Thursday, March 26, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : कवच : श्लोक ४ ते श्लोक ९



पहिल्या तीन श्लोकांपर्यंत आपण नीलवर्णी, कमलनयन, सालंकृत, जटामुकुटधारी, माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत असणाऱ्या, हातात धनुष्यबाण, तलवार असणाऱ्या श्रीरामप्रभुंच्या स्वरूपाचं ध्यान करून त्यांना हृदयात विराजमान केलं..   

आता पुढं..
चौथ्या श्लोकाचं दुसरं चरण 'शिरो मे राघवः' पासून रामरक्षा कवचाची सुरुवात होते.. 
कवच- हा मंत्रविद्येतील एक प्रकार आहे.. यात देवतेला आपल्या शरीराचं रक्षण करण्याची प्रार्थना केलेली असते.. रोगराई सारख्या स्थूल कवचाहून अधिक शक्तीशाली कवच ही असतात जी भूतबाधा, करणी यासारख्या सूक्ष्म वाईट शक्तीपासून रक्षण करतात.. 

चौथ्या श्लोकापासून ते नवव्या श्लोकापर्यंत श्रीरामांकडं शरीराच्या प्रत्येक अवयवाची रक्षा करण्याची प्रार्थना केली आहे.. 


रामरक्षाम् पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः॥४॥

प्राज्ञः : प्रज्ञावान, सूज्ञ  पापघ्नीं : पापाचा नाश करणारी  सर्वकामदाम् : सर्व इच्छा पूर्ण करणारी 
राघवः : रघू कुलाचा वंशज  दशरथात्मजः : दशरथ + आत्मजः (दशरथाचा मुलगा)  पातु : रक्षण करणं 

अर्थ- 
रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सूज्ञ लोकांनी तिचं पठण करावं..
रघूकुल वंशज राघव राम माझ्या मस्तकाचं रक्षण करो.. दशरथ पुत्र माझ्या कपाळाच रक्षण करो..

विवरण-
रघुकुल ज्ञान, पराक्रम, विवेक यांचं प्रतीक मानलं गेलं आहे.. मस्तक विचारांचं, बुद्धीचं केंद्रस्थान आहे.. अनिष्ट विचारांपासून मुक्ती, सकारात्मकता आणि बुद्धीच्या स्थैर्यासाठी हे राघव तू माझ्या मस्तकाचं रक्षण कर.. 
'दशरथ' ज्याची दहा इंद्रियांवर पकड आहे अश्या दशरथाचा पितृभक्त पुत्र राम.. विवेकबुद्धीनं निर्णय घेण्यासाठी, ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी, विचारांच्या सकारात्मक ऊर्जेसाठी तू माझ्या कपाळाचं रक्षण कर.. 


कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती।
          घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः॥५॥           

कौसल्येयो : कौसल्या पुत्र  दृशौ : दृष्टी  श्रुती : ऐकलेलं, वेद, प्राचीन शास्त्रांद्वारे प्रकट झालेलं ज्ञान (श्रवणेंद्रिय)
घ्राणं : नासिका  मखत्राता– मख (यज्ञ) + त्राता (रक्षण करणारा)  सौमित्रिवत्सल : सौमित्रेचा पुत्र (लक्ष्मण) 
पातु : रक्षण करणं 

अर्थ- 
कौसल्येचा पुत्र माझ्या दृष्टीचं रक्षण करो.. विश्वामित्रांना प्रिय (असलेले श्रीराम) माझ्या कानांचं रक्षण करोत.. 
यज्ञाचं रक्षण करणारे (श्रीराम) माझ्या नाकाचं रक्षण करोत..  सौमित्रेचं ज्यांच्यावर प्रेम आहे (श्रीराम) माझ्या मुखाचं रक्षण करो..

विवेचन-
कौसल्यामाते सारखी भक्ती ,वात्सल्य, ममता माझ्या डोळ्यांत असुदे म्हणून हे कौशल्यपुत्र तू माझ्या डोळ्यांचं रक्षण कर.. 
विश्वामित्रांनी जसं योग्य आणि उचित ज्ञानाचे संस्कार श्रुतीद्वारे केले तसेच उचित संस्कार होण्यासाठी हे विश्वामित्रांना प्रिय असणाऱ्या तू माझ्या कानांचं रक्षण कर.. उचित आणि योग्य तेच माझ्या कानांद्वारे ग्रहण होऊदे.. 
श्वसनातून, नाकाद्वारे होणाऱ्या प्राणायामातून, शरीराचा अंतर्गत सुरु असणाऱ्या यज्ञाचं, त्या प्राणशक्तीचं तू रक्षण कर..
सौमित्रेनं आपल्या पुत्राला लक्ष्मणाला रामाच्या सेवेसाठी अर्पण केलं.. लक्ष्मणानं रामाची सावली बनून, मुखानं रामनाम घेत सेवा केली.. जसं लक्ष्मणानं रामाचं रक्षण केलं तसंच माझ्या मुखाचं (वाणीचं) रक्षण कर..


जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः।
          स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः॥६॥           

विद्यानिधिः : विद्येचा संचय  भरतवन्दितः : भरताला वंदनीय  
स्कन्धौ : खांदा  दिव्यायुधः : दिव्यास्त्र  भग्नेशकार्मुकः :भग्न + ईश (शिव) + कार्मुक: (धनुष्य)
पातु : रक्षण करणं
 
अर्थ-
सर्व विद्यांचा संचय असणारा (राम) माझ्या जिभेचं रक्षण करो.. भरताला वंदनीय (राम) माझ्या कंठाचं रक्षण करो.. 
दिव्यास्त्र असणारा (राम) माझ्या (दोन्ही) खांद्यांचं रक्षण करो.. शिवधनुष्याचा भंग करणारा (राम) माझ्या (दोन्ही) बाहूंचे रक्षण करो.. 

विवेचन-
जिभेच्या टोकावर विद्देचा वास असतो म्हणून सर्व विद्यांचा अधिपती असणारा तू जिभेचं रक्षण कर.. ज्याप्रमाणे भरताच्या कंठातून रामाची वंदना निघाली त्याचप्रमाणे माझ्या कंठातूनही सदैव सत्य आणि रामनाम यावे म्हणून भरताला वंदनीय असणारा तू माझ्या कंठाचं रक्षण कर..  
जबाबदाऱ्या, संकटे पेलण्याचं सामर्थ्य मिळवण्यासाठी दिव्यास्त्रधारी मजबूत खांदे असणारा तू माझ्या खांद्याचं रक्षण कर.. सीता स्वयंवराच्या वेळेस शिवधनुष्याला प्रत्यंचा चढवत असताना धनुरभंग झाला.. धनुष्याचा भंग करण्यासाठी ताकदवान भुजा असणारा तू माझ्या भुजांचं रक्षण कर.. 


करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्।
           मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः॥७॥            

जामदग्न्यजित् : जमदग्निपुत्र (परशुराम)
खरध्वंसी : खर (राक्षस) + ध्वंसी (नाश करणारा)   जाम्बवदाश्रयः : जाम्बवंताला आश्रय देणारे
पातु : रक्षण करणं

अर्थ- 
सीतेचे पती माझ्या हातांचं रक्षण करोत.. परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचं रक्षण करोत..
खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्यभागाचं रक्षण करोत.. जांबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभीचं रक्षण करोत..

विवेचन-
शक्तिरूपिणी सीतेचा हात हातात असणाऱ्या तू माझ्या हातांचं रक्षण कर..

सीता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्य भंग झाल्यावर, शिवधनुष्य कोणी भंग केलं ह्याचा जाब विचारण्यासाठी जमदग्नीपुत्र परशुराम विवाहमंडपात येतात.. त्यावेळी रामाची परीक्षा घेण्यासाठी ते त्यांच्याकडील 'वैष्णव धनुष्या'स प्रत्यंचा लावण्यास सांगतात.. राम प्रत्यंचा आणि बाण लावून तो बाण कुठं मारू म्हणून विचारणा करतात.. त्यावर परशुराम म्हणतात रामा, मी २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आहे.. त्यावेळेस काही पाप झालं असेल तर त्या पापाचा नाश करावा.. श्रीरामानं तसं केलं आणि परशुरामांचं हृदय जिंकलं.. म्हणून पराक्रमानं परशुरामांचं हृदय जिंकणारा तू माझ्या हृदयाचं रक्षण कर..

लक्ष्मणानं शूर्पणखाचं नाक, कान कापल्यावर खर व दूषण हे राक्षस त्यांच्याशी युद्ध करायला येतात.. भगवान शंकराच्या वरामुळं त्यांचा मृत्यू कोणाच्याही हातून न होता आपापसात युद्ध करून होणार असतो.. रामाच्या मोहनास्त्रामुळं त्यांना एक दुसऱ्यात राम दिसल्यानं ते आपापसांत युद्ध करतात आणि त्यांचा मृत्यू होतो.. 'खर' सारख्या अशुभ वाईट प्रवृत्तींचा नाश करतात.. शरीराच्या मध्यभागांत, पोटाच्या भागात सर्व प्रकारच्या इंद्रियांची प्रवृत्ती व विकार राहतात म्हणून खर राक्षसाचा नाश करणारा तू माझ्या मध्यभागाचं रक्षण कर..

रावण वधाच्यावेळी राम अवतारात भगवान विष्णूंना मदत करण्यासाठी सर्व देव देवता आपआपल्या अंश रूपानं पृथ्वीवर अवतरीत झाले.. ब्रम्हदेवापासून जांबुवंत, इंद्रापासून वाली, सूर्यापासून सुग्रीव, बृहस्पती पासून तार, कुबेरापासून गंधमादन, विश्वकर्मापासून अंगद, अश्विनीकुमारांपासून नल-नील, वरुणापासून सुषेन, पर्जन्यापासून शरभ, वायूपासून हनुमंत इत्यादी.. ब्रह्मदेव ज्यांची उत्पत्ती विष्णूच्या नाभीतून झाली आहे त्यांचा अंश जांबुवंत.. म्हणून जांबुवंताला आश्रय देणारा तू माझ्या नाभीचं रक्षण कर.. 


सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः।
            ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥              

सक्थिनी : (सक्थि) जांघेची हाडं
उरू : मांड्या (उर्वस्थी : कंबरे पासून गुडघ्या पर्यंत असणारी हाडं)  रक्षःकुलविनाशकृत् : राक्षसकुलाचा विनाश करणारा.. 
पातु : रक्षण करणं

अर्थ- 
सुग्रीवाचा स्वामी माझ्या कंबरेचं रक्षण करोत.. हनुमंताचा प्रभू माझ्या दोन्ही जांघांचं रक्षण करोत..
राक्षसकुलाचा विनाश करणारा रघुकुलश्रेष्ठ माझ्या दोन्ही मांड्यांचं रक्षण करोत..

विवरण-  
वालीच्या त्रासानं पीडित सुग्रीवाला तुझ्या (श्रीराम) आश्रयानं, तुझ्याशी कटिबद्ध झाल्यानं राज्य, स्वाभिमान, शक्ती परत मिळाली तसंच तू माझ्या कर्माची, शक्तीची आणि मनाच्या स्थिरतेची (कंबरेची) रक्षा कर.. कंबर हे शरीराचं केंद्रस्थान असून, दृढता आणि कर्माचं प्रतीक आहे.. कंबर हा आधार देणारा मध्यभाग आहे.. आयुष्यात कठीण प्रसंगात, कंबर कसून काम करण्याची शक्ती प्रभू रामरायानं द्यावी हा उद्द्येश.. 

सक्थिनी किंवा जांघेचा संबंध आसनस्थ राहण्याशी, स्थिर राहण्याशी जोडला जातो.. कामविकारांशी संबंधित मानला जातो.. या भागाचं रक्षण करण्याची प्रार्थना म्हणजे विषयांचा त्याग आणि नैतिकतेचं बळ मिळवणं.. ज्याचा विकारांवर ताबा आहे अश्या हनुमानाचे प्रभू तुम्ही माझ्या जांघांचं, मूलाधार चक्राचं रक्षण करून विषयासक्तीचा त्याग, स्थिरता, ताकद आणि नैतिक नैतिकतेचं बळ द्या..  


जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः।
       पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः॥९॥        

जानुनी : जानु (गुडघा अनेकवचन)  सेतुकृत् : सेतुं करोति इति। (सेतू बांधणारा)  
जङ्घे : पोटऱ्या  दशमुखान्तकः दशमुख-अन्तकः (दशननाचा नाश करणारा)
रामोऽखिलं : रामस् अखिलं वपुः  : संपूर्ण शरीर
पातु : रक्षण करणं

अर्थ-
समुद्रावर सेतू बांधणारा माझ्या दोन्ही गुडघ्यांचं रक्षण करोत.. दशमुखी रावणाचा नाश करणारा माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करोत.. 
बिभीषणाला श्री (राजश्री) देणारा माझ्या पावलांचं रक्षण करोत.. सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण करोत..

विवरण-
अश्याप्रकारे मस्तक, नेत्र, नासिका, हृदय, हात, कंबर, मांड्या, गुडघे, पोटऱ्या इत्यादी सर्व अवयवांचं रक्षण करण्याच्या प्रार्थनेचा शेवट माझ्या 'सर्व शरीरा'चं संरक्षण कर म्हणून होतो.. श्रीराम हे केवळ आदर्श पुरुष नसून ते 'आनंदकंद' (आनंदाचा स्रोत) आहेत, जे मनाला शांतता आणि शरीराला आध्यात्मिक ऊर्जेद्वारे अभय देतात म्हणून सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या शरीराचं रक्षण करो असं म्हटलं आहे..  
शरीराच्या प्रत्येक अंगाचं रक्षण करण्यासाठी आणि जीवनात आनंद व शांती टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण शरणागतीची भावना व्यक्त केली आहे.. 

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संरक्षणासाठीचं हे कवच इथं समाप्त होतं.. दहाव्या श्लोकापासून सुरु होणारी फलश्रुति पुढच्या भागात पाहू..


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************

No comments:

Post a Comment