दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्॥३१॥
दक्षिणे : उजवी बाजू वामे : डावी बाजू
पुरतो : पुढं
*अनुष्ठूप छंद
अर्थ-
ज्यांच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे, डाव्या बाजूस राजा जनककन्या (सीता) आहे..
पुढं मारुती आहे अशा रघुनंदनाला मी वंदन करतो..
विवरण-
दक्षिणे लक्ष्मणो यस्य - याबद्दल एक कथा सांगितली जाते..
रामसीतेच्या विवाहाच्या आदल्या दिवशीची रात्र.. नेहमीप्रमाणं रामाची चरणसेवा करत असताना लक्ष्मणाच्या डोळ्यांतील अश्रू रामाच्या चरणावर पडले..
त्यावेळी रामांनी त्याला त्याच्या अश्रूंचं कारण विचारलं.. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, सीतेबरोबर आपला विवाह होईल, विवाह झाल्यावर ती आपली चरणसेवा करेल.. आणि मला ती करता येणार नाही म्हणून वाईट वाटत आहे.. आपली सेवा करणं हा माझा धर्म आहे..
त्यावर राम म्हणाले, असं झालंच तर मी चरण सेवा वाटून देईन.. उजव्या पायाची चरण सेवा तुझी आणि डाव्या पायाची चरण सेवा सीतेची..
म्हणून 'दक्षिणे लक्ष्मणो यस्य'..
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥३२॥
लोकाभिरामं : लोक + अभिरामं(आकर्षक, आनंद देणारा) रणरङ्गधीरं : रण(युद्ध) + रंग(क्षेत्र) + धीरं(धैर्यवान)
राजीवनेत्रं : कमळाप्रमाणे नेत्र
*त्रिष्टुप छंद
अर्थ-
लोकांना आनंद देणाऱ्या (प्रेम करणारा), रणांगणांत धैर्य धरणाऱ्या (धीराने तोंड देणाऱ्या), कमळासारखे डोळे असणाऱ्या, रघुवंशाचा अधिपती..
कारुण्याची मूर्ति असलेल्या, करुणासागर श्रीरामचंद्राला मी शरण आलो आहे..
विवरण-
रणरङ्गधीरं याचा खूप सुंदर प्रसंग रामायणांत राम-रावण युद्धप्रसंगी रामचरितमानस मध्ये वर्णिला आहे..
रावण रथावर आणि श्रीराम रथाशिवाय असं पाहून विभीषण बेचैन होतो.. त्याच्या मनांत शंका येते कि रथाशिवाय श्रीराम रावणावर विजय कसा प्राप्त करू शकतील? त्यावेळी श्रीराम बिभीषणास उपदेश करतात.. त्या उपदेशाला बिभीषण गीता किंवा धर्मरथ असं म्हंटलं जातं..
श्रीराम म्हणतात..
योद्ध्याचा रथ हा खरं तर धर्मरथ असतो.. रथाची दोन चाक ही शौर्य आणि धैर्य, रथाची ध्वजपताका योध्याचं सत्यशील, बल-विवेक-दम-परहित हे रथाचे चार घोडे तर क्षमा,कृपा, समता हे लगाम आणि ईश्वरभक्ती हा सारथी.. वैराग्य ढाल, संतोष तलवार, दान परशू, विज्ञान धनुष्य निर्मळ मन भाता तर शम,यम,नियम हे बाण, गुरुपूजा कवच आणि बुद्धी ही शक्ती असते..
मारुती स्तुती..
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्।
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥३३॥
मनोजवं : मन + जवं(वेग,गती) मारुततुल्यवेगं : मारुत(वारा) + तुल्य(सारखा) + वेगं(वेग) जितेन्द्रियं : इंद्रियांवर विजय
वातात्मजं : वात(वारा,पवन) + आत्मज(पुत्र)
*त्रिष्टुप छंद
अर्थ-
मनाच्या वेगानं आवागमन करणाऱ्या, वाऱ्याप्रमाणं वेगवान, इंद्रियांवर विजय मिळविलेल्या, बुद्धिमंतांत श्रेष्ठ..
पवनपुत्र, वनरसेनेचा मुख्य असलेल्या श्रीरामदूताला मी शरण आलो आहे..
वाल्मिकी वंदना..
कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्॥३४॥
आरुह्य : चढणं, बसणं, आरूढ होणं
*अनुष्ठूप छंद
अर्थ-
राम राम अशा मधुरात मधुर अक्षरांचं कूजन..
कवितेच्या (काव्यछंदांच्या) फांदीवर वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वंदन करतो..
म्हणजेच,
कवितेच्या (काव्यछंदांच्या) फांदीवर बसून राम राम अशा मधुरात मधुर अक्षरांचं कूजन करणाऱ्या वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वंदन करतो..
विवरण-
वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ही कथा आपल्याला माहिती आहेच..
वाल्याचा वाल्मिकी झाल्यावर मुनिवर्य वाल्मिकी आश्रमात राहू लागले.. वल्कलं धारण केली.. कंदमूळं खाऊ लागले.. मृगजिनावर तप करू लागले..
एके दिवशी तामसा नदीच्या प्रशांत तीरावर, एका उंच वृक्षावर क्रौंञ्च पक्षाचं एक जोडपं त्यांना क्रीडा करत असल्याचं दिसलं.. इतक्यात एका निषादाचा विषारी बाण पक्षाला लागला.. पक्षीण विरहानं व्याकूळ झाली.. तिचं आक्रंदन ऐकून मुनिवर्य वाल्मीकींचं हृदय कारुण्यानं भरून आलं..
त्यांनी छंदोमय शाप वाणी उच्चारली..
मा निषाद प्रतिष्ठा
त्वमगमःशाश्वती समः।
यत् क्रौञ्च मिथुनादेकमवधीः
काम मोहितम् '।।
हे निषादा! क्रीडा करीत असलेल्या पक्षाच्या जोडीतून तू एका पक्षाचा वध केला आहेस म्हणून तुला हजारो वर्ष या जगात प्रतिष्ठा मिळणार नाही..
नकळत निघालेल्या ह्या शापवाणीचं वाल्मिकींना वाईट वाटलं..
आश्रमात आल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाचं ध्यान केलं.. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, हे कवी कोकीळ वाणीच्या वीणा झंकारात श्रीराम चरित्राचं छंदोबद्ध गायन करण्यास प्रारंभ करा.. 'आदिकवी' म्हणून तुमचा गौरव होईल.. म्हणून वाल्मीकिकोकिलम्..
आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्॥३५॥
आपदामपहर्तारम् : आपदाम् (आपत्ती, संकटं) + अपहर्तारम् (विनाश करणं) दातारं : देणारा, दाता
लोकाभिरामं : लोक अभिरामं : लोकांना आकर्षित करणारा, आनंद देणारा
*अनुष्ठूप छंद
अर्थ-
आपत्ती हरणाऱ्या (आपत्तीचा विनाश करणाऱ्या), सर्व संपदा (संपत्ती, संतती, स्थावर, बुद्धी, वैभव इत्यादी) देणाऱ्या
लोकांना आनंद देणाऱ्या प्रभू श्रीरामांना मी पुनः पुनः नमस्कार करतो..
**असं म्हटलं जात कि, 'आपदंपहारहाराराम दाताराम सर्वसंपदाम' पठण केल्यानं एखादी व्यक्ती आपली सर्व कर्जे मिटवू शकेल..
भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्।
तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्॥३६॥
भर्जनम् : भाजणं भवबीजानामर्जनं : भवबीजानाम् (कर्मबीजं)+ अर्जनम् (प्राप्त करणं)
तर्जनं : धमकावणं गर्जनम् : गर्जना करणं
*अनुष्ठूप छंद
अर्थ-
(संसारवृक्षाची) कर्मबीजं जाळून टाकण्यासाठी सुखसमृद्धी मिळवण्यासाठी
यमदूतांना घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना (जप) करावी
विवरण-
बीज भाजल्यानंतर जसा त्यातून अंकूर फुटत नाही तसंच राम नामाचा जप केल्यानं संसाररुपी कर्मबीजं भाजून निघतात आणि जन्म मृत्युचे फेरे नष्ट होतात..
माऊली म्हणतात,
मग अग्निकुंडीं बीजे घातलीं ।
तियें अकुरदशे जेविं मुकलीं ।
तेविं न फळतीचि मज अर्पिलीं ।
शुभाशुभें ।। (ज्ञाने - ९-४०२)
म्हणजेच, मग अग्निकुंडात बीजे घातली, ती अंकुराच्या अवस्थेला जशी मुकली, तशी मला अर्पण केलेली कर्मे चांगली किंवा वाईट फळ देत नाहीत..
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर॥३७॥
राजमणिः : श्रेष्ठ राजा रमेशं : रमेचा ईश
रामेणाभिहता : रामेण (रामाकडून) + अभिहता (ठार मारलेला) निशाचरचमु : निशाचर (राक्षस) + चमु (सेना)
चित्तलय: : चित्त + लय (विलीन होणं , नष्ट होणं) मामुद्धर : माम (माझा) + उद्धार
*शार्दूलविक्रीडित छंद
अर्थ-
राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो.. रमेशाला म्हणजेच रमेचा (इथं सीता) पती(विष्णू) रामाला भजतो..
