेले लेखक, वाचलेली पुस्तके शक्यतो वाचायची नाहीत हे पक्क ठरवलं होत.. अत्रेंचं 'कऱ्हेचे पाणी' हे आत्मचरित्र पन्नास पुस्तकांच्या यादीत नक्कीच आहे.. 

"मी अत्रे बोलतोय".. १९५८ ते १९६९ ह्या काळातील 
अत्रेंच्या भाषणांचा छोटासा संग्रह.. अत्रेंबद्दल फारशी माहिती नसल्याने ह्या भाषणातील प्रसंग, घटना, आजूबाजूचा परिसर समजून घेताना वेळ लागला.. भाषणात उल्लेखलेली काही नावं तर ह्यापूर्वी कधी ऐकली हि नव्हती.. सुरुवातीच्या काही भाषणांसाठी गूगल सर्च करावा लागला पण तिथंही फारशी माहिती उपलब्ध नव्हती..

संयुक्त महाराष्ट्र निर्मिती पासून ते नाट्यपरिषद, वसंत व्याख्यानमाला ते साहित्य परिषद, संभाजी उद्यानातील गडकरींच्या पुतळा आवरण समारंभ ते कवी शुक्ल यांचा षष्ठ्यपूर्ती समारंभ, 'कऱ्हेचे पाणी' पहिल्या खंडाचा प्रकाशन सोहळा ते बालमोहन विद्यालयातील बालदिन, स्वतःचा सत्तरी पूर्ण झाल्याचा सत्कार ते भावार्थ रामायणाचा प्रकाशन सोहळा.. अश्या अनेक ठिकाणी केलेली भाषणं ह्या २१२ पानी पुस्तकांत आहेत.. त्यांच निर्भीड व्यक्तिमत्व आणि स्पष्टवक्तेपणा ह्या भाषणांतून दिसून येतो.. 

१९३६ साली सावरकर निर्बंधमुक्त झाल्यावर घेतलेल्या सभेत अत्रेंनीच प्रथम त्यांचा उल्लेख स्वातंत्र्यवीर सावरकर असा केला.. आणि त्याच सभेत सावरकरांनी अत्रेंना आचार्य हि उपाधी दिली.. हे ह्यातील एका भाषणातूनच समजले..   


-मी मधुरा.. 

******************************************************************

Monday, May 2, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं

💖 Happy Birthday to ME!! 💖

विश्वासच बसत नाही मी पन्नाशीच्या उंबरठयावर.. आता अजुनी एक पाऊल टाकलं कि उगाचंच मोठठं झाल्यासारखं वाटणार.. "Age is just a Number" हे कितीही खरं असलं तरी हा नंबर खरोखरीच मोठ्ठा आहे.. केसात डोकावणाऱ्या रुपेरी छटा.. चेहऱ्यावर दिसू पाहणाऱ्या अनुभवाच्या सुरुकुत्या.. नको तिथं खुखवस्तू आयुष्याचं शरीरानं मांडलेलं प्रदर्शन.. आयुष्यात येत चाललेलं रिकामपण.. सगळंच नवीन.. ह्या नवीन होऊ घातलेल्या बदलला, ह्या नवीन आयुष्याच्या टप्प्याला कसं घ्यायचं हे प्रत्येकानं आपापलं ठरवायला हवं..  
 
थोडी सुजाण (?.. ) झाल्यापासून दरवर्षी मी माझ्या वाढदिवसाला सरलेल्या वर्षाचं सिंहावलोकन करते आणि ह्यावर्षी काय करायचं ह्याचा अंदाज घेते.. पण ह्यावेळी हे विचारमंथन बरंच आधीपासून सुरु झालं होतं.. हे विशेष वर्ष असल्यानं जरा हटके आणि थोडंसं आव्हानात्मक असं काही तरी करायचं होतं.. काय करता येईल हा विचार करत असताना पहिला विचार मनात आला तो म्हणजे "वाचन".. तशी मी काही 'पुस्तकी किडा' वैगरे तर अजिबातच नाही.. पण थोडे फार वाचत असते.. म्हणून पन्नास पुस्तकं हे माझ्यासाठी नक्कीच आव्हान असणार आहे.. 



पन्नास पुस्तकं.. विविध लेखन/साहित्य प्रकार.. कविता, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, कादंबऱ्या, नाटक.. आधी शक्यतो न वाचलेले लेखक.. आणि न वाचलेली पुस्तकं.. आणि ते हि इथं अमेरिकेत राहून.. (...मराठी पुस्तकं मिळायला खूप त्रास होतो हो.. )

मग काय पुस्तकांची शोधाशोध सुरु झाली आहे.. बुकगंगा साईट वर सध्या पडीक असते.. मैत्रिणींची बुक शेल्फ धुंडाळायला सुरुवात केली आहे.. "कोणी पुस्तकं देता का पुस्तकं.." अशी सध्याची परिस्थिती आहे.. 

बघू हे आव्हान असं पार पडत ते.. (बाकी अजुनी बऱ्याच गोष्टी डोक्यात आहेत...😀 )

-मी मधुरा... 
२ मे २०२२