श्रीरामरक्षा स्तोत्र.. रक्षणकर्त्या रामाचं स्तोत्र.. ३८ श्लोकांचं हे संरक्षण कवच..
ह्या ३८ श्लोकांपकी काही श्लोक कवचाचे तर काही प्रभूंचं वर्णन, रामनामाचा महिमा, त्यांची अनेक विशेषणं, फलश्रुती यांचे तर काही वाल्मिकी, माता सीता, भक्तश्रेष्ठ हनुमंताचं स्मरण, वंदना करणारे..
'स्तोत्र' म्हणजे देवतेचं स्तवन, गुणगान किंवा स्तुती करणारी काव्यरचना.. 'स्तूयते अनेन इति स्तोत्रम्' म्हणजेच ज्याद्वारे स्तुती केली जाते ते स्तोत्र अशी याची व्याख्या.. स्तोत्रं ही श्लोक स्वरूपात संस्कृत भाषेत असतात..
स्तोत्र ह्या शब्दाची उत्पत्ती 'स्तु' म्हणजे स्तुती करणं ह्या धातूला 'त्र' म्हणजे रक्षण करणं हा प्रत्येय लागून झाली आहे..
यांच्या नियमित पठणानं भक्ताच्या भोवती संरक्षक कवच निर्माण होते आणि मनःशांती मिळते..
रामरक्षेच्या सुरुवातीला बुधकौशिक ऋषींनी 'श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य' म्हणजेच हे स्तोत्र 'मंत्र' पण आहेत असं सांगितलं आहे..
'मननात त्रायते इती मंत्र' म्हणजेच ज्याचं मनन केल्यानं आपलं रक्षण होतं..
मंत्रामध्ये एक नाद ध्वनी असतो.. ठराविक लयित, सुरात एखादा मंत्र जपला तर त्या ध्वनिलहरींतून एक विशिष्ट शक्ती निर्माण होते.. मंत्रजप म्हणजे मंत्रांचा तदर्थ भावपूर्ण जप, अर्थ समजून भावासह पुनःपुन्हा केलेला उच्चार..
🌸🌸🌸
श्रीगणेशायनमः।
अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य l
बुधकौशिकऋषिः।
श्रीसीतारामचन्द्रो देवता।
अनुष्टुप् छ्न्दः। सीता शक्तिः।
श्रीमद् हनुमान् कीलकम् ।
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः।
अर्थ-
श्रीगणेशाला नमन..
या रामरक्षास्तोत्ररूपी मंत्राचा (रचेता) ऋषि बुधकौशिक असून रचना अनुष्टुप छंदात केली आहे.. माता सीता आणि श्रीरामचंद्र ह्या मंत्राच्या देवता आहेत.. मंत्राची शक्ती सीता आहे तर हनुमान सुरक्षा कवच.. श्रीरामचंद्राचा (प्रेमानं भक्तिभावनेनं) जप करता यावा म्हणून हा स्तोत्ररूपी मंत्र निर्माण केला आहे..
विवरण-
उपासना ही सिद्ध मंत्रानं करायची असते..
प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला जो मंत्र किंवा स्तोत्र असेल त्याचा स्पष्ट उल्लेख असतो.. नंतर त्या मंत्राची सिद्धी करणारा ऋषी, मंत्रानं सिद्ध होणाऱ्या देवता, मंत्राचं सामर्थ्य असणारी शक्ती, मंत्राचं बीज, मंत्रामुळं होणारी फलप्राप्ती, मंत्राचा आधारस्तंभ आणि त्या मंत्राचा विनियोग यांचा उल्लेख असतो..
कीलक : खिळा, खुंटी किंवा जोडणारा घटक..
आध्यात्मिक संदर्भात याचा अर्थ मंत्राला 'किलित' (निश्चित करणे) म्हणजेच स्तोत्राची शक्ती जागृत करून ती सुरक्षित ठेवणे असा होतो..
रामरक्षेतील बहुतौशी श्लोकांची रचना अनुष्टुप छंदात केलीली असली तरी काही श्लोकांची रचना त्रिष्ठुप, स्रग्धरा, शार्दूलविक्रीडित, वसंततिलका छंदात ही केलेली आहे..
|| अथ ध्यानम् ||
ध्यायेदाजानुबाहुम् धृतशरधनुषम्। बद्धपद्मासनस्थम्।
पीतं वासो वसानम् नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्।
वामाङ्कारूढसीता-मुखकमल-मिलल्लोचनं नीरदाभम्।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम्॥
|| इति ध्यानम् ||
ध्यायेदाजानुबाहुं : ध्यायेत् + अजानु (गुढगा) + बाहुं (भुजा)
नीरदाभम् : नीरद (मेघ) + आभम् (समान, कांती)
दधतमुरुजटामण्डनं : दधतम् (धारण करणारा) + उरू (विस्तृत) + जटामंडनं(जटांनी सुशोभित)
*स्रग्धरा छंद
अर्थ–
आता ध्यान करूया..
आजानुबाहु म्हणजेच गुडघ्यापर्यंत लांब हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्धपद्मासनात बसलेल्या
पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणं सुंदर प्रसन्न डोळे असणाऱ्या
डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडं स्थिर दृष्टीनं पहात असणाऱ्या, पावसाळी मेघांप्रमाणं (श्यामवर्णाची) कांती असणाऱ्या
नानाविविध अलंकारांनी सुशोभित आणि मोठं जटामंडल धारण केलेल्या श्री प्रभू श्रीरामचंद्राचं
ध्यान करूया..
विवरण-
स्तोत्र सिद्ध करण्यासाठी पठणापूर्वी ज्या देवतेचं स्तवन करायचं आहे त्याची प्रतिमा डोळ्यांसमोर आणून, त्या देवतेचं ध्यान करायचं.. म्हणून सुरुवात 'अथ ध्यानम्' आता ध्यानाला सुरुवात करूया अशी होते.. इथं ध्यान ही अवस्था आहे क्रिया नव्हे.. खोल आत्मनिरीक्षण, आत्मपरीक्षण, आत्मचिंतन, आत्मलीनता अशी वृत्ती अपेक्षित असते..
भक्तांच्या रक्षणाकरिता हातात धनुष्यबाण असलेली, अलंकार आणि जटामंडलांनी सुशोभित बद्धपद्मासनात एकाग्र चित्तानं बसलेली, डाव्या मांडीवर शक्तीरूपिणी सीता असलेली अश्या प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपाचं 'इति ध्यानम्' आपण ध्यान करूया..
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्॥१॥
शतकोटिप्रविस्तरम्: शंभर कोटी श्लोकां इतकं विस्तृत
पुंसां: पुरुषांची
*अनुष्ठूप छंद
अर्थ–
श्रीरघुनाथाचं चरित्र शंभर कोटी श्लोकांत मावेल इतकं विस्तृत आहे.. त्यातील केवळ एक अक्षरसुद्धा पुरुष जातीची मोठी पापं नष्ट करण्यास समर्थ आहे..
ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्।
जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम्॥२॥
ध्यात्वा: ध्यान करून नीलोत्पलश्यामं: नील + उत्पल (कमळ )+ श्यामं राजीव: कमळ
जानकीलक्ष्मणोपेतं: जानकी + लक्ष्मण + उपेतं(जवळ)
*अनुष्ठूप छंद
अर्थ–
ज्यांचा वर्ण नीलकमलाप्रमाणं श्यामरंगी आहे, कमळासारखे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्यांचे डोळे आहेत
ज्यांच्या बरोबर सीता आणि लक्ष्मण आहेत, जटारुपी मुकुटामुळं जे सुशोभित झाले आहेत..
सासितूणधनुर्बाणं पाणिं नक्तंचरान्तकम्।
स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्॥३॥
सासितूणधनुर्बाण: स + असि(तलवार) + तूण (भाता) + धनुर् + बाण
नक्तंचरान्तकम्: नक्तं ( रात्र ) + चर + अंतकम् नक्तंचर: निशाचर म्हणजे दानव, राक्षस
जगत्त्रातुमाविर्भूतमजं: जगत् + त्रातुम् (जगाच्या रक्षणासाठी) + आविर्भूतम् (स्वतःला प्रकट केले) + अजम् (जन्मरहित)
विभुम्: व्यापून उरणारा
*अनुष्ठूप छंद
अर्थ–
ज्यांच्या हाती धनुष्यबाण आणि भात्या बरोबरच तलवारही आहे, जे दानव राक्षसांचा नाश करणारा आहेत
मूलत: जन्मरहित व सर्वव्यापक असूनही ज्यांनी जगाच्या रक्षणासाठी स्वतःला मर्यादित स्वरूपात सहज लीलेनं प्रकट केलं आहे..
(अश्या श्रीरामांचं ध्यान करूया..)
विवरण-
श्लोकांत वर्णन केलेला 'हाती तलवार असलेला राम' हे दृश्य सहसा कुठं दिसत नाही..
सीतामातेचा शोध घेत असताना राम आणि लक्ष्मणानं दंडकारण्यात कबंध नावाच्या विचित्र, धडालाच तोंड आणि डोळे असलेल्या राक्षसाचा वध तलवारीनं केला होता.. ह्या शापित गंधर्वाचे हात कापून, त्याला अग्नीत दहन केल्यानंतर तो मुक्त झाला आणि त्यानं रामाला सुग्रीवाशी मैत्री करण्याचा सल्ला दिला होता..
तिसऱ्या श्लोकांपर्यंत श्रीराम स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे.. चौथ्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणापासून रामरक्षा कवचाची सुरुवात होते.. ती पुढच्या भागात पाहूया..
*स्रग्धरा छंद : प्रत्येक चरणांत २१ अक्षरं.. ओळीची लांबी जास्त, त्यामुळं लय अतिशय संथ आणि भारदस्त असते..
*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं.. एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत..
।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।
🙏
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment