Friday, September 11, 2020

वाइल्ड फायर डायरीज...

डोंगर पेटला, पळा पळा.... लहानपणी खेळलेला हा खेळ प्रत्यक्षात पहायला मिळेल असे कधी वाटले नव्हते..

सोमवार, ७ सप्टेंबर.. 

सकाळचे ९: वादळाचा अलर्ट.. आज संध्याकापासून २० MPH ने वारे वाहू लागतील आणि मंगळवार पर्यंत ४० MPH वेगाने वाहतील..

अतुलकडून सियाटलहून लवकरच निघालो.. पोर्टलॅंड जसं जवळ येत गेलं तसं वातावरण एकदम ढगाळ जाणवू लागलं.. 'अरे वाह, खूप दिवसाने आज पाऊस पडणार तर..' संपूर्ण उन्हाळा कोरडाच गेला.. खरं तर उन्हाळ्यात थोडा पाऊस होतो.. ह्यावेळी स्प्रिंग मध्ये सुद्धा तसा पाऊस झालाच नाही..

3 pm: घरी पोचलो.. गाडीतून खाली उतरलो.. पण हवा काही फ्रेश वाटेना.. धुराचा वास येत होता.. काही तरी झाले असेल...

6 pm: मैत्रिणीचा मेसेज.. 'माऊंट हूड' ला आग लागली आहे.. सगळे ट्रेल्स बंद केले आहेत.. ओह्ह म्हणजे मगाशी जो धूर जाणवला तो त्या आगीचा होता तर..
लगेचच दुसऱ्या मैत्रिणीचा मेसेज.. 'आम्ही तिकडेच होतो.. पण 'माऊंट हूड' च्या दुसऱ्या साईड ला.. खूप वाईट परिस्थिती आहे.. आणि माऊंट जेफर्सन फॉरेस्टला सुद्धा आग लागली आहे..



बापरे!!! काय चालले आहे हे? इतक्या जवळ वणवा पेटलेला कधीच ऐकला नव्हता.. COVID झाले.. Black Lives Matter झाले.. आता Fire?? कोठे नेवून ठेवले आहे माझे ओरेगॉन? least expected thing is Fire.. तशी २ वर्षांपूर्वी Multnomah Falls पाशी एका मूर्ख माणसाच्या हलगर्जीपणामुळे आग लागली होती.. पण भरपूर पाऊस, पाणी, वनसमृद्धीने नटलेल्या ह्या Emerald State मध्ये अशी नैसर्गिक आपत्ती.. विश्वासच बसत नाही.. Mudslides, Earthquakes, Flooding हे कॉमन आहे पण FIRE??! :(

मंगळवार, ८ सप्टेंबर... 

रात्रभर वाऱ्याचा आवाज येत होता.. सकाळचे ८ वाजले तरी अजुनी सूर्याचे दर्शन नव्हते.. रस्तावर झाडाची पाने इतस्ततः विखुरलेली मात्र दिसत होती.. दिवसभर अधून मधून धुराचे लोट दिसत होते..


5 pm: अचानक अधून मधून दिसणाऱ्या धुराच्या लोटांनी आता स्वच्छ निळे आकाश व्यापायाला सुरुवात केली आहे.. इथून ७०-७५ मैलावर असणारी Lincoln City ला सावधतेचा इशारा दिलाय.. म्हणजे अगदी जवळच.. सुजाता, शिल्पा याचे Vacation House.. आमचे हक्काचे Beach House.. सगळे डोळ्यासमोर दिसते आहे..

जसजश्या बातम्या येत आहेत तसतशी काळजी पेक्षा भिती जाणवत आहे.. कोरडी हवा, वाऱ्याचा जोर ह्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जात आहे.. fire fighters ह्या परिस्थितीतून बाहेर पडायला लोकांना मदत करत आहेत.. Hoping for relief for those are suffering..

हा सूर्य आहे.. खराब हवेमुळे गुलाबी दिसतो आहे.. 
"पुढे काय??" मी हे २०२० बाबत म्हणत नाही आहे.. इतक्या दशकांमध्ये आपल्याला हवामान बदलाचे भयंकर परिणाम सांगण्यात येत आहेत परंतु आपण त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत आहोत, ते नाकारत आहोत किंवा चालढकल करत आहोत.. पॅरिस करारासारख्या करारांपासून लज्जास्पदपणे मागे हटून काय मिळवले?? जे घडते त्याकडे आपण डोळेझाक करत आहोत का? - short term gain for long term pain- And here we are.. विषय थोडा भरकटला पण अश्याच आपत्ती आपण कोठे आहोत? काय करत आहोत? काय करू शकतो? हा विचार करायला भाग पडतात..

8 pm: Evacuating Woodburn.. म्हणजे आता फक्त ३० मैलावर...

ओरेगॉन बरोबर कॅलिफोर्निया मध्ये पण आगीचा धुमाकूळ सुरु आहे.. बापरे आता वॉशिंग्टनचा पण काही भाग..


बुधवार, ९ सप्टेंबर.. 

What a day today!

आजही दिवसभर सूर्याचे दर्शन नाही.. वाऱ्याचा जोर वाढतो आहे.. समुद्र किनाऱ्यावरून दिशा बदलून तो आता आत शिरतो आहे.. Hagg Lake परिसरात लागलेली आग आता इथूनही दिसते आहे..


Devil has arrived...

घरी बसून बातम्या ऐकून, कल्पना करूनच थकून जायला होते आहे.. पण हे काही मैलावर राहणाऱ्या लोकांपेक्षा नक्कीच सुसह्य आहे.. लोक evacuate होत आहेत, स्वतःची घरे सोडून दुसरीकडे राहायला जात आहेत.. गायींना पण सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आले आहे.. Okay.. ओरेगॉनमध्ये Tillamook नामक Cheese, Icecream आणि Milkproduct ची फॅक्टरी असल्याने गोपालन हा मोठ्ठा व्यवसाय आहे..

2020 च्या अथक नाटकातील हे आणखी एक दृश्य..


5 pm: Medford city is under evacuation :( ... बापरे इतकी मोठ्ठी सिटी कशी evacuate करणार? म्हणजे आता नॉर्थ बरोबर सदर्न ओरेगॉन पण.. जर कॅलिफोर्निया फायर Medford पर्यन्त आली असेल तर? संपूर्ण वेस्ट कोस्ट आगीच्या तोंडात...

एक छोटीशी क्लिप पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा.. ..




7 pm: आजूबाजूच्या लोकांनी पॅकिंग सुरु केले आहे.. कधी घर सोडून जावे लागेल काही सांगता येत नाही.. किती कठीण आहे.. काय घेऊन जायचे आणि काय ठेवून जायचे.. आत्ता ह्या क्षणाला सगळेच महत्वाचे वाटते आहे.. जायचे तर कोठे जायचे? ग्रुपवर उलटसुलट चर्चा सुरु आहे.. पासपोर्ट आणि लिगल डॉक्युमेंट्स तरी नक्कीच..

Newburg ला पण फायर.. इथून दुसऱ्या दिशेला २५ मैलावर..

Lake Oswego.. Level 1 Alert.. फक्त १० मैल... आता मात्र पॅकिंगचा विचार केलाच पाहिजे.. वाऱ्याचा जोर थांबला आहे.. त्यामुळे आज रात्र कशी जाते ती पाहून उद्या सकाळी ठरवू..




गुरुवार, १० सप्टेंबर... 

आजचा दिवस धुराचे पांगरून (smoke blanket) घेऊन उजाडला.. दाट धुराच्या ढगांमुळे अंधारून आले होते.. वारा एकदम शांत होता.. त्यामुळे सगळीकडे धुराचा वास, जळालेल्या लाकडांचा वास भरून राहिला होता.. एरवी मला हा धुराचा वास खूप आवडतो.. शेकोटी पेटलेला.. लहानपणच्या रम्य आठवणी जागा करतो.. पण आज तोच वास नकोसा वाटत आहे..

दिवसभर एअर क्वालिटी खूपच वाईट आहे.. त्यामुळे डोळे खाजणे, नाकातून पाणी येणे असे साईड इफेक्ट्स ही.. अजुनी २ दिवस अशीच हवा असेल म्हणे.. त्यामुळे बाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे..



Portland is #1 at Poor Air Quality



सोमवार-शुक्रवार असे दिसले पोर्टलॅंड
रेडीफ कडून साभार 


त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे आता हा आगीचा भस्मासुर शांत झाला आहे.

Let's hope no surprises rest of the year...

निराश ना होना,
कमजोर तेरा वक्त हैं, तू नही...
वक्त फिर आयेगा...
क्या पता, तुझे हसायेगा या रुलायेगा?
जीना हैं तो इस पल को ही जी ले...
क्योंकि, इस पल को, अगले पल तक
वक्त भी नही रोक पायेगा...



-मी मधुरा.. 

************************************************

Friday, September 4, 2020

मिनिमलिझम आणि मी ५...

निकष पसाऱ्याचे...

आजूबाजूच्या पसाऱ्याचा, अडगळीचा, विचार करताना मागे Opra ह्या talk show मध्ये ऐकलेली मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल आठवली.. आणि मग शोधाशोध सुरु झाली.. मिनिमलिझम हे सूत्र किती वेगवेगळ्या पातळ्यांवर, सखोलतेनं आणि सहजतेनं आपल्या रोजच्या आयुष्यात सामावून घेता येऊ शकतं हे त्यातूनच लक्षात येत गेलं.

"उतू नको, मातु नको" ही आजी-आई ने दिलेली शिकवण ह्यापेक्षा काही वेगळी नव्हती.. कोणत्याही भारतीय व्यक्तीला काटकसर, पुनर्वापर, कमीतकमी वस्तुंचा संचय, साधी रहाणी या मिनिमलिझमच्या मुलभूत संकल्पना काही वेगळ्या नाहीत..
'अती समृद्धता आणि अभाव ही राहणीमानामधली दरी सांधण्याचे सामर्थ्य मिनिमलिझम विचारसरणीतच आहे'.. हे ओळखूनच महात्मा गांधींनी साधेपणा आणि कमीत कमी जीवनावश्यक वस्तूंचा वापर ही जीवन पद्धती स्वतः अंगीकारून केवळ भौतिकच नाही तर मानसिक, वैचारिक मिनिमलिझमचा पाया घालून दिला... तो आजच्या सर्व मिनिमलिझमचा आदर्श आहे असे मला वाटते.

मृत्यूनंतर महात्मा गांधींच्या खाजगी मालमत्तेमध्ये, त्यांचे रोजच्या वापरातले घड्याळ, चष्मा, चपला आणि जेवणाचा वाडगा इतक्याच गोष्टींचा समावेश होता.. ही गोष्ट त्यांच्या वागणुकीतला आणि विचारांमधला साधेपणा सिद्ध करायला पुरेशी आहे.. 'अल्टीमेट मिनिमलिस्ट' म्हणून महात्मा गांधींचे नाव अनेक आधुनिक मिनिमलिस्ट आदराने घेतात ते त्याकरताच..

'भौतिक जीवन, भौतिक वस्तू नाशवंत आहेत त्यामुळे त्याचा मोह टाळला तर अनेक दु:खांमधून सुटका होऊ शकते' ही बुद्धाची विचारसरणी मिनिमलिझमच्या जवळ नेणारी आहे.. आणि हीच विचारसरणी झेन तत्त्वज्ञानाचा मूळ स्त्रोत पण आहे.
कोणताही बदल हा कधीच सोपा नसतो. जीवन पद्धतीचा तर नक्कीच नाही..

अडथळे, पसारा, अडगळ आपणच निर्माण केलेले असतात, ते दूर सारणं, आवरुन ठेवणं आणि मोकळा, स्वच्छ अवकाश आपल्या सभोवताली निर्माण करणं हे ही आपल्याच हातात असतं.. पसारा किंवा अडगळ होण्याचं, साठण्याचं एकमेव कारण म्हणजे ’लेट गो’ करण्याची, नको असलेलं सहजतेनं सोडून देण्याची अक्षमता. त्यात कधी भावनिकता आड येते तर कधी आठवणी तर कधी भविष्याची सोय.. आपला आळशीपणा, हलगर्जीपणा किंवा बेफिकिरी हे ही कारण असू शकते.. तेव्हा करणे शोधत बसण्यापेक्षा, 'उठा आणि फ़ेकून द्या, किंवा रिसायकल करा..'

पसारा आवरताना, एखादी वस्तू नको आहे हे कसे ठरवायचे? त्याचा निकष कसा लावायचा?

१. काय फेकायचं आहे हे ठरवता येत नसेल तर काय ठेवायचं याचा विचार आधी करायचा. त्या वस्तूकरता जागा निर्माण करायची.
२. अजून एक पद्धत म्हणजे चार खोक्यांवर नावं लिहायची - ठेवणे, टाकून देणे, गरजूला देणे, नंतर ठरवणे. अर्थात ’ठेवणे’ ह्या खोक्यात जास्त वस्तु भरल्या गेल्या तर मात्र ही पद्धत आपल्याकरिता नाही ;-)
३. एक सोपी पण काहीशी वेळखाऊ पद्धत म्हणजे रोज एक वस्तू टाकून द्यायची किंवा देऊन टाकायची.

सगळे कपडे, पुस्तकं, वस्तू वेगवेगळे करून एक एक कपडा, पुस्तक, वस्तू हातात घेऊन, निरखून खालील प्रश्न स्वतःला विचारायचे..
तुम्हाला खरंच ती हवी आहे का?
त्याचा वापर रेग्युलरली केला जातो का?
त्या वस्तूकडे पाहिल्यावर मनात आनंदाची भावना निर्माण होते का?
अजुनी अशी वस्तू किंवा ह्यासारखी दुसरी वस्तू आहे का?
नसेल तर असलेल्यातील दुसरे काही वापरू शकतो का?
खूप महागडी आहे म्हणून ती टाकवत नाही का?
कोणीतरी दिलेली भेट, आठवण आहे का? त्यात भावना गुंतल्या आहेत का?
असुदे कधी गरज पडली तर.. असे वाटते का?
दुसऱ्या कोणाला ह्या वस्तूचा चांगला उपयोग होईल का?

जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी स्वतःसाठी करता तेव्हा ठराविक मर्यादेपर्यंत त्याचे अवलंबन करणे शक्य वाटते.. पण जेव्हा संपूर्ण कुटुंबाचा विचार केला जातो तेव्हा सगळ्यांना ह्या सूत्रात बांधणे शक्य होईल का? प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत, मानसिकता वेगळी असते.. नाहीतर पसारा परवडला अशी परिस्थिती व्हायची.. :-)

मिनिमलिझम वर अभ्यास केल्यावर, माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि, कितीही कपाटे आवरली, नव्या वस्तूंच्या खरेदीवर संयम ठेवला, अडगळ दूर करण्याचे सर्व उपाय योजले तरी मुळात जोवर हे विचार आपल्यात रुजत नाहीत, तोवर हे सर्व प्रयत्न व्यर्थ आहेत.. बदल हा नेहमी आतून बाहेर व्हायला हवा.. विचार बदलले कि आचारात बदल नक्कीच होतो..

'गरजा आणि इच्छा या मधला नेमका फरक ओळखून साधेपणाने, तणावरहित जीवन जगणे'.. हा पण मिनिमलिझम च नाही का?

ह्या वर्षा अखेरपर्यंत घरातील पसारा आवरेन म्हणते.. बघू कसे काय जमते ते..



-मी मधुरा.. 

************************************************

मिनिमलिझम आणि मी ४...

"द मिनिमलिस्ट"..

क्लटरफ़्री, पसारामुक्त जीवन पद्धती म्हणजे मिनिमलिझम.. साधेपणाने जगण्याचे एक सूत्र..

मिनिमलिझम किंवा मिनिमलिस्ट जीवन पद्धतीचे अवलंबन म्हणजे कमीतकमी, अत्यावश्यक गरजेच्या, स्वत:ला महत्वाच्या वाटणा-या वस्तुंसोबत जगणे.. एका साध्या, मिनिमलिस्ट जीवन पद्धतीकडे घेऊन जाणारी ही वाट, प्रत्येकाची वेगळी...
आयुष्य जास्तीत जास्त सोपेपणाने जगणे, कमीत कमी वस्तु वापरणे, गरजेपुरतेच जमवणे आणि कोणत्याही ताण तणावाशिवाय आनंदात जगणे हा विचार वाचताना कितीही आकर्षक, हवासा वाटला तरी प्रत्यक्षात अंगीकारणे तसे कठीणच.. पण हे अंगीकारून, "मिनिमलिझम" जीवन पद्धतीचा प्रसार करणारा अमेरिकेचा "जोशुआ बेकर" विरळाच.. त्याच्या ह्या “द मिनिमलिस्ट” चळवळीची सुरुवात झाली ती, त्याने घरातला, गराज मधला ओसंडून वहाणारा पसारा, वस्तुंची अडगळ आवरायला काढली त्या दिवशी.. ड्राइव्हवे वरचा प्रचंड मोठा ढिगारा पाहून जोशुआचा म्हातारा शेजारी त्याला सहज म्हणाला, “खरंच तुला या इतक्या गोष्टींची गरज होती का?” या प्रश्नाचे उत्तर शोधताना जोशुआचे पुढचे आयुष्य बदलून गेलं.. आणि मग जोशुआने नुसती अडगळच नाही तर घरातल्या इतरही अनेक वस्तु डोनेट, रिसायकल करायला सुरुवात केली. यातूनच कमीतकमी वस्तुंसोबत जगण्याची, मिनिमलिस्ट जीवन पद्धती त्याला सापडली आणि मग मिनिमलिस्ट ब्लॉगर्स चळवळ सुरु झाली..

’मिनिमलिझम’ म्हणजे सर्वसंगपरित्याग नाही किंवा कोणतेही आधुनिक फॅड ही नाही. त्याकरिता कोणत्याही गोष्टीचा त्याग करणं, कोणत्याही बंधनात अडकवून घेणं अपेक्षित नाही. ही एक पर्यायी जीवनपद्धती आहे. व्यक्तिगणिक त्याला रोजच्या जगण्याला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी बदलत असतात. काहीजणांना स्वत:चं घर, कार, टीव्हीसेट या गोष्टी आवश्यक वाटू शकतात तर काही जणांना अनावश्यक.. प्रत्येकालाच एका साचेबद्ध पद्धतीने ही जीवनपद्धती स्वीकारणे कितपत शक्य आहे? जोशुआच्या भाषेत "मिनिमलिझम" जीवन पद्धती म्हणजे “शंभरहून कमी गोष्टींसोबत जगणं”.. रोज ठरवून काही गोष्टी कमी केल्या, नवीन वस्तु आणण्यापेक्षा आहेत त्यांचाच नवा उपयोग शोधून काढला तर हे ध्येय बघता बघता साध्य होऊ शकतं.
"जगताना मुक्तपणा, मोकळेपणा जाणवायला हवा" हे मिनिमलिस्ट जीवन पद्धतीचे मुख्य सूत्र... भिती, असुरक्षितता, स्पर्धा, काळजी, तणाव यापासून मुक्ती... अपराधभाव, नैराश्य जोपासणा-या ग्राहक-संस्कृतीच्या चंगळवादी जाळ्यात अडकून रहाण्यापासून मिळालेली मुक्ती... मात्र ह्यासाठी जाणीवपूर्वक, विचार करुन आयुष्यातील प्रायॉरिटीज ठरवायला हव्यात..
आलिशान घर, लक्झरी कार, कुटुंबाकरता चैनीच्या वस्तु खरेदी करायच्या आहेत? खुशाल खरेदी करा.. करिअरच्या मागे धावायचं आहे? तसं करा.. पण त्या आधी आयुष्यातील प्रायॉरिटीज ठरावा.. उगाचच ग्राहक-संस्कृती, जाहिराती यांच्या मा-याखाली दबून जाऊन, स्वत:ची विचारशक्ती हरवून, आपल्या आयुष्यातल्या सर्वात आनंद देणा-या इतर गोष्टींना डावलून हे करु नका इतकं साधं मिनिमलिस्ट जीवन पद्धतीचे सूत्र आहे..

घर-संसार व्यवस्थित सांभाळून, वस्तुंचा उपभोग घेऊनही मिनिमलिस्ट जीवन पद्धती जोपासता येते.. फक्त त्या वस्तुंना, चैनीला स्वत:च्या आयुष्यात किती महत्व द्यायचे हे ज्याचे त्याने ठरवायचं.. आपले आरोग्य, नातेसंबंध, छंद, व्यक्तिमत्वाची जोपासना, एक व्यक्ती म्हणून आपली होणारी वाढ यापेक्षा या वस्तु मोठ्या आहेत का? हे तपासून पाहायचं.. आपण ह्या भोवतालच्या पर्यावरणाचा, समाजाचा एक घटक आहोत, आपलं आयुष्य जगताना त्यांचंही देणं ही लागतो ह्याचे भान ठेवून, आजूबाजूच्या पर्यावरणाचा एक भाग होऊन जगायचं..

प्रत्येकाचे क्लटरफ़्री, मिनिमलिस्ट लाइफ़स्टाईल जोपासण्याचे ध्येय वेगवेगळे असू शकते. तेव्हा ही जीवनपद्धती कश्यासाठी हवी आहे? हे तपासून पहिले पाहिजे.. साधं रहाणीमान हवं आहे, पैसे वाचवायचे आहेत कि खरेदी कमी करायची आहे?, धावपळ-दगदग कमी करून ताण-तणाव कमी करायचे आहेत का असलेले व्याप कमी करून क्लटरफ़्री जगायचं आहे?, कि पर्यावरण स्नेही व्हायचं आहे?... मग इतरांनी काय काय केलय यापेक्षा, नेमक्या कशाने आपल्याला आनंद मिळेल, ध्येयाप्रत पोचता येईल याचा शांतपणे विचार करुन, वेळेची एक चौकट ठरवून त्यानुसार वागता येईल.

२००८ च्या अनुभवानंतर, "२ वर्षात जे काही वापरले नाही ते पुढे लागणार नाही" हे अवलंबण्याचा प्रयत्न करते आहे.. हा विचार थोडा त्रासदायक आहे पण ह्यामुळे निदान बरीच वर्षे कपाटात पडून असलेल्या गोष्टींचा विचार होतो, कदाचित त्या काढून ही टाकल्या जातात.. आणि प्रत्येक नव्या खरेदीच्या वेळी क्रेडीट कार्ड पुढे करण्याआधी “खरंच याची गरज आहे का?” हा प्रश्न स्वतःला विचारून खात्री करून घेते..

One step at a time किंवा अश्या baby steps घेत थोडे जरी मिनिमलिझम अंगिकारता आले तरी बराच पसारा कमी होईल, नाही का? “शंभरहून कमी गोष्टींसोबत जगणे” सध्या जरी अशक्य वाटत असले तरी, आपण शंभर गोष्टी कमी करायचा नक्कीच प्रयत्न करू शकतो..



-मी मधुरा.. 

************************************************

मिनिमलिझम आणि मी ३...

पसारा सोशल मीडियाचा...

जी गोष्ट वस्तुंच्या बाबतीत तिच नातेसंबंधांच्याही!! खंडीभर मित्र मैत्रिणींची गर्दी अवती भवती करण्यापेक्षा मोजकेच, आयुष्य समृद्ध करणारे मित्र मैत्रिणी जोडणे, जे आहेत ते जपणे हे महत्वाचे..

आपल्या सारख्या सोशल मीडियाच्या व्हर्चुअल जगात जगणाऱ्यांसाठी तर हा पसारा दिवसेंदिवस खूपच मोठ्ठा होत चालला आहे.. फेसबुकवर किती फ्रेंड्स आहेत, इन्स्टा ट्विटर वर किती फॉलोअर्स आहेत ह्यावर होणारी माणसाची पारख आणि व्हाट्स ऍप वर असणारे शेकडो ग्रूप्स.. प्रत्येकाने सातत्याने अपडेट केलेली स्टेटस, टाकलेले फोटो, ते आज कुठे जेवताहेत, कॉफ़ी पिताहेत, त्यांच्या आयुष्यातल्या बारीक सारीक घडामोडी, घटना ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात काडीचाही फ़रक पडणार नसतो पण त्या जाणून घेण्यात आपले कित्येक तास खर्च होतात.. त्यावर प्रतिक्रिया देणे, आलेल्या उत्तराची दखल घेणे, त्यांच्या एका ’लाईक’ ला उत्तर म्हणून आपले चार ’लाईक’.. या सगळ्याला अंत नाही.

प्रत्यक्ष आयुष्यातही आपण नातेवाईकां बरोबरच अनेक लोकांशी जोडले गेलेलो असतो.. शेजारी पाजारी, कॉलनीतले, ऑफिसमधले, मॉर्निंगवॉक-हास्यक्लब-जिम मधले, भिशी-ट्रीप्स-प्रवासात ओळखी झालेले, जोडीदाराचे मित्र-मैत्रिणी.. अगदी रोजचा भाजीवाला, फळवाला, वाणी, इस्त्रीवाला, वॉचमन, कामाला येणाऱ्या बायका..

कधीकधी नुसती ही गर्दी आजूबाजूला असण्याचाही तो ताण येतो.. त्यांच्याशी संबंध ठेवणे, घरी जाणे, बोलावणे, फोनवरुन विचारपूस करणे ही नको वाटू लागते..

खरंच ह्या भरपूर मित्र-मैत्रिणींच्या, नातेवाईकांच्या, आपल्या जवळच्या लोकांच्या ह्या पसाऱ्यात, गर्दीत वेळेला उपयोगी पडणारे किती असतात?.. काहीवेळा त्या चार उपयोगी पडणाऱ्या लोकांसाठी ही गर्दी, हा पसारा जपावा ही लागतो..
अनेकदा नात्यात, मैत्रीत कडवटपणा आलेला असतो, तर काही चिघळलेली असतात.. पण तरीही आपण ती कितीही ताण आला तरी जपतच राहतो.. एकटं पडण्याच्या भितीतून, आपण आजूबाजूला ही गर्दी जमवलेली नाही ना? याचा काटेकोर, स्पष्ट विचार करायला हवा.. असे नातेसंबंध जपून जगण्यातले अनारोग्य वाढवण्यापेक्षा, आपल्याला सोबत लोकांचा गराडा हवाच हा मनाचा हट्ट कमी केला तर?? कघी चार लोकांसोबत तर कधी कधी एकटेपणाने जगण्यात सुद्धा किती मोठा आनंद आहें, शांतता आहे, सोपेपणा आहे हे कदाचित सहज समजून येईल.

ऑगस्ट २०१९ मध्ये, जेव्हा मी 'सोशल मीडिया डिटॉक्स चॅलेंज' स्वीकारले, तेव्हा पहिल्यांदा फेसबुक वापरणे बंद केले..  फेसबुकवर पोस्ट न करणे इथून सुरुवात झाली.. नंतर दिवसातून एकदा ब्राऊज करणे आणि आता तर दोनचार दिवसातून एकदा ५-१० मिनिटे इतकाच काय तो वापर होतो... महत्वाचे म्हणजे त्यामुळे माझ्या सोशल लाईफ मध्ये बिलबुल फरक पडला नाही... पण अनावश्यक ताण नक्कीच कमी झाला.
तसेच व्हॅट्स ऍप चे पण.. ग्रुप नोटिफिकेशन गेले वर्षभर बंद आहे.. पर्सनल नोटिफिकेशन ऑन असल्याने ते लगेच पहिले ही जातात.. otherwise दिवसातून २-४ वेळा व्हाट्स ऍप पाहिले जाते.. आणि तेवढे सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहण्यासाठी पुरेसे आहे असे मला वाटते..



-मी मधुरा.. 

************************************************

मिनिमलिझम आणि मी २...

पसारा आठवणींचा..

पसारा आहे हे मान्य केल्यावर मग पुढे काय?

त्याकडे दुर्लक्ष करणे किंवा तो नाहीच असे समजून वावरत रहाणे.. हे अगदी सोपे उत्तर, पण एका मर्यादेनंतर असे वागणे ही अवघड जाते.. मग तो आवरण्याचा प्रयत्न करणे किंवा तो नजरेसमोरुन नाहीसा करण्याचा प्रयत्न करणे इतकेच काय ते हातात राहते..

२००८ ला अमेरिकेतून इंग्लंडला काही वर्षांसाठी प्रोजेक्टवर जाताना मी ह्या दिव्यातून गेले आहे.. आणि 'गरजेपेक्षा जास्ती गोष्टी खरेदी करायच्या नाहीत, सोसासोसाने जमावायच्या नाहीत' हा कानाला खडा ही लावला होता.. पण काळापरत्वे, तो खडा कधी गळून पडला हे कळलेच नाही.. काही गोष्टी काढून टाकणे, फेकून देणे तेव्हाही जमले नव्हते.. मुख्यत्वे करून ज्यामागे काही आठवणी आहेत, ज्यात भावना गुंतल्या आहेत.. 'आठवणींचा हिंदोळा' असे लिहिलेले कित्येक बॉक्सेस (हो हो बॉक्सेस) आजही स्टोरेज मध्ये पडून आहेत.

सगळ्यात जास्त पसारा, गोंधळ असणारे, किंवा तो आहे असं कायमच वाटणारे ठिकाण म्हणजे आपले कपड्यांचे कपाट. जेथे इंडियन, एथिनिक, वेस्टर्न, इंडोवेस्टर्न दाटीवाटीने वर्षानुवर्षे नांदत असतात..
ह्याशिवाय साड्या.. 'साडी' आवडता पोशाख असल्याने हा तर वेगळाच चर्चेचा विषय आहे.. आईनी हौसेनी घेतलेली पहिली साडी, लग्नातला शालू (जो त्याच दिवशी पहिला आणि शेवटचा नेसला), आजीची नऊवार पासून ते माझे स्वतःचे कलेक्शन.. पेटीकोट, ब्लाउजेस.. त्याचेही आता दोन-तीन सेट. न होणारे, होणारे, नव्या स्टाईलचे. त्यात रेडिमेडचीही भर...
जीन्स, ट्राउझर्स, कॅप्रीज, टॉप्स, टी-शर्ट, ब्लाऊजेस, स्कर्ट्स, मिडीज, ट्युनिक्स, चुडीदार, सलवार, पतियाळा, लेगिन्ग्ज, कुर्ते, ओढण्या, स्टोल्स....
न होणारे, वजन कमी-जास्त होईल तेव्हा घालू म्हणून ठेवून दिलेले, आठवणीखातर ठेवलेले कपडे काढून टाकणे, जुन्या सवयीच्या, प्रेमाने घेतलेल्या, दिलेल्या वस्तु फ़ेकून देणे सोपे नाही.

मॅचिंग बॅग्स, पर्सेस, क्लचेस तसेच सँडल्स, चप्पल, बूट यांची गणती तर संपतच नाही..

तसेच दागिन्यांचेही.. सोन्याचांदीचे लग्नातले, काही कारणाने घेतलेले दागिने, प्रेशस-सेमी प्रेशस स्टोन्स, बरोबरच मॅचिंगची बीड्स, कॉस्च्युम ज्वेलरी.. वापरात नसले तरी कधीतरी लागेल म्हणून ठेवलेले, किंवा कोणीतरी दिले आहे म्हणून जपून ठेवलेले असे अनेक दागिने..

कधीतरी लागतील म्हणून जपून ठेवलेले रॅपिंग पेपर्स, गिफ्ट बॅग्स, गिफ्ट बॉक्सेस…

स्वयंपाकघरातील पसारा... स्वयंपाकाची भांडीकुंडी काही जुनी काही आधुनिक.. जुनी टाकवत नाहीत आणि नवीन भांड्यांचा मोह सुटत नाही.. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स तर रोज शेकडोने बाजारात येतात... येथे ही आठवणींचा पसारा आहेच.. लग्नातल्या रुखवतापासून ते पिढीजात चालत आलेल्या वस्तू मोठ्यांचा आशीर्वाद म्हणून किंवा आठवण म्हणून जपून ठेवल्या जातात..

फोटो, फोटो अल्बम्स, ग्रीटिंग कार्ड्स, लेटर्स, मेमो बुक्स, सुविनीर्स हे सगळे कसे टाकून द्यायचे?... खरंच हा पसारा आहे का? पसारा असला तरी मन हे मानायला तयार होत नाही.. मग 'आठवणींचा हिंदोळा' असे लेबल लावून एका छनाश्या बॉक्स मध्ये जपून ठेवले जाते..

म्हणूनच आठवणींचा पसारा सगळ्यात मोठा आणि त्या पसाऱ्याचा भारही...
आवरायचा प्रयत्न करतानाच कळत जातं आपल्या आवरण्या पलीकडचा आहे हा पसारा...
हा सगळा पसारा आपणच निर्माण केलेला आहे.. आपला पैसा, वेळ, उर्जा खर्च करुन जमा केलेला आहे.. या वस्तु ना धड गरजेच्या, ना धड अडगळीच्या, पण मनाला सुख देणाऱ्या नक्कीच असतात..



-मी मधुरा.. 

************************************************


मिनिमलिझम आणि मी...

सगळा पसारा..

आज रविवार.. सकाळी सकाळी घर एकदम शांत आहे.. बाहेर पक्षांचा किलबिलाट सुरु आहे.. बाजूला छान कॉफीचा मोठ्ठा कप, ऋचाचा cozy बेड (शेजारी ऋचा आणि तिची प्रेमळ उब) आणि मांडीवर MacBook.. अहाहा.. माझी ideal sunday morning..

सध्या COVID च्या दिवसात सगळे दिवस तसे सारखेच.. त्यात summer break.. ना सकाळी उठायची गडबड, ना रात्री वेळेत झोपायचे बंधन.. 'सकाळी नऊ वाजता जिम हिट करायचे, किमान आठवड्यातील ४ दिवसतरी' म्हणून निदान आज weekend असा फील तरी आहे.. MacBook वर बऱ्याच windows open आहेत.. काल रात्री Netflix वर अर्धवट पाहून झालेला movie.. Google Drive वर वाचत असलेले पुस्तक.. Gmail.. Youtube वर रंगपंढरी.. Hotstar..  तेवढ्यात समोरच्या टेबलवर ठेवलेली ऋचाच्या पुस्तकांची थप्पी दिसते.. ही काल परवाच Amazon वरून order केलेली पुस्तके.. आता खरंच नवीन Book Shelf घ्यायला पाहिजे... पण किती हा पसारा.. ही पुस्तके तरी Kindle वर घ्यायला हवी होती.. तेवढाच पसारा कमी झाला असता.. पुस्तकांबरोबरच आजूबाजूला पडलेला पसारा मला दिसतो.. खोलीभर पहुडलेले Stuff Budies, pillows, कपडे.. कशी राहणार dorm मध्ये???.. माझी motherly concern..

ह्या motherly concern बरोबरच डोक्यात अनेक विचार डोकावू पाहतायेत.. अगदी parenting पासून ते ह्या long weekend ला काय करायचे, ह्यावर्षीची चुकलेली India trip, नवीन शाळेचे वर्ष कसे असेल? असे बरेच काही.. डोक्यात विचारांचा पण पसारा होऊ पाहतोय.. मनाच्या तळाशी अस्वस्थतेचा अजून एक नवा थर रचला जाण्याआधीच समोरचा पसारा माझे लक्ष वेधून घेतोय..

ह्या पसाऱ्याबरोबरच घरातील इतर पसाऱ्याच्या जागा मन शोधू पाहतय.. छान आवरलेल्या कपाटात ही नंतर बघू म्हणून ठेवलेले काही कपडे खुणावत आहेत.. दरवर्षी spring cleaning मध्ये नको म्हणून काढलेल्या, त्याचं आता नेमकं करायचं असा हताश प्रश्न पडल्याने गराज मध्ये नुसत्या पडून राहिलेल्या, कित्तेक वस्तू.. भारत भेटीत मिळालेल्या आणि इकडे देण्यासाठी म्हणून आलेल्या भेटवस्तू.. मॅटचिंगची कानातली-गळ्यातली.. कॉस्मॅटिकस, नेलपॉलिश लिपस्टिक च्या असंख्य शेड्स.. इमोशनल किपसेक्स.. आईने रुखवतात दिलेली भांडी ही अजुनी तशीच कोरी कपाटात पडून आहेत.. हे सगळं एकदा आवरायला हवय.. कशाकरता घेऊन ठेवलं हे आपण? याला उत्तर नाहीच. मग ह्या उस्तवारीचा नकळत मनावर एक नवा ताण निर्माण होतो आणि ह्या रोज न दिसणाऱ्या पण असणाऱ्या पसाऱ्याकडे दुर्लक्ष होतं.. घर मोठठं आहेना.. चलता हैं, हे attitude.. दुसरे काय?

अगदी आत्तापर्यंत जेवण हा प्रकार किती सोपा होता. पोळी,भाजी, आमटी, भात, कोशिंबीर, चटणी. पण आता जगासोबतच स्वयंपाकघरही ग्लोबल झालं आहे. आज इंडिअन, उद्या मेक्सिकन, परवा पिझ्झा, मग नूडल्स, तर कधी सूप आणि सॅलडच, तर कधी थाय, चाट हा ऑपशन तर कायमच on.. त्यामुळे ह्यासाठी लागणारे खास मसाले, निरनिराळी स्वयंपाकाची भांडी ही वाढत आहेत. दहा दुकाने फिरून ग्रोसरी करावी लागते ते वेगळेच.. त्यात डाएट कॉन्शस असेल तर पाहायलाच नको.. 'जेवण नको पण पसारा आवर'... अशी परिस्थिती..

अरे बापरे.. इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स.. विचारानेच अंगावर काटा आला.. काही चालणारी, काही न चालणारी.. काही जेनरेशन ओल्ड पण चालणारी, काही नवीन टेकनॉलॉजि सपोर्ट न करणारी.. त्या वायर्स, त्यांचे चार्जेर्स, बॅटरीज.. इलेक्ट्रॉनिक स्टोरेज.. माझ्या व्यवस्थित ठेवण्याच्या वेडापायी, हे सगळे लेबल लावून, वेगवेगळ्या बॉक्सेस मध्ये छान जपून ठेवले आहे.. छान ठेवले तरी तो पसाराच ना..

तेवीस वर्षांपूर्वी, भारतातून इकडे अमेरिकेत येताना आणलेल्या चार बॅग्सचा इतका मोठ्ठा पसारा होईल असे वाटले नव्हते.. किती सुखाचे होते ते दिवस.. ना कसली चिंता ना कसली काळजी.. काळ सुद्धा शांत वेगाने पुढे जायचा.. तो वेग आता शतपटीने वाढल्याचं जाणवतंय.. सतत काहीतरी राहून गेलय, खूप काहीतरी करायचं राहिलय ह्यातून डोक्यात विचारांचा पसारा वाढत जातोय.. सतत कशाच्यातरी मागे धावता धावता क्षणभर थांबायचं राहतंय, मनातलं बोलायचं राहतंय, भावनांच्या गुंतागुंतीचा पण मनात पसारा होतोय..

हे सगळं एकदा आवरायला हवंय... फक्त गरजेच्या गोष्टी ठेवून बाकी सगळ्या 'देऊन टाकायला' हव्यात.. टाकून देण्यापेक्षा 'देऊन टाकलेले' केव्हाही चांगले.. 'someones junk is someones treasure'... नाही का?...



-मी मधुरा.. 

************************************************