अध्याय ३ 'कर्मयोग'
दुसऱ्या अध्यायात भगवान अर्जुनाला 'कर्मफलाकडं समत्व दृष्टीनं बघ आणि युद्ध कर' असं सांगतात.. कर्म तर करावंच लागतं, पण कर्मामागील विचार (ज्ञान) हे कर्मापेक्षा श्रेष्ठ आहेत, तेव्हा निश्चयात्मक बुद्धी (ज्ञान) प्राप्त करून आत्मशांती मिळव असा उपदेश ही करतात.. हे ऐकल्यावर आपण ही मानवी जीवनाचं परमश्रेय, आत्मशांती प्राप्त करण्यासाठी ज्ञानयोगाचा अवलंब करावा असं कोणालाही वाटेल.. असं वाटणाऱ्या सर्व मानवांचा अर्जुन हा जणू प्रतिनिधीच आहे.. 'ज्ञानप्राप्ती हीच जर सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे, तर कर्माची आवश्यक्ता काय?' ह्या अर्जुनाच्या प्रश्नानं 'कर्मयोग' ह्या अध्यायाची सुरुवात होते.. सर्वप्रथम, कर्म हे आवश्यक आणि अपरिहार्य का आहे हे सांगितलं आहे.. कर्मामागची यज्ञभावना आणि कर्मक्षेत्रातील देवता, समाज आणि प्रकृती (सृष्टी) यांच्याशी जोडणारा कर्मयज्ञ कसा असावा, ज्ञानी व्यक्तींचं लोक कल्याणार्थ कर्तव्य कसं असावं, कर्मसमर्पण म्हणजे काय?, माणसाच्या अंतःकरणातील ज्ञानविरोधी प्रवृत्ती कश्या असतात, त्यावर उपाय काय?.. हे ह्या अध्यायांत सांगितलं आहे.. 'बुद्धीनं तत्वस्पर्शी व्हायला हवं' हे सांगून अध्यायाची सांगता होते..
'ज्ञानात एव तु कैवल्यम्' - कैवल्य म्हणजे परमात्म्याशी एकरूप अवस्था- म्हणजेच ज्ञान प्राप्त केल्याने मोक्ष मिळतो.. ज्ञानमार्गाचा अवलंब केला तर युद्ध कर्म करावं लागणार नाही.. पितामह, गुरु द्रोण, आप्तस्वकिय ह्यांच्याशी लढावं लागणार नसेल तर कर्मापेक्षा ज्ञानमार्ग बरा.. असा विचार अर्जुन करतो.. पण लगेचच भगवान त्याला त्याच्या कर्माची आठवण करून देतात.. एकीकडं ते त्याला 'आत्मवान हो', 'ज्ञानाचा अधिकारी हो' असं सांगतात तर दुसरीकडं 'कर्मण्येवाधिकारस्ते' - 'कर्मणि एव अधिकार: ते'- म्हणजेच 'कर्माचा अधिकारी हो' असं ही सांगतात.. ह्या बोलण्यानं गोंधळून गेलेल्या अर्जुनाच्या परखड प्रश्नानं अध्यायाची सुरुवात होते.. "हे जनार्दना, तुम्ही मला युद्ध करणं हे माझं कर्तव्य आहे असं सांगितलंत पण नंतर कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानामुळं मन:शांती मिळते असंही म्हणालात.. त्यामुळे मी आता पुरता गोंधळून गेलो आहे.. तेव्हा तुम्ही मला निश्चितपणे सांगा कि ज्ञान श्रेष्ठ आहे तर त्यामार्गे न जाता युद्धासारखं घोर कर्म मी का करू?.."
अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवान म्हणतात, "अरे अर्जुना, *आत्मसाक्षात्काराचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी मी यापूर्वीच दोन मार्ग सांगितले आहेत.. ज्ञानयोगेन संख्यानाम्, कर्मयोगेन योगिनाम्.. म्हणजेच, एक ज्ञानाचा आणि दुसरा कर्माचा!.. ज्ञानाचा मार्ग हा तत्त्वज्ञानी, ज्ञानी लोकांसाठी आहे तर कर्माचा मार्ग हा बाकी साधकांसाठी.." हे दोन्ही मार्ग एकाच ध्येयाप्रत म्हणजेच परमात्म्याला जाऊन मिळतात.. कोणत्या मार्गानं जायचं ते साधकाच्या जीवनशैलीवर, त्याच्या योग्यतेवर अवलंबून आहे..
ज्ञानयोगी बुद्धीनं, तत्वज्ञानानं इंद्रियनिग्रह करून *परमसत्याचा शोध घेतात तर कर्मयोगी आपल्या सकाम कर्मातून, समर्पणातून परमतत्वाच्या जवळ जातात..
अर्जुनाची जीवनशैली कर्मयोगीची आहे.. क्षत्रिय असल्यानं युद्ध करणं हे त्याचं कर्म आहे.. पण केवळ आप्तेष्ठांशी युद्ध करायला लागू नये म्हणून तो ज्ञानमार्गाचा, तत्वज्ञानी होण्याचा विचार करतो आहे.. गोधळलेल्या अर्जुनाला माऊली म्हणतात, "देखे उत्प्लवनासरिसा। पक्षी फळाशी झोंबे जैसा। सांग नरु केवि तैसा। पावे वेगा?।।".. म्हणजेच, पक्ष्यासारखं एका झेपेत झाडावरच्या फळापर्यंत पोचणं आपल्याला शक्य आहे का?.. हळूहळू फांदीवरून जात जात आपल्याला फळापर्यंत पोचावं लागतं.. पण ह्या पक्षाप्रमाणंच उंच भरारी घेऊन ज्ञानमार्गानं परमात्म्यापर्यंत पोचायची अपेक्षा अर्जुन करतो आहे.. उंच उडण्यापूर्वी पक्षाच्या ही पंखात बळ येणं आवश्यक असतं.. त्याला एकाच विशिष्ट दिशेनं सातत्यानं उडण्याचा सराव करावा लागतो.. पंखाचा योग्य वापर करण्याचं कर्म सातत्यानं केलं तर उंचीवर पोचायची क्षमता विकसित होते.. ही क्षमता विकसित करणं म्हणजेच कर्मयोग.. पंख सक्षम झाल्यावर, त्यात उडण्याची ताकद आल्यावर, भरारी मारून परमात्म्यापर्यंत पोचणं म्हणजे ज्ञानयोग..
केवळ कर्म केल्यानं कर्मयोगी होत नाही किंवा कर्म सन्यास घेतल्यानं सिद्धयोगी.. प्रत्येक देहधारी जीव हा क्षणभरही कर्म केल्यावाचून राहू शकत नाही.. कर्म करणं का प्रकृतीचा स्वाभाविक धर्म आहे.. शरीराच्या किमान गरजा भागविण्याइतकं तरी कर्म करणं आलंच.. अगदी नैष्कर्म स्थितीला पोचलेला ज्ञानयोगी, ध्यानाला जरी बसला असला तरी त्याचा श्वासोच्छ्वास, रक्ताभिसरण इत्यादी कार्य चालूच असतं.. कारण प्रकृति गुणांपासून उत्पन्न झालेल्या देहाचे व्यवहार चालूच असतात.. यावरून हे निश्चित की कर्म माणसाला सुटत नाही.. कर्माचा त्याग करून, विषयसुखांचा नाश करून जे कर्मातीत होऊ इच्छितात त्यांना भगवान दांभिक, दुराचारी म्हणतात कारण त्यांच्यात वासना जागृत असते, ते विषयासक्त असतात.. परंतु मनानं इंद्रियांचं नियमन करून, आसक्ती न ठेवता कर्मयोगाचं आचरण करतो तो खरा कर्मयोगी.. असा कर्मयोगी कर्मबंधनातून मुक्त असतो..
प्रत्येक कर्म हे मनांतून निर्माण झालेल्या इच्छेमुळं घडतं, तेव्हा अनावश्यक गोष्टीं विषयीचे आकर्षण वाटणारे विचार मनांतून काढून टाकणं हे उत्तम.. मनाला व इंद्रियांना ताब्यात ठेवून स्वधर्माप्रमाणं आचरण करणं हाच 'अखंड यज्ञ'-'नित्य यज्ञ'.. आणि जो हा यज्ञ करतो तो कोणत्याही बंधनात अडकत नाही कारण तो ध्येयानं, कर्मानं प्रेरित झालेला असतो.. यज्ञ म्हणजे समाजाच्या भल्यासाठी केलेलं निस्सीम काम, ज्यामुळं समाज एकत्र जोडला जाईल.. शिवरायानं पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न असो वा लोकमान्य, सावरकर, गांधीजी यांनी दिलेला स्वातंत्र्याचा लढा, हा सुद्धा एक यज्ञच!.. स्वातंत्र्यासाठी, सुराज्यासाठी केलेला यज्ञ.. देशाला गुलामगिरीतून मुक्त करणं ह्या ध्येयानं प्रेरित असा यज्ञ.. स्वातंत्र्य मिळवणं हाच धर्म आणि कर्म सुद्धा..
जेव्हा ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तेव्हा सृष्टी बरोबरच त्यातील जीव-सजीवांचं धर्म आणि कर्म ही निश्चित केलं आणि धर्माचरण केलं असता जीवनाचं उद्दिष्ट पूर्ण होईल असं ही सांगितलं.. जीवन उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी उपासतापास, व्रतवैकल्यं, तीर्थयात्रा, अनुष्ठानं असं करण्याची काहीच गरज नसते.. 'स्वधर्माचं निष्काम बुद्धीनं केलेलं आचरण'- हाच खरा जीवनमंत्र होय..
'इदम् न मम'-हे माझं नाही- ह्या भावनेनं केलेलं विहित कर्म, नि:स्वार्थ भावनेनं समाज कल्याणासाठी केलेलं काम परमात्म्याला अर्पून निश्चिन्त राहावं.. एकनिष्ठेनं स्वधर्माचं आचरण केलं असता विषयासक्ती राहत नाही.. कर्म न करता त्याच्या फळाची अपेक्षा करणं किंवा दुसऱ्याच्या कामात स्वतःचा स्वार्थ पाहणं हे चोरी केल्यासारखंच.. विहित कर्माचं निष्काम बुद्धीनं आचरण करून मिळालेल्या संपत्तीचा योग्य विनियोग केला पाहिजे.. सर्व संपत्ती स्वतःकडं ठेवणं ही सुद्धा बेइमानीच.. म्हणजेच स्वधर्मानं संपादन केलेलं द्रव्य, संपत्ती स्वधर्मानं खर्चावी आणि बाकी राहील त्याचा आनंदानं उपभोग घ्यावा.. स्वधर्मनं खर्च करणं म्हणजे समाजातील इतर घटकांचा, परस्परांचा उद्धार करण्यासाठी खर्च करणं.. अश्यासाठी मिळवलेली संपत्ती विषयसुखात अडकवत नाही.. जे शरीरास आत्मा मानतात, विषयसुखाशिवाय दुसरं काही जाणत नाहीत त्यांनी केलेलं यज्ञकर्म हे नुसतं थोथांड असतं.. समाजाला दाखवण्यासाठी, समाजात आपली पत ठेवण्यासाठी केलेलं एक काम..
अन्नाला आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे.. अन्नामुळंच आपला देह पोसला जातो आणि ह्या देहाच्याच मदतीनं आपण धर्म आणि कर्म करू शकतो.. अन्नाचं महत्व सांगताना भगवान म्हणतात, "अन्नापासून प्राणीमात्राची उत्पत्ती होते आणि पर्जन्यापासून अन्नाची.. पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून तर यज्ञाची कर्मापासून.. कर्माची उत्पत्ती वेदांपासून तर वेदाची अविनाशी ब्रह्मापासून.. म्हणूनच हे सारं विश्व ब्रह्मापासून उत्पन्न झालं आहे.. आणि सर्वव्यापी ब्रह्मतत्त्व ज्ञानकर्मात स्थित आहे.."
जो सृष्टीचक्राचं पालन करत नाही, ह्या स्वधर्मरूप यज्ञाचं आचरण करत नाही त्याचं जगणं व्यर्थच.. इंद्रियलंपट होऊन तो आयुष्य वाया घालवतो.. परंतू जो आत्म्याठायी स्थिरबुद्धी आहे, आत्मसुखानं तृप्त झाला आहे, आत्मानंदानं संतुष्ट आहे त्याला काहीच कर्तव्य उरत नाही.. इच्छा, आकांक्षा, वासना, कमी झाल्यानं त्यांच्या गरजा ही कमी असतात आणि गरजा कमी म्हणून कर्म ही कमी!.. समाजातले अधिकतर लोक हे कर्माचरण करीत सर्वसामान्य जीवन जगणारे असतात.. त्यांच्या मनांत सतत उठत असणाऱ्या वृत्ती, इच्छा, वासना यांची पूर्ती करण्यासाठी ते अविरत कार्यमग्न असतात.. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत कर्तव्यं, कर्म ह्यांचं आचरण करावं लागतं.. थोडक्यात, कर्मफलाची आसक्ती न ठेवता केवळ कर्तव्य म्हणून कर्म केल्यानं जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रत पोचू शकतो..
"म्हंणूनच निष्काम बुद्धीनं आचरण करून समाजासमोर एक आदर्श ठेव.. ह्या जगात खरोखर ज्यांनी स्वधर्माचं निष्काम बुद्धीनं आचरण केलं ते मोक्षपदास गेले. त्यामुळं कर्माच्या ठिकाणी आस्था हवी.. तुझ्यासारखंच कर्माचं निष्ठेनं आचरण त्यांनी केल्यास त्यांची ही दुःखं कमी होतील कारण श्रेष्ठ आणि ज्ञानी लोकांचं समाज अनुकरण करतच असतो." असा उपदेश भगवान करतात..
म्हणजेच श्रेष्ठ पुरुष जे कर्म करतात त्याचंच अनुकरण इतर लोक करतात.. ते जे प्रमाण ठरवतात, तेच प्रमाण ग्राह्य धरतात.. आणि त्यातून निर्माण होतो तो धर्म.. मग तो गांधीजींनी केलेला मिठाचा सत्याग्रह असो वा गरजेपुरते कपडे परिधान करणं असो, सूतकताई असो वा स्वदेशी मालाचा वापर असो.. वेळोवेळी जनसमुदायानं त्यांचं अनुकरण केलं.. हळूहळू अश्या आचरणाचा धर्म बनला आणि नाव मिळालं गांधीगिरी.. इतकंच काय तर त्रैलोक्याचा स्वामी असणाऱ्या भगवानांना सुद्धा कर्म चुकलं नाही.. लहानपणी गवळ्याचं पोर बनून गायी चरायला नेल्या तर द्वारकाधिश असताना सुद्धा अर्जुनाचा सारथी बनून घोड्यांचा खराडा ही तितक्याच निष्काम बुद्धीनं केला.. परिस्थितीमुळं मिळालेलं कोणतेही कर्म धर्मरूपच असतं आणि ते केलं पाहिजे हा तो आदर्श..
म्हणून जो समर्थ आहे, सर्वज्ञान संपन्न आहे, त्यानं कर्माचा त्याग कधीही करू नये.. कर्मफलांची अपेक्षा न करता, लोकसमुदायासाठी कर्म करत राहावं.. निष्काम बुद्धीचं आचरण करून इतरांना कर्म करण्यासाठी सतत प्रेरित करावं..
प्रकृते: क्रियमाणानि, गुणै: कर्माणि सर्वश:।... म्हणजेच सर्व कर्मं प्रकृतीच्या गुणांनी होतात.. प्रकृती ही एक शक्ती आहे जिच्यामुळं ह्या विश्वाचं रहाटगाडगं सुरु आहे.. परंतु सामान्य माणूस, जो देहबुद्धी आहे - 'मी देह आहे' असं म्हणणारा आहे - तो अहंकारापोटी 'कर्म मी केलं' असं म्हणत असतो.. हा विकार ज्ञानी म्हणजे जे आत्मबुद्धी आहेत - 'मी आत्मा आहे' असं म्हणणारा- ठिकाणी मुळीच नसतो.. हे ज्ञानी देहाभिमान सोडून, आत्मबुद्धी होऊन, देहात फक्त *साक्षित्वानं वागतात.. देहाचा उपयोग फक्त कर्म करण्यासाठी करतात..
प्रत्येक माणूस हा स्वतःच्या प्रकृती गुणांप्रमाणं वागत असतो.. सात्विक, राजस आणि तामसी अश्या तीन प्रकृती गुणांमध्ये त्याचं वर्तन म्हणजेच कर्मं दिसून येतात.. जसं तामसी आळशी निद्राप्रिय असतो.. सुस्ती, जडत्व, मोह ह्यात गुरफटलेला असतो तर राजसी धडपड्या, लढाऊ वृत्तीचा पण मोह आणि इच्छा ह्यात अडकलेला असतो.. सात्विक गुण असलेला ज्ञानी, शांतीप्रिय, निस्वार्थ प्रेम करणारा, भक्तीच्या मार्गावर चालणारा असतो.. सामान्य माणूस व्यवहारानुसार कधी तामसी तर कधी राजस ह्या गुणांमध्ये वर्तन करताना दिसतो.. ज्ञानी लोकांना प्रकृतीच्या ह्या गुणांची, त्याच्या शक्तीची जाणीव असते.. थोडक्यात, प्रकृतीच्या अधीन होऊन जो वागतो तो गुणांच्या मोहमायेत अडकवून राहतो.. त्यामुळं 'कर्मफलाची अपेक्षा न करता माझ्याठायी तुझी सर्व कर्मं अर्पण कर, स्वामित्व सोडून वीरवृत्तीचा स्वीकार कर आणि युद्ध कर' असा उपदेश भगवान अर्जुनाला करतात..
त्रिगुणांच्या मोहमायेत न अडकता, कर्मफलांची अपेक्षा न करता श्रद्धापूर्वक, आदरानं परमात्मयाठायी जे आपली कर्मं अर्पण करतात ते कर्मबंधनातून मुक्त होतात.. पण ज्ञानानं उन्मत्त होऊन जे कर्म करतात ते कपाळ करंटेच.. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावाला, प्रकृती गुणाला अनुसरूनच वागत असतो.. विषयसुखाच्या आसक्तीनं तो सुद्धा वासनांच्या, इच्छांच्या मोहापश्यात भरकटू शकतो..
पंचतत्वात विलीन होणारं शरीर फक्त 'आत्मविकास' करण्याचं, 'आत्मशांती' मिळवण्याचं माध्यम आहे इतकंच.. मग परिश्रम करून, पुष्कळ संपत्ती मिळवून, प्रसंगी स्वधर्माचा त्याग करून केवळ देहाचं पोषण का करायचं? जर शरीर हे पराधीन, गुणहीन आहे तर मग विषयसुखांसाठी इतकी खटपट का करायची?.. चित्ताला मिळणाऱ्या क्षणिक समाधानासाठी?.. ही कामवासना सुरुवातीला सुखावह असली तरी परिणामी तीच दुःखाचं कारण होते..
इंद्रियांमध्ये प्रत्येक प्रकारचा भाव लपलेला असतो, मग तो चांगला असो वा वाईट.. आपण ह्या गुणांच्या मोहपाशात आपसूकच अडकून कर्तव्यापासून भरकटत जातो.. म्हणूनच इंद्रियं आणि विषयसुख हे आत्मसाक्षात्काराच्या मार्गातले शत्रू आहेत..
आपला धर्म, आपलं कर्म(काम) आचरणास जरी कठीण असलं तरी त्याचंच आचरण करावं.. दुसऱ्याचं कर्म(काम) कितीही चांगलं, सोपं असलं तरी स्वधर्म, स्वकर्म सोडू नये.. स्वधर्म आचरण करताना मरण जरी आलं तरी ते कल्याणकारीच असेल, परमात्माकडं नेणारं असेल..
हे सगळं जाणणारा ज्ञानी सुद्धा मग अधर्मानं का वागतो? सर्वज्ञ असून सुद्धा परधर्म का आचारतो? असं काय आहे कि जे त्याला प्रेरित, उद्युक्त करतं? हे जाणण्यास उत्सुक अर्जुन विचारतो, "अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुष:।.. म्हणजे कोणत्या प्रेरणेनं मनुष्य पापाचरण करतो?"..
भगवान म्हणतात, जेव्हा एखादा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा रजोगुणांच्या संगामुळं कामविकार उत्पन्न होतात.. जेव्हा कामाची तृप्ती होत नाही तेव्हा क्रोध निर्माण होतो.. क्रोधातून मोह.. आणि मोहामुळं भौतिक अस्तित्वासाठी धडपड सुरूच राहते.. यांचा अतिरेक झाला की ह्यातून अविद्या, अज्ञान म्हणजेच तमोगुण निर्माण होतात.. काम क्रोधाचा पडदा ज्ञानचक्षूवर आल्यानं ज्ञानी पण अज्ञानी बनून पाप करण्यास प्रवृत्त होतात.. जसा धुरामुळं अग्नी, धुळीमुळं आरसा झाकला जातो तसंच काम क्रोधामुळं शुद्ध ज्ञान झाकलं जातं.. चांगल्या वाईटाचा विचार करण्याची सारासार शक्ती नाहीशी होते आणि ज्ञानी सुद्धा अविद्येनं प्रेरित होऊन पाप करतो..
विषयसुखांनी कोणीच तृप्त होत नाही.. श्रीमंतांना अजुनी श्रीमंत व्हायचं असतं, खाणाऱ्याला अजुनी चवीनं खायचं असतं.. ह्या कामविकारांना, इंद्रियसुखांच्या आसक्तीला भगवान 'अग्नी'ची उपमा देतात.. जसं इंधनांच्या निरंतर पुरवठ्यानं अग्नी विझला जात नाही तसंच ह्या विषयसुखांचं आहे, अमर्यादित इंद्रियतृप्ती केली तरी 'काम' तृप्त होऊ शकत नाही.. त्यांचा कोठेच अंत नाही.. ह्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर 'विषयासक्ती सोडून देऊन आत्म्याच्या ठिकाणी स्थिरबुद्धी होणं' हे होय..
थोडक्यात, इंद्रियं मन आणि बुद्धी हे विषयसुखांचं वास्तव्य स्थान आहेत.. इंद्रियांच्या मदतीनं बुद्धीवर, ज्ञानावर पडदा टाकून विषयसुखं मनाला वश करतात.. काही चांगलं पाहिलं तर त्याची लालसा निर्माण होते आणि नाही मिळालं तर त्यातून क्रोध,मत्सर उत्पन्न होतात आणि हाच क्रोध, मत्सर बुद्धीवर नियंत्रण करायला लागतो.. आणि विशुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो..
"म्हणून हे अर्जुना, विषयसुखांची आसक्ती सोडून देऊन, इंद्रियांवर नियंत्रण ठेवून काम, क्रोध यांना मारून टाक.. देहापेक्षा इंद्रियं श्रेष्ठ आणि इंद्रियांपेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आणि बुद्धीपेक्षा परमात्मा हे तू जाण.. म्हणून हे महाबाहो, बुद्धीच्या पलीकडं असणाऱ्या परमात्म्याला जाणून स्थिरबुद्धीनं ह्या कामरूपी शत्रूस जिंक.." असा उपदेश करून भगवान ह्या अध्यायाची सांगता करतात..
कर्मफलाशा सोडुनी पार्था आचर तू युद्धधर्म
मिळवण्या आत्मशांती कर्माहून श्रेष्ठ ज्ञान तू जाण
ऐकून हा ज्ञानयोग उपदेश पुसता झाला अर्जुन
असे सर्वश्रेष्ठ ज्ञान तर का करावे मी युध्दकर्म? ।।१।।
ऐक *अनघा परत सांगतो उत्तरले भगवान
दोन मार्गी प्रयत्न करतो घडण्या *आत्मसाक्षात्कार
तत्वज्ञानी चालतो ज्ञानमार्ग तर योगी साधक कर्ममार्ग
ज्ञानमार्ग वा कर्ममार्ग ध्येय एकच मिळवणे परमधाम ।।२।।
कर्म करणे असे हा प्रकृती स्वभाव धर्म
न होतसे कर्मयोगी केवळ करता विहित कर्म
घेऊनी कर्मसंन्यास न कोणी होतसे सिद्धयोगी
अनासक्ती इंद्रियनियम आचारे तो खरा कर्मयोगी ।।३।।
आत्म्याठायी स्थिरबुद्धी ज्याची पावे आत्मसुखाची तृप्ती
आत्मानंदी निष्कामबुद्धी असा ज्ञानी मिळावे मोक्षप्राप्ती
कर्माठायी ठेवून आस्था कर जनलोका प्रेरित कर्म
आचरण करून स्वधर्माचं लोककल्याणा हो आदर्श ।।४।।
ठेव साक्षीभाव हो आत्मबुद्धी सोडून देहाभिमान
कर्म तू न करशी करे प्रकृती गुण माया हे जाण
सोड स्वामित्व अर्पून कर्मे मंत्र हा अनासक्तीचा
हो तयार युद्धासी करून स्वीकार वीरवृत्तीचा ।।५।।
इंद्रिय-मन-बुद्धी विषयसुखांचे वास्तव्य स्थान
रजोगुण संगे जीव येता उत्पन्न कामविकार
अतुप्त कामविकारे निर्माण क्रोध-मोह-अज्ञान
तमोगुणी विशुद्ध जीव रममाण भौतिक जगतात ।।६।।
जाणूनी हा 'कर्मयोग' प्रभुमुखातून
होऊ कार्यरत कर्तव्य अन् विहित कर्मातून
जाणता देह इंद्रिय मन पर बुद्धी अन् बुद्धी पर परमात्मा
होउनी स्थिरबुद्धी जिंकेल कामक्रोध हा अनासक्त जीवात्मा ।।७।।
हरी ॐ तद् सद्
॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
********************
*आत्मसाक्षात्कार: अर्जित ज्ञान (अभ्यासातून मिळवलेलं ज्ञान) आणि अनुभवातून, विशुद्ध भक्तीतून मिळवलेलं ज्ञान ह्यामुळं येणारी समदृष्टी.. थोडक्यात आत्मा, परमात्मा आणि चराचर ह्याकडं समबुद्धीनं पाहणं म्हणजे आत्मसाक्षात्कार..
* परमसत्याचा शोध: परमात्म्याच्या संबंधात असणारी आत्म्याची मूळ स्वरुपस्थिती जाणणे..
*साक्षित्व: कर्मं हा प्रकृतीचा, मायेचा खेळ आहे आणि आपण त्या खेळाचे फक्त साक्षी आहोत ही भावना..
*अनघ: निष्पाप अर्जुन..
-मी मधुरा..
************************************************