Tuesday, February 18, 2025

अध्याय ६ 'आत्मसंयमयोग'

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय ६ 'आत्मसंयमयोग' 
ध्यानयोग )



'आत्मसंयमयोग' हा अध्याय मुख्यत्वे योगशास्त्र ह्या विषयावर भाष्य करतो.. ह्या अध्यायात भगवंतांनी, मन आणि इंद्रिये संयमित करण्याचं माध्यम म्हणून अष्टांगयोगाचं वर्णन केलं आहे.. योगाच्या प्रशिक्षणानं विकसित झालेलं मन, इंद्रिय-विषयसुखांवर नियंत्रण ठेवू शकतं.. शरीर-मन-आत्मा जेव्हा एकत्र येऊन कर्म करतात तेव्हा 'योग' घडतो.. म्हणजेच आत्म्यापाशी बुद्धी स्थिर होऊन आत्मानंद मिळतो.. परमसुखाचा अनुभव मिळतो.. ब्रह्मत्व प्राप्त होते.. 
ज्ञानेश्वर माऊली ह्या अध्यायाबद्दल बोलताना म्हणतात..
तैसे गीतार्थाचे सार। जे विवेकसिंधूचे पार। नाना योगविभवभंडार। उघडले कां।।
जे आदिप्रकृतीचे विसवणे। जे शब्दब्रह्मासि न बोलणे। जेथूनि गीतावल्लीचे ठाणे। प्ररोहो पावे।। 
तो अध्यावो सहावा।वरि साहित्याचिया बरवा। सांगिजैल म्हणौनि परिसावा। चित्त देउनी।। 
म्हणजेच हा अध्याय गीतेचे सार आहे.. जणू आत्मानंदाचा शोध घेण्यासाठी योगसंपत्तीचं भांडार खुलं केलंय.. जे आदिमायेचं विश्रांतीस्थान आहे, जिथं वेदांनाही मौन धारण करावं लागतं- असा तो अध्याय सहावा.. 

योगशास्त्रात योगासनांबरोबरच प्राणायाम आणि साधना (ध्यान) यांचा ही समावेश होतो.. योगासनांमुळं शरीर तंदुरुस्त राहतं, प्राणायामामुळं मन स्थिर होतं आणि साधनेमुळं आत्मबुद्धी (आत्म्यावर संयम).. कर्मयोग, भक्तियोग, ज्ञानयोग सारखाच हा आत्मसंयमयोग.. जो आपल्याला परमात्म्यापर्यंत पोचवतो.. 

'योगी आणि संन्यासी' ह्यावरच्या भाष्यान 'आत्मसंयमयोग' अध्यायाची सुरुवात होते.. पुढं स्वचिंतन, आत्मविकासासाठी 'साधना' म्हणजेच ध्यानाचं महत्व सांगून, साधना म्हणजे काय, त्यासाठी बैठक कशी असावी, साधकानं कोणते नियम पाळावेत हे सविस्तर सांगितलं आहे. साधना, ध्यान धारणा करून आत्म्यावर संयम मिळवून ब्रह्मत्व प्राप्त करता येत असलं तरी 'कर्मयोग' श्रेष्ठ आहे.. म्हणून 'तू कर्मयोगी हो' असा अर्जुनाला उपदेश करत ह्या अध्यायाची सांगता होते..   

''कर्मसंन्यासयोग' ह्या अध्यायात भगवानांनी 'कर्मयोगी हा कर्मसंन्यासी असतो' असं सांगितलं.. कर्मफळाची आसक्ती न ठेवता कर्मयोगी कर्मे करत असतो म्हणून तो कर्मसंन्यासी.. 'एके संन्यासी तोचि योगी' म्हणजेच संन्यासी आणि योगी एकच.. जो कर्मफळाची इच्छा न करता विहित कर्मे- कर्तव्य कर्मे करतो तोच खरा संन्यासी व योगी होय.. गृहस्थाश्रमाचा त्याग करून विहित कर्मे न करणारा संन्यासी ही नव्हे आणि योगी ही नव्हे.. 
संन्यास म्हणजे स्वतृप्तीचा त्याग.. इंद्रियतृप्तीच्या इच्छेचा त्याग.. संन्यास म्हणजे जीवात्मा ही आपली स्वरुपस्थिती आहे- हे जाणून त्याप्रमाणं कर्म करणं.. जीवाला, जीवात्म्याला आपलं स्वतंत्र असं अस्तित्व नसतं, जेव्हा तो भौतिक शक्तींना वश होतो तेव्हा तो बद्ध होतो आणि त्याला स्वतःच्या स्वरुपस्थितीचा विसर पडतो.. आणि जेव्हा त्याला आपल्या अध्यात्मिक शक्तींची जाणीव होते तेव्हा तो आपल्या स्वरुपस्थिती मध्ये स्थित होऊन इंद्रियतृप्ती करणाऱ्या कर्मांना थांबवतो.. याचाच अभ्यास (योगशास्त्र) भौतिक आसक्ती रोखण्यासाठी योगिजन करत असतात.. 

थोडक्यात जीवात्माचा ब्रह्मत्वाशी युक्त (मोक्ष) होण्याचा प्रवास म्हणजे योग.. 
कर्म मार्गानं ह्या ध्येयाप्रत पोचण्यासाठी योगशास्त्रात अष्टांगयोग सांगितला आहे.. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही त्याची आठ अंगं..
'यम'- साधकासाठी असलेली नैतिक आणि सामाजिक मार्गदर्शक तत्त्व.. 
'नियम'- स्वतःचं निरीक्षण करून स्वतःबद्दल अधिकाधिक जागृत होण्यासाठी घालून घेतलेले नियम.. 
'आसने'- शरीर लवचिक, तंदुरुस्त आणि कणखर होण्यासाठी मदत करणाऱ्या शारीरिक स्थिती.. 
'प्राणायाम'- श्वासांच्या स्थिर हालचालींचा सराव.. 
'प्रत्याहार'- सर्व गोष्टीतून संवेदना काढून घेण्याची पद्धत थोडक्यात आसक्ती सोडून देणे, बाह्य विषयांच्या व आपल्या इंद्रियांच्या प्रभावापासून मनाला मुक्त करणे..  'धारणा'- अविचलित एकाग्रता.. 
'ध्यान'- कोणत्याही प्रक्रियेचा विचार न करता संपूर्ण लक्ष मनावर केंद्रित करणे.. 
'समाधी'- अत्यानंदाच्या अवस्था- ब्रह्मरूप- मोक्ष..
अश्या ह्या अष्टांगयोगाच्या नवसाधकास निष्काम कर्म हे साधन सांगितलं आहे तर ही सिद्धी प्राप्त असणाऱ्या साधकास कर्मनिवृत्ती- सर्व भौतिक क्रियांचे शमन- हे साधन सांगितलं आहे..  

जो साधक इंद्रियभोगाच्या व कर्माच्या ठिकाणी आसक्त होत नाही आणि जो सर्व वासनांचा त्याग करतो त्याला 'योगरूढ' असं म्हणतात.. आणि जो योगारूढ होतो तो निःसंशय परिपूर्ण योगी होतो.. कारण त्याचं त्याच्या मनावर नियंत्रण असल्यानं तो स्वतःची अधोगती होऊ देत नाही.. असा 'योगरूढ' स्वतःच स्वतःचा उद्धार करतो..  त्याला चांगलेच माहिती असते कि आपण स्वतःच (मन) स्वतःचे मित्र आणि स्वतःचे शत्रू आहोत.. 
ज्यानं मनाला जिंकलंय त्याच्यासाठी 'मन' सर्वोत्तम मित्र आहे.. परंतु ज्यानं मनाला जिंकलेलं नाही त्याच्यासाठी त्याचं तेच मन परमशत्रु होतं.. 
ज्यानं मनाला जिंकलंय, ज्याच्या सर्व वासना शांत झाल्या आहेत असा योगी शीत-उष्ण, सुख-दुःख, मानापमान ह्याकडं अत्यंत समदृष्टीनं पाहतो.. ह्या भौतिक अस्तित्वाच्या द्वंद्वाचा त्याच्यावर मुळीच परिणाम होत नाही.. ही अवस्था म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी तल्लीनता होय.. आत्मज्ञान आणि अर्जित ज्ञान (मिळवलेलं विविध ज्ञान) ह्यांनी ज्याच अंतःकरण तृप्त झालंय, जो निर्विकार आहे, जो जितेंद्रिय आहे तो परमात्म्यात स्थित (मुक्त) झालाय असं समजावं.. हितचिंतक, वैरी, तटस्थ, मध्यस्थ, द्वेषी, मित्र, शत्रू, सज्जन, दुर्जन ह्या विषयी समबुद्धी ठेवणारा योगी विशेष योग्यतेचा असतो.. 

मनाला संयमित करणं हा अष्टांगयोगाच्या अभ्यासाचा उद्देश आहे.. जोपर्यंत मन संयमित होत नाही तोपर्यंत योग म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय.. कोणत्याही भौतिक सुविधा प्राप्त करण्यासाठी योगाभ्यास नसून तो भौतिक अस्तित्वाचा नाश करण्यासाठी असतो.. जो आपलं शरीरस्वास्थ सुधारण्यासाठी योगाभ्यास करतो तो योगी नव्हे.. अष्टांगयोगाचं अनुकरण करणाऱ्या योग्यानं सर्वप्रथम आपलं शरीर, मन आणि आत्मा परमात्म्यापाशी स्थिर ठेवून सतत आत्मचिंतन (आत्मध्यान) करावं.. परमेश्वरावर मन एकाग्र करावं.. बाह्य गोष्टींपासून होणारा व्यत्यय टाळण्यासाठी एकांतात राहावं.. जाणीवपूर्वक आकांक्षा, संग्रह किंवा स्वामित्व ह्या भावनांपासून अलिप्त असावं.. जे काही आहे ते सर्व त्या परमात्म्याचं आहे अशी भावना असावी.. 
ज्या ठिकाणी ध्यानाला बसायचं आहे ती जागा पवित्र व शुद्ध हवी.. फार सखल ही नाही आणि फार उंच ही नाही अश्या जागेवर आधी दर्भ, त्यावर हरिणाचं कातडं, त्यावर वस्त्र अंथरावं.. ह्या आसनावर निश्चलपणे दृढतापूर्वक बसावं.. पाठ, मान, डोकं उभ्या सरळ रेषेत आणून, नाकाच्या शेंड्यावर दृष्टी लावून मन एकाग्र करावं..
अविचलित आणि संयमित मनानं, भयरहित होऊन परमात्म्याचं चिंतन करत ध्यानमग्न व्हावं.. ह्याप्रमाणं आपला योगाभ्यास - ध्यानधारणा- यांचा निरंतर सराव करून मन संयमित झालेला योगी मोक्षरूप परमधामाची प्राप्ती करतो.. 

मोक्ष देणाऱ्या ह्या योगाभ्यासासाठी यम, नियम, प्रत्याहार यांचं तंतोतंत पालन केलं पाहिजे..  उदाहरण दाखल, गरजेपेक्षा अत्याधिक किंवा अत्यल्प खाणाऱ्याला, अति झोपाळू किंवा अति जागरण करणाऱ्याला हा योग साध्य होत नाही.. परंतु आहारविहार, कर्माचरण, निद्रा, जागृती यांचं यथायोग्य पालन करून, चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर ठेवून जो अध्यात्मामध्ये स्थित होतो, तेव्हा तो 'योगयुक्त' योगी होतो.. अश्या योग्याचं वर्णन करताना माऊली म्हणतात.. तयाते योगयुक्त तू म्हण। हे ही प्रसंगे जाण। ते दीपाचे उपलक्षण। निर्वातिचिया।।.. आडोश्याला ठेवलेल्या दिव्याची ज्योत जशी निश्चल असते त्याप्रमाणं संयमित मनाचा योगी निश्चल असतो, आत्मध्यानात सदैव स्थिर असतो..    

सांसारिक, मानसिक, भौतिक इच्छांपासून पूर्णपणे संयमित झालेल्या मनानं, परमात्म्याला आपल्यात पाहून योगी जेव्हा संतुष्ट होतो, त्या अवस्थेला 'परिपूर्ण समाधी' असं म्हणतात..  ह्या अवस्थेत विशुद्ध मनानं आत्म्याचं अवलोकन करण्यात, आपल्या आत्म्याच्या ठिकाणी परमात्म्याच्या स्वरूपाला पाहण्यात तो दंग होतो.. जे सुख इंद्रियांनी जाणणं अशक्य आहे पण जे आत्मबुद्धीनं ग्रहण करणं शक्य आहे, असे निरतिशय सुख ह्या स्थितीत योगी अनुभवतो.. अश्या प्रकारे स्थित झालेला योगी ब्रह्मस्वरूपापासून कधीच ढळत नाही.. ही स्थिती प्राप्त झाल्यावर ह्याहून अधिक काही श्रेष्ठ असेल असं त्याला वाटत नाही.. कितीही मोठठं दुःख आलं तरी त्याचं चित्त परमात्म्यापासून विचलित होत नाही.. भौतिक संसर्गामुळं निर्माण होणाऱ्या दुःखापासून हीच यथार्थ मुक्ती आहे..  

मन संयमित करून मनाला समाधीस्थ करावं.. परमात्म्याशिवाय इतर कशाचंही चिंतन करू नये.. भडकलेल्या मनाला निग्रहानं परत परत खेचून आत्मस्वरूपी लावावं.. अश्याप्रकारे योगाभ्यासात लीन योगी सर्व भौतिक सुखांतून, दोषांतून मुक्त होतो आणि ब्रह्मप्राप्तीरूप निरतिशय सुखाची प्राप्ती करतो.. असा योगयुक्त योगी सर्व प्राणिमात्रांमध्ये स्वतःला व स्वतःच्या ठिकाणी सर्व प्राणिमात्रांना पाहतो -सोहम्- तो मी आहे आणि मी ही तोच आहे- ही अवस्था.. जो योगी सर्वत्र ब्रह्म पाहतो आणि ब्रह्मामध्येच सर्व पाहतो त्याला परमात्मा कधीही दृष्टीआड होऊ देत नाही.. जो योगी सर्व प्राणिमात्रात असणाऱ्या परमात्म्याला समबुद्धीनं भजतो, तो सर्व परिस्थितीत परमात्म्यामध्ये वास करतो.. असा योगी 'परिपूर्ण योगी' होय..

हे सर्व ऐकून अर्जुन म्हणतो, "हे मधुसूदना, साम्यबुद्धीनं प्राप्त होणारी ही जी योगपद्धती तुम्ही सांगितलीत, ती मनाच्या अस्थिरतेमुळं, चंचलतेमुळं साध्य होईल असं मला वाटत नाही.. कारण मन हे अतिचंचल, बलवान, दुराग्रही, उतशृंखल असल्यानं त्याला आवरणं हे वाऱ्याची मोट बांधण्यापेक्षाही कठीण आहे.." खरंच ह्या चंचल मनाला लगाम कसा घालायचा? जे मन बुद्धीला हरवतं, निश्चय मोडतं, विचारला चकवतं, संतोषाला नादी लावतं, दाही दिशा हिंडवतं, असं हे मन स्थिर राहिल का? आपला स्वभाव सोडेल का?.. ह्यावर भगवान म्हणतात, "हे महाबाहो कौंतेया, चंचल मनाला संयमित करणं निःसंशय अत्यंत कठीण पण योग्य अभ्यासानं, अनासक्तीनं  मनाला वश करणं शक्य आहे. तसंच ज्याचं मन उतशृंखल आहे त्याला आत्मसाक्षात्कार होणं कठीण आहे परंतु ज्याचं मन संयमित आहे, त्याला योग्य साधनांनी (यम, नियम, प्राणायाम) आणि प्रयत्नांनी हा योग साधणं शक्य आहे.." 

