अध्याय ७ "ज्ञानविज्ञानयोग"
( भगवद् ज्ञान )
गीतेच्या अध्यायांची विभागणी करायची झाल्यास पहिले सहा अध्याय म्हणजे एक भाग.. ज्यात आत्मज्ञान - स्वतःतील ईशतत्व जाणण्याचं ज्ञान - स्वतःला जाणण्याची प्रक्रिया - विस्तृतपणे मांडली आहे..
युद्ध करण्यास तयार नसलेल्या अर्जुनाला श्रीभगवान सर्वप्रथम शरीर आणि आत्मा यांचं द्वैत्य सांख्ययोगातून समजावून सांगतात.. देह नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे याचं ज्ञान करून देतात.. मनुष्याचा त्याच्या कर्मावर अधिकार आहे कर्मफलावर नाही त्यामुळं त्यानं केवळ निःसंग वृत्तीनं कर्म केलं पाहिजे हे कर्मयोगातून तर त्यासाठी आवश्यक असणारी स्थिरबुद्धी म्हणजे काय हे ज्ञानकर्मसंन्यासयोगातून, अशी बुद्धी प्राप्त करण्यासाठी लागणारी संन्यस्थवृत्ती कर्मसंन्यासयोगातून आणि त्यासाठीचा आत्मसंयम आत्मसंयमयोगातून सांगतात..
एकदा का हे आत्मज्ञान प्राप्त झालं कि ज्ञानी व्यक्तीला आपल्यात असणारं ईशतत्व चराचरांत वास करत असल्याचा प्रत्यय येतो.. ज्ञानविज्ञानयोग ह्या अध्यायात श्रीभगवान चराचरांत असणाऱ्या आपल्या ह्या अस्तित्वाचं स्वरूप सांगतात..
'हे सगळं अमर्यादित ज्ञान मर्यादित कक्षा असलेल्या मनानं कसं अभ्यासायचं?' ह्या विचारानं सैरभैर झालेल्या अर्जुनाला श्रीभगवान 'माझ्या ठिकाणी म्हणजेच परमात्म्याच्या ठिकाणी मन लावून आनासक्त मनानं योगाभ्यास कर' असा उपदेश करत ह्या अध्यायाची सुरुवात करतात.. 'प्रापंचिकज्ञान' आणि 'ब्रह्मज्ञान' ह्या रूपात हे ज्ञान विभागून, उकलून सांगतात.. जे ज्ञान बुद्धीनं, विचारानं, तर्कानं मिळवलं जातं ते व्यावहारिक म्हणजेच प्रापंचिकज्ञान म्हणजेच विज्ञान.. आणि जेथं बुद्धी, विचार आणि तर्क ह्याचा अंत होतो तेथं ज्ञान, तत्वाचं ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान-सुरु होतं.. प्रापंचिक ज्ञान खरं मानणं हे अज्ञान आणि ह्या अज्ञानाचा समूळ अंत झाल्यावर जे मूर्तिमंत ज्ञान प्रकट होतं ते ब्रह्मज्ञान- अंतिम ज्ञान होय.. नंतर 'परा अपरा' ह्या दोन प्रकृती तत्वांवर भाष्य करून संपूर्ण विश्वात ब्रह्म म्हणजेच भगवंत कश्या प्रकारे स्थित आहेत ह्याचं वर्णन केले आहे. साधकांचे अनेक प्रकार, त्यांच्या भक्तीचे अनेक मार्ग सांगून ते कसे शेवटी परमात्म्यापर्यंत पोचतात हे सांगून ह्या अध्यायाची सांगता होते..
भागवतात सांगितल्याप्रमाणं, ह्या सृष्टीच्या निर्मितीकरिता तीन विष्णुरूप कार्यरत असतात.. महाविष्णू हे रूप भौतिक प्रकृतीची निर्मिती करते, गर्भोदकशायी रूप ब्रह्माण्डात वैविध्यपूर्ण निर्मिती करते तर क्षीरोदकशायी विष्णू सर्वव्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होते.. जो कोणी ह्या तीन विष्णूरुपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो..
