Wednesday, October 14, 2026

भागवत सप्ताह : भागवत कथा वाचन एक अनुभूती.. भाग २

 

... तर भागवत सप्ताह ठरला, ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर.. संध्याकाळी ७:३० ते १०.. 

सप्ताह ठरला आणि एकच गडबड सुरु झाली.. पोस्टर्स तयार करणं, ती ग्रुप्स मधून पाठवणं त्या बरोबरच कृष्णाची मूर्ती, सजावट.. लिखाणात टायपिंग करताना काही चुका झाल्या नाहीत ना वैगरे तपासणं, सौ काकूंसमोर वाचन.. मला वाचनात थोडा ब्रेक मिळावा म्हणून काही वाचक शोधणं.. दिवस पटापट पळत होते..  

एकदाचा शनिवार, ३ ऑक्टोबर उजाडला.. 
संध्याकाळी साडे सहालाच मी मंजूच्या घरी पोचले.. सजावट तर उत्तम झाली होती.. मध्यभागी राधा कृष्णाची मनोहर मूर्ती, राधेबरोबर वनात पावा वाजवत असलेला कृष्ण!.. बाजूला भागवताची इंग्लिश भाषेतील १८ पुस्तकं.. आणि 'ॐ नमो भागवते वासुदेवाय' चा मंद आवाजात सुरु असलेला जप.. अतिशय प्रसन्न भक्तिमय वातावरण.. 
हळूहळू श्रोते यायला सुरुवात झाली.. 

भागवताच्या दिंडीनं भागवताची दिंडी कार्यक्रमाची सुरुवात झाली.. 

भागवताची पूजा करून मी आसनस्थ झाले.. आलेल्या सगळ्या हरिभक्तांचं स्वागत केलं.. 
असं म्हणतात की, जिथं भागवत कथा, राम कथा सांगितली जाते तिथं त्यांचा परमभक्त हनुमान उपस्थित असतो. त्यामुळं त्याच्यासाठी एक आसन राखीव ठेवलं जातं.. 
श्रीमद् भागवताला, हनुमंताची असणाऱ्या राखीव आसनाला वंदन करून, भगवंतांच्या चरणकमलांचे ध्यान करून श्रीमद् भागवत गंगेत प्रवेश केला.. 

आजचा सप्ताहाचा पहिला दिवस असला तरी भागवत कथेला सुरुवात उद्यापासून होणार.. आज भागवत म्हणजे काय? भागवत सप्ताह म्हणजे काय? तो का करायचा? कसा करायचा? हे जाणून घेणार.. थोडक्यात भागवत कथा महात्म्य जाणून घेणार.. 

आजच निरूपण वाचन झालं.. आरती झाली.. प्रसाद झाला.. 
सोळा जणांनी रजिस्टर केलं होतं पण तीस जणांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात तर छान झाली.. 

आजच्या दिवसाच्या क्लिप्स..
निरूपण                 जप

*********************

अगदी काही हातावर मोजता येण्या इतकेच श्रोते येतील असं वाटलं होतं.. म्हणजे आमचेच मित्र मैत्रिणी.. पण ती संख्या पहिल्या दिवशी ३० च्या घरात गेली.. वीकेंड असेल म्हणून असेल असं वाटलं.. पण मला सांगायला आनंद वाटतो की ती संख्या रोज वाढतच गेली.. कामाचा दिवस असुदे किंवा काही आधीच्या कमिटमेंट्स, रोज संध्याकाळी डॉट ७:३० ला सप्ताहाला सुरुवात व्हायची.. समाप्तीच्या दिवशी साधारण ५० श्रोते होते.. 

सगळ्या हरिभक्तांबरोबर सत्संग घडत होता.. प्रत्येकाला काही ना काही मदत करायची इच्छा होती.. रोज कृष्णाला नवीन हार, नवनवीन खिरापती सगळं उत्साहानं होत होतं.. प्रत्येकाला भगवंतानं जणू काम वाटून दिलं होतं! भगवंतांनी त्यांना हवं तसं आमच्या सर्वांकडून करून घेतलं हे नक्की! त्या शिवाय हे झालंच नसतं.. 

भागवताचा सहावा दिवस खासच होता.. आज कृष्णजन्म!.. कृष्णावताराची सुरुवात.. 


कृष्णजन्म झाला.. २-३ पाळणे, गाणी.. नुसता अनादी आनंद!.. 

गोवर्धन पर्वताची कथा झाली.. प्रत्येकानं मुठ मुठ तांदूळ आणले होते.. त्या तांदुळाचा गोवर्धन पर्यंत तयार केला.. त्यावर गोपाळकृष्णाला बसविले.. शिऱ्याचा ही गोवर्धन पर्वत केला होता..  



कंसवध झाल्यावर नारळ वाढविला.. नारळाचा कठीण भाग अहंकाराचं प्रतीक मानलं जातं.. कंस अत्यंत अहंकारी, अत्याचारी होता. जसा कृष्णानं कंसाचा वध करून त्याच्या अहंकाराचा अंत केला तसाच नारळ फोडून आपण आपल्यातील अहंकाराचा अंत करतो.. हे प्रतीकात्मक आहे.. असुरी वृत्तीचा आणि स्वतःतील अहंकाराचा नाश करून भगवंताला शरण जाणे..  

नंतर रासलीलाची गाणी झाली.. खुपच समृद्ध करणारा अनुभव होता! 

*********************

शनिवार १० ऑक्टोबर, आज भागवत सप्तहाची समाप्ती.. आठवडा कसा संपला ते कळलंच नाही.. शेवटचा दिवस म्हणून मनाला थोडी हुरहूर लागली होती.. आता उद्यापासून एकत्र येणे नसेल, भागवत कथा कथन, श्रवण नसेल, ही भक्तांची मांदियाळी नसेल.. हे सात दिवस केवळ भागवत कथेचे नव्हते तर भक्तीचे, ज्ञानाचे, आपुलकीचे होते.. 

भागवताची सांगता भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायानं झाली..



महाप्रसाद : प्रत्येकानं एक पदार्थ करून आणला होता.. potluck  

भागवत कथा सांगतानाची जी अनुभूती होती ती शब्दातीत आहे.. त्यासाठी मी स्वतःला नशीबवान समजते.. निरूपणाच्या नोट्सचा अभ्यास करून इतकं समाधान मिळत असेल तर साक्षात पुराण वाचून किती समाधान मिळेल.. काठावर बसून खूप आनंद घेऊन झाला आता श्रीमद् भागवताच्या ह्या भक्तीगंगेत उतरायला आवडेल.. 

अशीच सेवा माझ्याकडून घडत राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना 🙏
                             
*********************

तर, 
भागवत कथा का ऐकावी?
देवाची गोष्ट म्हणून? पुण्य मिळतं म्हणून? की परंपरा आहे म्हणून?
तर नाही,
भागवत कथा ऐकावी कारण ही कथा आपल्यालाच आपली कथा सांगते..

ध्रुवाची कथा सांगते-
परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, मनात श्रद्धा असेल तर लहान मूलही ध्येय गाठू शकते..

प्रल्हादाची कथा सांगते-
संपूर्ण जग विरोधात उभं राहिलं तरी सत्यावरची श्रद्धा सोडू नये..

गजेंद्राची कथा सांगते-
शक्ती संपली, उपाय संपले की मारलेली एक आर्त हाक भगवंतापर्यंत नक्की पोहोचते..

सुदाम्याची कथा सांगते-
मैत्रीला श्रीमंतीची गरज नसते, प्रेमाच्या एका मूठभर पोह्यांतही भगवंताला संपूर्ण विश्व दिसतं.. 

गोपींची कथा सांगते-
भक्ती म्हणजे देवाकडून काही मागणं नव्हे तर स्वतःला देवाच्या चरणी पूर्णपणे समर्पित करणं..

आणि कृष्णाची कथा सांगते
जीवनात संकटं येणारच पण संकटांपासून पळायचं नसतं.. कृष्णाला सारथी करून कर्तव्याच्या रथावर उभं राहायचं असतं..

भागवत आपल्याला दुसऱ्याला बदलायला शिकवत नाही तर स्वतःकडे पाहायला शिकवतं..
राग आला तर संयम शिकवतं.. अहंकार आला तर नम्रता शिकवतं.. दुःख आलं तर श्रद्धा शिकवतं.. आणि सुख आलं तर कृतज्ञता शिकवतं..

म्हणून भागवत कथा फक्त कानांनी ऐकायची नसते कानातून मनात, मनातून विचारात, आणि विचारातून आचरणात उतरवायची असते..

कथा संपली आणि आपण बदललो नाही तर आपण फक्त कथा ऐकली. पण कथा ऐकून मन थोडं शांत झालं, वागणं थोडं प्रेमळ झालं, अहंकार थोडा कमी झाला आणि भगवंतावरचा विश्वास वाढला तर समजा, भागवत आपल्या जीवनात उतरलं!

म्हणून भागवत कथा ऐकावी
मोक्षासाठीच नव्हे, तर या जन्माचं जीवन अधिक सुंदर, अर्थपूर्ण आणि भगवंतमय करण्यासाठी..

भागवत म्हणजे कथा नाही तर भागवत म्हणजे जीवन जगण्याची कला.. आणि कृष्ण म्हणजे केवळ देव नाही तर अडचणीच्या क्षणी योग्य मार्ग दाखवणारा आपला अंतरीचा सारथी!

हरी ॐ तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

******************** 

                             



-मी मधुरा.. 

************************************************

Tuesday, October 13, 2026

भागवत सप्ताह : भागवत कथा वाचन एक अनुभूती..



भागवत सप्ताह करणं एक मोठठं शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे हे किती ही खरं असलं तरी भगवंतच ते करून घेतो.. करणारा ही तोच आणि करवून घेणारा ही तोच!..  

गेल्या एक दीड वर्षांपासून, माझी मैत्रीण मंजू आणि मी, आमच्यात भागवत सप्ताहाबद्दल बोलणं होई.. भागवत सप्ताह म्हणजे काय हे आम्हाला अनुभवायचं होतं.. भारतवारीत ही संधी मिळेलच असं नाही.. मग इकडं अमेरिकेत भागवत सप्ताह केला तर?.. भागवत कोण सांगेल? तो सप्ताह रूपात, सकाळ-संध्याकाळ करावा कि अजुनी काही पर्याय?.. अशा मूलभूत प्रश्नांवर चर्च्या होत असे आणि ती तिथंच विरून ही जात असे.. 

*********************

२०२६ उजाडलं आणि ह्यावर्षी काय करायचं? हा विचार सुरु झाला आणि भागवताने खुणावलं.. भागवत सप्ताह होईल तेव्हा होईल पण नुसतं भागवत तरी वाचावं म्हणून भागवताची शोधाशोध सुरु झाली.. ऑनलाईन, ऑफलाईन, भारतातून कोणी येणारं आहे का? सगळे मार्ग शोधून झाले.. पण काहीच होत नव्हतं.. 
होता होता एप्रिल उजाडला.. एके दिवशी 'you might be interested in' मध्ये अमेझॉनवर 'एकनाथी भागवत' पुस्तक रूपात दिसलं.. (वाचण्याची मजा पुस्तक वाचण्यातच आहे, device वर वाचण्यात नाही).. आणि संपूर्ण भागवत नाही तर नाही पण एकनाथी भागवत तर आहे.. मग काय, लगेचच 'एकनाथी भागवत' ऑर्डर केलं.. अनयसा १७ मे पासून अधिक महिना सुरु होणारच होता.. रोज एक अध्याय असे ३१ अध्याय अधिक महिन्यात वाचले.. आणि वाचता वाचता त्यात रंगून गेले.. 

भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर सांगितलेली भगवद्गीता आणि अवतारकार्याच्या शेवटी श्रीकृष्णानं उद्धवाला सांगितलेली उद्धवगीता.. आप्तेष्टांना पाहून कुरुक्षेत्रावर हातपाय गाळून बसलेला अर्जुन, त्याचा विषाद आणि आपला प्रिय सखा, आपलं सर्वस्व, आता आपल्याला कायमचं पोरकं करून, वैकुंठाला जाणार म्हणून दुख्खी झालेला उद्धव.. स्थळ, काळ, वेळ सगळंच वेगळं पण भगवंत तेच आणि त्यांची शिकवण तीच!.. भगवद्गीता महाभारतात तर उद्धवगीता श्रीमद्भागवत पुराणात, अकराव्या स्कंदात!!.. आणि एकनाथी भागवत म्हणजे एकनाथांनी केलेली ह्या अकराव्या स्कंदावरचीच तर टीका!!.. भगवद्गीतेचा ही अभ्यास करत असल्यानं ही उद्धवगीता, त्यावरची एकनाथ महाराजांनी केलेली टीका वाचताना, समजून घेताना खूप 'अहा क्षण' अनुभता आले.. खूप गोष्टींची उकल झाली.. आहाहा काय संतोष वाटला म्हणून सांगू..  
एकनाथी भागवत हा वारकरी संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि आधारभूत ग्रंथ मानला जातो.. सर्वांभूती समानता आणि भगवद्‌भाव हे या ग्रंथाचं व नाथांच्या शिकवणीचं सार आहे.. भक्तीच्या मार्गाने पारमार्थिक सुख कसं मिळवावं याचे सोप्या भाषेतील निरूपण यात आहे.. 

अधिक महिन्यांत मी एकनाथी भागवताचं पारायण केल्याचं, एका मित्राला म्हणजे आमच्या नाटकाचा डायरेक्टर, अभयला कळालं.. आणि तो म्हणे, 'अगं माझ्याकडं माझ्या आईनं लिहिलेलं भागवताचं निरूपण आहे.. त्याचं डिजिटलायझेशन करण्यासाठी मी घेऊन आलो आहे..' हे ऐकून मला माझ्या कानांवर विश्वासच बसेना, क्षणभर काय बोलावं तेच कळालं नाही.. आणि लगेचच दुसऱ्या क्षणी मी त्याला विचारलं, 'तुझी हरकत नसेल तर मी ते तुला टाईप करून देऊ?'.. जगभर भागवताच्या शोधात फिरत होते आणि ते मला शेजारीच सापडलं!.. ही संधी मी नक्कीच सोडणार नव्हते.. भागवत नाही तरी संपूर्ण भगवंताचं निरूपण वाचायला, त्याचा अभ्यास करायला मिळणार हेच खूप होतं माझ्यासाठी.. आणि लागले की मग कामाला.. म्हणजे अभ्यासाला.. 

सौ काकू, कुमुदिनी धर्माधिकारी, स्वतः भागवत निरुपणकार आहेत.. त्यांनी त्यांचं निरूपण हस्तलिहित स्वरूपात वह्यात लिहिलं होतं.. सुरुवातीला त्यातील एक वही मी टाईप करण्यासाठी घेऊन आले.. एका आठवड्यात अख्खी २०० पाणी वही मी टाईप केली.. आणि झपाटलेल्या सारखी मी टाईप करतंच राहिले.. २०० पानांच्या चार वह्या मी साडे तीन महिन्यात पूर्ण केल्या.. नुसत्या टाईप नाही केल्या तर अभ्यास करून, समजून घेऊन.. जिथं अडेल तिथं पुस्तकं वाचून.. रोजची पाच-सहा तासांची साधनाच ती!! सौ. काकूंनी लिहिलेलं वाचणं, टाईप करणं आणि त्यावर विचार करणं यामुळे मला जे समजलं आहे ते मी वाचून सांगू शकते ह्याचा अंदाज मला आला.. आणि मग काय, आपण भागवत सप्ताह करूया असं मी मैत्रिणीला, मंजूला सांगितलं.. 



मंजू आणि अभयच्या रघुनंदन फौंडेशनकडून कार्यक्रम ठरला पण!.. स्थळ: त्यांचंच घर..

इतक्या दिवसांचं स्वप्न सत्यात उतरत होतं.. भागवत सप्ताह.. आता आम्हीच करणार!!.. पक्ष पंधरवड्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर.. संध्याकाळी ७:३० ते १०.. 






to be continued...
                             



-मी मधुरा.. 

************************************************

Monday, July 20, 2026

श्रीमद् भगवद्गीता




कुरूक्षेत्रावर, धर्मयुद्ध सुरू होण्याच्या ऐनवेळी अर्जुनाच्या मनावर, विचारांवर आप्तेष्टांच्या प्रेमापोटी दाटून आलेलं मळभ दूर सारण्यासाठी, त्याला पुनच्छ क्षात्रधर्माला उद्युक्त करण्यासाठी, भगवान श्रीकृष्णांनी त्याला दिलेला उपदेश म्हणजे 'श्रीमद् भगवद् गीता'.. तो सुटसुटीतपणे ‘गीता’ या नावाने ओळखला जातो..

'गीता' म्हणजे मानव (अर्जुन) आणि सृष्टीकर्ता (श्रीकृष्ण) यांच्यातील दिव्य संवाद! अंतरात्म्यानं (श्रीकृष्ण) आत्म्याला (अर्जुन) दिलेला उपदेश!!

'गीता' म्हणजे सत्याचा साक्षात्कार असलेले एक महाकाव्य!!!

कसं आहे 
भगवद् गीतेचं अंतरंग?..
'गीता' ही अठरा अध्यायांत विभागलेली असून, एकूण श्लोकसंख्या सातशे एक आहे.. ह्या श्लोकांतून वेदं, उपनिषदं यांचं सार आणि अंतिम सत्य संक्षिप्त रूपानं सांगितलं आहे.. गीता केवळ अर्जुनासाठी ‘युध्द कर’ एवढाच उपदेश करत नाही तर मानव जातीच्या उद्धारासाठी, समाज्याच्या कल्याणासाठी प्रबोधन ही करते..
गीतेच्या सर्व अध्यायात ब्रह्मतत्वाचं वर्णन असले तरी, काही अध्याय ब्रह्म जाणून त्याचं प्रतिपादन करतात, तर काही ब्रह्माचं अस्तित्व दर्शवतात, तर काही ब्रह्म जाणताना त्यांच्या गुणांसह ब्रह्मरूपच होतात.. 
'गीता'तील प्रत्येक अध्यायात वेगवेगळे 'योग' सांगितले आहेत.. 'योग' ही शरीर आणि मनाची, विचार आणि बुद्धीची, भावना आणि वर्तनांची संतुलित अवस्था आहे.. आणि ह्या योगशास्त्राद्वारे श्रीभगवान अर्जुनाच्या विषादावर उपदेश करतात.. 

'गीता'ला 'गीतोपनिषद' म्हणून ही संबोधलं जातं.. गीता उपनिषदांचा अर्थ सांगत असल्यानं तिला 'उपनिषदांचं उपनिषद' असं ही म्हणलं जातं.. 
'गीते'तील ज्ञानामुळं अत्युच्च समाधान आणि आनंद तर मिळतोच पण त्याचबरोबर मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून 'गीते'ला 'मोक्षशास्त्र' ही म्हणलं गेलं आहे.. 

कुरुक्षेत्रावर, भगवान श्रीकृष्णांनी गीता उपदेश फक्त अर्जुनाला केला असला तरीही श्रीकृष्ण मुखोदमूक गीता तिघांनी ऐकली अशी मान्यता आहे.. अर्जुनानं प्रत्यक्षरित्या, संजयनं अप्रत्यक्षरित्या प्रतिभेच्या रूपातून आणि हनुमानानं अदृश्य रूपात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून.. वेदव्यासांनी वरदान दिलेल्या दिव्यचक्षूनं संजयनं जे पाहिलं ते उपरोक्षरित्या महाराज धृतराष्ट्रांना सांगितलं.. आणि हनुमानानं ते वेद व्यासांना.. असं ही मानलं जातं कि भीमाचा नातू, घटोत्कच पुत्र बार्बारिकनं आपल्या दिव्यश्रवणशक्तीनं गीता ऐकली होती..  
  
ह्या महाकाव्यांत बोलणाऱ्या व्यक्तिरेखा चार आहेत.. 
१. धृतराष्ट्र.. ह्या महाकाव्याच्या पहिल्या श्लोकाचा मान मिळालेला हस्तिनापूर सम्राट आणि कौरवांचा पिता.. 'संजय, माझी आणि पांडूची मुलं युद्धभूमीवर काय करत आहेत?' ह्या प्रश्नानं झालेली ही सुरुवात.. 
२. संजय.. धृतराष्ट्राचा सारथी आणि युद्धकाळापुरते दिव्यचक्षू मिळालेला युद्धाचा वार्ताहर.. याला ४१ श्लोक आहेत.. 
३. अर्जुन.. धनुर्धारी पांडव ज्याला भगवान श्रीकृष्णांनी गीतोपदेश केला.. याच्या मुखी ८४ श्लोक आहेत.. 
४. श्रीकृष्ण.. साक्षात भगवान.. ज्यांनी युद्धभूमीवर हे तत्वज्ञान ५७४ श्लोकांमधून अर्जुनाला सांगितलं.. 


भगवद् गीतेच्या अठरा अध्यायांचं सार.. 

'गीता'तील तत्वज्ञान समजून घेण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी कोणत्या कुरुक्षेत्राची, युद्धभूमीची गरज नाही.. अर्जुनाच्या विषादासारखेच असंख्य प्रश्न, समस्या आपल्यापुढं काल ही होत्या, आज ही आहेत आणि उद्या ही असतील.. 
तुकाराम महाराज म्हणतात, "रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन।।"
प्रत्येकाचं सुख-दुःख वेगळं तसंच प्रश्न ही वेगळे आणि उत्तरं ही वेगळी.. 'गीता'चं मोठ्ठेपण ह्यातच आहे कि भिन्न स्वभाव, बुद्धी, परिस्थती, समस्या ह्यासर्वांवर प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणं, साधनेप्रमाणं ह्यात उत्तरं सापडतात.. एक एक अध्यायाची पायरी रचत 'गीता' अठरा अध्यायांतून सार्थ जीवन जाणण्याचा मंत्र देत निजधामाच्या द्वारापर्यंत घेऊन जाते..
  • अध्याय १ - अर्जुनविषादयोग
    • चुकीचा विचार ही जीवनातील एकमेव समस्या आहे.. त्यामुळं जेव्हा दडपण किंवा गोंधळल्यासारखं वाटेल तेव्हा आधी थोडा वेळ थांबा.. नंतर संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेऊन, मनस्थितीची जाणीव करून घेऊन निर्णय घ्या..
  • अध्याय २ - सांख्ययोग 
    • कर्तव्य करा पण त्याच्या परिणामांचा विचार करू नका.. कारण अर्धा ताण हा प्रत्यक्ष कृतीमुळं नाही तर परिणामांविषयीच्या अतिविचारामुळं निर्माण होतो..
  • अध्याय ३ - कर्मयोग
    • 'प्रेरणेला' गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं.. त्यामुळं प्रेरणा मिळण्याची वाट पाहू नका.. आपली भूमिका आणि कर्तव्य ओळखा.. तसंच तीव्र आवडीनिवडींच्या आहारी न जाता ते कर्म प्रामाणिकपणे करत राहा.. नि:स्वार्थीपणा हाच प्रगती आणि समृद्धीचा एकमेव मार्ग आहे.. 
  • अध्याय ४ - ज्ञानकर्मसंन्यासयोग
    • जीवन एका उच्च ध्येयाशी जोडून घ्या.. जेव्हा जीवन योग्य ज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानुसार चालतं तेव्हा ते मानसिक शांततेत व्यत्यय आणत नाही..
  • अध्याय ५ - कर्मसंन्यासयोग
    • शांतता मिळवण्यासाठी जबाबदाऱ्यांपासून पळून जाण्याची गरज नाही.. कर्तव्य करताना आंतरिक आसक्तीचा, व्यक्तित्वाच्या अहंकाराचा त्याग करून ईश्वराच्या ठिकाणी मन स्थिर करा.. 
  • अध्याय ६ - आत्मसंयमयोग
    • शिस्तबद्ध मन सर्वोत्तम मित्र तर अनियंत्रित मन सर्वात मोठा शत्रू.. म्हणूनच साधना, सराव आणि शिस्तीच्या साहाय्यानं नेहमी मनाला प्रशिक्षित करा.. दररोज उच्च चेतनेशी जोडले राहा..
  • अध्याय ७ - ज्ञानविज्ञानयोग
    • केवळ ईश्वरी तत्त्वच खऱ्या परिपूर्णतेचा स्रोत आहे.. परंतु क्षणभंगुर इच्छा सतत आपल्याला त्यापासून दूर ओढत असतात.. म्हणून जेव्हा कधी रिकामंपण किंवा विलग झाल्यासारखं वाटेल तेव्हा केवळ ईश्वराचाच आश्रय घ्या..
  • अध्याय ८ - अक्षरब्रह्मयोग
    • अत्यंत भीती, असहाय्यता आणि अनिश्चिततेच्या क्षणी मन अशा दिशेनं धाव घेतं जिथं जाण्याची त्याला सवय झालेली असते – म्हणजेच पळवाट शोधण्याकडं.. त्यामुळं, अशा वेळी जर खरी शांतता हवी असेल, तर दररोज साधना करण्याची, स्वतःला ईश्वराच्या चरणी समर्पित करण्याची आणि ईश्वरावर विश्वास ठेवण्याची सवय मनाला लावा..
  • अध्याय ९ - राजविद्याराजगुह्ययोग
    • जर एकटं किंवा कोणाचाही आधार नाही असं वाटत असेल तर हे लक्षात ठेवा की ईश्वरी शक्ती सदैव तुमच्या सोबत आहे.. तिची उपस्थिती अनुभवण्यासाठी, आधार व सुरक्षिततेची जाणीव होण्यासाठी केवळ विश्वास आणि निखळ भक्ती आवश्यक आहे..
  • अध्याय १० - विभूतीयोग
    • सर्वत्र देवत्व पहा.. सभोवताली दिसणारं, प्रशंसक असं प्रत्येक महान स्वरूप हे त्या ईश्वरी तत्त्वाचंच प्रतिबिंब आहे.. जेव्हा आपण त्याचं कौतुक करायला शिकतो तेव्हा आपल्या अंतर्मनात प्रेरणा जागृत होते..
  • अध्याय ११ - विश्वरूपदर्शनयोग
    • जेव्हा अहंकाराला ठेच लागते तेव्हा वास्तव स्वीकारणं कठीण जातं.. पण 'जीवन हे एका विशाल वैश्विक व्यवस्थेचा एक छोटासा भाग आहे'- हे सत्य जसं आहे तसं पाहण्यासाठी पुरेसं समर्पण करा..
  • अध्याय १२ - भक्तियोग 
    • भावनिक असुरक्षितता आणि आंतरिक असंतुलन दूर करण्यासाठी 'भक्ती' हा सर्वात प्रभावी उपाय आहे.. म्हणूनच, कर्म, उपासना आणि ध्यान यांच्या माध्यमातून ईश्वराप्रती भक्ती करा.. मन परमात्म्याठायी स्थिर करा..
  • अध्याय १३ - क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग
    • आपले विचार किंवा भावना म्हणजे आपण नाही तर आपण केवळ एक साक्षीदार आहोत.. कोणतीही प्रतिक्रिया त्वरित देण्याऐवजी, क्षणभर थांबा, परिस्थितीचं निरीक्षण करा आणि मगच प्रतिसाद द्या.. 
  • अध्याय १४ - गुणत्रयविभागयोग
    • आपली मनस्थिती, निवडी आणि कृती यांवर नेहमीच सत्व, रज आणि तम या तीन गुणांचा प्रभाव असतो.. म्हणून सर्वप्रथम हे गुण नीट समजून घेऊन साधनेद्वारे स्वतःला सत्व गुणाच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करा.. तुमच्या दृष्टिकोनाशी जुळणारी जीवनशैली जगा..
  • अध्याय १५ - पुरुषत्तमयोग
    • आयुष्यात बदल हा अटळ आहे.. त्यामुळं लोक, वस्तू आणि परिस्थितीशी अति-आसक्ती ठेवू नका.. ईश्वराशी घट्ट नातं जोडून त्यात स्थिर राहा.. चांगलं असो वा वाईट, आयुष्य जसं समोर येईल तसं स्वीकारा आणि हा विश्वास ठेवा की खुद्द भगवंतांनीच तुमच्या हितासाठी त्याची योजना केली आहे.. 
  • अध्याय १६ - दैवासुरसंपद्विभागयोग
    • दैवी आणि नकारात्मक अशा दोन्ही गुणांचं अस्तित्व आपल्यामध्ये असतं.. ज्या गुणांची जोपासना आपण करतो तेच गुण आपलं आयुष्य, आपले नातेसंबंध आणि भवितव्य घडवतात.. दैवी गुण प्रगतीकडं नेतात तर नकारात्मक गुण अधोगतीस कारणीभूत ठरतात.. 
  • अध्याय १७ - श्रद्धात्रयविभागयोग
    • जेव्हा विश्वास कमकुवत असतो तेव्हा दिशाहीन आणि गोंधळल्यासारखं वाटतं.. अशा वेळी अगदी छोट्या गोष्टीही सहज विचलित करू शकतात.. म्हणून दैनंदिन निर्णय, निवडी आणि साधनेद्वारे विश्वास अधिक दृढ व परिपूर्ण करा..
  • अध्याय १८ - मोक्षसंन्यासयोग
    • नीतिमत्तेच्या मार्गावरून चालताना तुम्ही कधीही एकटे नसता.. ईश्वरी तत्त्व सदैव तुमच्या अंतर्यामी संचार करत असतं आणि तीच आयुष्यातील सर्वात मोठी विजयगाथा ठरते..

 हरी ॐ तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

******************** 

                             



-मी मधुरा.. 

************************************************

Monday, June 15, 2026

अध्याय १८ 'मोक्षसंन्यासयोग'


ॐ
श्रीपरमात्माने नमः 
अध्याय १८ 'मोक्षसंन्यासयोग'




श्रीमदभगवतगीतेचा हा शेवटचा अध्याय!!.. आत्तापर्यंत पाहिलेल्या, अभ्यासलेल्या सतरा अध्यायांचं हे सार.. 
माऊली म्हणतात, जसं दुरूनच मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं तरी गाभाऱ्यातील देवतेच्या दर्शनाचं फळ मिळतं तसंच हा 'मोक्षसंन्यासयोग' अध्याय वाचला असता सर्व गीताशास्त्र वाचल्याचं श्रेय मिळतं.. ते पुढं म्हणतात, वेद-उपनिषदं यांच्या पायाभरणीवर, धर्म-अर्थ-काम यांची भक्कम तटबंदी बांधून, कृष्णार्जुन संवादाचे आत्मज्ञानरूपी उत्तम चिरे वापरून, शास्त्रांच्या मदतीनं मोक्षरूपी मंदिराची उभारणी महर्षी व्यासांनी पहिल्या सोळा अध्यायांनी केली. सतरावा अध्याय ‘श्रद्धात्रयविभागयोग’ म्हणजे ह्या मोक्षसंन्यासरूपी कळसाची त्रिगुणी (सत्व-रज-तम) बैठकच होय.. हे सगळे अध्याय एकावर एक चढते थर असून त्यांची पूर्तता ह्या 'मोक्षसंन्यासयोग' अध्यायात होते.. 

श्रीमदभगवतगीतेच्या ७०० श्लोकांतून, त्रिकांडवेद (कर्म, उपासना व ज्ञान) असणारं हे गीताशास्त्र अर्जुनास सांगताना भगवान श्रीकृष्ण एकाच तत्वाचं वारंवार विवेचन करतात.. ते तत्व म्हणजे श्रद्धा/भक्ती..  
पहिल्या अध्यायांत अर्जुनाचा विषाद सांगून प्रवृत्तिशास्त्राचा विचार मांडला आहे तर दुसऱ्या अध्यायांत शास्त्रावर विश्वास ठेवायला सांगितले आहे.. गीताशास्त्र ज्ञानप्रधान असलं तरी कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा यांच्या एकरूपानं ते मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगते.. 
तिसऱ्या अध्यायात अज्ञानानं कर्मबंधनात अडकलेल्या साधनकांना त्या बंधापासून सोडून मोक्षपदावर आणणाऱ्या साधनांचा उल्लेख आहे.. देहाभिमान सोडून निषिद्ध कर्मे टाकून विहित कर्माचं आचरण केलं असता अज्ञानाचा नाश होतो आणि ही सर्व विहित कर्मे (कायिक,वाचिक व मानसिक) ब्रह्मार्पण बुद्धीनं केली असता मोक्षाचा मार्ग खुला होतो असं सांगितलं आहे.. तर परमात्म्याच्या ठायी कर्मयोगानं भजन कीर्तन करावं असं चौथ्या अध्यायात सांगितलं आहे.. 
थोडक्यात २-३-४ ह्या अध्यायांत कर्मकांडाविषयी भाष्य आहे तर ४ ते ११ ह्या अध्यायांत उपासनाकांडावर तर १२ ते १५ ह्या चार अध्यायांत ज्ञानफळ आणि त्याची सिद्धी म्हणजेच ज्ञानकांडावर भाष्य आहे.. 
अश्याप्रकारे त्रिकांडांचं निरूपण करणारी ही गीता एक गोजिरवाणी श्रुतीच आहे असं माऊली म्हणतात.. एवं सकल संख्यासिद्धू। भगवतगीता प्रबंधु। हा औदाचे आगळा वेदु। मूर्तु जाण।।.. ७०० श्लोकांच्या संख्येनं सिद्ध झालेला हा भगवतगीतेचा प्रबंध मूर्तिमंत वेद असून औदार्यानं वेदांपेक्षा ही श्रेष्ठ आहे.. 

अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नानं होते.. 
सतराव्या अध्यायाच्या शेवटी श्रीभगवान म्हणतात- अर्जुना, श्रद्धेशिवाय जी काही कर्मं - यज्ञ, दान, तपं - करशील ती सारी व्यर्थ आहेत.. सर्व कर्मं श्रद्धेनं परब्रह्माप्रित्यर्थ केली पाहिजेत.. श्रीभगवानांच्या ह्या व्यक्तव्यामुळं अर्जुन अधिकच गोंधळतो.. अज्ञानानं अंध अशी व्यक्ती कोणावर कसा विश्वास, कशी श्रद्धा ठेवू शकेल? रज, तम ह्या दोन्ही गुणांचा नाश झाल्याशिवाय परमात्म्यावरील श्रद्धा खरी श्रद्धा असेल का? कर्मं जन्ममरणास कारणीभूत असतात - ती यथासांग केली तर मोक्ष नाहीतर जन्ममृत्यूच्या फेरा- असं असेल तर कर्मसंन्यास का नको? कर्माशिवाय आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञानाशिवाय मोक्ष... मग कर्मसंन्यास आणि कर्मत्याग ह्यात नक्की काय फरक आहे? ह्या सगळ्या प्रश्नांनी गोधळलेला अर्जुन श्रीभगवानांना विचारतो, "हे महाबाहो, हे हृषीकेश, मी कर्म-संन्यास आणि कर्म-त्याग यांचं तत्व वेगवेगळं जाणू इच्छितो.. कृपा करून ते मला सांगा"..  

श्रीभगवान उवाच.. 
कर्म-संन्यास आणि कर्म-त्याग ह्या दोन्ही शब्दांनी त्यागाचा निर्देश होत असला तरी गूढार्थानं ते वेगळे आहेत.. काम्य कर्माच्या, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांच्या त्यागाला, सर्वार्थानं कर्म सोडण्याला 'कर्म-संन्यास' असं म्हणतात.. तर कर्म कर्तृत्वाचा अभिमान व कर्म फल यांच्या त्यागाला 'कर्म-त्याग' असं म्हणतात.. परंतु कर्मफलाची आशा, कर्मफल आसक्ती सुटत नाही म्हणून कर्माला दोषयुक्त मानून कित्येक विचारवंत कर्माचा त्याग करावा असं सांगतात.. तर काही विचारवंत यज्ञ-दान-तपरूप कर्मांनी  चित्तशुद्धी होते म्हणून त्यांचा त्याग करू नये असं ही सांगतात.. 

त्यागांविषयी जरी मतभेद असले तरी ही कर्मे कर्तेपणाचा अभिमान व कर्मफलांचा त्याग करून कर्तव्य बुद्धीनं अवश्य केली पाहिजेत.. मनुष्याची जीवनात आणि त्याच्या अध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी ह्यासाठी अनेक संस्कार सांगण्यात आले आहेत.. मानवाच्या कल्याणाकरिता असणाऱ्या कोणत्याही यज्ञ-दान-तप स्वरूपाच्या कर्मांचा कधीही त्याग करू नये.. यज्ञामुळं मन संयमित होतं, दानामुळं हृदयाचं शुद्धीकरण होतं तर तपामुळं आत्म्याचं शुद्धीकरण होतं.. त्यामुळं नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग करणं योग्य नाही. 

सात्विक, राजस आणि तामस ह्या तीन प्रकृती गुणांच्या भेदांमुळं शास्त्रांमध्ये कर्म त्याग तीन प्रकारचे सांगितले आहेत.. 
अज्ञानानं किंवा मोहवश होऊन केलेल्या कर्म-त्यागाला 'तामस त्याग' असं म्हणतात.. 
जे कर्म दुःखरूप आहे, क्लेशकारक आहे असं समजून शारीरिक त्रासाच्या भीतीनं केलेल्या कर्म-त्यागाला 'राजस त्याग' असं म्हणतात. अश्या त्यागाचं कोणतंही फल मिळत नाही.. असा त्याग उन्नतीच्या दिशेनं नेत नाही..
कर्तव्य भावनेनं, आसक्ती सोडून, कर्तेपणाचा अभिमान टाकून, फलाची अपेक्षा न करता केलेल्या त्यागाला 'सात्विक त्याग' असं म्हणतात.. सत्वगुणांत स्थित बुद्धिमान त्यागीस कर्माविषयी काहीच संशय नसतो.. तो अशुभ कर्मांचा द्वेष करत नाही किंवा शुभ कर्मांत आसक्त राहत नाही..

देह कर्मरूप असल्यानं कोणत्याही देहधारी जीवाला कर्माचा त्याग करणं शक्य नाही.. 'श्वासोच्छवास करणं' हे सुद्धा एक कर्मच!.. परंतु जो कर्मफलांचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय.. कर्मफलांचा त्याग न करणाऱ्यांना अनुकूल, प्रतिकूल, मिश्र अशी तीन प्रकारची कर्मफलं प्राप्त होतात.. परंतु कर्मफलांचा त्याग करणाऱ्यांना असं कोणतेही फल मिळत नाही.. कर्मफलांचं सुखदुःख भोगावं लागत नाही..

सांख्यशास्त्रात, वेदांतात कर्मांच्या सिद्धीची पाच कारणं सांगितली आहेत.. १. कर्म पूर्ण करण्यासाठी अधिष्ठान म्हणजे आधारभूत शरीर, २. कर्ता म्हणजे जीव, ३. विभिन्न इंद्रियं म्हणजे कर्माचं साधन, ४. अनेक प्रकारचे प्रयत्न वेगवेगळ्या क्रिया आणि ५. दैव.. मनुष्य मन, वाणी आणि शरीरानं जे काही कर्म करतो ते ह्या पाच कारणांमुळं घडत असतं.. परंतु जो ह्या पाच कारणांचा विचार न करता 'आत्माच कर्ता आहे' असं समजतो असा अज्ञानी मूर्ख जाणावा.. परंतु ज्याच्या अंतःकरणात 'मी कर्ता आहे' असा मिथ्या अभिमान नाही आणि ज्याची बुद्धी कर्माच्या बंधनात बद्ध नाही त्यानं सर्व प्राण्यांचा वध केला तरी तो मारेकरी होत नाही, त्या वधांच्या दोषांनी बद्ध होत नाही.. युद्धांत सैनिकाला शत्रूहत्येचं पाप लागत नाही.. कारण त्याची बुद्धी कर्माच्या बंधनात बद्ध नाही.. तो त्याचं फक्त कर्म करत असतो.. पण त्याच सैनिकानं स्वच्छेनं, स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाची हत्या केली तर ते निश्चितंच पाप होय.. 

दैनंदिन कर्म करण्यासाठी ज्ञान, ज्ञेय (विषयसुख) आणि ज्ञाता (जीव) प्रेरक असतात तर कर्म संचयासाठी इंद्रियं (कर्म काण्याची साधनं), कर्मं (व्यवहार) आणि कर्ता (जीव) कारण असतात.. कर्म करण्यापूर्वी काही तरी प्रेरणा असते.. ते घडण्यापूर्वीचा विचार असतो.. आणि त्यानंतर कर्माचं रूपांतर क्रियेत होतं.. ज्ञाता (जीव) आणि ज्ञेय (विषयसुख) ह्यांच्यातील ही क्रिया, हा व्यवहार ज्ञानामार्फत होतो.. विषयांच्या इच्छेनं ज्ञाता (जीव) इंद्रियांचे लाड पुरवतो म्हणून त्याचा 'कर्ता' होतो.. आणि आता हा ज्ञाता (जीव) कर्ता बनून ज्ञानाच्या साह्यानं ज्ञेय (विषयसुख) साध्य करतो आणि ज्ञेयाचं 'कर्म' (व्यवहार) होते.. तहान (इंद्रिय) लागली असता पाणी प्यायल्यानं (ज्ञान) तहान भागेल हे जीवाला (ज्ञाता) कळतं.. आणि पाणी पिण्याचं कर्म, क्रिया (व्यवहार) कर्ता (जीव) कडून घडतं.. 

प्रकृतीच्या तीन गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म, कर्ता यांचे तीन प्रकार आहेत.. माऊली म्हणतात, एवं सत्व रजतमा। तिहींची एवढी असे महिमा। जे त्रैविध्य आदी ब्रह्मा। अंती कृमी।। - म्हणजेच, सत्व, रज, तम ह्या तीन गुणाचं एवढं सामर्थ्य आहे कि त्यांनी ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत सर्व जीवांचे तीन भेद केले आहेत.. 
जे ज्ञान प्रत्येकांत मग तो देवता, पशु, पक्षी, जलचर, वनस्पती असो सर्वांमध्ये एकंच आत्मतत्व पाहतं ते 'सात्विक ज्ञान' होय.. जे ज्ञान प्रत्येकांत, विभिन्न शरीरांत विभिन्न जीव, विभिन्न आत्मतत्व पाहतं ते 'राजस ज्ञान' होय.. आणि जे कार्यरूपी शरीरातच आसक्त असतं, जे शरीरापलीकडं पाहतच नाही, जे तात्विक अर्थानं अल्पकाळ टिकणारं, तुच्छ असतं  ते 'तामस ज्ञान' होय.. 
ह्या तीन ज्ञानाच्या अनुरोधानं तीन प्रकारची कर्मे घडतात.. शास्त्राविधीनं नेमून दिलेलं कर्म कर्तेपणाचा अभिमान न बाळगता, फलाची इच्छा न करता, रागद्वेष सोडून केलेलं  असतं ते 'सात्विक कर्म' होय.. परंतु जे कर्म फलांची इच्छा धरून, अहंकारपूर्वक व पुष्कळ प्रयासानं केलं जातं ते 'राजस कर्म' होय.. परिणाम, हानी, हिंसा आणि आपले सामर्थ्य ह्याचा विचार न करता केवळ अज्ञानानं केलेलं कर्म हे 'तामस कर्म' होय..  
जो अनासक्त, मी-माझं न म्हंणणारा, धर्माचं पालन करणारा, यशापयशामुळं विचलित न होणारा, निश्चयी, उत्साही असतो तो 'सात्विक कर्ता' होय.. विषयासक्त, फलाची इच्छा करणारा, लोभी, घातकी, अशुद्ध आचरणाचा, हर्ष-शोकांनी युक्त असतो तो 'राजस कर्ता' होय.. इंद्रियासक्त, मूर्ख, उन्मत्त, कपटी, पारोत्कर्ष सहन न करणारा, आळशी, दुर्मुख व चेंगट असा तो 'तामस कर्ता' होय.. 

प्रकृतीच्या गुणांचा हा भेद बुद्धी आणि निश्चय यांच्यातही आहे..
जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग (कर्ममार्ग) आणि निवृत्तिमार्ग (संन्यासमार्ग), कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय तसेच बंधन आणि मोक्ष यांना यथार्थपणे जाणते ती 'सात्त्विक बुद्धी' होय.. आणि जी बुद्धी धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथायोग्य रीतीनं जाणत नाही ती 'राजसी बुद्धी' होय.. तमोगुणानं व्यापलेली बुद्धी धर्माला अधर्म आणि अधर्माला धर्म मानते, नेहमी विपरीत मार्गानं कर्म करते.. 
याच बुद्धीचा कर्म करण्यासाठी जेव्हा निश्चय होतो तेव्हा तिला धृती असं म्हणतात.. जो निश्चय अचल आहे, जो योगसाधनेद्वारा मन, प्राण, इंद्रियं यांच्या क्रियांना संयमित करतो तो 'सात्विक निश्चय' होय.. जो निश्चय धर्म, अर्थ, काम करताना फलाची अपेक्षा ठेवतो तो 'राजस निश्चय' होय.. जो निश्चय झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणा सोडत नाही तो 'तापसी निश्चय' होय.. 

योग्य कर्म आणि ते कर्म करण्याची साधनं बुद्धी उत्पन्न करते.. पण हे कर्म पूर्ण करण्यास धृतीची अनुकूलता लागते.. केलेल्या कर्मांच्या चांगल्या फलांना 'सुख' असं म्हणतात.. आणि ही सुखं ही तीन प्रकारची असतात.. 
ज्या सुखांत साधक भजन, ध्यान आणि सेवा यांत रमतो, ज्यामुळं त्याचं दुःख नाहीसं होतं, जे आरंभी जरी विषासारखं वाटलं तरी परिणामी अमृततुल्य असतं आणि जे आत्मसाक्षात्काराची जागृती करतं ते सात्विक सुख होय.. थोडक्यात, ज्या सुखाचं वैराग्य हे मूळ असून आत्मानंदप्राप्ती हा ज्याचा परिणाम असतो ते सात्विक सुख.. 
इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यानं उत्पन्न होणारं सुख जे आरंभी अमृतासारखं गोड भासलं तरी परिणामी विषासमान असतं ते राजसिक सुख होय.. 
जे सुख आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असतं आणि जे निद्रा, आळस व प्रमादापासून उत्पन्न झालेलं असतं ते तामसिक सुख होय.. 

पुढं भगवंत संपूर्ण विश्वावर असणारा प्रकृतीच्या ह्या तीन गुणांचा प्रभाव सांगतात..
प्रकृतीच्या ह्या तीन गुणांनी बद्ध नाही अशी कोणतेही वस्तू ह्या लोकी किंवा स्वर्गलोकी नाही.. ह्या तीन गुणांची शक्ती इतकी अचाट आहे कि तिनं एका देवाचे तीन देव आणि एका लोकाचे तीन लोक (स्वर्ग, मृत्यू, पाताळ) केले तर मनुष्याचे चार वर्ण आणि त्यांची निरनिराळी कर्मे ही निर्माण केली.. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची स्वाभाविक गुणांनुसार निरनिराळी कर्मे केली गेली.. 
आत्म्याची जी प्रवृत्ती, तिच्या गुणांनी चार वर्णांना कर्मे वाटून दिली असली तरी वेदाचा अधिकार ब्राह्मणांना असल्यानं ह्यात अग्रेसर मानले गेले.. क्षत्रिय आणि वैश्य हे दोन वर्ण वैदिक धर्मकांड करण्याचा अधिकारी असल्यानं उच्चस्तर राहिले.. चौथा वर्ण शूद्र, त्याला वेदाचा अधिकार नाही म्हणून त्याच्यापाशी असणारी सेवावृत्ती बाकी तीन वर्णांच्या अधीन राहिली.. 

शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात.. तर शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य, आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात.. 
शेती, गोपालन आणि व्यापार हे वैश्यांचं स्वभावजन्य कर्म तर श्रम, इतरांची सेवा करणं हे शूद्रांचं.. 
आपापल्या स्वाभाविक कर्मांत तत्पर असलेल्यास परमसिद्धीचा लाभ मिळतो.. जे भगवंत सर्व जीवांचे उगमस्थान आहेत, ज्यांनी आपल्या बहिरंगा आणि अंतरंगा शक्तीद्वारे संपूर्ण सृष्टी व्यापली आहे त्या भगवंतांची, परमात्म्याची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करुन मनुष्य परमसिद्धीस प्राप्त होतो.. स्वतःचा धर्म आचरणास कठीण असला तरी आणि दुसऱ्याचा धर्म आचरणास कितीही सोपा असला तरी, आपला धर्म श्रेष्ठ मानून, नेमून दिलेलं स्वधर्मरूपी कर्म करणाऱ्याला पाप लागत नाही.. म्हणूनच सदोष असलं तरी स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये..  

आसक्तिरहित बुद्धी असलेला, निःस्पृह असा जितेंद्रिय (इंद्रियांवर विजय मिळवलेला) त्याच्या संन्यस्थवृत्तीनं कर्मबंधनातून मुक्त होऊन ज्ञानसिद्धीला प्राप्त होतो.. ज्यानं ह्या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिध्द अवस्था म्हणजेच ब्रह्मावस्था प्राप्त करतो.. अश्या योग्याची लक्षणं सांगताना श्रीभगवान म्हणतात.. 
विशुद्ध बुद्धीनं युक्त, हलका-सात्त्विक-नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयांचा त्याग करुन एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्त्विक धारणाशक्तीनं अंतःकरण व इंद्रियांवर संयम ठेवून मन-वाणी-शरीर ताब्यात ठेवणारा, राग-द्वेष पूर्णपणे नाहीसे करुन दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार-बळ-घमेंड-कामना-राग-संग्रहवृत्ती यांचा त्याग करुन नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा, ममतारहित व शांतियुक्त असा मनुष्य ब्रह्मरूप होण्यास पात्र होतो.. असा हा ब्रह्मरूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही.. सर्व प्राण्यांच्या ठायी समभाव बाळगणारा असा हा योगी पराभक्तीला प्राप्त होतो.. त्या पराभक्तीच्या योगानं तो परमात्म्याला तो जसा आहे तसाच तत्त्वतः जाणतो आणि परमात्म्यात विलीन होतो.. 
थोडक्यात, परमात्म्याशी अनन्यभाव ठेवून, सर्व कर्मे त्याला अर्पण करून, समबुद्धिरूप योगाच्या अवलंब करणारा कर्मयोगी परमेश्वर कृपेनं शाश्वत अविनाशी अशा पदाला प्राप्त होतो.. 

अश्याप्रकारे माझ्या ठिकाणी (परमात्म्याठायी) चित्त ठेवल्यानं तू सर्व संकटातून सहजच पार होशील.. आणि जर अहंकारामुळं माझं सांगणं टाळशील तर तू नाश पावशील अर्थात परमार्थाला मुकशील.. 'मी युद्ध करणार नाही' हा तुझा निश्चय व्यर्थ आहे कारण तुझा क्षत्रिय स्वभाव तुला जबरदस्तीनं युद्ध करायला प्रवृत्त करेल.. जे कर्म तू आप्तांच्या मोहामुळं करु इच्छित नाहीस ते तू पूर्वकृत स्वाभाविक कर्मानं बद्ध असल्यानं नक्कीच करशील.. हे अर्जुना, शरीररुपी यंत्रावर आरुढ झालेल्या सर्व प्राण्यांच्या हृदयांत वास करून योगमायेच्या साह्यानं त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार अंतर्यामी परमेश्वर सूत्रं हलवत असतो.. त्यामुळं पूर्णपणे त्या अंतर्यामी परमेश्वराला शरण जा.. त्या परमात्म्याच्या कृपेनंच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल..

एवढं सगळं गोपनीयाहूनही अतिगोपनीय ज्ञान सांगून झाल्यावर, युद्धाचा निर्णय श्रीभगवान अर्जुनावर सोपवतात.. 
.. आणि म्हणतात, तू माझा अत्यंत प्रिय सखा असल्यामुळं मी तुला सर्व ज्ञानातील अत्याधिक गुह्यतर असं परमश्रेष्ठ वचन परत एकदा सांगतो जे तुझ्या हितार्थ आहे.. हे अर्जुना, तू माझं चिंतन कर.. माझा भक्त हो.. माझे पूजन कर.. आणि मलाच नमस्कार कर.. असं केलं असता तू मलाच येऊन मिळशील.. सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करुन तू सर्व शक्तिमान अशा मला परमेश्वराला शरण ये.. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन.. तू भयभीत होऊ नकोस.. आणि हे ज्ञान त्यांनाच सांग ज्यांची माझ्यावर श्रद्धा आहे.. हे परमगुह्य गीताशास्त्र जो माझ्या भक्तांना सांगेल तो मला प्रिय असेल.. आणि जो कोणी ह्या पवित्र संवादाचं अध्ययन करेल तो आपल्या बुद्धीद्वारे माझं पूजनच करेल.. 

पुढं श्रीभगवान अर्जुनाला त्यानं हे गीताशास्त्र एकाग्रचित्तानं ऐकलं आहे का? आणि अज्ञानातून उत्पन्न झालेला त्याचा मोह नाहीसा झाला का? असं विचारतात.. 
श्रीभगवानांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन म्हणतो, "हे अच्युता, आपल्या कृपेनं माझा मोह नाहीसा झाला आहे.. मला माझ्या खऱ्या स्वरूपाची स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे.. आता मी संशयरहित झालो आहे.. आणि मी आपल्या आज्ञेनुसार कर्म करण्यास तयार आहे.."

रूढार्थानं श्रीकृष्णार्जुन संवाद इथं संपला.. गीताशास्त्राची सांगता झाली..
माऊली म्हणतात.. यया अर्जुनाचिया बोला। देखे नाचे सुखे भुलला। म्हणे विश्वफळा जाला। फळ हा मज।।.. अर्जुनाचा होकार ऐकून भगवान सुखानं अतिहर्ष पावून प्रेमानं  नाचू लागले आणि म्हणाले 'या विश्वरूप फळाला मला अर्जुन हे एकच फळ उत्पन्न झालं'.. 

हा श्रीकृष्णार्जुन संवाद संपल्यावर संजय महाराज धृतराष्ट्रांना म्हणाला, "अशाप्रकारे मी श्रीवासुदेव आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला.. श्रीव्यासांच्या कृपेनं, दिव्य दृष्टी मिळवून, मी हे परम गोपनीय ज्ञान योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, अर्जुनाला सांगत असताना प्रत्यक्ष ऐकले.. महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय, कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे.. हे राजन, श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रुपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्र्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे.. आणि... जिथं योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत, गांडीव धनुष्य धारण करणारा त्यांचा परमभक्त अर्जुन आहे, तिथंच लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि अचल नीती आहे असं मला वाटतं..".. ह्या संजयाच्या वचनानं अध्यायाची सांगता होते.. 

म्हणे पार्थ, हे अच्युता 
चिरंतर सत्य उमजले मजला 
नष्ट होऊनी अज्ञान मोह माया 
स्मृतिप्रकाशे विषाद हा संपला 


हरी ॐ तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥




-मी मधुरा.. 

************************************************



Tuesday, May 19, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : श्लोक ३१ ते ३८




दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्॥३१॥

दक्षिणे : उजवी बाजू       वामे : डावी बाजू 
पुरतो : पुढं 
*अनुष्ठूप छंद

अर्थ-  
ज्यांच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे, डाव्या बाजूस राजा जनककन्या (सीता) आहे..
पुढं मारुती आहे अशा रघुनंदनाला मी वंदन करतो..

विवरण-     
दक्षिणे लक्ष्मणो यस्य - याबद्दल एक कथा सांगितली जाते.. 
रामसीतेच्या विवाहाच्या आदल्या दिवशीची रात्र.. नेहमीप्रमाणं रामाची चरणसेवा करत असताना लक्ष्मणाच्या डोळ्यांतील अश्रू रामाच्या चरणावर पडले..
त्यावेळी रामांनी त्याला त्याच्या अश्रूंचं कारण विचारलं.. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, सीतेबरोबर आपला विवाह होईल, विवाह झाल्यावर ती आपली चरणसेवा करेल.. आणि मला ती करता येणार नाही म्हणून वाईट वाटत आहे.. आपली सेवा करणं हा माझा धर्म आहे.. 
त्यावर राम म्हणाले, असं झालंच तर मी चरण सेवा वाटून देईन.. उजव्या पायाची चरण सेवा तुझी आणि डाव्या पायाची चरण सेवा सीतेची.. 
म्हणून 'दक्षिणे लक्ष्मणो यस्य'.. 


लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
               कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥३२॥              

लोकाभिरामं : लोक + अभिरामं(आकर्षक, आनंद देणारा)       रणरङ्गधीरं : रण(युद्ध) + रंग(क्षेत्र) + धीरं(धैर्यवान)    
राजीवनेत्रं : कमळाप्रमाणे नेत्र 
*त्रिष्टुप छंद

अर्थ-
लोकांना आनंद देणाऱ्या (प्रेम करणारा), रणांगणांत धैर्य धरणाऱ्या (धीराने तोंड देणाऱ्या), कमळासारखे डोळे असणाऱ्या, रघुवंशाचा अधिपती.. 
कारुण्याची मूर्ति असलेल्या, करुणासागर श्रीरामचंद्राला मी शरण आलो आहे..

विवरण-       
रणरङ्गधीरं याचा खूप सुंदर प्रसंग रामायणांत राम-रावण युद्धप्रसंगी रामचरितमानस मध्ये वर्णिला आहे.. 
रावण रथावर आणि श्रीराम रथाशिवाय असं पाहून विभीषण बेचैन होतो.. त्याच्या मनांत शंका येते कि रथाशिवाय श्रीराम रावणावर विजय कसा प्राप्त करू शकतील? त्यावेळी श्रीराम बिभीषणास उपदेश करतात.. त्या उपदेशाला बिभीषण गीता किंवा धर्मरथ असं म्हंटलं जातं..
श्रीराम म्हणतात.. 
योद्ध्याचा रथ हा खरं तर धर्मरथ असतो.. रथाची दोन चाक ही शौर्य आणि धैर्य, रथाची ध्वजपताका योध्याचं सत्यशील, बल-विवेक-दम-परहित हे रथाचे चार घोडे तर क्षमा,कृपा, समता हे लगाम आणि ईश्वरभक्ती हा सारथी.. वैराग्य ढाल, संतोष तलवार, दान परशू, विज्ञान धनुष्य निर्मळ मन भाता तर शम,यम,नियम हे बाण, गुरुपूजा कवच आणि बुद्धी ही शक्ती असते.. 


मारुती स्तुती..
         
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। 
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥३३॥

मनोजवं  : मन + जवं(वेग,गती)    मारुततुल्यवेगं : मारुत(वारा) + तुल्य(सारखा) + वेगं(वेग)   जितेन्द्रियं : इंद्रियांवर विजय 
वातात्मजं : वात(वारा,पवन) + आत्मज(पुत्र)
*त्रिष्टुप छंद

अर्थ-
मनाच्या वेगानं आवागमन करणाऱ्या, वाऱ्याप्रमाणं वेगवान, इंद्रियांवर विजय मिळविलेल्या, बुद्धिमंतांत श्रेष्ठ..
पवनपुत्र, वनरसेनेचा मुख्य असलेल्या श्रीरामदूताला मी शरण आलो आहे..

 
वाल्मिकी वंदना..             

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्॥३४॥

आरुह्य : चढणं, बसणं, आरूढ होणं 
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
राम राम अशा मधुरात मधुर अक्षरांचं कूजन..
कवितेच्या (काव्यछंदांच्या) फांदीवर वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वंदन करतो..
म्हणजेच, 
कवितेच्या (काव्यछंदांच्या) फांदीवर बसून राम राम अशा मधुरात मधुर अक्षरांचं कूजन करणाऱ्या वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वंदन करतो..

विवरण-
वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ही कथा आपल्याला माहिती आहेच..
वाल्याचा वाल्मिकी झाल्यावर मुनिवर्य वाल्मिकी आश्रमात राहू लागले.. वल्कलं धारण केली.. कंदमूळं खाऊ लागले.. मृगजिनावर तप करू लागले..
एके दिवशी तामसा नदीच्या प्रशांत तीरावर, एका उंच वृक्षावर क्रौंञ्च पक्षाचं एक जोडपं त्यांना क्रीडा करत असल्याचं दिसलं.. इतक्यात एका निषादाचा विषारी बाण पक्षाला  लागला.. पक्षीण विरहानं व्याकूळ झाली.. तिचं आक्रंदन ऐकून मुनिवर्य वाल्मीकींचं हृदय कारुण्यानं भरून आलं..  
त्यांनी छंदोमय शाप वाणी उच्चारली..
मा निषाद प्रतिष्ठा
त्वमगमःशाश्वती समः।
यत् क्रौञ्च मिथुनादेकमवधीः 
काम मोहितम् '।।
हे निषादा! क्रीडा करीत असलेल्या पक्षाच्या जोडीतून तू एका पक्षाचा वध केला आहेस म्हणून तुला हजारो वर्ष या जगात प्रतिष्ठा मिळणार नाही..
नकळत निघालेल्या ह्या शापवाणीचं वाल्मिकींना वाईट वाटलं.. 
आश्रमात आल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाचं ध्यान केलं.. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, हे कवी कोकीळ वाणीच्या वीणा झंकारात श्रीराम चरित्राचं छंदोबद्ध गायन करण्यास प्रारंभ करा.. 'आदिकवी' म्हणून तुमचा गौरव होईल.. म्हणून वाल्मीकिकोकिलम्..



आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्॥३५॥

आपदामपहर्तारम्  : आपदाम् (आपत्ती, संकटं) + अपहर्तारम् (विनाश करणं)              दातारं : देणारा, दाता 
लोकाभिरामं : लोक अभिरामं : लोकांना आकर्षित करणारा, आनंद देणारा 
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
आपत्ती हरणाऱ्या (आपत्तीचा विनाश करणाऱ्या), सर्व संपदा (संपत्ती, संतती, स्थावर, बुद्धी, वैभव इत्यादी) देणाऱ्या 
लोकांना आनंद देणाऱ्या प्रभू श्रीरामांना मी पुनः पुनः नमस्कार करतो..

**असं म्हटलं जात कि, 'आपदंपहारहाराराम दाताराम सर्वसंपदाम' पठण केल्यानं एखादी व्यक्ती आपली सर्व कर्जे मिटवू शकेल..



भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्।
                 तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्॥३६॥                

भर्जनम् : भाजणं     भवबीजानामर्जनं : भवबीजानाम् (कर्मबीजं)+ अर्जनम् (प्राप्त करणं)
तर्जनं : धमकावणं     गर्जनम् : गर्जना करणं 
*अनुष्ठूप छंद
  
अर्थ-
(संसारवृक्षाची) कर्मबीजं जाळून टाकण्यासाठी सुखसमृद्धी मिळवण्यासाठी 
यमदूतांना घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना (जप) करावी 

विवरण- 
बीज भाजल्यानंतर जसा त्यातून अंकूर फुटत नाही तसंच राम नामाचा जप केल्यानं संसाररुपी कर्मबीजं भाजून निघतात आणि जन्म मृत्युचे फेरे नष्ट होतात..
माऊली म्हणतात,                
मग अग्निकुंडीं बीजे घातलीं ।
तियें अकुरदशे जेविं मुकलीं ।
तेविं न फळतीचि मज अर्पिलीं । 
शुभाशुभें ।।  (ज्ञाने - ९-४०२)
म्हणजेच, मग अग्निकुंडात बीजे घातली, ती अंकुराच्या अवस्थेला जशी मुकली, तशी मला अर्पण केलेली कर्मे चांगली किंवा वाईट फळ देत नाहीत..


रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।
              रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर॥३७॥             

राजमणिः : श्रेष्ठ राजा     रमेशं : रमेचा ईश 
रामेणाभिहता : रामेण (रामाकडून) + अभिहता (ठार मारलेला)   निशाचरचमु :  निशाचर (राक्षस) + चमु (सेना) 
चित्तलय: : चित्त + लय (विलीन होणं , नष्ट होणं)    मामुद्धर : माम (माझा) + उद्धार 
*शार्दूलविक्रीडित छंद
      

अर्थ- 
राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो.. रमेशाला म्हणजेच रमेचा (इथं सीता) पती(विष्णू) रामाला भजतो.. 
असुरांच्या समुदायाला नष्ट करणाऱ्या रामाला मी नमस्कार करतो..
रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही.. मी रामाचा दास आहे..
रामामध्ये माझ्या चित्तवृत्तीचा लय होवो.. हे राम माझा उद्धार कर..

विवरण- 
या श्लोकात राम शब्दाच्या सातही विभक्ति वापरलेल्या आहेत..
राम एकपत्नि, एक वचनी, एक बाणी म्हणून ह्या श्लोकांत रामाच्या एक वचनी विभक्तिची सर्वरूपे आली आहेत..
रामो = रामः (प्रथमा)  रामं (द्वितीया)  रामेण (तृतिया)  रामाय (चतुर्थी)  रामात् (पंचमी)  रामस्य (षष्ठी)  रामे (सप्तमी)   भो राम (अष्टमी, संबोधन)

**ह्या श्लोकात र-काराची पुनरावृत्ती असल्यानं असं म्हटलं जातं कि गर्भारपणात हा श्लोक म्हटल्यानं जन्माला येणारं बाळ बोबडं बोलत नाही.. तसंच बोबडं बोलणाऱ्याचे ही उच्चार सुधारतात.. 


रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥३८॥

वरानने : वर (श्रेष्ठ) + आनन (मुख)
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
मनाला रममाण करणाऱ्या (आनंद देणाऱ्या) रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो.. 
रामाचं एक नाव (विष्णूच्या) हजार नावांच्या बरोबरीचे आहे.. (भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात) हे सुमुखी.. 

विवरण-   
माता पार्वतीनं विचारलेल्या 'श्रीविष्णुसहस्रनामावली सारखं रामाचं एखादं स्तोत्र आहे का?' ह्या प्रश्नाच्या उत्तराची सांगता करणारा हा श्लोक.. भगवान विष्णूच्या सहस्रनामाची बरोबरी करणारा हा एक 'राम' हा शब्द.. ज्याच्या नामस्मरणात भगवान शंकर अखंड रममाण असतात..


इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम्।

अर्थ-
अशा प्रकारे श्री बुधकौशिकऋषी रचित श्रीरामरक्षा स्तोत्र संपूर्ण झाले..


॥श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु॥

श्रीसीतारामचंद्र : सीतेचा पती श्री रामचंद्र

अर्थ- 
हे स्तोत्र श्री सीतारामचंद्रांच्या चरणी अर्पण असो..

विवरण-
'श्री सीता रामचंद्र चरणी अर्पण' - असा ही एक अर्थ सांगितला आहे..
सीता ही रामाची शक्ती, शक्तीचं स्मरण प्रथम करावं म्हणून सीताराम असं म्हटलं जातं.. तसंच राधेशाम, पार्वतीवल्लभ ह्या नावांत ही दिसून येतं.. 


*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं..     
एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत.. 
*त्रिष्टुप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ११ अक्षरं..  
एक महत्त्वाचा वैदिक छंद.. वेदमंत्रांमध्ये गायत्री छंदानंतर त्रिष्टुप हा सर्वाधिक वापरला जाणारा आणि लोकप्रिय छंद मानला जातो.. श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक श्लोक या छंदात रचलेले आहेत.. 
*शार्दूलविक्रीडित छंद :  प्रत्येक चरणात एकूण १९ अक्षरं..
एक अतिशय लोकप्रिय आणि लयबद्ध जोरदार, डौलदार चालीचं असं हे अक्षरगणवृत्त..         


🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर मंत्रमय व तारक आहे..
शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमी पर्यंत हे अनुष्ठान करतात.. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणं चढत्या क्रमानं वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा..  
१२१ दिवस रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी पठण केल्यास.. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज १३ वेळा.. किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज १३ वेळा पठण केल्यास रामरक्षा सिद्ध होते.. असं म्हणतात.. 
रामरक्षा सिद्ध होते म्हणजे नियम, श्रद्धा आणि एकाग्रतेनं केलेल्या नियमित पठणामुळं रामरक्षा स्तोत्राची ऊर्जा जागृत होऊन, पठण करणाऱ्या व्यक्तीच्या अवतीभोवती प्रभू श्रीरामाच्या कृपेचं एक शक्तिशाली संरक्षककवच निर्माण होतं..


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************

Friday, May 15, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : श्लोक २२ ते ३०




रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः॥२२॥

लक्ष्मणानुचरो : लक्ष्मण + अनुचारो (पाठोपाठ चालणारा)
काकुत्स्थः : काकुत्स्थ कुळातील  
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-
दशरथपुत्र श्रीराम शूर आहेत, लक्ष्मणा सारखा बलवान त्यांचं अनुचरण करतो..
ककुत्स्थ कुळातला हा पूर्ण पुरुष असलेला कौसल्येचा पुत्र रघुकुलात श्रेष्ठ आहे..

विवरण-        
पुराणकथेनुसार, सत्ययुगाच्या शेवटी देव दानवांचं घोर युद्ध झालं.. देवांच्या सैनेचं प्रतिनिधित्व 'सूर्यवंशी राजा' पुरंजय यांनी वृषभ(बैल) रूपात असलेल्या इंद्राच्या 'कुकुद' (कूबड) वर बसून केलं आणि राक्षसांचा पराभव केला.. म्हणून त्यांना काकुत्स्थ हे नाव पडलं.. आणि त्या वंशांत जन्म घेणाऱ्यास काकुत्स्थ म्हणू लागले.. 



वेदान्तवेद्यो यज्ञेशः  पुराणपुरुषोत्तमः।
               जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः॥२३॥              

वेदान्तवेद्यो : वेदांतानं जाणून घेण्या योग्य       पुराणपुरुषोत्तमः : सनातन पुरुष
जानकीवल्लभः : सीतेचा पती     श्रीमानप्रमेयपराक्रमः : श्रीमान्+अप्रमेय(मोजदाद करता येत नाही असा)+पराक्रमः
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-
वेदान्त विद्यांचे निधी, सर्व यज्ञांचे ईश, पुराणात देखील उल्लेख असणारे पुरुषोत्तम..
जानकीचे पती हे कल्याणकर्ता आणि पराक्रमी आहेत..  

श्लोक क्र २२, २३ मध्ये श्रीरामांची आलेली १५ विशेषणं.. १) दशरथ पुत्र, २) शूर, ३) लक्ष्मण ज्याचा अनुचर आहे, ४) बलवान, ५) काकुत्स्थ कुलोत्पन्न, ६) महापुरुष, ७) पूर्ण ब्रह्म, ८) कौसल्या तनय, ९) रघुकुलातील श्रेष्ठ १०) वेदांत शास्त्रांनी जाणण्यास योग्य, ११) यज्ञाचा स्वामी, १२) पुराण पुरषोत्तम, १३) जानकीचा पति, १४) वैभव संपन्न, १५) अतुल पराक्रमी..



इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः॥२४॥
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-
ह्याचा नित्यजप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनानं करतील 
त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल यात शंका नाही..

विवरण-    
अश्वमेध यज्ञ- पूर्वकाळात आपलं सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याकरिता राजे अश्वमेध यज्ञ करीत असत.. एक वर्ष चालणाऱ्या या यज्ञासाठी एक यज्ञिय अश्व सोडला जात असे.. आणि त्याच्या मागून राजाचं सैन्य जात असे.. ज्या ज्या भूभागातून हा घोडा जायी त्या त्या ठिकाणच्या राजांना ह्या अश्वाचं स्वामीत्व मान्य मान्य करावं लागे.. आणि ते मान्य नसेल तर सैन्याशी युद्ध करावं लागे.. मग तो भूभाग सैन्य युद्ध करून आपलं करून घेत असत..


रामंदूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः॥२५॥       

रामंदूर्वादलश्यामं : रामं+दूर्वादल(दूर्वांचं पान)+श्यामं(सावळा)    पद्माक्षं : कमळासारखे डोळे    पीतवाससम् : पितांबर 
नामभिर्दिव्यैर् : नामभिः(नावांनी)+दिव्यैः( दिव्य, अलौकिक)
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-  
दूर्वादलासारख्या सावळ्या वर्णाच्या, कमळासारखे डोळे असलेल्या, पितांबर परिधान केलेल्या श्रीरामांचं..
दिव्य नाव घेऊन जे स्तुति करतात ते पुरुष संसाराच्या फेऱ्यातून मुक्त होतात..


रामं लक्ष्मणपूर्वजम् रघुवरं सीतापतिं सुन्दरम्।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्l
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम्।
              वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकम् राघवं रावणारिम्॥२६॥            

*पहिले दोन चरण शार्दूलविक्रीडित छंद 
*दुसरे दोन चरण स्रग्धरा छंद 

अर्थ-
श्रीराम लक्ष्मणाग्रज, रघुकुळातले श्रेष्ठ, सीतेचे पती व सुंदर आहेत.. 
ककुत्स्थ कुळातले, करूणेचे सागर, गुणांचा खजिना, ब्राह्मणांना प्रिय असलेले व धार्मिक आहेत.. 
राजांमध्ये श्रेष्ठ, सत्याशी कायम जोडलेले, दशरथपुत्र, सावळे व शांततेची मूर्ती आहेत.. 
लोकांना प्रिय असणाऱ्या, रघुकुळात तिलका प्रमाणे शोभणाऱ्या, रावणाचा शत्रू असणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करतो..

विवरण- 
लक्ष्मणपूर्वजम् : लक्ष्मणाग्रज असा अर्थ..       
पूर्वज म्हणजे पूर्वी जन्मले असा रुढार्थ आहे.. मोठ्या भावाला सहसा कोणी पूर्वज म्हणत नाही.. पण इथं लक्ष्मणा आधी म्हणजेच लक्ष्मणाग्रज हा अर्थ अभिप्रेत आहे..

रावणारिम : रावणाचा शत्रू 
विश्रवामुनी आणि कैकसी यांचा पुत्र दशानन.. पुराणानुसार, ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यावर अत्यंत अहंकारी झालेला दशानन एकदा त्यानं आपलं पुष्पक विमान कैलास पर्वताजवळ थांबवलं आणि शिवाला उचलण्याचा प्रयत्न केला.. तेव्हा भगवान शिवांनी त्याला कैलासावर येण्यास सक्त मनाई केल्यावर, अहंकारी दशाननानं  कैलास पर्वतच मुळापासून उखडून लंकेला नेण्याचा प्रयत्न केला.. त्याची शक्ती पाहून भगवान शिवांनी आपल्या पायाच्या अंगठ्यानं कैलास पर्वताला दाबलं.. या वजनाखाली त्याचे हात चिरडले गेल्यानं हातातील प्रचंड वेदनानं तो असह्य होऊन भयानक गर्जना करत ओरडू लागला.. त्याच्या या आक्रोशानं त्रैलोक्य रावित (नादित) झालेलं पाहून भगवान शिवांनी त्याला 'रावण' हे नाव दिलं.. 

ह्या श्लोकात आलेली श्रीरामाची १८ विशेषणं.. १) लक्ष्मणाचा जेष्ठ बंधू, २) रघुकुलातील श्रेष्ठ, ३) सीतेचा पति, ४) सुंदर ५) काकुत्स्थ कुलोत्पन्न, ६) दयेचा सागर, ७) सद्गुणांचा निधी,  ८) ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असा, ९) धार्मिक, १०) राजे लोकांचा इंद्र, ११) सत्यवचनी, १२) दशरथपुत्र, १३) सावळ्या वर्णाचा, १४) शांत स्वरुपाचा, १५) लोकांना आनंद देणारा, १६) रघुकुलाला तिलकाप्रमाणं शोभणारा, १७) रघुकुलात श्रेष्ठ आणि १८) रावणाचा शत्रू..



रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
                  रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥२७॥               

रामभद्र : भद्र(कल्याणकारी,शांत, सज्जन)      वेधसे : निर्माता, प्रजापती
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-
रामाला, रामभद्राला, रामचंद्राला, प्रजापतीला, रघुनाथाला, नाथाला, सीतेच्या पतीला माझा नमस्कार असो..



श्रीराम राम रघुनन्दन राम राम।
श्रीराम राम भरताग्रज राम राम।
श्रीराम राम रणकर्कश राम राम।
           श्रीराम राम शरणं भव राम राम॥२८॥          

*वसंततिलका छंद 

अर्थ-
श्रीराम हे रघुकुळातले श्रेष्ठ आहेत..
श्रीराम भरताचे थोरले बंधु आहेत..
श्रीराम रणांगणावर शूरवीर आहेत.. 
अशा श्रीरामांना मी शरण आलो आहे..



श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि।
           श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये॥२९॥           

*वसंततिलका छंद 

अर्थ- 
मी श्रीरामांच्या चरणांचं मनानं स्मरण करतो.. 
मी श्रीरामांच्या चरणांचं वाणीनं स्तवन करतो.. 
मी श्रीरामांच्या चरणांना शिरसाष्टांग नमन करतो..
मी श्रीरामांच्या चरणांना शरण जातो..

विवरण-        
रामचंद्र नावासंबंधित एक कथा अशी सांगितली जाते..
श्रीरामांच्या जन्मानं सर्व सृष्टी प्रसन्न झाली होती, सर्वजण आनंदीत झाले होते.. पण श्रीराम जन्म सोहळा पाहायला न मिळाल्यानं चंद्र मात्र दुःखी होता..
श्रीरामांनी त्याला वाचन दिलं कि, चिंता करू नकोस रामावतारात असं झालं असलं तरी कृष्णावतारात असं होणार नाही.. मी रात्री बारा वाजता अवतरीत होईन.. बाकी सगळी सृष्टी झोपलेली असेल आणि तू एकटाच जागा असशील.. आणि तुलाच माझं प्रथम दर्शन घेता येईल.. 
चंद्र प्रसन्न झाला तरीही म्हणाला, "प्रभो पुढच्या अवतारा पर्यंत याची प्रतिक्षा करावी लागेल?" यावर श्रीराम म्हणाले, "ठीक आहे मी माझ्या नावासह तुझं नाव जोडेन.. लोक मला रामचंद्र म्हणतील.. मी सूर्यवंशात जन्मलो असलो तरी माझ्या नावापुढं तुझं नाव लावेन" 



माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः।
               सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने॥३०॥               

*त्रिष्टुप छंद

अर्थ- 
माझी माता श्रीराम आहेत माझा पिता श्रीराम आहेत.. माझा स्वामी श्रीराम आहेत माझा मित्र ही श्रीराम आहेत.. 
परम दयाळू प्रभू श्रीराम माझे सर्वस्व आहेत.. मी त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही जाणत नाही..

*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं..     
एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत.. 
*शार्दूलविक्रीडित छंद :  प्रत्येक चरणात एकूण १९ अक्षरं..
एक अतिशय लोकप्रिय आणि लयबद्ध जोरदार, डौलदार चालीचं असं हे अक्षरगणवृत्त.. 
*स्रग्धरा छंद : प्रत्येक चरणांत २१ अक्षरं.. ओळीची लांबी जास्त त्यामुळं लय अतिशय संथ आणि भारदस्त..
*वसंततिलका छंद : प्रत्येक चरणात १४ अक्षरं..
मुख्यतः वीररस, शृंगाररस आणि गंभीर भावना व्यक्त करण्यासाठी अत्यंत लोकप्रिय असं हे अक्षरगणवृत्त..  
*त्रिष्टुप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ११ अक्षरं..  
एक महत्त्वाचा वैदिक छंद.. वेदमंत्रांमध्ये गायत्री छंदानंतर त्रिष्टुप हा सर्वाधिक वापरला जाणारा आणि लोकप्रिय छंद मानला जातो.. श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक श्लोक या छंदात रचलेले आहेत.. 


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************