Thursday, March 26, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : कवच : श्लोक ४ ते श्लोक ९



पहिल्या तीन श्लोकांपर्यंत आपण नीलवर्णी, कमलनयन, सालंकृत, जटामुकुटधारी, माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत असणाऱ्या, हातात धनुष्यबाण, तलवार असणाऱ्या श्रीरामप्रभुंच्या स्वरूपाचं ध्यान करून त्यांना हृदयात विराजमान केलं..   

आता पुढं..
चौथ्या श्लोकाचं दुसरं चरण 'शिरो मे राघवः' पासून रामरक्षा कवचाची सुरुवात होते.. 
कवच- हा मंत्रविद्येतील एक प्रकार आहे.. यात देवतेला आपल्या शरीराचं रक्षण करण्याची प्रार्थना केलेली असते.. रोगराई सारख्या स्थूल कवचाहून अधिक शक्तीशाली कवच ही असतात जी भूतबाधा, करणी यासारख्या सूक्ष्म वाईट शक्तीपासून रक्षण करतात.. 

चौथ्या श्लोकापासून ते नवव्या श्लोकापर्यंत श्रीरामांकडं शरीराच्या प्रत्येक अवयवाची रक्षा करण्याची प्रार्थना केली आहे.. 


रामरक्षाम् पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः॥४॥

प्राज्ञः : प्रज्ञावान, सूज्ञ  पापघ्नीं : पापाचा नाश करणारी  सर्वकामदाम् : सर्व इच्छा पूर्ण करणारी 
राघवः : रघू कुलाचा वंशज  दशरथात्मजः : दशरथ + आत्मजः (दशरथाचा मुलगा)  पातु : रक्षण करणं 
*छंद : अनुष्ठूप 
अर्थ- 
रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सूज्ञ लोकांनी तिचं पठण करावं..
रघूकुल वंशज राघव राम माझ्या मस्तकाचं रक्षण करो.. दशरथ पुत्र माझ्या कपाळाच रक्षण करो..

विवरण-
रघुकुल ज्ञान, पराक्रम, विवेक यांचं प्रतीक मानलं गेलं आहे.. मस्तक विचारांचं, बुद्धीचं केंद्रस्थान आहे.. अनिष्ट विचारांपासून मुक्ती, सकारात्मकता आणि बुद्धीच्या स्थैर्यासाठी हे राघव तू माझ्या मस्तकाचं रक्षण कर.. 
'दशरथ' ज्याची दहा इंद्रियांवर पकड आहे अश्या दशरथाचा पितृभक्त पुत्र राम.. विवेकबुद्धीनं निर्णय घेण्यासाठी, ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी, विचारांच्या सकारात्मक ऊर्जेसाठी तू माझ्या कपाळाचं रक्षण कर.. 


कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती।
          घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः॥५॥           

कौसल्येयो : कौसल्या पुत्र  दृशौ : दृष्टी  श्रुती : ऐकलेलं, वेद, प्राचीन शास्त्रांद्वारे प्रकट झालेलं ज्ञान (श्रवणेंद्रिय)
घ्राणं : नासिका  मखत्राता– मख (यज्ञ) + त्राता (रक्षण करणारा)  सौमित्रिवत्सल : सौमित्रेचा पुत्र (लक्ष्मण) 
पातु : रक्षण करणं 
*छंद : अनुष्ठूप 

अर्थ- 
कौसल्येचा पुत्र माझ्या दृष्टीचं रक्षण करो.. विश्वामित्रांना प्रिय (असलेले श्रीराम) माझ्या कानांचं रक्षण करोत.. 
यज्ञाचं रक्षण करणारे (श्रीराम) माझ्या नाकाचं रक्षण करोत..  सौमित्रेचं ज्यांच्यावर प्रेम आहे (श्रीराम) माझ्या मुखाचं रक्षण करो..

विवेचन-
कौसल्यामाते सारखी भक्ती, वात्सल्य, ममता माझ्या डोळ्यांत असुदे म्हणून हे कौशल्यपुत्र तू माझ्या डोळ्यांचं रक्षण कर.. 
विश्वामित्रांनी जसं योग्य आणि उचित ज्ञानाचे संस्कार श्रुतीद्वारे केले तसेच उचित संस्कार होण्यासाठी हे विश्वामित्रांना प्रिय असणाऱ्या तू माझ्या कानांचं रक्षण कर.. उचित आणि योग्य तेच माझ्या कानांद्वारे ग्रहण होऊदे.. 
श्वसनातून, नाकाद्वारे होणाऱ्या प्राणायामातून, शरीराचा अंतर्गत सुरु असणाऱ्या यज्ञाचं, त्या प्राणशक्तीचं तू रक्षण कर..
सौमित्रेनं आपल्या पुत्राला लक्ष्मणाला रामाच्या सेवेसाठी अर्पण केलं.. लक्ष्मणानं रामाची सावली बनून, मुखानं रामनाम घेत सेवा केली.. जसं लक्ष्मणानं रामाचं रक्षण केलं तसंच माझ्या मुखाचं (वाणीचं) रक्षण कर..


जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः।
          स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः॥६॥           

विद्यानिधिः : विद्येचा संचय  भरतवन्दितः : भरताला वंदनीय  
स्कन्धौ : खांदा  दिव्यायुधः : दिव्यास्त्र  भग्नेशकार्मुकः :भग्न + ईश (शिव) + कार्मुक: (धनुष्य)
पातु : रक्षण करणं
*छंद : अनुष्ठूप 
 
अर्थ-
सर्व विद्यांचा संचय असणारा (राम) माझ्या जिभेचं रक्षण करो.. भरताला वंदनीय (राम) माझ्या कंठाचं रक्षण करो.. 
दिव्यास्त्र असणारा (राम) माझ्या (दोन्ही) खांद्यांचं रक्षण करो.. शिवधनुष्याचा भंग करणारा (राम) माझ्या (दोन्ही) बाहूंचे रक्षण करो.. 

विवेचन-
जिभेच्या टोकावर विद्देचा वास असतो म्हणून सर्व विद्यांचा अधिपती असणारा तू जिभेचं रक्षण कर.. ज्याप्रमाणे भरताच्या कंठातून रामाची वंदना निघाली त्याचप्रमाणे माझ्या कंठातूनही सदैव सत्य आणि रामनाम यावे म्हणून भरताला वंदनीय असणारा तू माझ्या कंठाचं रक्षण कर..  
जबाबदाऱ्या, संकटे पेलण्याचं सामर्थ्य मिळवण्यासाठी दिव्यास्त्रधारी मजबूत खांदे असणारा तू माझ्या खांद्याचं रक्षण कर.. सीता स्वयंवराच्या वेळेस शिवधनुष्याला प्रत्यंचा चढवत असताना धनुरभंग झाला.. धनुष्याचा भंग करण्यासाठी ताकदवान भुजा असणारा तू माझ्या भुजांचं रक्षण कर.. 


करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्।
           मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः॥७॥            

जामदग्न्यजित् : जमदग्निपुत्र (परशुराम)
खरध्वंसी : खर (राक्षस) + ध्वंसी (नाश करणारा)   जाम्बवदाश्रयः : जाम्बवंताला आश्रय देणारे
पातु : रक्षण करणं
*छंद : अनुष्ठूप 

अर्थ- 
सीतेचे पती माझ्या हातांचं रक्षण करोत.. परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचं रक्षण करोत..
खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्यभागाचं रक्षण करोत.. जांबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभीचं रक्षण करोत..

विवेचन-
शक्तिरूपिणी सीतेचा हात हातात असणाऱ्या तू माझ्या हातांचं रक्षण कर..

सीता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्य भंग झाल्यावर, शिवधनुष्य कोणी भंग केलं ह्याचा जाब विचारण्यासाठी जमदग्नीपुत्र परशुराम विवाहमंडपात येतात.. त्यावेळी रामाची परीक्षा घेण्यासाठी ते त्यांच्याकडील 'वैष्णव धनुष्या'स प्रत्यंचा लावण्यास सांगतात.. राम प्रत्यंचा आणि बाण लावून तो बाण कुठं मारू म्हणून विचारणा करतात.. त्यावर परशुराम म्हणतात रामा, मी २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आहे.. त्यावेळेस काही पाप झालं असेल तर त्या पापाचा नाश करावा.. श्रीरामानं तसं केलं आणि परशुरामांचं हृदय जिंकलं.. म्हणून पराक्रमानं परशुरामांचं हृदय जिंकणारा तू माझ्या हृदयाचं रक्षण कर..

लक्ष्मणानं शूर्पणखाचं नाक, कान कापल्यावर खर व दूषण हे राक्षस त्यांच्याशी युद्ध करायला येतात.. भगवान शंकराच्या वरामुळं त्यांचा मृत्यू कोणाच्याही हातून न होता आपापसात युद्ध करून होणार असतो.. रामाच्या मोहनास्त्रामुळं त्यांना एक दुसऱ्यात राम दिसल्यानं ते आपापसांत युद्ध करतात आणि त्यांचा मृत्यू होतो.. 'खर' सारख्या अशुभ वाईट प्रवृत्तींचा नाश करतात.. शरीराच्या मध्यभागांत, पोटाच्या भागात सर्व प्रकारच्या इंद्रियांची प्रवृत्ती व विकार राहतात म्हणून खर राक्षसाचा नाश करणारा तू माझ्या मध्यभागाचं रक्षण कर..

रावण वधाच्यावेळी राम अवतारात भगवान विष्णूंना मदत करण्यासाठी सर्व देव देवता आपआपल्या अंश रूपानं पृथ्वीवर अवतरीत झाले.. ब्रम्हदेवापासून जांबुवंत, इंद्रापासून वाली, सूर्यापासून सुग्रीव, बृहस्पती पासून तार, कुबेरापासून गंधमादन, विश्वकर्मापासून अंगद, अश्विनीकुमारांपासून नल-नील, वरुणापासून सुषेन, पर्जन्यापासून शरभ, वायूपासून हनुमंत इत्यादी.. 
ब्रह्मदेव ज्यांची उत्पत्ती विष्णूच्या नाभीतून झाली आहे त्यांचा अंश जांबुवंत.. म्हणून जांबुवंताला आश्रय देणारा तू माझ्या नाभीचं रक्षण कर.. 


सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः।
            ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥              

सक्थिनी : (सक्थि) जांघेची हाडं
उरू : मांड्या (उर्वस्थी : कंबरे पासून गुडघ्या पर्यंत असणारी हाडं)  रक्षःकुलविनाशकृत् : राक्षसकुलाचा विनाश करणारा.. 
पातु : रक्षण करणं
*छंद : अनुष्ठूप 

अर्थ- 
सुग्रीवाचा स्वामी माझ्या कंबरेचं रक्षण करोत.. हनुमंताचा प्रभू माझ्या दोन्ही जांघांचं रक्षण करोत..
राक्षसकुलाचा विनाश करणारा रघुकुलश्रेष्ठ माझ्या दोन्ही मांड्यांचं रक्षण करोत..

विवरण-  
वालीच्या त्रासानं पीडित सुग्रीवाला तुझ्या (श्रीराम) आश्रयानं, तुझ्याशी कटिबद्ध झाल्यानं राज्य, स्वाभिमान, शक्ती परत मिळाली तसंच तू माझ्या कर्माची, शक्तीची आणि मनाच्या स्थिरतेची (कंबरेची) रक्षा कर.. कंबर हे शरीराचं केंद्रस्थान असून, दृढता आणि कर्माचं प्रतीक आहे.. कंबर हा आधार देणारा मध्यभाग आहे.. आयुष्यात कठीण प्रसंगात, कंबर कसून काम करण्याची शक्ती प्रभू रामरायानं द्यावी हा उद्द्येश.. 

सक्थिनी किंवा जांघेचा संबंध आसनस्थ राहण्याशी, स्थिर राहण्याशी जोडला जातो.. कामविकारांशी संबंधित मानला जातो.. या भागाचं रक्षण करण्याची प्रार्थना म्हणजे विषयांचा त्याग आणि नैतिकतेचं बळ मिळवणं.. ज्याचा विकारांवर ताबा आहे अश्या हनुमानाचे प्रभू तुम्ही माझ्या जांघांचं, मूलाधार चक्राचं रक्षण करून विषयासक्तीचा त्याग, स्थिरता, ताकद आणि नैतिक नैतिकतेचं बळ द्या..  


जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः।
       पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः॥९॥        

जानुनी : जानु (गुडघा अनेकवचन)  सेतुकृत् : सेतुं करोति इति। (सेतू बांधणारा)  
जङ्घे : पोटऱ्या  दशमुखान्तकः दशमुख-अन्तकः (दशननाचा नाश करणारा)
रामोऽखिलं : रामस् अखिलं वपुः  : संपूर्ण शरीर
पातु : रक्षण करणं
*छंद : अनुष्ठूप 

अर्थ-
समुद्रावर सेतू बांधणारा माझ्या दोन्ही गुडघ्यांचं रक्षण करोत.. दशमुखी रावणाचा नाश करणारा माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करोत.. 
बिभीषणाला श्री (राजश्री) देणारा माझ्या पावलांचं रक्षण करोत.. सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण करोत..

विवरण-
अश्याप्रकारे मस्तक, नेत्र, नासिका, हृदय, हात, कंबर, मांड्या, गुडघे, पोटऱ्या इत्यादी सर्व अवयवांचं रक्षण करण्याच्या प्रार्थनेचा शेवट माझ्या 'सर्व शरीरा'चं संरक्षण कर म्हणून होतो.. श्रीराम हे केवळ आदर्श पुरुष नसून ते 'आनंदकंद' (आनंदाचा स्रोत) आहेत, जे मनाला शांतता आणि शरीराला आध्यात्मिक ऊर्जेद्वारे अभय देतात म्हणून सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या शरीराचं रक्षण करो असं म्हटलं आहे..  
शरीराच्या प्रत्येक अंगाचं रक्षण करण्यासाठी आणि जीवनात आनंद व शांती टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण शरणागतीची भावना व्यक्त केली आहे.. 

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संरक्षणासाठीचं हे कवच इथं समाप्त होतं.. दहाव्या श्लोकापासून सुरु होणारी फलश्रुति पुढच्या भागात पाहू..

*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं..     
एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत.. 


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************

Thursday, March 5, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : ध्यान : श्लोक १ ते ३


श्रीरामरक्षा स्तोत्र.. रक्षणकर्त्या रामाचं स्तोत्र.. ३८ श्लोकांचं हे संरक्षण कवच.. 
ह्या ३८ श्लोकांपकी काही श्लोक कवचाचे तर काही प्रभूंचं वर्णन, रामनामाचा महिमा, त्यांची अनेक विशेषणं, फलश्रुती यांचे तर काही वाल्मिकी, माता सीता, भक्तश्रेष्ठ हनुमंताचं स्मरण, वंदना करणारे.. 

'स्तोत्र' म्हणजे देवतेचं स्तवन, गुणगान किंवा स्तुती करणारी काव्यरचना.. 'स्तूयते अनेन इति स्तोत्रम्' म्हणजेच ज्याद्वारे स्तुती केली जाते ते स्तोत्र अशी याची व्याख्या.. स्तोत्रं ही श्लोक स्वरूपात संस्कृत भाषेत असतात..
स्तोत्र ह्या शब्दाची उत्पत्ती 'स्तु' म्हणजे स्तुती करणं ह्या धातूला 'त्र' म्हणजे रक्षण करणं हा प्रत्येय लागून झाली आहे.. 
यांच्या नियमित पठणानं भक्ताच्या भोवती संरक्षक कवच निर्माण होते आणि मनःशांती मिळते..

रामरक्षेच्या सुरुवातीला बुधकौशिक ऋषींनी 'श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य' म्हणजेच हे स्तोत्र 'मंत्र' पण आहेत असं सांगितलं आहे.. 
'मननात त्रायते इती मंत्र' म्हणजेच ज्याचं मनन केल्यानं आपलं रक्षण होतं..
मंत्रामध्ये एक नाद ध्वनी असतो.. ठराविक लयित, सुरात एखादा मंत्र जपला तर त्या ध्वनिलहरींतून एक विशिष्ट शक्ती निर्माण होते.. मंत्रजप म्हणजे मंत्रांचा तदर्थ भावपूर्ण जप, अर्थ समजून भावासह पुनःपुन्हा केलेला उच्चार..

🌸🌸🌸

श्रीगणेशायनमः।

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य l
बुधकौशिकऋषिः।
श्रीसीतारामचन्द्रो देवता।
अनुष्टुप् छ्न्दः। सीता शक्तिः।
श्रीमद् हनुमान् कीलकम् ।
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः। 

अर्थ- 
श्रीगणेशाला नमन.. 
या रामरक्षास्तोत्ररूपी मंत्राचा (रचेता) ऋषि बुधकौशिक असून रचना अनुष्टुप छंदात केली आहे.. माता सीता आणि श्रीरामचंद्र ह्या मंत्राच्या देवता आहेत.. मंत्राची शक्ती सीता आहे तर हनुमान सुरक्षा कवच.. श्रीरामचंद्राचा (प्रेमानं भक्तिभावनेनं) जप करता यावा म्हणून हा स्तोत्ररूपी मंत्र निर्माण केला आहे..


विवरण-
उपासना ही सिद्ध मंत्रानं करायची असते.. 
प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला जो मंत्र किंवा स्तोत्र असेल त्याचा स्पष्ट उल्लेख असतो.. नंतर त्या मंत्राची सिद्धी करणारा ऋषी, मंत्रानं सिद्ध होणाऱ्या देवता, मंत्राचं सामर्थ्य असणारी शक्ती, मंत्राचं बीज, मंत्रामुळं होणारी फलप्राप्ती, मंत्राचा आधारस्तंभ आणि त्या मंत्राचा विनियोग यांचा उल्लेख असतो.. 

कीलक : खिळा, खुंटी किंवा जोडणारा घटक..  
आध्यात्मिक संदर्भात याचा अर्थ मंत्राला 'किलित' (निश्चित करणे) म्हणजेच स्तोत्राची शक्ती जागृत करून ती सुरक्षित ठेवणे असा होतो.. 

रामरक्षेतील बहुतौशी श्लोकांची रचना अनुष्टुप छंदात केलीली असली तरी काही श्लोकांची रचना त्रिष्ठुप, स्रग्धरा, शार्दूलविक्रीडित, वसंततिलका छंदात ही केलेली आहे..


|| अथ ध्यानम् ||

ध्यायेदाजानुबाहुम् धृतशरधनुषम्। बद्धपद्मासनस्थम्।
पीतं वासो वसानम् नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्।
वामाङ्कारूढसीता-मुखकमल-मिलल्लोचनं नीरदाभम्।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम्॥

|| इति ध्यानम् ||

ध्यायेदाजानुबाहुं : ध्यायेत् + अजानु (गुढगा) + बाहुं (भुजा)  
नीरदाभम् : नीरद (मेघ) + आभम् (समान, कांती)  
दधतमुरुजटामण्डनं : दधतम् (धारण करणारा) + उरू (विस्तृत) + जटामंडनं(जटांनी सुशोभित) 
*स्रग्धरा छंद

अर्थ– 

आता ध्यान करूया..

आजानुबाहु म्हणजेच गुडघ्यापर्यंत लांब हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्धपद्मासनात बसलेल्या

पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणं सुंदर प्रसन्न डोळे असणाऱ्या

डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडं स्थिर दृष्टीनं पहात असणाऱ्या, पावसाळी मेघांप्रमाणं (श्यामवर्णाची) कांती असणाऱ्या

नानाविविध अलंकारांनी सुशोभित आणि मोठं जटामंडल धारण केलेल्या श्री प्रभू श्रीरामचंद्राचं

ध्यान करूया..  


विवरण-

स्तोत्र सिद्ध करण्यासाठी पठणापूर्वी ज्या देवतेचं स्तवन करायचं आहे त्याची प्रतिमा डोळ्यांसमोर आणून, त्या देवतेचं ध्यान करायचं.. म्हणून सुरुवात 'अथ ध्यानम्' आता ध्यानाला सुरुवात करूया अशी होते.. इथं ध्यान ही अवस्था आहे क्रिया नव्हे.. खोल आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण, आत्मचिंतन, आत्मलीनता अशी वृत्ती अपेक्षित असते..