असुरांच्या समुदायाला नष्ट करणाऱ्या रामाला मी नमस्कार करतो..
रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही.. मी रामाचा दास आहे..
रामामध्ये माझ्या चित्तवृत्तीचा लय होवो.. हे राम माझा उद्धार कर..
विवरण-
या श्लोकात राम शब्दाच्या सातही विभक्ति वापरलेल्या आहेत..
राम एकपत्नि, एक वचनी, एक बाणी म्हणून ह्या श्लोकांत रामाच्या एक वचनी विभक्तिची सर्वरूपे आली आहेत..
रामो = रामः (प्रथमा) रामं (द्वितीया) रामेण (तृतिया) रामाय (चतुर्थी) रामात् (पंचमी) रामस्य (षष्ठी) रामे (सप्तमी) भो राम (अष्टमी, संबोधन)
**ह्या श्लोकात र-काराची पुनरावृत्ती असल्यानं असं म्हटलं जातं कि गर्भारपणात हा श्लोक म्हटल्यानं जन्माला येणारं बाळ बोबडं बोलत नाही.. तसंच बोबडं बोलणाऱ्याचे ही उच्चार सुधारतात..
रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥३८॥
वरानने : वर (श्रेष्ठ) + आनन (मुख)
*अनुष्ठूप छंद
अर्थ-
मनाला रममाण करणाऱ्या (आनंद देणाऱ्या) रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो..
रामाचं एक नाव (विष्णूच्या) हजार नावांच्या बरोबरीचे आहे.. (भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात) हे सुमुखी..
विवरण-
माता पार्वतीनं विचारलेल्या 'श्रीविष्णुसहस्रनामावली सारखं रामाचं एखादं स्तोत्र आहे का?' ह्या प्रश्नाच्या उत्तराची सांगता करणारा हा श्लोक.. भगवान विष्णूच्या सहस्रनामाची बरोबरी करणारा हा एक 'राम' हा शब्द.. ज्याच्या नामस्मरणात भगवान शंकर अखंड रममाण असतात..
इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम्।
अर्थ-
अशा प्रकारे श्री बुधकौशिकऋषी रचित श्रीरामरक्षा स्तोत्र संपूर्ण झाले..
॥श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु॥
श्रीसीतारामचंद्र : सीतेचा पती श्री रामचंद्र
अर्थ-
हे स्तोत्र श्री सीतारामचंद्रांच्या चरणी अर्पण असो..
विवरण-
'श्री सीता रामचंद्र चरणी अर्पण' - असा ही एक अर्थ सांगितला आहे..
सीता ही रामाची शक्ती, शक्तीचं स्मरण प्रथम करावं म्हणून सीताराम असं म्हटलं जातं.. तसंच राधेशाम, पार्वतीवल्लभ ह्या नावांत ही दिसून येतं..
*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं..
एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत..
*त्रिष्टुप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ११ अक्षरं..
एक महत्त्वाचा वैदिक छंद.. वेदमंत्रांमध्ये गायत्री छंदानंतर त्रिष्टुप हा सर्वाधिक वापरला जाणारा आणि लोकप्रिय छंद मानला जातो.. श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक श्लोक या छंदात रचलेले आहेत..
*शार्दूलविक्रीडित छंद : प्रत्येक चरणात एकूण १९ अक्षरं..
एक अतिशय लोकप्रिय आणि लयबद्ध जोरदार, डौलदार चालीचं असं हे अक्षरगणवृत्त..
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर मंत्रमय व तारक आहे..
शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमी पर्यंत हे अनुष्ठान करतात.. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणं चढत्या क्रमानं वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा..
१२१ दिवस रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी पठण केल्यास.. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज १३ वेळा.. किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज १३ वेळा पठण केल्यास रामरक्षा सिद्ध होते.. असं म्हणतात..
रामरक्षा सिद्ध होते म्हणजे नियम, श्रद्धा आणि एकाग्रतेनं केलेल्या नियमित पठणामुळं रामरक्षा स्तोत्राची ऊर्जा जागृत होऊन, पठण करणाऱ्या व्यक्तीच्या अवतीभोवती प्रभू श्रीरामाच्या कृपेचं एक शक्तिशाली संरक्षककवच निर्माण होतं..
।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।
🙏
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment