Tuesday, May 19, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : श्लोक ३१ ते ३८




दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्॥३१॥

दक्षिणे : उजवी बाजू       वामे : डावी बाजू 
पुरतो : पुढं 
*अनुष्ठूप छंद

अर्थ-  
ज्यांच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे, डाव्या बाजूस राजा जनककन्या (सीता) आहे..
पुढं मारुती आहे अशा रघुनंदनाला मी वंदन करतो..

विवरण-     
दक्षिणे लक्ष्मणो यस्य - याबद्दल एक कथा सांगितली जाते.. 
रामसीतेच्या विवाहाच्या आदल्या दिवशीची रात्र.. नेहमीप्रमाणं रामाची चरणसेवा करत असताना लक्ष्मणाच्या डोळ्यांतील अश्रू रामाच्या चरणावर पडले..
त्यावेळी रामांनी त्याला त्याच्या अश्रूंचं कारण विचारलं.. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, सीतेबरोबर आपला विवाह होईल, विवाह झाल्यावर ती आपली चरणसेवा करेल.. आणि मला ती करता येणार नाही म्हणून वाईट वाटत आहे.. आपली सेवा करणं हा माझा धर्म आहे.. 
त्यावर राम म्हणाले, असं झालंच तर मी चरण सेवा वाटून देईन.. उजव्या पायाची चरण सेवा तुझी आणि डाव्या पायाची चरण सेवा सीतेची.. 
म्हणून 'दक्षिणे लक्ष्मणो यस्य'.. 


लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
               कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥३२॥              

लोकाभिरामं : लोक + अभिरामं(आकर्षक, आनंद देणारा)       रणरङ्गधीरं : रण(युद्ध) + रंग(क्षेत्र) + धीरं(धैर्यवान)    
राजीवनेत्रं : कमळाप्रमाणे नेत्र 
*त्रिष्टुप छंद

अर्थ-
लोकांना आनंद देणाऱ्या (प्रेम करणारा), रणांगणांत धैर्य धरणाऱ्या (धीराने तोंड देणाऱ्या), कमळासारखे डोळे असणाऱ्या, रघुवंशाचा अधिपती.. 
कारुण्याची मूर्ति असलेल्या, करुणासागर श्रीरामचंद्राला मी शरण आलो आहे..

विवरण-       
रणरङ्गधीरं याचा खूप सुंदर प्रसंग रामायणांत राम-रावण युद्धप्रसंगी रामचरितमानस मध्ये वर्णिला आहे.. 
रावण रथावर आणि श्रीराम रथाशिवाय असं पाहून विभीषण बेचैन होतो.. त्याच्या मनांत शंका येते कि रथाशिवाय श्रीराम रावणावर विजय कसा प्राप्त करू शकतील? त्यावेळी श्रीराम बिभीषणास उपदेश करतात.. त्या उपदेशाला बिभीषण गीता किंवा धर्मरथ असं म्हंटलं जातं..
श्रीराम म्हणतात.. 
योद्ध्याचा रथ हा खरं तर धर्मरथ असतो.. रथाची दोन चाक ही शौर्य आणि धैर्य, रथाची ध्वजपताका योध्याचं सत्यशील, बल-विवेक-दम-परहित हे रथाचे चार घोडे तर क्षमा,कृपा, समता हे लगाम आणि ईश्वरभक्ती हा सारथी.. वैराग्य ढाल, संतोष तलवार, दान परशू, विज्ञान धनुष्य निर्मळ मन भाता तर शम,यम,नियम हे बाण, गुरुपूजा कवच आणि बुद्धी ही शक्ती असते.. 


मारुती स्तुती..
         
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। 
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥३३॥

मनोजवं  : मन + जवं(वेग,गती)    मारुततुल्यवेगं : मारुत(वारा) + तुल्य(सारखा) + वेगं(वेग)   जितेन्द्रियं : इंद्रियांवर विजय 
वातात्मजं : वात(वारा,पवन) + आत्मज(पुत्र)
*त्रिष्टुप छंद

अर्थ-
मनाच्या वेगानं आवागमन करणाऱ्या, वाऱ्याप्रमाणं वेगवान, इंद्रियांवर विजय मिळविलेल्या, बुद्धिमंतांत श्रेष्ठ..
पवनपुत्र, वनरसेनेचा मुख्य असलेल्या श्रीरामदूताला मी शरण आलो आहे..

 
वाल्मिकी वंदना..             

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्॥३४॥

आरुह्य : चढणं, बसणं, आरूढ होणं 
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
राम राम अशा मधुरात मधुर अक्षरांचं कूजन..
कवितेच्या (काव्यछंदांच्या) फांदीवर वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वंदन करतो..
म्हणजेच, 
कवितेच्या (काव्यछंदांच्या) फांदीवर बसून राम राम अशा मधुरात मधुर अक्षरांचं कूजन करणाऱ्या वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वंदन करतो..

विवरण-
वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ही कथा आपल्याला माहिती आहेच..
वाल्याचा वाल्मिकी झाल्यावर मुनिवर्य वाल्मिकी आश्रमात राहू लागले.. वल्कलं धारण केली.. कंदमूळं खाऊ लागले.. मृगजिनावर तप करू लागले..
एके दिवशी तामसा नदीच्या प्रशांत तीरावर, एका उंच वृक्षावर क्रौंञ्च पक्षाचं एक जोडपं त्यांना क्रीडा करत असल्याचं दिसलं.. इतक्यात एका निषादाचा विषारी बाण पक्षाला  लागला.. पक्षीण विरहानं व्याकूळ झाली.. तिचं आक्रंदन ऐकून मुनिवर्य वाल्मीकींचं हृदय कारुण्यानं भरून आलं..  
त्यांनी छंदोमय शाप वाणी उच्चारली..
मा निषाद प्रतिष्ठा
त्वमगमःशाश्वती समः
यत् क्रौञ्च मिथुनादेकमवधीः 
काम मोहितम् '
हे निषादा! क्रीडा करीत असलेल्या पक्षाच्या जोडीतून तू एका पक्षाचा वध केला आहेस म्हणून तुला हजारो वर्ष या जगात प्रतिष्ठा मिळणार नाही..
नकळत निघालेल्या ह्या शापवाणीचं वाल्मिकींना वाईट वाटलं.. 
आश्रमात आल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाचं ध्यान केलं.. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, हे कवी कोकीळ वाणीच्या वीणा झंकारात श्रीराम चरित्राचं छंदोबद्ध गायन करण्यास प्रारंभ करा.. 'आदिकवी' म्हणून तुमचा गौरव होईल.. म्हणून वाल्मीकिकोकिलम्..



आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्॥३५॥

आपदामपहर्तारम्  : आपदाम् (आपत्ती, संकटं) + अपहर्तारम् (विनाश करणं)              दातारं : देणारा, दाता 
लोकाभिरामं : लोक अभिरामं : लोकांना आकर्षित करणारा, आनंद देणारा 
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
आपत्ती हरणाऱ्या (आपत्तीचा विनाश करणाऱ्या), सर्व संपदा (संपत्ती, संतती, स्थावर, बुद्धी, वैभव इत्यादी) देणाऱ्या 
लोकांना आनंद देणाऱ्या प्रभू श्रीरामांना मी पुनः पुनः नमस्कार करतो..

**असं म्हटलं जात कि, 'आपदंपहारहाराराम दाताराम सर्वसंपदाम' पठण केल्यानं एखादी व्यक्ती आपली सर्व कर्जे मिटवू शकेल..



भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्।
                 तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्॥३६॥                

भर्जनम् : भाजणं     भवबीजानामर्जनं : भवबीजानाम् (कर्मबीजं)+ अर्जनम् (प्राप्त करणं)
तर्जनं : धमकावणं     गर्जनम् : गर्जना करणं 
*अनुष्ठूप छंद
  
अर्थ-
(संसारवृक्षाची) कर्मबीजं जाळून टाकण्यासाठी सुखसमृद्धी मिळवण्यासाठी 
यमदूतांना घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना (जप) करावी 

विवरण- 
बीज भाजल्यानंतर जसा त्यातून अंकूर फुटत नाही तसंच राम नामाचा जप केल्यानं संसाररुपी कर्मबीजं भाजून निघतात आणि जन्म मृत्युचे फेरे नष्ट होतात..
माऊली म्हणतात,                
मग अग्निकुंडीं बीजे घातलीं 
तियें अकुरदशे जेविं मुकलीं 
तेविं न फळतीचि मज अर्पिलीं  
शुभाशुभें   (ज्ञाने - ९-४०२)
म्हणजेच, मग अग्निकुंडात बीजे घातली, ती अंकुराच्या अवस्थेला जशी मुकली, तशी मला अर्पण केलेली कर्मे चांगली किंवा वाईट फळ देत नाहीत..


रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।
              रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर॥३७॥             

राजमणिः : श्रेष्ठ राजा     रमेशं : रमेचा ईश 
रामेणाभिहता : रामेण (रामाकडून) + अभिहता (ठार मारलेला)   निशाचरचमु :  निशाचर (राक्षस) + चमु (सेना) 
चित्तलय: : चित्त + लय (विलीन होणं , नष्ट होणं)    मामुद्धर : माम (माझा) + उद्धार 
*शार्दूलविक्रीडित छंद
      

अर्थ- 
राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो.. रमेशाला म्हणजेच रमेचा (इथं सीता) पती(विष्णू) रामाला भजतो.. 
असुरांच्या समुदायाला नष्ट करणाऱ्या रामाला मी नमस्कार करतो..
रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही.. मी रामाचा दास आहे..
रामामध्ये माझ्या चित्तवृत्तीचा लय होवो.. हे राम माझा उद्धार कर..

विवरण- 
या श्लोकात राम शब्दाच्या सातही विभक्ति वापरलेल्या आहेत..
राम एकपत्नि, एक वचनी, एक बाणी म्हणून ह्या श्लोकांत रामाच्या एक वचनी विभक्तिची सर्वरूपे आली आहेत..
रामो = रामः (प्रथमा)  रामं (द्वितीया)  रामेण (तृतिया)  रामाय (चतुर्थी)  रामात् (पंचमी)  रामस्य (षष्ठी)  रामे (सप्तमी)   भो राम (अष्टमी, संबोधन)

**ह्या श्लोकात र-काराची पुनरावृत्ती असल्यानं असं म्हटलं जातं कि गर्भारपणात हा श्लोक म्हटल्यानं जन्माला येणारं बाळ बोबडं बोलत नाही.. तसंच बोबडं बोलणाऱ्याचे ही उच्चार सुधारतात.. 


रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥३८॥

वरानने : वर (श्रेष्ठ) + आनन (मुख)
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
मनाला रममाण करणाऱ्या (आनंद देणाऱ्या) रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो.. 
रामाचं एक नाव (विष्णूच्या) हजार नावांच्या बरोबरीचे आहे.. (भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात) हे सुमुखी.. 

विवरण-   
माता पार्वतीनं विचारलेल्या 'श्रीविष्णुसहस्रनामावली सारखं रामाचं एखादं स्तोत्र आहे का?' ह्या प्रश्नाच्या उत्तराची सांगता करणारा हा श्लोक.. भगवान विष्णूच्या सहस्रनामाची बरोबरी करणारा हा एक 'राम' हा शब्द.. ज्याच्या नामस्मरणात भगवान शंकर अखंड रममाण असतात..


इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम्।

अर्थ-
अशा प्रकारे श्री बुधकौशिकऋषी रचित श्रीरामरक्षा स्तोत्र संपूर्ण झाले..


॥श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु॥

श्रीसीतारामचंद्र : सीतेचा पती श्री रामचंद्र

अर्थ- 
हे स्तोत्र श्री सीतारामचंद्रांच्या चरणी अर्पण असो..

विवरण-
'श्री सीता रामचंद्र चरणी अर्पण' - असा ही एक अर्थ सांगितला आहे..
सीता ही रामाची शक्ती, शक्तीचं स्मरण प्रथम करावं म्हणून सीताराम असं म्हटलं जातं.. तसंच राधेशाम, पार्वतीवल्लभ ह्या नावांत ही दिसून येतं.. 


*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं..     
एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत.. 
*त्रिष्टुप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ११ अक्षरं..  
एक महत्त्वाचा वैदिक छंद.. वेदमंत्रांमध्ये गायत्री छंदानंतर त्रिष्टुप हा सर्वाधिक वापरला जाणारा आणि लोकप्रिय छंद मानला जातो.. श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक श्लोक या छंदात रचलेले आहेत.. 
*शार्दूलविक्रीडित छंद :  प्रत्येक चरणात एकूण १९ अक्षरं..
एक अतिशय लोकप्रिय आणि लयबद्ध जोरदार, डौलदार चालीचं असं हे अक्षरगणवृत्त..         


🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर मंत्रमय व तारक आहे..
शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमी पर्यंत हे अनुष्ठान करतात.. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणं चढत्या क्रमानं वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा..  
१२१ दिवस रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी पठण केल्यास.. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज १३ वेळा.. किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज १३ वेळा पठण केल्यास रामरक्षा सिद्ध होते.. असं म्हणतात.. 
रामरक्षा सिद्ध होते म्हणजे नियम, श्रद्धा आणि एकाग्रतेनं केलेल्या नियमित पठणामुळं रामरक्षा स्तोत्राची ऊर्जा जागृत होऊन, पठण करणाऱ्या व्यक्तीच्या अवतीभोवती प्रभू श्रीरामाच्या कृपेचं एक शक्तिशाली संरक्षककवच निर्माण होतं..


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************

Friday, May 15, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : श्लोक २२ ते ३०




रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः॥२२॥

लक्ष्मणानुचरो : लक्ष्मण + अनुचारो (पाठोपाठ चालणारा)
काकुत्स्थः : काकुत्स्थ कुळातील  
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-
दशरथपुत्र श्रीराम शूर आहेत, लक्ष्मणा सारखा बलवान त्यांचं अनुचरण करतो..
ककुत्स्थ कुळातला हा पूर्ण पुरुष असलेला कौसल्येचा पुत्र रघुकुलात श्रेष्ठ आहे..

विवरण-        
पुराणकथेनुसार, सत्ययुगाच्या शेवटी देव दानवांचं घोर युद्ध झालं.. देवांच्या सैनेचं प्रतिनिधित्व 'सूर्यवंशी राजा' पुरंजय यांनी वृषभ(बैल) रूपात असलेल्या इंद्राच्या 'कुकुद' (कूबड) वर बसून केलं आणि राक्षसांचा पराभव केला.. म्हणून त्यांना काकुत्स्थ हे नाव पडलं.. आणि त्या वंशांत जन्म घेणाऱ्यास काकुत्स्थ म्हणू लागले.. 



वेदान्तवेद्यो यज्ञेशः  पुराणपुरुषोत्तमः।
               जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः॥२३॥              

वेदान्तवेद्यो : वेदांतानं जाणून घेण्या योग्य       पुराणपुरुषोत्तमः : सनातन पुरुष
जानकीवल्लभः : सीतेचा पती     श्रीमानप्रमेयपराक्रमः : श्रीमान्+अप्रमेय(मोजदाद करता येत नाही असा)+पराक्रमः
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-
वेदान्त विद्यांचे निधी, सर्व यज्ञांचे ईश, पुराणात देखील उल्लेख असणारे पुरुषोत्तम..
जानकीचे पती हे कल्याणकर्ता आणि पराक्रमी आहेत..  

श्लोक क्र २२, २३ मध्ये श्रीरामांची आलेली १५ विशेषणं.. १) दशरथ पुत्र, २) शूर, ३) लक्ष्मण ज्याचा अनुचर आहे, ४) बलवान, ५) काकुत्स्थ कुलोत्पन्न, ६) महापुरुष, ७) पूर्ण ब्रह्म, ८) कौसल्या तनय, ९) रघुकुलातील श्रेष्ठ १०) वेदांत शास्त्रांनी जाणण्यास योग्य, ११) यज्ञाचा स्वामी, १२) पुराण पुरषोत्तम, १३) जानकीचा पति, १४) वैभव संपन्न, १५) अतुल पराक्रमी..



इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः॥२४॥
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-
ह्याचा नित्यजप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनानं करतील 
त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल यात शंका नाही..

विवरण-    
अश्वमेध यज्ञ- पूर्वकाळात आपलं सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याकरिता राजे अश्वमेध यज्ञ करीत असत.. एक वर्ष चालणाऱ्या या यज्ञासाठी एक यज्ञिय अश्व सोडला जात असे.. आणि त्याच्या मागून राजाचं सैन्य जात असे.. ज्या ज्या भूभागातून हा घोडा जायी त्या त्या ठिकाणच्या राजांना ह्या अश्वाचं स्वामीत्व मान्य मान्य करावं लागे.. आणि ते मान्य नसेल तर सैन्याशी युद्ध करावं लागे.. मग तो भूभाग सैन्य युद्ध करून आपलं करून घेत असत..


रामंदूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः॥२५॥       

रामंदूर्वादलश्यामं : रामं+दूर्वादल(दूर्वांचं पान)+श्यामं(सावळा)    पद्माक्षं : कमळासारखे डोळे    पीतवाससम् : पितांबर 
नामभिर्दिव्यैर् : नामभिः(नावांनी)+दिव्यैः( दिव्य, अलौकिक)
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-  
दूर्वादलासारख्या सावळ्या वर्णाच्या, कमळासारखे डोळे असलेल्या, पितांबर परिधान केलेल्या श्रीरामांचं..
दिव्य नाव घेऊन जे स्तुति करतात ते पुरुष संसाराच्या फेऱ्यातून मुक्त होतात..


रामं लक्ष्मणपूर्वजम् रघुवरं सीतापतिं सुन्दरम्।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्l
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम्।
              वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकम् राघवं रावणारिम्॥२६॥            

*पहिले दोन चरण शार्दूलविक्रीडित छंद 
*दुसरे दोन चरण स्रग्धरा छंद 

अर्थ-
श्रीराम लक्ष्मणाग्रज, रघुकुळातले श्रेष्ठ, सीतेचे पती व सुंदर आहेत.. 
ककुत्स्थ कुळातले, करूणेचे सागर, गुणांचा खजिना, ब्राह्मणांना प्रिय असलेले व धार्मिक आहेत.. 
राजांमध्ये श्रेष्ठ, सत्याशी कायम जोडलेले, दशरथपुत्र, सावळे व शांततेची मूर्ती आहेत.. 
लोकांना प्रिय असणाऱ्या, रघुकुळात तिलका प्रमाणे शोभणाऱ्या, रावणाचा शत्रू असणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करतो..

विवरण- 
लक्ष्मणपूर्वजम् : लक्ष्मणाग्रज असा अर्थ..       
पूर्वज म्हणजे पूर्वी जन्मले असा रुढार्थ आहे.. मोठ्या भावाला सहसा कोणी पूर्वज म्हणत नाही.. पण इथं लक्ष्मणा आधी म्हणजेच लक्ष्मणाग्रज हा अर्थ अभिप्रेत आहे..

रावणारिम : रावणाचा शत्रू 
विश्रवामुनी आणि कैकसी यांचा पुत्र दशानन.. पुराणानुसार, ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यावर अत्यंत अहंकारी झालेला दशानन एकदा त्यानं आपलं पुष्पक विमान कैलास पर्वताजवळ थांबवलं आणि शिवाला उचलण्याचा प्रयत्न केला.. तेव्हा भगवान शिवांनी त्याला कैलासावर येण्यास सक्त मनाई केल्यावर, अहंकारी दशाननानं  कैलास पर्वतच मुळापासून उखडून लंकेला नेण्याचा प्रयत्न केला.. त्याची शक्ती पाहून भगवान शिवांनी आपल्या पायाच्या अंगठ्यानं कैलास पर्वताला दाबलं.. या वजनाखाली त्याचे हात चिरडले गेल्यानं हातातील प्रचंड वेदनानं तो असह्य होऊन भयानक गर्जना करत ओरडू लागला.. त्याच्या या आक्रोशानं त्रैलोक्य रावित (नादित) झालेलं पाहून भगवान शिवांनी त्याला 'रावण' हे नाव दिलं.. 

ह्या श्लोकात आलेली श्रीरामाची १८ विशेषणं.. १) लक्ष्मणाचा जेष्ठ बंधू, २) रघुकुलातील श्रेष्ठ, ३) सीतेचा पति, ४) सुंदर ५) काकुत्स्थ कुलोत्पन्न, ६) दयेचा सागर, ७) सद्गुणांचा निधी,  ८) ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असा, ९) धार्मिक, १०) राजे लोकांचा इंद्र, ११) सत्यवचनी, १२) दशरथपुत्र, १३) सावळ्या वर्णाचा, १४) शांत स्वरुपाचा, १५) लोकांना आनंद देणारा, १६) रघुकुलाला तिलकाप्रमाणं शोभणारा, १७) रघुकुलात श्रेष्ठ आणि १८) रावणाचा शत्रू..



रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
                  रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥२७॥               

रामभद्र : भद्र(कल्याणकारी,शांत, सज्जन)      वेधसे : निर्माता, प्रजापती
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-
रामाला, रामभद्राला, रामचंद्राला, प्रजापतीला, रघुनाथाला, नाथाला, सीतेच्या पतीला माझा नमस्कार असो..



श्रीराम राम रघुनन्दन राम राम।
श्रीराम राम भरताग्रज राम राम।
श्रीराम राम रणकर्कश राम राम।
           श्रीराम राम शरणं भव राम राम॥२८॥          

*वसंततिलका छंद 

अर्थ-
श्रीराम हे रघुकुळातले श्रेष्ठ आहेत..
श्रीराम भरताचे थोरले बंधु आहेत..
श्रीराम रणांगणावर शूरवीर आहेत.. 
अशा श्रीरामांना मी शरण आलो आहे..



श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि।
           श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये॥२९॥           

*वसंततिलका छंद 

अर्थ- 
मी श्रीरामांच्या चरणांचं मनानं स्मरण करतो.. 
मी श्रीरामांच्या चरणांचं वाणीनं स्तवन करतो.. 
मी श्रीरामांच्या चरणांना शिरसाष्टांग नमन करतो..
मी श्रीरामांच्या चरणांना शरण जातो..

विवरण-        
रामचंद्र नावासंबंधित एक कथा अशी सांगितली जाते..
श्रीरामांच्या जन्मानं सर्व सृष्टी प्रसन्न झाली होती, सर्वजण आनंदीत झाले होते.. पण श्रीराम जन्म सोहळा पाहायला न मिळाल्यानं चंद्र मात्र दुःखी होता..
श्रीरामांनी त्याला वाचन दिलं कि, चिंता करू नकोस रामावतारात असं झालं असलं तरी कृष्णावतारात असं होणार नाही.. मी रात्री बारा वाजता अवतरीत होईन.. बाकी सगळी सृष्टी झोपलेली असेल आणि तू एकटाच जागा असशील.. आणि तुलाच माझं प्रथम दर्शन घेता येईल.. 
चंद्र प्रसन्न झाला तरीही म्हणाला, "प्रभो पुढच्या अवतारा पर्यंत याची प्रतिक्षा करावी लागेल?" यावर श्रीराम म्हणाले, "ठीक आहे मी माझ्या नावासह तुझं नाव जोडेन.. लोक मला रामचंद्र म्हणतील.. मी सूर्यवंशात जन्मलो असलो तरी माझ्या नावापुढं तुझं नाव लावेन" 



माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः।
               सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने॥३०॥               

*त्रिष्टुप छंद

अर्थ- 
माझी माता श्रीराम आहेत माझा पिता श्रीराम आहेत.. माझा स्वामी श्रीराम आहेत माझा मित्र ही श्रीराम आहेत.. 
परम दयाळू प्रभू श्रीराम माझे सर्वस्व आहेत.. मी त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही जाणत नाही..

*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं..     
एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत.. 
*शार्दूलविक्रीडित छंद :  प्रत्येक चरणात एकूण १९ अक्षरं..
एक अतिशय लोकप्रिय आणि लयबद्ध जोरदार, डौलदार चालीचं असं हे अक्षरगणवृत्त.. 
*स्रग्धरा छंद : प्रत्येक चरणांत २१ अक्षरं.. ओळीची लांबी जास्त त्यामुळं लय अतिशय संथ आणि भारदस्त..
*वसंततिलका छंद : प्रत्येक चरणात १४ अक्षरं..
मुख्यतः वीररस, शृंगाररस आणि गंभीर भावना व्यक्त करण्यासाठी अत्यंत लोकप्रिय असं हे अक्षरगणवृत्त..  
*त्रिष्टुप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ११ अक्षरं..  
एक महत्त्वाचा वैदिक छंद.. वेदमंत्रांमध्ये गायत्री छंदानंतर त्रिष्टुप हा सर्वाधिक वापरला जाणारा आणि लोकप्रिय छंद मानला जातो.. श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक श्लोक या छंदात रचलेले आहेत.. 


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************

Saturday, May 2, 2026

पुनःश्च २ मे..


 Happy Birthday to ME!!

आजचा दिवस खूप शांत सुंदर गेला.. 
तळ्याकाठी बसून केलेल्या साधनेनं दिवसाची सुरुवात झाली.. आदल्यादिवशीच झालेल्या बुद्ध पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब अजुनी तळ्यांत होतंच.. तांबडं फुटताना पसरलेल्या लाल अभेत त्याचं हळूहळू नाहीस होणं हा एक अनुभव होता.. 
मंजू माझी लाडकी मैत्रीण, योगायोगानं फ्लोरीडाला आलेली असल्यानं तिच्या बरोबर कॉफी शॉपला जाऊन पोटभर गप्पा मारल्या.. संध्याकाळी ऋचाबरोबर बर्थडे ट्रेडीशन असलेलं चॉकलेट आईस्क्रिम खाल्लं.. (वरचा फोटो तिथलाच.. मला कूकी हा प्रकार अजिबात आवडत नाही म्हणून मुद्दाम काढलेला..)

ह्यावर्षी प्रकर्षानं जाणवलं ते वाढदिवसाच्या शुभेच्छांचं कमी होणं.. जसं जशी सोशल मीडिया, व्हाट्स ऍप गृप पासून लांब होत गेले तसा हा वर्षाव कमी होत गेला.. ह्यावर्षी तर अगदी जवळची माणसं सुद्धा वाढदिवस विसरली.. अर्थात ह्याचं वाईट वाटण्यापेक्षा माणसाच्या स्वभावाची गंमत वाटली.. पूर्वी मला ह्या गोष्टींचा त्रास व्हायचा पण आता हसून सोडून देता येतंय.. दुनियादारी शिकायला अंमळ उशिरच झाला.. 

ह्यावर्षीनं मला सोडून द्यायला शिकवलं..
कुरुंदवाडचं घर.. माझा हृदयाच्या अगदी जवळचं.. ते घर पाडून आता तिथं प्रशस्त सुंदर अपार्टमेंट झालंय.. 
२०२५ची दिवाळी कुरुंदवाडला नवीन वास्तूत साजरी करायची टूम निघाली.. आणि त्यानुसार सगळं नियोजन करणं सुरु झालं.. त्या अनुषंगानं मी माझी चारधाम यात्रा ठरवली.. 
पण काही कारणानं दिवाळी मात्र तिथं साजरी करता आली नाही.. आई-बाबा ह्या घरात राहायला येतील तेव्हा मी नसेन याचं खूप वाईट वाटलं.. 
इकडं अमेरिकेला येण्यापूर्वी मी कुरुंदवाडला जातेच जाते.. घर पाहायला, त्या वास्तूला नमस्कार करायला, तो उबदारपणा मनांत साठवून ठेवायला.. आणि गावाला कृतज्ञता व्यक्त करायला.. 
तर, ह्यावेळी माझ्या कात टाकलेल्या घराच्या सुंदर इमारतीत बांधकामाच्या, सुतारकामाच्या, इलेकट्रिशिअनच्या आवाजाबरोबरच लहान मुलांचा किलकिलाट, दंगा, हसणं ऐकू आलं.. आणि माझं मन तृप्त झालं.. कारण आता माझ्या घराला श्वास मिळाले होते.. माझं घर जिवंत झालं होतं.. आई बाबा घरी राहायला येतील तेव्हा आता मी नसले तरी मला चालणार होतं.. कारण मला जे हवं होतं ते मिळालं होतं.. 
आता घराबद्दलची भावना, ते भावनिक अडकलेपण संपल्याचं मला जाणवतंय.. घर परत नांदायला लागलेलं पाहून त्याच क्षणी बहुतेक मी मुक्त झाले होते.. पण ती नाळ, ती आपुलकी, तो आपलेपणा मात्र अजुनी जाणवतो.. आणि तो कायम राहील..  


२ मे २०२५.. गेल्या वर्षीचा वाढदिवस.. 
उगवतीच्या सूर्याच्या साक्षीनं एक नवीन उमेद आयुष्यात येताना दिसली.. 
तुटत चालेल्या नात्याच्या फांदीतून आशेचा दिसलेला तो एक नाजूकसा हिरवा कोंब!.. 
दिवसभर त्या कोवळ्या हिरव्यागार नाजूक कोंबाकडं पाहून आनंदानं नाचत होते.. प्रेमानं विश्वासानं जोपासायचं स्वप्नं उरी बाळगून बागडत होते.. 
..पण एक दिवस ही फांदी तुटलीच.. अपेक्षांचं ओझं इतकं झालं की तुटताना सोबत तो कोंब सोबत घेऊनच तुटली.. विश्वासाचं प्रेमाचं केलेलं कलम फार काळ तग धरू शकलं नाही.. 
ठसठसणारी, भळभळणारी जखम.. ऊर्जेचं गमावणं.. अपूर्णतेची जाणीव.. 
खूप केविलवाणं, असहाय्य वाटलं त्यावेळी.. 
मीच का? प्रश्नापासून सकारात्मकता ते स्वीकारात्मकता पर्यंतचा हा प्रवास.. खूप शिकवणारा, धैर्याची परीक्षा घेणारा, प्रत्येकवेळी 'स्व' ची जाणीव करून देणारा.. 

संपलं असलं सगळं तुझ्यातलं माझ्यातलं 
उरलं तरीही काही तुझ्यातलं माझ्यातलं
कळ काळजात अजुनी त्या तुटण्याची 
त्या तुटण्यातलं मौन तुझ्यातलं माझ्यातलं
विखुरता सप्तरंग कळलं पहाट झाली 
होत ते स्वप्न सुगंधी तुझ्यातलं माझ्यातलं
नको वळून पाहणं नको साद घालणं   
हे ओसरणं जरुरी तुझ्यातलं माझ्यातलं

ह्या प्रवासात Your Soul's Plan आणि Your Soul's Gift पुस्तकांची ओळख झाली.. आणि माझा आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टीकोणच बदलला.. मी माझं आयुष्य केस-स्टडी म्हणून अभ्यासलं.. आणि मला माझी नव्यानंच ओळख होत गेली.. आधी स्वतःला आणि मग दुसऱ्याला, त्या वेळच्या परिस्थितीला माफ करायचा प्रयत्न करू लागले.. हे खूप सक्षम करणारं आहे.. 
सद्गुरूंची Inner Engineering, Death, Karma, Adiyogi ही पुस्तकं ही अभ्यासली.. ही सगळी अशी पुस्तकं आहेत की एकदा वाचून त्यातील विषय, आशय कळत नाही.. प्रत्येकवेळी नवीन काही तरी कळतं.. आयुष्य जाणण्याचं स्वतःचं मॅन्युअल, स्वतःची खास मार्गदर्शिका स्वतःच तयार करता.. आणि गरज पडेल तेव्हा त्यात बदल करण्याची मुभा ही ठेवता.. 

गेलं वर्ष जरी भावनिक दृष्टया आव्हानात्मक असलं तरी तितकंच समाधान देणारं होतं.. सेंट हेलन चढाई आणि चारधाम यात्रा ही ठळक वैशिष्ट!.. 
आता ह्यावर्षी काय करायचं हे अजुनी ठरलं नाहीय पण ऋषिकेश योगा रिट्रीट करावी असं वाटतंय.. हे वर्ष ऋचासाठी महत्वाचं असल्यानं तिला लागेल तसा सपोर्ट करत माझे प्लॅन्स ठरवेन..
अधिक महिन्यात एकनाथी भागवत वाचायचा मानस आहे.. विष्णुसहस्रनाम शिकायला सुरु केलं आहे.. 
स्वतःला शोधणं तर अखंड सुरु राहीलच.. 


-मी मधुरा.. 

************************************************