भक्तांच्या रक्षणाकरिता हातात धनुष्यबाण असलेली, अलंकार आणि जटामंडलांनी सुशोभित बद्धपद्मासनात एकाग्र चित्तानं बसलेली, डाव्या मांडीवर शक्तीरूपिणी सीता असलेली अश्या प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपाचं 'इति ध्यानम्' आपण ध्यान करूया.. 



चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्।

एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्॥१॥ 


शतकोटिप्रविस्तरम्: शंभर कोटी श्लोकां इतकं विस्तृत  

पुंसां: पुरुषांची

*अनुष्ठूप छंद


अर्थ– 

श्रीरघुनाथाचं चरित्र शंभर कोटी श्लोकांत मावेल इतकं विस्तृत आहे.. त्यातील केवळ एक अक्षरसुद्धा पुरुष जातीची मोठी पापं नष्ट करण्यास समर्थ आहे..



ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्।

                    जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम्॥२॥                   


ध्यात्वा: ध्यान करून   नीलोत्पलश्यामं: नील + उत्पल (कमळ )+ श्यामं    राजीव: कमळ

जानकीलक्ष्मणोपेतं: जानकी + लक्ष्मण + उपेतं(जवळ)

*अनुष्ठूप छंद


अर्थ– 

ज्यांचा वर्ण नीलकमलाप्रमाणं श्यामरंगी आहे, कमळासारखे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्यांचे डोळे आहेत 

ज्यांच्या बरोबर सीता आणि लक्ष्मण आहेत, जटारुपी मुकुटामुळं जे सुशोभित झाले आहे..



सासितूणधनुर्बाणं पाणिं नक्तंचरान्तकम्।

स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्॥३॥


सासितूणधनुर्बाण: स + असि(तलवार) + तूण (भाता) + धनुर् + बाण 
नक्तंचरान्तकम्: नक्तं ( रात्र ) + चर + अंतकम्   नक्तंचर: निशाचर म्हणजे दानव, राक्षस
जगत्त्रातुमाविर्भूतमजं: जगत् + त्रातुम् (जगाच्या रक्षणासाठी) + आविर्भूतम् (स्वतःला प्रकट केले) + अजम् (जन्मरहित) 
विभुम्: व्यापून उरणारा
*अनुष्ठूप छंद

अर्थ– 

ज्यांच्या हाती धनुष्यबाण आणि भात्या बरोबरच तलवारही आहे, जे दानव राक्षसांचा नाश करणारा आहेत 

मूलत: जन्मरहित व सर्वव्यापक असूनही ज्यांनी जगाच्या रक्षणासाठी स्वतःला मर्यादित स्वरूपात सहज लीलेनं प्रकट केलं आहे.. 

(अश्या श्रीरामांचं ध्यान करूया..)


विवरण-

श्लोकांत वर्णन केलेला 'हाती तलवार असलेला राम' हे दृश्य सहसा कुठं दिसत नाही..   

सीतामातेचा शोध घेत असताना राम आणि लक्ष्मणानं दंडकारण्यात कबंध नावाच्या विचित्र, धडालाच तोंड आणि डोळे असलेल्या राक्षसाचा वध तलवारीनं केला होता.. ह्या शापित गंधर्वाचे हात कापून, त्याला अग्नीत दहन केल्यानंतर तो मुक्त झाला आणि त्यानं रामाला सुग्रीवाशी मैत्री करण्याचा सल्ला दिला होता.. 


तिसऱ्या श्लोकांपर्यंत श्रीराम स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे.. चौथ्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणापासून रामरक्षा कवचाची सुरुवात होते.. ती पुढच्या भागात पाहूया..


*स्रग्धरा छंद : प्रत्येक चरणांत २१ अक्षरं.. ओळीची लांबी जास्त, त्यामुळं लय अतिशय संथ आणि भारदस्त असते..

*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं.. एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत.. 



।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************