ह्या भौतिक प्रकृतीमध्ये आठ प्रधान अभिव्यक्ती आहेत.. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश ही पाच तत्वे (पंचमहाभूते) याचबरोबर मन, बुद्धी आणि अहंकार..
हे भौतिक जग भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे.. परा प्रकृती.. जिच्यात सर्व जीवांचा समावेश होतो.. आणि हे जीव भौतिक प्रकृतीच्या साधनांचा म्हणजेच अपरा प्रकृतीचा उपभोग घेतात.. थोडक्यात पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार ही झाली अपरा प्रकृती.. विविध हेतूंसाठी या परा प्रकृतीनं - जीवांनी- अपरा प्रकृतीचा उपभोग घेतल्यामुळं हे भौतिक जग कार्यरत होतं.. ह्या जीवांनी चालना दिल्याशिवाय भौतिक विश्व कार्यरत होण्यास असमर्थ आहे.. आणि ह्या जीवांना चालना देण्याचं काम मायाशक्ती करते..
सर्व सृष्टी 'परा व अपरा' प्रकृतीपासून उत्पन्न झाल्यानं परमात्मा उत्पत्तिकर्ता तसेच प्रलयकर्ता ही आहे.. म्हणजेच सगळे जीव परमात्म्यापासून निर्माण होतात आणि परमात्म्यातच विलीनही होतात.. सारं जग दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणं परमात्म्याच्या सूत्रात गोवलं गेलं आहे.. परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं काहीच नाही..
ह्या परमात्म्याचं, सृष्टीरचेत्याचं, स्वतःचं तत्वरूप सांगताना श्रीभगवान म्हणतात, "हे कौंतेया, पाण्यामधील रस मी, चंद्रसूर्यामधील प्रकाश मी, सर्व वेदांतला प्रणव म्हणजे ॐकार मी, आकाशांतला शब्द मी आणि पुरुषांमधील पराक्रम ही मीच.. पृथ्वीवरील सुवास मी, अग्नीमधलं तेज मी, सर्व प्राणिमात्रांतील जीवनशक्ति मी आणि तपस्वी मधील तप ही मीच.. सर्व पदार्थांचे अनादि बीज मी, बुद्धिमंतांची बुद्धि मी व तेजस्वीचं तेजही मीच.. बलवंतांचं सामर्थ्य, आसक्तिरहित बल ही मीच.. सर्व भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुकूल असणारं कर्म ही मीच आहे.."
भौतिक जगतातील सर्व प्राकृतिक कार्य तीन गुणांच्या प्रभावाखाली होत असतात.. हे सात्विक, राजसिक व तापसिक गुण जरी भगवंतांच्या शक्तीनं उत्पन्न झाले असले तरी भगवंत त्या गुणांच्या अधीन नाहीत.. माऊलीनी हे समजावून सांगतांना म्हणतात, "सांगे अग्निस्तव धूम होये। तिथे धूमी काय अग्नी आहे?। तैसा विकारु हा मी नोहे। जरी विकारला असे।।..." म्हणजेच अग्नीपासून धूर उत्पन्न झाला तरी धुरात अग्नी कोठे असतो? तसेच हे भाव जरी परमात्म्यातून उत्पन्न झाले असले तरी ते भाव म्हणजे परमात्मा नव्हे..
ह्या सत्व-रज-तमात्मक भावांनी मोहित झाल्यामुळं हे सर्व जग निर्गुण अविनाशी अश्या परमात्म्याला जाणत नाही.. त्रिगुणांच्या जंजाळात ते असं अडकतं कि ह्या गुणांच्या सूत्रधाराचंच त्याला विस्मरण होतं.. ह्या मायेच्या पाशात अडकून जे आसक्ती कामना ह्यांच्या आहारी जातात त्यांना ही त्रिगुणात्मक अलौकिक माया पार करून परमात्म्यापर्यंत पोचणं कठीण होतं.. पण जे परमात्म्याला शरण जातात, त्याच्याठायी समर्पित होतात तेच ह्या मायेला तरुन जातात..
जे शास्त्राच्या विधिविधानांचं दृढपणे पालन करतात असे 'सुकृतिनः'- चांगले कर्म करणारे - यांचे चार प्रकार श्रीभगवान सांगतात.. आर्त (पीडित), जिज्ञासू, अर्थार्थी (धनाची अभिलाषा) व ज्ञानी.. आर्त हा दुःख निवारण्याकरिता, जिज्ञासू ज्ञान प्राप्तिकरिता, अर्थार्थी द्रव्यप्राप्तीच्या इच्छेनं उपासना करतो तर ज्ञानी परमसत्याच्या ज्ञानाच्या शोधात उपासना करतो.. कर्मफलाच्या अपेक्षेनं केलेली ही उपासना फलदायी असली तरी मोक्षदायी नाही.. उपासनेच्या मार्गावर चालणारे सर्व योगी श्रेष्ठ आहेतच पण निष्कामतेनं, अनन्यभक्तीनं उपासना करणारा, परमसत्याचं ज्ञान असणारा योगी सर्वश्रेष्ठ आहे.. कारण भौतिक शरीरापासून भिन्न असण्याची अनुभूती त्याला अधिक उन्नत करते.. तो आत्मसाक्षात्कारी होतो.. आणि सर्वोच्च, सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो.. अनेक जन्मांच्या उपासनेनंतर, अभ्यासानंतर ज्याला वास्तविक ज्ञान - इदं ब्रह्मासि - सर्वत्र ब्रह्म आहे - 'सर्व काही वासुदेवरूप आहे' - हे कळतं, असा दुर्लभ महात्मा परमात्म्यात विलीन होतो..
असे हे सुकृतिनः आपल्या प्रकृती नियमाप्रमाणं भौतिक सुखोपभोग घेण्यासाठी निरनिराळ्या देवतांची उपासना करतात.. प्रत्येक जन्मात केलेल्या कर्मांनी, भोगलेल्या भोगांनी, तृप्त अतृप्त इच्छांनी आत्म्यावर संस्कार होत असतात आणि त्यानुसार आत्म्याचा प्रकृती गुण (सात्विक, राजसिक व तापसिक) ठरतो.. उदाहरणादाखल रोगी सूर्यदेवाची, विद्यार्जन करणारा सरस्वतीची-गणेशाची, श्रीमंतीची कामना करणारा कुबेराची, प्रेम-वैवाहिक सुख प्राप्तीसाठी उमेची उपासना करतो.. जो ज्या देवतास्वरूपाची उपासना श्रद्धापूर्वक करू इच्छितो, त्या देवतास्वरुपावर त्याची श्रद्धा भगवंत/परमात्मा स्थिर करतात.. जेणेकरून त्या देवतांची उपासना तो संपूर्ण समर्पण भावनेनं करू शकेल.. अश्याप्रकारे श्रद्धापूर्वक, स्थिरबुद्धीनं उपासना करून, त्या देवतेची कृपा संपादन करून, इच्छितफल त्याला प्राप्त होतं.. जे फल मर्यादित व अल्पकाळ टिकणारं असतं.. असे हे देवदेवतांचे उपासक त्या त्या देवलोकांची प्राप्ती करतात.. पुण्यकाळ संपला कि परत जन्म घेतात.. पण जे परमात्म्याला, परमात्म्याच्या ब्रह्मस्वरूपाला, साक्षात भगवंताला भजतात ते परमधामाची (मोक्ष) प्राप्ती करतात.. कारण देवतांची उपासना ही भौतिक आहे तर भगवंतांची उपासना ही अध्यात्मिक..
परमात्म्याच्या अनेक रूपांचं श्रेष्ठ, उत्कृष्ट आणि अव्यक्त स्वरूप न जाणता अल्पज्ञ, अज्ञानी त्या रूपांना देहधारी व्यक्ती समजतात.. योगमायेमुळं अव्यक्त असणारं खरं स्वरूप झळकलं गेल्यानं ते जन्मरहित, अविनाशी आहेत हे अल्पज्ञ, अज्ञानी जाणत नाहीत.. विश्वनियंता परमात्मा भूतकाळात घडलेलं, वर्तमानात घडत असणारं आणि भविष्यात घडणारं सर्वकाही जाणतो.. तो सर्व जीवांना जाणतो पण त्याला कोणी जाणत नाही.. कारण इंद्रियांच्या इच्छा व द्वेष ह्यापासून उद्भवणाऱ्या मोहांनी ते भ्रमित झालेले असतात.. जोपर्यंत मनुष्य भौतिक विकारातून मुक्त होत नाही तोपर्यंत तो भूत, वर्तमान, भविष्य जणू शकत नाही..
सत्कर्मीं, ज्ञानी जे सुखदुःखादी द्वंद्वापासून, त्या मोहापासून मुक्त होऊन दृढनिश्चयानं, समर्पणभावनेनं परमात्म्याची उपासना करतात ते परब्रह्माला, अध्यात्माला आणि सर्व कर्मांना ही जाणतात..
थोडक्यात, पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या ह्या दृश्य सृष्टीत भगवंताचं अंशात्मक अधिष्ठान आहे हे जाणणं म्हणजे ज्ञान आणि ह्या सृष्टीचा मोह त्यागून तिच्या मायेपलीकडं असणाऱ्या भगवंताला जाणणं म्हणजे विज्ञान!..
"जो योगी मला भौतिक सृष्टीचा संचालक (अधिभूत), देवतांचा नियंत्रक (अधिदैव), सर्व यज्ञांचा अद्धिदाता भगवंत (अधियज्ञ) म्हणून जाणतो तो अंतसमयी पण मला जाणू शकतो".. असे सांगून श्रीभगवान ह्या अध्यायाची सांगता करतात..
होऊन स्थिरबुद्धी परमात्म्याठायी, कर अनासक्त मने योगाभ्यास
हो परिपूर्ण ज्ञानी, सांगतो परमसत्य प्रापंचिक अन ब्रह्मज्ञान रूपात
बुद्धी-विचार-तर्क असे प्रापंचिक ज्ञान, अन ज्ञानाअंती वसे मूर्तिमंत ब्रह्मज्ञान
सत्य मानणे प्रापंचिक ज्ञाना असे अज्ञान, होता समूळ नाश प्रकटे दिव्यज्ञान ।।१।।
चालण्या सृष्टी सदैव असती परा-अपरा प्रकृती कार्यरत
वसतो जीव 'परा'त अन उपभोगे भौतिक सुखे 'अपरां'त
पृथ्वी-जल-तेज-वायू-आकाश अन मन-बुद्धी-अहंकार असे अपरा तू जाण
उपभोगता भौतिक सुखे फिरे सृष्टीचक्र, पाठी मात्र मायाशक्ती सुजाण ।।२।।
निर्मिता सृष्टी परा-अपरा संगे, म्हणती उत्पत्तीकर्ता भगवंत
होऊन प्रलयकर्ता अंती, सारी सृष्टी विलीन त्या परमात्म्यात
झाले भगवंत शक्ती उत्पन्न त्रिगुण जरी, नाहीत ते गुणाधीन
जावू तरून मोहमाया, होता निर्गुण अविनाशी स्वरूपाचे ज्ञान ।।३।।
मिळवण्या भौतिक सुख करिसी नानाविध देव उपासना
पूर्वजन्म कर्म संचित ठरवतो सत्व-रज-तम आत्मभावना
भाव तसा देव तू भजसी ठेवून स्थिरबुद्धी अन श्रद्धा मनी
प्राप्यसी इच्छितफल अन देवलोक जोवर पुण्याचा धनी ।।४।।
जन्म जन्मती देवता उपासक संपता पुण्यकाळ
भजती ब्रह्मरुपा भगवंत उपासक परमधामी सर्वकाळ
होशील तू ज्ञानी जाणुनी अव्यक्त सर्वव्यापी स्वरूप
होशील विज्ञानी त्यागुन मोहमाया पाहता मायेपल्याड भगवंतरुप ।।५।।
जाणूनी हा 'ज्ञानविज्ञानयोग' प्रभुमुखातून
होऊ निजधामी, करुनी नित्य उपासना भगवंतचिंतनातून
त्यजुनी मोहमाया, समर्पणभावे दृढनिश्चयी करता भगवंतसेवा
होऊ आत्मज्ञानी, अभ्यासून ज्ञान-विज्ञाने सर्वव्यापी ईशतत्वा।।६।।
हरी ॐ तद् सद्
॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
********************
-मी मधुरा..
************************************************