पुढं अर्जुन विचारतो, "हे कृष्णा, एखादा योगी ज्यानं आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा स्वीकार केलाय, अत्यंत कठीण अश्या अष्टांगयोगाचा मार्ग अनुसरतोय, पण निरंतर प्रयत्न करूनही सांसारिक आसक्तीमुळं विचलित झालाय, मार्गभ्रष्ट झालाय अश्या अयशस्वी योगीचं पुढं काय होतं? मोहामुळं ब्रह्मप्राप्तीच्या मार्गात स्थिर न झालेला, ना प्रपंच ना परमार्थ असा भरकटलेला, फुटक्या ढगाप्रमाणं नाश तर पावत नाही ना? हे कृष्णा, माझा हा संशय तू पूर्णपणे दूर कर कारण तुझ्याशिवाय दुसरा कोणीही हा दूर करण्यास समर्थ नाही.." अर्जुनाच्या ह्या प्रश्नांना उत्तर देताना भगवान म्हणतात, "हे पार्था, सत्कर्म करणारा योगी कधीही अधोगतीला जात नाही.. इहलोकांत किंवा परलोकांत ही त्याचा विनाश होत नाही.. असा 'योगभ्रष्ट' योगी पुण्यवंताना मिळणाऱ्या स्वर्गादि लोकाला जाऊन तिथं दीर्घ काळापर्यंत राहून नंतर शुद्धाचरण करण्यासाठी श्रीमंतांच्या घराण्यांत जन्माला येतो किंवा ज्ञानी लोकांच्या कुळात जन्माला येतो.. अश्या प्रकारचा जन्म मिळणं या लोकी अतिशय दुर्लभ आहे.. त्याला त्या नव्या देहात पूर्वजन्मीच्या बुद्धिसंस्काराचा लाभ होतो आणि तो पुन्हा परिपूर्ण सिद्धीसाठी पुन्हा प्रयत्न करतो.. नव्या जन्मात सुरुवातीला आवड नसली तरी पूर्वजन्मीच्या अभ्यासाच्या बळानं योगाकडं आकर्षिला जातो.. आणि योगाविषयी जो जिज्ञासू आहे त्याला वेदाचरणाच्या फळापेक्षा विशेष फळ मिळते.. प्रयत्नपूर्वक अभ्यास करता करता, पूर्ण पापांपासून शुद्ध झालेला आणि अनेक जन्मांनी पूर्ण सिद्धीप्रत पोचलेला असा योगी अखेर परमगती (मोक्ष) प्राप्त करतो.. योगी हा तपस्वी, ज्ञानी, आणि सकाम कर्मी व्यक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे म्हणून हे अर्जुना, तू सर्व परिस्थितीत योगी हो.. "


म्हणे माऊली, हा अध्याय असे गीतार्थाचे सार 

संयमिण्या मन-इंद्रिये उघडले अष्टांगयोगाचे द्वार 

स्थिर बुद्धी आत्म्याठायी घडतो आत्मसंयमयोग 

जसा असतो कर्मयोग, भक्तियोग अन ज्ञानयोग ।।१।।


करुनी विहित कर्मे इच्छा नसे फलांची  

त्यागून इंद्रियतृप्ती होशील कर्मसंन्यासी 

होता जाणीव तुज अध्यात्मिक शक्तींची 

पाशिल स्थित आपल्या स्वरुपस्थितीशी ।।२।।


होण्या परिपूर्ण योगी कर त्याग वासनांचा 

होऊनी योगारूढ उद्धार कर स्वतःचा 

हो समबुद्धी, आत्मज्ञानी जिंकुनी या मनाला 

लाभेल योगसिद्धी अष्टांगयोग साधकाला ।।३।।


यम नियम आसने प्राणायाम प्रत्याहार 

ध्यान धारणा समाधी असा हा अष्टांग 

चढता कठीण सोपान हा योगशास्त्राचा

*आत्मसाक्षात्कारी योग शरीर-मन-बुद्धीचा ।।४।। 


राहावं एकांती, सोडावं स्वामित्व, करावं एकाग्र चिंतन  

नसावं भय अन विचलित मन, असावं संयमित ध्यानमग्न 

करावा अभ्यास, अखंड सराव, होण्या स्थिर परमात्म्यासव 

'नाही काही माझं असे सर्व त्याचं' भावना अशी मनी ठेव ।।५।।


असे समाधिस्थ मन, निरंतर करी परमात्मा चिंतन    

होता ते आसक्त, प्रयत्ने खेचूनी तू आण आत्म्याठायी 

असा योगयुक्त, जाणुनी ब्रह्मतत्त्व भजे समबुद्धी 

होता *आत्मसाक्षात्कार, परमात्म्याचा वास चराचरी ।।६।।


मन संसार आसक्त, ना प्रपंच ना परमार्थ

पुसतसे पार्थ, असा मार्गभ्रष्ट काय करी         

जरी योगभ्रष्टी, नाही विनाश दोन्ही लोकी 

जाईल पुण्यलोकी, जन्मेल उच्चकुळी हे तू जाण ।।७।।


जाणूनी हा 'आत्मसंयमयोग' प्रभुमुखातून

होऊ आत्मानंदी प्रयत्ने अष्टांगयोग साधनेतून     

पोचतो सिद्धीप्रत घडता हा योग शरीर-मन-आत्त्म्याचा 

निष्पाप, अनासक्त, परंतप श्रेष्ठ योगी परमधामाचा ।।८।। 


हरी  तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  



*आत्मसाक्षात्कार: अर्जित ज्ञान (अभ्यासातून मिळवलेलं ज्ञान) आणि अनुभवातून, विशुद्ध भक्तीतून मिळवलेलं ज्ञान ह्यामुळं येणारी समदृष्टी.. थोडक्यात आत्मा, परमात्मा आणि चराचर ह्याकडं समबुद्धीनं पाहणं म्हणजे आत्मसाक्षात्कार.. 

*आत्मसाक्षात्कारी: आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित असा योगी.. 


*शरीर मन आत्मा एकत्र येणं म्हणजे योग.. 

*सकाम कर्माशी संबंधित योगपद्धती म्हणजे कर्मयोग.. 

*ज्ञानशी संबंधित योगपद्धती म्हणजे ज्ञानयोग..  

*भगवंताच्या प्रेममयी सेवेशी संबंधित योगपद्धती म्हणजे भक्तियोग..  


*वैराग्य: भौतिक सुखांपासून अनासक्ती आणि अध्यात्मामध्ये मन युक्त होणं 


निष्काम कर्मयोग हा आत्मसाक्षात्काराच्या मार्गाचा आरंभ आहे.. जेव्हा कर्मयोगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची वृद्धी होते तेव्हा त्या अवस्थेला ज्ञानयोग म्हणतात.. जेव्हा ज्ञानयोगामध्ये विविध आसनं, प्राणायाम यामुळं ध्यानाची वृद्धी होते आणि मन परमात्म्यावर स्थिर होते तेव्हा त्याला अष्टांगयोग म्हणतात.. आणि जेव्हा साधक अष्टांगयोगाच्या पलीकडं जाऊन परमात्म्याप्रत पोचतो तेव्हा त्याला भक्तियोगयुक्त असे म्हटले जाते आणि हीच संपूर्ण योगाची परमावधी असते.. 




-मी मधुरा.. 

************************************************


Tuesday, February 11, 2025

झालोत जरी दूर आपण..



झालो जरी दूर आपण 
तरीही, प्रेम मजवर करशील ना?
चुकून भेटलो वाटेत कधी 
ओळख मज देशील ना?

झालास जरी दुसऱ्या कोणाचा 
तरीही, तिच्यात 
मला पाहशील ना?
निजताना एकांतात 
आठवण माझी काढशील ना?

असला जरी दुरावा दोघांत
तरीही, मनानं जवळ असशील ना?
अबोला सोडून गुजगोष्टी करण्या 
स्वप्नांत माझ्या येशील ना?

असलं संपलं जरी सगळं
तरीही, तुझ्यांत मी उरेन ना?
पुढच्या जन्मी भेटण्याचं  
वचन मजला देशील ना?



-मी मधुरा.. 

************************************************