रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः॥२२॥
लक्ष्मणानुचरो : लक्ष्मण + अनुचारो (पाठोपाठ चालणारा)
काकुत्स्थः : काकुत्स्थ कुळातील
अर्थ-
दशरथपुत्र श्रीराम शूर आहेत, लक्ष्मणा सारखा बलवान त्यांचं अनुचरण करतो..
ककुत्स्थ कुळातला हा पूर्ण पुरुष असलेला कौसल्येचा पुत्र रघुकुलात श्रेष्ठ आहे..
विवरण-
पुराणकथेनुसार, सत्ययुगाच्या शेवटी देव दानवांचं घोर युद्ध झालं.. देवांच्या सैनेचं प्रतिनिधित्व 'सूर्यवंशी राजा' पुरंजय यांनी वृषभ(बैल) रूपात असलेल्या इंद्राच्या 'कुकुद' (कूबड) वर बसून केलं आणि राक्षसांचा पराभव केला.. म्हणून त्यांना काकुत्स्थ हे नाव पडलं.. आणि त्या वंशांत जन्म घेणाऱ्यास काकुत्स्थ म्हणू लागले..
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः।
जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः॥२३॥
वेदान्तवेद्यो : वेदांतानं जाणून घेण्या योग्य पुराणपुरुषोत्तमः : सनातन पुरुष
जानकीवल्लभः : सीतेचा पती श्रीमानप्रमेयपराक्रमः : श्रीमान्+अप्रमेय(मोजदाद करता येत नाही असा)+पराक्रमः
अर्थ-
वेदान्त विद्यांचे निधी, सर्व यज्ञांचे ईश, पुराणात देखील उल्लेख असणारे पुरुषोत्तम..
जानकीचे पती हे कल्याणकर्ता आणि पराक्रमी आहेत..
श्लोक क्र २२, २३ मध्ये श्रीरामांची आलेली १५ विशेषणं.. १) दशरथ पुत्र, २) शूर, ३) लक्ष्मण ज्याचा अनुचर आहे, ४) बलवान, ५) काकुत्स्थ कुलोत्पन्न, ६) महापुरुष, ७) पूर्ण ब्रह्म, ८) कौसल्या तनय, ९) रघुकुलातील श्रेष्ठ १०) वेदांत शास्त्रांनी जाणण्यास योग्य, ११) यज्ञाचा स्वामी, १२) पुराण पुरषोत्तम, १३) जानकीचा पति, १४) वैभव संपन्न, १५) अतुल पराक्रमी..
इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः॥२४॥
अर्थ-
ह्याचा नित्यजप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनानं करतील
त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल यात शंका नाही..
विवरण-
अश्वमेध यज्ञ- पूर्वकाळात आपलं सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याकरिता राजे अश्वमेध यज्ञ करीत असत.. एक वर्ष चालणाऱ्या या यज्ञासाठी एक यज्ञिय अश्व सोडला जात असे.. आणि त्याच्या मागून राजाचं सैन्य जात असे.. ज्या ज्या भूभागातून हा घोडा जायी त्या त्या ठिकाणच्या राजांना ह्या अश्वाचं स्वामीत्व मान्य मान्य करावं लागे.. आणि ते मान्य नसेल तर सैन्याशी युद्ध करावं लागे.. मग तो भूभाग सैन्य युद्ध करून आपलं करून घेत असत..
रामंदूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः॥२५॥
रामंदूर्वादलश्यामं : रामं+दूर्वादल(दूर्वांचं पान)+श्यामं(सावळा) पद्माक्षं : कमळासारखे डोळे पीतवाससम् : पितांबर
नामभिर्दिव्यैर् : नामभिः(नावांनी)+दिव्यैः( दिव्य, अलौकिक)
अर्थ-
दूर्वादलासारख्या सावळ्या वर्णाच्या, कमळासारखे डोळे असलेल्या, पितांबर परिधान केलेल्या श्रीरामांचं..
दिव्य नाव घेऊन जे स्तुति करतात ते पुरुष संसाराच्या फेऱ्यातून मुक्त होतात..
रामं लक्ष्मणपूर्वजम् रघुवरं सीतापतिं सुन्दरम्।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्l
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम्।
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकम् राघवं रावणारिम्॥२६॥
अर्थ-
श्रीराम लक्ष्मणाग्रज, रघुकुळातले श्रेष्ठ, सीतेचे पती व सुंदर आहेत..
ककुत्स्थ कुळातले, करूणेचे सागर, गुणांचा खजिना, ब्राह्मणांना प्रिय असलेले व धार्मिक आहेत..
राजांमध्ये श्रेष्ठ, सत्याशी कायम जोडलेले, दशरथपुत्र, सावळे व शांततेची मूर्ती आहेत..
लोकांना प्रिय असणाऱ्या, रघुकुळात तिलका प्रमाणे शोभणाऱ्या, रावणाचा शत्रू असणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करतो..
विवरण-
लक्ष्मणपूर्वजम् : लक्ष्मणाग्रज असा अर्थ..
पूर्वज म्हणजे पूर्वी जन्मले असा रुढार्थ आहे.. मोठ्या भावाला सहसा कोणी पूर्वज म्हणत नाही.. पण इथं लक्ष्मणा आधी म्हणजेच लक्ष्मणाग्रज हा अर्थ अभिप्रेत आहे..
रावणारिम : रावणाचा शत्रू
विश्रवामुनी आणि कैकसी यांचा पुत्र दशानन.. पुराणानुसार, ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यावर अत्यंत अहंकारी झालेला दशानन एकदा त्यानं आपलं पुष्पक विमान कैलास पर्वताजवळ थांबवलं आणि शिवाला उचलण्याचा प्रयत्न केला.. तेव्हा भगवान शिवांनी त्याला कैलासावर येण्यास सक्त मनाई केल्यावर, अहंकारी दशाननानं कैलास पर्वतच मुळापासून उखडून लंकेला नेण्याचा प्रयत्न केला.. त्याची शक्ती पाहून भगवान शिवांनी आपल्या पायाच्या अंगठ्यानं कैलास पर्वताला दाबलं.. या वजनाखाली त्याचे हात चिरडले गेल्यानं हातातील प्रचंड वेदनानं तो असह्य होऊन भयानक गर्जना करत ओरडू लागला.. त्याच्या या आक्रोशानं त्रैलोक्य रावित (नादित) झालेलं पाहून भगवान शिवांनी त्याला 'रावण' हे नाव दिलं..
ह्या श्लोकात आलेली श्रीरामाची १८ विशेषणं.. १) लक्ष्मणाचा जेष्ठ बंधू २) रघुकुलातील श्रेष्ठ ३) सीतेचा पति ४) सुंदर ५) काकुत्स्थ कुलोत्पन्न ६) दयेचा सागर ७) सद्गुणांचा निधी ८) ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असा ९) धार्मिक १०) राजे लोकांचा इंद्र ११) सत्यवचनी १२) दशरथपुत्र १३) सावळ्या वर्णाचा १४) शांत स्वरुपाचा १५) लोकांना आनंद देणारा १६) रघुकुलाला तिलकाप्रमाणं शोभणारा १७) रघुकुलात श्रेष्ठ आणि १८) रावणाचा शत्रू
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥२७॥
रामभद्र : भद्र(कल्याणकारी,शांत, सज्जन) वेधसे : निर्माता, प्रजापती
अर्थ-
रामाला, रामभद्राला, रामचंद्राला, प्रजापतीला, रघुनाथाला, नाथाला, सीतेच्या पतीला माझा नमस्कार असो..
श्रीराम राम रघुनन्दन राम राम।
श्रीराम राम भरताग्रज राम राम।
श्रीराम राम रणकर्कश राम राम।
श्रीराम राम शरणं भव राम राम॥२८॥
अर्थ-
श्रीराम हे रघुकुळातले श्रेष्ठ आहेत..
श्रीराम भरताचे थोरले बंधु आहेत..
श्रीराम रणांगणावर शूरवीर आहेत..
अशा श्रीरामांना मी शरण आलो आहे..
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये॥२९॥
अर्थ-
मी श्रीरामांच्या चरणांचं मनानं स्मरण करतो..
मी श्रीरामांच्या चरणांचं वाणीनं स्तवन करतो..
मी श्रीरामांच्या चरणांना शिरसाष्टांग नमन करतो..
मी श्रीरामांच्या चरणांना शरण जातो..
विवरण-
रामचंद्र नावासंबंधित एक कथा अशी सांगितली जाते..
श्रीरामांच्या जन्मानं सर्व सृष्टी प्रसन्न झाली होती, सर्वजण आनंदीत झाले होते.. पण श्रीराम जन्म सोहळा पाहायला न मिळाल्यानं चंद्र मात्र दुःखी होता..
श्रीरामांनी त्याला वाचन दिलं कि, चिंता करू नकोस रामावतारात असं झालं असलं तरी कृष्णावतारात असं होणार नाही.. मी रात्री बारा वाजता अवतरीत होईन.. बाकी सगळी सृष्टी झोपलेली असेल आणि तू एकटाच जागा असशील.. आणि तुलाच माझं प्रथम दर्शन घेता येईल..
चंद्र प्रसन्न झाला तरीही म्हणाला, "प्रभो पुढच्या अवतारा पर्यंत याची प्रतिक्षा करावी लागेल?" यावर श्रीराम म्हणाले, "ठीक आहे मी माझ्या नावासह तुझं नाव जोडेन.. लोक मला रामचंद्र म्हणतील.. मी सूर्यवंशात जन्मलो असलो तरी माझ्या नावापुढं तुझं नाव लावेन"
माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः।
सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने॥३०॥
अर्थ-
माझी माता श्रीराम आहेत माझा पिता श्रीराम आहेत.. माझा स्वामी श्रीराम आहेत माझा मित्र ही श्रीराम आहेत..
परम दयाळू प्रभू श्रीराम माझे सर्वस्व आहेत.. मी त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही जाणत नाही..
।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।
🙏
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment