Wednesday, April 15, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : कवच फलश्रुति



रामाच्या सामर्थ्यानं युक्त असलेल्या या रामरक्षा कवचाच्या पठाणांनं मिळणारं फलं म्हणजेच फलश्रुति पुढच्या काही श्लोकांत सांगितली आहे.. 

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्।
        स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्॥१०॥         

रामबलोपेतां : रामशक्तीनं युक्त   सुकृती : सत्कर्म करणारा  

अर्थ- 
जो सत्कर्मी रामबलानं युक्त अश्या रामरक्षेचं (कवचाचं)पठण करेल तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयशील होईल..



पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः॥११॥

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः : पातालभूतलव्योमचारिण: + छद्मचारिणः 
पातालभूतलव्योमचारिण: : पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे..  
छद्मचारिणः कपटी, मायावी खोटं सोंग घेणारे (राक्षस)

द्रष्टुमपि : दृष्टी वर करून 

अर्थ-
पाताळ, भूमी किंवा आकाशात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपात संचार करणारे दुष्ट जीव या श्रीरामरक्षा स्तोत्राचं पठण करणाऱ्याकडं दृष्टी वर करून पाहू देखील शकणार नाहीत..


रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति।।१२॥ 
       
भुक्ति : ऐहिक सुख (सांसारिक सुख)   मुक्ति : मोक्ष. (पारमार्थिक सुख)

अर्थ- 
राम, रामभद्र किंवा रामचंद्र अशा (इतर कोणत्याही) नावांनी श्रीरामाचं स्मरण करणारा कधीही पापांनी लिप्त (ग्रसित) होत नाही.. अनेक सुखं भोगून शेवटी तो मोक्ष प्राप्त करतो..

विवरण- 
अध्यात्मात नामस्मरण ला अलौकिक महत्व आहे.. कोणत्याही देवदेवतेचं नामस्मरण करणं हा कलियुगांत मुक्तीचा मार्ग सांगितला आहे.. 

श्वासोच्छवास करताना श्वासांवर नियंत्रण ठेवून नामस्मरण केलं तर प्रत्येक श्वासाबरोबर एक अश्याप्रकारे दिवसांत २१६०० वेळा नामजप - अजपाजप होतो..  
रामनामाचा जप करायचा असेल तर श्वास सोडताना रा आणि घेतांना म म्हणायचं.. असं म्हणतात 'रा' म्हणतांना सर्व विकार, पाप बाहेर पडतात आणि 'म' म्हणतांना ओठ बंद होतात आणि बाहेर पडलेली पापं परत येत नाहीत.. दिवसभरांत आपण साधारणपणे २१६०० वेळा श्वासोच्छवास करतो..

विश्वाचं मूळ ज्ञान, शक्ती, आनंद, नाद ज्याला उपनिषदं ओंकार किंवा प्रणव म्हणतात, ज्याला गीता एकाक्षर ब्रह्म म्हणते, वेदांत शब्दब्रह्म म्हणतो त्याला साधूसंत नाम असं म्हणतात.. नाम शक्तिमय असल्यानेनं संपूर्ण मूर्त विश्व त्यातून जन्म पावतं.. नाम नुसता शब्दोच्चार नसून नाम म्हणजे अंतरंगात असणारी आदी परम ईशाची शक्ती आहे.. मूर्त-अमूर्तांना जोडणारी साखळी.. दृश्यातून अदृश्यात आणि अदृश्यातून अव्यक्तात जाण्यासाठी नामा सारखी सहज सुंदर दुसरी साधना नाही..
नामजपावर असणारा विश्वास आणि त्याच्या शक्तीनंचं सगळं घडतं ही असणारी जाणीव म्हणजे 'नामस्मरण'.. 
 
रामनामानं वाल्याचा 'वाल्मिकी झाला, दगड पाण्यावर तरंगले आणि भगवंताच्या नामानं छोटा प्रल्हाद ही तरला.. 
संकटांत असताना, भयभीत असताना जो नामजप केला जातो त्याला 'नामस्मरण होणं' असं म्हणतात तर नित्य नैमित्तिक, फलांची अपेक्षा न करता जो नामजप केला जातो त्याला 'नामस्मरण करणं' असं म्हणतात.. आणि जेव्हा संत मंडळी नामस्मरण करतात तेव्हा त्यांच्या नामस्मरणाला 'नामस्मरणात राहणं' असं म्हणतात..
भीतीच्यावेळी नामस्मरण होणं, नित्यकर्म म्हणून नामस्मरण करणं यापेक्षा सजगतेनं, जागृकतेनं नामस्मरणात राहणं हे नक्कीच श्रेष्ठ आहे.. 


जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्।
         यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिध्दयः॥१३॥         

जगज्जैत्रेकमन्त्रेण : जगज्जेत्र + एकमन्त्रेण (जग जिंकणाऱ्या एका मंत्रानं)  
रामनाम्नाभिरक्षितम् : रामनाम्ना + अभिरक्षितम् (रामनामानं सर्व बाजूंनी रक्षण होतं)

अर्थ-
सर्व जगाला जिंकणारा हा मंत्र जो रामनामानं अभिरक्षित आहे जो मनुष्याचं सर्व बाजूंनी रक्षण करतो तो मंत्र जो कंठात धारण करतो त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात..


वज्रपञ्जरनामेदमं यो रामकवचं स्मरेत्।
                 अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम्॥१४॥               

वज्रपञ्जरनामेदमं : वज्रपञ्जरनाम इदं  वज्रपञ्जर : वज्रस्य पञ्जरः (वज्राचा पिंजरा)
अव्याहताज्ञः : न व्याहता अव्याहता (आज्ञा कधीही मोडली जात नाही असा)   जयमङ्गलम् : मंगलमय विजय  

अर्थ- 
जो या रामकवचाचं स्मरण करतो त्याच्यासाठी हे वज्राच्या पिंजऱ्या सारखं आहे.. अशा माणसाची आज्ञा कायम अबाधित राहते, अव्याहत मानली जाते आणि त्याला सर्वत्र मंगल विजय मिळतो..

विवरण-     
इंद्राचं अस्त्र वज्र.. त्याचा पिंजरा जसा अत्यंत संरक्षक असतो तसं हे रामनामाचं कवच, रामरक्षा स्त्रोत्र.. म्हणून हे  वज्रपञ्जर.. जो ह्या रामरक्षेचं स्मरण करतो त्याला सर्वत्र विजय जय प्राप्त होउन त्याचं नेहमी कल्याण होतं..


आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः॥१५॥

आदिष्टवान् : आदेश दिला  हरः : भगवान शिवशंकर

अर्थ- 
भगवान शिवशंकरांनी स्वप्नांत ही श्रीरामरक्षा सांगितली.. सकाळी श्री बुधकौशिक ऋषींनी ती जशीच्या तशी लिहून काढली..

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

रामनामाची दिव्य अनुभूती खुद्द श्रीरामांना ही आली..  

गोष्ट आहे भगवान श्रीरामांनी केलेल्या एका मोठ्ठ्या यज्ञाच्या वेळची.. महान ऋषी-मुनी, अनेक राजे-महाराजे यांची उपस्थिती असलेला हा यज्ञ..  
यज्ञाची सूचना मिळताच सामंत नावाचा राजा अयोध्येत आला.. यज्ञ मंडपाच्या बाहेरूनच उपस्थतीत महर्षींना प्रणाम करून यज्ञमंडपात स्थानापन्न झाला.. देवर्षि नारदांच्या नजरेतून राजा सामंतांचा हा प्रणाम चुकला नाही.. रामनामाची महत्ता सर्वांपुढं प्रकट करण्यासाठी त्यांना एक युक्ती सुचली..  
देवर्षी नारद त्वरित विश्वामित्र ऋषींकडं गेले आणि म्हणाले, पहा तरी राजा सामंताचं धाडस.. वास्तविक पाहता महर्षी वसिष्ठापेक्षा आपण श्रीरामाचे अत्यंत उपकारी आहात.. तुमच्याच कृपेनं श्रीरामानी माता सीतेला प्राप्त केलं.. तुमच्याच अनुग्रहानं रावणासारख्या शत्रूचा श्रीरामांनी वध केला.. पण हा राजा सामंत जाणून बुजून तुमचा अपमान करण्याच्या हेतूनं महर्षी 'वसिष्ठादिकांना माझा प्रणाम' असं म्हणून वसिष्ठांना प्रथम स्थान दिलं.. 

क्रोधीत विश्वामित्र रामाला म्हणाले ज्या राजा सामंतांनी माझा यज्ञमंडपात अपमान केला त्या राजा सामंताचं मस्तक माझ्या चरणावर समर्पित कर.. श्रीरामांनी विश्वामित्रांची आज्ञा शिरोधार्य मानून  राजा सामंतच्या शोधात निघाले..

विश्वामित्रांना कळ लावून देवर्षि नारद थेट राजा सामंतांकडं येणाऱ्या संकटाची सूचना देण्यासाठी गेले.. घाबरलेला राजा सामंतानं नकळत हे पाप घडलं आणि आता ह्यातून तुम्हीच मार्ग काढा अशी विनंती नारदांना केली.. नारदांनी त्वरित अंजनीमातेला शरण जाण्याचा सल्ला दिला.. राजा सामंतांनी अंजनीमाते चरण धरून अभय मागितलं.. सर्व वृत्तांत सांगून जीवनदान देण्याबद्दल प्रार्थना केली.. अंजनीमातेनं हनुमंताला राजाचं रक्षण करण्याची आज्ञा दिली..
मातेची आज्ञा ऐकून हनुमंत क्षणभर विचलित झाले.. राजाचं रक्षण करणं याचा अर्थ अराध्यदेवतेचा विरोध.. पण मातेची आज्ञा ही शिरसावंद्य..
हनुमंतानी आपली शेपटी वाढवून, शेपटीचा गोलाकार करून एक किल्ला तयार केला.. त्यात राजा सामंतांसह ते ध्यानमग्न होऊन रामनामाचा जप करीत बसले.. राजा सामंतांचा शोध घेत श्रीराम त्या ठिकाणी पोहोचले.. आणि त्या किल्ल्याला लक्ष बनवून आपले अमोघ बाण चालवले.. पण ज्या वेगानं बाण किल्ल्याकडं जात होते त्या वेगानंच ते किल्ल्याला प्रदक्षिणा घालून परत येत होते.. आणि श्रीरामाच्या चरणावर लीन होत होते.. हे पाहून श्रीरामाचा क्रोध उफाळून येऊ लागला.. परिस्थिती हाताच्या बाहेर जात आहे हे दिसताच देवर्षि नारदांनी अस्त्रांचा प्रयोग बंद करून किल्ल्यातून येणारा ध्वनी ऐकण्याची विनंती श्रीरामांना केली.. शांत वातावरणात 'राम राम' असा ध्वनी स्पष्ट ऐकू येऊ लागला. श्रीरामांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्या किल्ल्यात ध्यानमग्न हनुमंत आणि भयभीत राजा सामंत..
हनुमंताला पाहून श्रीराम म्हणाले हे काय? मी ज्या व्यक्तीचं मस्तक विश्वामित्रांना भेट देण्याचं वचन दिलं आहे, त्यांचंच रक्षण तू करतो आहेस?.. 
हनुमंतानं श्रीरामाचे चरण पकडले.. प्रभू तुमच्या मनाविरुद्ध जाणं माझ्यानं शक्य नाही.. पण मी मातेच्या आज्ञेचं उल्लंघन पण करू शकत नाही.. मला तुमच्या नावा शिवाय दुसरा कोणता आश्रय नाही.. 
आता श्रीरामांचं हे वचन निभावण्यासाठीचा युक्तीवाद नारदांनी केली.. ते म्हणाले विश्वामित्रांनी राजा सामंतांचं मस्तक त्यांच्या चरणावर समर्पित करण्यास सांगितलं आहे.. ह्याचा अर्थ असा नाही की मस्तक कापूनच चरणावर ठेवावयला हवं.. महर्षी विश्वामित्रांच्या चरणावर राजानं मस्तक ठेवून दंडवत केला तरी तोच अर्थ होईल.. आणि तुमच्या वचनाचं पालन ही होईल आणि राजाचं रक्षण ही.. 
देवर्षि नारदांचा प्रस्ताव ऐकून राजा सामंतांनी विश्वामित्रांच्या चरणावर मस्तक ठेवून साष्टांग प्रणाम केला.. महर्षींचा क्रोध शांत झाला..

..धन्य आहे हनुमंताची रामभक्ती आणि रामनामाचा महिमा.. म्हणूनच जगामध्ये जय प्राप्त करून देणारा मुख्य मंत्र 'रामनाम' आहे..

सोळाव्या श्लोकापासून श्रीराम स्तुती, श्रीराम विशेषणं पाहूया..


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************
  

No comments:

Post a Comment