श्रीपरमात्माने नमः
अध्याय ४ "ज्ञानकर्मसंन्यासयोग"
( दिव्य ज्ञान )
तिसऱ्या अध्यायात श्रीभगवान कर्मयोगाबरोबरच कर्मामागं असणारी यज्ञभावना -कर्मयज्ञ- म्हणजे काय? ज्ञानी व्यक्तींचं लोक कल्याणार्थ कर्तव्य कसं असावं, कर्मसमर्पण म्हणजे काय? हे विस्तारानं सांगतात.. बुद्धीच्या पलीकडं असणाऱ्या परमात्म्याला जाणून स्थिरबुद्धीनं कामरूपी शत्रूस जिंकून, कर्म कर म्हणजेच युद्ध कर.. असा उपदेश अर्जुनाला करतात.. तरी ही युद्धाबद्दल, त्याच्या धर्म कर्तव्याबद्दल साशंक असणाऱ्या अर्जुनाला कर्मयोगाची थोरवी सांगत श्रीभगवान 'ज्ञानकर्मसंन्यासयोग' ह्या अध्यायाची सुरुवात करतात..
'ज्ञानकर्मसंन्यास' ह्या शब्दाच्या अर्थाची फोड दोन प्रकारे करता येईल..
१. संन्यस्तवृत्तीनं कर्म करण्याचं ज्ञान
२. कर्म करता करता संन्यस्तवृत्ती प्राप्त होऊन आत्मज्ञान मिळवणं..
पहिली फोड ज्ञानयोगी तर दुसरी कर्मयोगी.. सांख्ययोग (ज्ञानयोग) आणि कर्मयोग ह्या अध्यायांत सांगितलेले विचार ह्या अध्यायात विस्तारानं मांडले आहेत..
हा अध्याय चार भागात विभागला गेला आहे.. पहिल्या भागात श्रीभगवान आपल्या अवतारावर भाष्य करून कर्मयोग सांगतात.. तर तोच कर्मयोग योगी, संतमाहात्मे कसा आचरणात आणतात हे दुसऱ्या भागात सांगतात.. तिसऱ्या भागात यज्ञ तर चौथ्या भागात ज्ञानाचं महत्व अधोरेखित करतात..
'कर्मयोग' ह्या अत्यंत जिव्हाळ्याच्या योगाची महती सांगून श्रीभगवान, जेव्हा जेव्हा धर्मस्थापनेसाठी, विश्वकल्याणासाठी ह्या ज्ञानाची गरज पडेल तेव्हा तेव्हा ते जन्म घेतील असं सांगतात.. कोणते ही कर्तव्य, 'कर्म समर्पण' भावनेनं केलं कि ते परमात्म्यास पोचते तसंच 'ज्ञानरूप तपानं' सुद्धा ते कसं साध्य करता येईल हे सांगतात.. थोडक्यात, कर्मातून ज्ञान, ज्ञानापासून इंद्रियांच्या आसक्तीवर नियंत्रण आणि त्यामुळे निर्माण झालेला कर्मसंन्यास म्हणजेच हा अध्याय होय..
'श्रीभगवान उवाच' नं अध्यायाची सुरुवात होते.. श्रीभगवान सांगतात.. मी ह्या अव्ययी, अविनाशी ज्ञानाचा उपदेश सर्वप्रथम सूर्यदेव विवस्वनाला केला, सूर्यदेवानं तो मानवजातीचा जनक वैवस्वत मनूला केला आणि मनूनं तो इक्ष्वाकूला (श्रीरामाचे पूर्वज) केला.. ह्याप्रमाणं हे दिव्यज्ञान गुरुशिष्य परंपरेनं राजऋषींनी ही प्राप्त केलं.. पण पुढं काळाच्या ओघात ही परंपरा खंडित होऊन हे ज्ञान लुप्त झालं.. देहावर प्रेम, विषयसुखांची आसक्ती ह्यामुळं आत्मबोधाचा विसर पडत गेला.. विषयसुख म्हणजेच इतिकर्तव्यता वाटून, आत्म्याचा विसर पडला, इंद्रियप्रेम वाढलं आणि हा ज्ञानयोग लुप्त होत गेला..
पुढं श्रीभगवान म्हणतात, "पुरातन, गूढ, अलौकिक असा हा योग, जो माझ्या जिव्हाळ्याचा आहे, तो मी तत्वतः तुला सांगत आहे कारण तू प्रेमाचं, भक्तीचं, मित्रत्वाचं आणि माझ्या विश्वासाचं मूर्तिमंत रूप आहेस.."
अर्जुनापुढं उभा असणारा कृष्ण हा सूर्याच्या आधी जन्मणं शक्य नाही.. म्हणून आश्चर्यचकित झालेला अर्जुन 'ह्या योगाचा प्रथम जाणकार सूर्यदेव कसा?' असा प्रश्न विचारतो.. तेव्हा श्रीभगवान म्हणतात, "परंतप अर्जुना, तुझे माझे अनंत जन्म झाले आहेत.. ते जन्म मला आठवतात पण तुला नाही.. म्हणून तू गोंधळून गेला आहेस, साशंक आहेस.. मी अजन्मा - जन्म न घेणारा, अविनाशी - नाश न पावणारा आणि निराकार आहे.. आणि जगत्कार्यासाठी योगमायेनं मी अवतार घेतो...
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे।।
ज्या ज्या वेळी अधर्मानं धर्माचा ऱ्हास होतो त्या त्या वेळी मी अवतार घेतो.. भक्तांच्या कैवारासाठी, दुष्टांचा समूळ नाश करण्यासाठी, धर्माची पुनःस्थापना करण्यासाठी मी परत परत जन्म घेतो.. आणि हे जे जाणतो तो खरा ज्ञानी होय.."
अजन्मा असून ही भगवंताचं जन्म घेणं, अवतार घेणं, निष्कर्म असून ही कर्म करणं, हे स्वरूप जो निःशंक जाणतो, तो देहत्याग केल्यावर ही ह्या भौतिक जगात परत जन्म घेत नाही.. तर भगवंताच्या शाश्वत रूपात विलीन होतो, परममुक्त होतो.. तसंच जे आसक्ती म्हणजेच काम, क्रोध, भय, मत्सर ह्यातून मुक्त होऊन, समर्पण भावनेनं कर्म, ज्ञानार्जन करतात, ते ही त्या शाश्वत रूपात विलीन होतात.. जे ज्या भावनेनं भगवंताला-परमात्म्याला शरण जातात त्या भावनानुरूप फळ त्यांना मिळतं..
मनात अनेक हेतू, इच्छा ठेवून नानाविध मार्गांनी उपासना केली जाते.. अनेक शास्त्रांचा अभ्यास केला जातो.. नाना देवतांचं पूजन केलं जातं..
भगवंत, परमशक्ती परमेश्वर हा एकच आहे आणि तो ह्या भौतिक सृष्टीच्या अतीत आहे.. ह्या नानाविध देवता म्हणजे भगवतांनी दिलेल्या भौतिक शक्तींनी युक्त असे जीव.. त्यामुळं जशी ज्या देवतेची आराधना, पूजा तसं त्याचं फलं.. अश्या सकाम कर्मांची फलप्राप्ती ही त्वरित आणि क्षणिक असते..
सकाम कर्म म्हणजे काय हे सांगताना भगवान कर्मांचं वर्गीकरण करतात.. भौतिक प्रकृतीचे तीन गुण - सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण- आणि त्यांना अनुरूप अश्या कर्माला अनुसरून मानवी समाजाचे चार विभाग - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र - असं हे वर्गीकरण.. जे सत्वगुणांत स्थित ते ब्राह्मण ज्यांना ज्ञानाची आस आहे, रजोगुणांत स्थित ते क्षत्रिय जे प्रशासन करतात, रजोगुण-तमोगुण ह्यात स्थित असे वैश्य-व्यापारी आणि तमोगुणांत स्थित असा कामगार वर्ग-शूद्र..
वर्ण कोणताही असो आत्मज्ञान मिळालं की मोक्षसिद्धी प्राप्त होते.. 'वाल्याचा वाल्मिकी' होतो..
सृष्टीचं सृजन असो किंवा गुणकर्मानुसार वर्णांची निर्मिती, भगवंत कर्ता असून सुद्धा अव्ययी-अपरिवर्तनीय असल्यानं अकर्ताच असतात.. भगवंत त्यांच्या सगुण साकार अवतारात, सर्व विहित कर्मे करतात.. पण कर्मफलांची आसक्ती नसल्यानं ती कर्मे त्यांना बद्ध करत नाहीत.. आणि जे कोणी हे परमात्म्याच्या अनासक्त कर्माचं तत्व जाणतो तो ही कर्म बंधनातून मुक्त होतो..
"मुमुक्षु म्हणजे मोक्षाची अपेक्षा करणाऱ्या तुझ्या पूर्वजांनी माझं हे स्वरूप जाणून त्याचं अनुकरण केलं.. म्हणून हे अर्जुना, तू ही ह्याच मार्गाचं अनुकरण कर".. असं सांगून श्रीभगवान दुसऱ्या भागाकडं वळतात.. आणि सृष्टीचा कर्ता परमात्म्यासारखं निरपेक्ष कर्म कसं असावं हे सांगतात..
निरपेक्ष कर्म करायचं असेल तर कर्म, अकर्म आणि विकर्म ह्यातील भेद जाणणं आवश्यक आहे.. हा भेद जाणणाराच कर्माचं तात्विक स्वरूप समजू शकतो.. हे स्वरूप ज्याला कळतं तो कर्म करून ही अलिप्त राहतो.. कर्म, अकर्म, विकर्म ही वेगवेगळी कर्मं नाहीत.. श्रीभगवान म्हणतात कर्मातच कर्म आणि विकर्म दडलेलं असतं.. कर्माकडं आपण कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो ते महत्वाचं..
जो अल्पसंतुष्ट आहे, जो द्वंद्वातीत आहे, जो यशापयशामध्ये सुद्धा स्थिर आहे तो कर्मं करत असला तरी कधीच कर्म बद्ध होत नाही.. असं निस्पृहपणे केलेलं कर्म इंद्रियांपर्यंतच मर्यादित राहतं, ते आत्म्याला बद्ध करत नाही.. असं भासमान कर्म म्हणजे अकर्म.. माऊली म्हणतात, "जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे ।तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहें ".. म्हणजेच, पाण्यात दिसणारं प्रतिबिंब आपलं असलं तरी ते आपण नाही.. तसंच कर्म हा शरीराचा धर्म असला तरी तो आत्म्यापासून वेगळा आहे.. अश्या निस्पृहवृत्तीनं केलेलं कर्म हे अकर्म.. कारण शरीर कर्म करत असतं पण आत्मा त्यापासून मुक्त असतो..
'जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म' तो खरा ज्ञानी.. असा हा ज्ञानी सर्व कामात मग्न असला तरी तो परमात्मापाशी स्थिरबुद्धी असतो.. तो मनावर नियंत्रण ठेवून बुद्धीनं कर्म करत असतो.. स्वामित्वच्या भावनेचा त्याग करून फक्त जीवनावश्यक गोष्टींसाठीच कर्म करतो.. त्यामुळं त्याच्याकडून पापकर्म घडत नाही..
असा हा कर्मयोगी कर्म करत असला तरी कर्मरहित असतो.. सत्व-रज-तम गुण असले तरी गुणातीत असतो.. प्राकृतिक गुणांपासून अनासक्त झाल्यानं आणि धर्म-कर्म बंधनातून बाहेर पडून ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाल्यानं त्याचं कर्म पूर्णपणे दिव्यत्व प्राप्त करतं..
हे दिव्यत्व प्राप्त कर्म म्हणजेच विकर्म-विशेष कर्म.. म्हणजेच अकर्माचं स्वरूप जाणणं किंवा आत्म्याचं स्वरूप जाणणं.. विकर्म हे कर्म नसून ज्ञान आहे.. असा ज्ञानी कर्म करून ही कर्मबद्ध असतो, उपभोग घेऊन ही भोगमुक्त असतो.. नित्य कर्म करून ही निष्कर्मी असतो.. ही कर्मातील विकर्माची भावना म्हणजे यज्ञ असं सांगून श्रीभगवान तिसऱ्या भागाकडं वळतात..
यज्ञ हे एक निरपेक्ष कर्म आहे.. ही एक अध्यात्मिक भावना आहे.. ह्या यज्ञात हवी अर्पण करणारा (कर्मयोगी), हवी(आहुती-कर्म), हवन (अग्नी), यज्ञाचा अधिष्ठाता (परब्रह्म) आणि अंती प्राप्त होणारं फल सर्व काही परब्रह्ममध्ये एकरूप होतं.. थोडक्यात, 'सर्व खलू एवं ब्रह्म'- सर्व काही ब्रह्मच आहे अशी ही भावना..
प्रत्येक कर्म हे यज्ञवतच असतं.. ते अर्पण भावनेनंच केलं पाहिजे.. प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या धर्म आणि कर्त्यव्यानुसार ते करत असतो.. काही देवदेवतांना विविधप्रकाराचे यज्ञ अर्पण करून त्यांची उपासना करतात तर काही परब्रह्म अग्निमध्ये स्वधर्मानं आत्म्याचं हवन करतात.. कोणी आत्मसंयमरूप अग्निमध्ये कायिक, वाचिक, मानसिक युक्ती मंत्रांनी इंद्रियरूप द्रव्याचं हवन करतात.. तर कोणी इंद्रियरूपी अग्नी ज्ञानानं पेटवून ह्या वैराग्यरूपी अग्नीत विषयसुखांची आहुती देतात.. आणि इतर काही मन आणि इंद्रियांच्या संयमानं आत्मसाक्षात्कारासाठी इंद्रियांच्या सर्व क्रिया/कर्म मनरूपी अग्नीत अर्पण करतात..
ह्या निरनिराळ्या यज्ञांच्या माध्यमातून आत्मसंयम आणि इंद्रियनियमन करून, कर्मबंधनातून मुक्त होऊन आत्मज्ञान प्राप्त करणं हे मूळ उद्दिष्ट..
श्रीभगवान म्हणतात, काही जण कठोर व्रत-तपस्या करतात तर काही आपल्याकडील द्रव्याचा यज्ञ (दान) -द्रव्ययज्ञ- करतात.. काहीजण जीवनातील भौतिक सुखांचं हवन -तपोयज्ञ- करतात.. काहीजण अष्टांग योग -योगयज्ञ- पद्धतीचं आचरण करतात तर काही दिव्यज्ञानात प्रगत होण्यासाठी वेदाध्ययन -ज्ञानयज्ञ- करून प्रबुद्ध होतात.. काही शब्दानं शब्दांचं हवन- शास्त्रोक्त चर्चा -वाग्यज्ञ- करतात.. आणि जीवनातील उन्नतावस्थेचा शोध घेतात..
योग समृद्धीनं सुसंपन्न आपल्या प्राणाचं आत्माच्या ठिकाणी हवन करतात.. काही समाधिस्थ राहण्याकरता प्राणायाम पद्धतीचा अवलंब करतात.. प्राणवायूचं अपानवायूमध्ये आणि अपानवायूचं प्राणवायूमध्ये हवन करतात.. शेवटी संपूर्ण श्वासोच्छवास थांबवून असे 'प्राणायामपरायण योगी' समाधी अवस्थेत राहतात.. तर काही आहार नियमन करून प्राणवायूचंच प्राणवायूमध्ये हवन करतात.. अश्याप्रकारे यज्ञाचं प्रयोजन उत्तमरितीनं जाणणारे हे सर्व यज्ञकर्ते मोक्ष प्राप्त करतात.. सनातन ब्रह्मस्थानाची प्राप्ती करतात.. ब्रह्मरूप होतात..
हे विविध कर्मातून निर्माण झालेले वेदसंमत यज्ञ शरीर, मन किंवा बुद्धीद्वारे करता येतात.. ज्ञानाशिवाय यज्ञ म्हणजे केवळ भौतिक कर्मच.. यज्ञामागची श्रद्धा, उद्देश फक्त द्रव्यसंचय, प्रतिष्ठा, भौतिक सुख मिळवणं असेल तर ते नक्कीच कर्मबद्ध करतात.. पण जेव्हा हे यज्ञ दिव्य ज्ञानाच्या उन्नतभावनेनं केले जातात तेव्हा ह्या यज्ञकर्मांना अध्यात्मिक स्वरूप प्राप्त होतं.. यज्ञाच्या कर्मकांडापेक्षा ज्या यज्ञाचं फलित ज्ञानप्राप्तीत होतं तोच श्रेष्ठ यज्ञ होय..
सर्व कर्मयज्ञांचं पर्यवसन दिव्य ज्ञानात 'अहं ब्रह्मासि' - ब्रह्म म्हणजेच मी, मी म्हणजेच ब्रह्म - अश्या अद्वैतात होते. हा आत्मसाक्षात्काराचा मार्ग निःसंशय कठीण आहे पण आत्मसाक्षात्कारी, अध्यात्मिक गुरुंकडं जाऊन हे तत्त्व जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.. जिज्ञासा, नम्रता, सेवाभाव, समर्पण हेच अध्यात्मिक प्रगतीचं रहस्य आहे.. ज्ञानाच्या प्रकाशानं मिथ्या अहंकार, मोहरूपी अंधार नाहीसा झाला कि सर्व प्राणीमात्रात परमात्माचा अंश दिसेल.. सर्व रूपात निरंतर तो परमेश्वर परमात्मा दिसेल..
ज्ञानयज्ञ म्हणजे काय सांगून झाल्यावर, श्रीभगवान ज्ञानयज्ञाची महिती सांगून अध्यायाची सांगता करतात..
कितीही पापी असला तरी ज्ञानामध्ये त्याला सुधारण्याचं प्रचंड सामर्थ्य आहे.. ज्याप्रमाणं प्रज्वलित अग्नी सरपण भस्मसात करतो त्याचप्रमाणं ज्ञानाग्नी सर्व प्राकृत कर्मबंधनं भस्मसात करतो.. केवळ पापकर्मांचीच नाहीत तर पुण्यकर्मांची संचित आणि क्रियमाण फलं, बंधनं सुद्धा भस्मसात होतात.. ज्ञानासारखं पवित्र, विशुद्ध आणि उदात्त असं दुसरं काहीही नाही.. असं ज्ञान म्हणजे सर्वसिद्धीचं परिपक्व फळ आहे.. जो भक्तिमार्गाचं आचरण करतो त्याला आत्मज्ञानाची अवीट गोडी लागते.. आत्मसुखाच्या गोडीनं तो इंद्रियं आणि विषयसुखांवर नियंत्रण करू शकतो.. श्रद्धेच्या भावनेनं आत्म्यापाशी बुद्धी स्थिर ठेवून आत्मज्ञान मिळवू शकतो..
स्वार्थानं अधर्माची बाजू घेणं जितकं अयोग्य आहे तितकंच केवळ युद्धोत्तर प्रतिष्ठेसाठी धर्माच्या बाजूनं युद्ध करणं ही.. कारण ह्यात असणारी कर्मफलांची आसक्ती.. ह्या आसक्ती पासून संन्यास घेऊन म्हणजेच अनासक्त होऊन कर्म कर असा उपदेश भगवान अर्जुनाला करतात.. श्रीभगवान म्हणतात, "अज्ञानामुळं तुझ्या मनात जे संशय निर्माण झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्रानं छाटून टाक आणि कर्मयोगाचं अवलंबन कर आणि युद्ध कर.."
ऐक परंतपा, दिव्य रहस्य असे जे अविनाशी योगाचे
सांगतो तुज पुरातन विज्ञान जाणून नाते भक्त सख्याचे..
दिला हा दिव्य उपदेश, प्रथम मान सूर्यदेव विवत्सनाचा
जाणिला हा योग मनू-राजर्षीने स्रोत गुरुशिष्य परंपरेचा ।।१।।
होऊ नको अचंबित, जाणून प्रथमश्रोता अलौकिक योगाचा
जन्म जन्मुनी आलो आपण, पण तुज विसर साऱ्या जन्मांचा..
अजन्मा असुन ही जन्मतो मी, करण्या पुनर्स्थापना धर्माची
विनाश करण्या अधर्माचा, अवतरतो पुनःपुनः, माया ही योगमायेची ।।२।।
जाणतो जो हे स्वरूप माझे, न परत जन्मे भौतिक जगतात
अनासक्ती संपर्पणभावे करी जो कर्म, विलीन शाश्वत रूपात..
भौतिक शक्तींनी युक्त असा जीव, देवता म्हणती त्यास
जशी ज्याची आराधना तसे त्याचे फल, तत्वर मिळे हमखास ।।३।।
सकाम कर्मे करी उपासना ठेवून इच्छा मनी
चातुर्वर्ण्य कर्मे असती विभागे प्रकृती त्रिगुणी
सत्वगुणी असे ब्राह्मण तर रजोगुणी क्षत्रिय
रजो-तमोगुण स्थित वैश्य तर शूद्र तमोगुणाय ।।४।।
कर निरपेक्ष कर्म जाणून कर्म-अकर्म-विकर्म भेद
जाणता हे कर्म स्वरूप होशील कर्मबंधने अलिप्त
'कर्मात अकर्म अन अकर्मात कर्म' नसे वेगळा भेद
जाणता हे ज्ञान घडे विकर्म होऊन दिव्यत्व प्राप्त ।।५।।
अर्पिता निरपेक्ष कर्मे अन कर्तव्ये, होतील ती यज्ञवत तू जाण
होता कर्मयोगी, असे समिधा कर्म अन अधिष्ठाता परब्रह्म
करता आत्मसंयम सेवाभाव समर्पण, होईल प्राप्त तुज आत्मज्ञान
होता ज्ञाने दूर अहंकार अन मोह, जाणसी सर्व काही आहे स्वरूप ब्रह्म ।।६।।
जाणूनी हा 'ज्ञानकर्मसंन्यासयोग' प्रभुमुखातून
होऊ सनातनी आत्मज्ञानी विशुद्ध अध्यात्मिक कर्मातून
योगयुक्त तू, टाक छाटून, संशय-अज्ञान, ज्ञानरूपीशस्त्राने
होतील भस्मसात पाप-पुण्य, संचित अन क्रियमान कर्मबंधने।।७।।
हरी ॐ तद् सद्
॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
********************
-मी मधुरा..
************************************************