Tuesday, April 28, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : श्रीरामस्तुती : श्लोक १६ ते २१




श्रीराम कवचाच्या फलश्रुति नंतर पुढच्या काही श्लोकांत (१६ ते २१) श्रीरामस्तुती, राम-लक्ष्मण यांची वर्णनात्मक स्तुती केली आहे.. 


आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः॥१६॥ 

आरामः : बगीचा, वन   विरामः : शेवट करणारा, मुक्ती देणारा   सकलापदाम् : सकल + आपदाम् : सर्व संकटांचा
अभिरामस्त्रिलोकानां : अभिराम: + त्रिलोकानां : तिन्ही लोकांना आवडणारा, मनोहारी  श्रीमान् : श्रीमंत   
स नः प्रभुः : आमचा देव आहे
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
प्रभू श्रीराम कल्पवृक्षांचा बगीचा आहे.. सकल संकटांपासून मुक्ती देणारा आहे..
तिन्ही लोकांमध्ये मनोहारी आहे.. असे हे प्रभू श्रीराम निःसंदेह आमचे प्रभू आहेत..

विवरण- 
आराम-विराम-अभिराम हे ह्या श्लोकातील तीन यमक.. 
आराम म्हणजे बगीचा.. विराम म्हणजे शेवट पण इथं मुक्ती देणारा तर अभिराम मधील अभि म्हणजे अभि म्हणजे सर्वांच्या दृष्टीचे केंद्र, ज्यावर सर्वांचे डोळे खिळलेले आहेत असा मनोहारी ऐश्वर्य युक्त, अतिशय सुंदर, कल्याणकारक, ज्यात पावित्र्य असते असा अर्थ अभिप्रेत आहे..


तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ।
       पुण्डरीक विशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ॥१७॥          

पुण्डरीक : कमळ    विशालाक्षौ : मोठे डोळे असलेला    
चीरकृष्णाजिनाम्बरौ : चीर (वल्कले)+कृष्णाजिन (काळवीटाचं कातडं)+अंबरौ (परिधान केलेला)  कृष्ण : गडद रंग 
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
तरुण, रूपसंपन्न, सुकुमार, महाबली, कमळाच्या आकाराचे मोठे डोळे असलेले, गडद रंगाची वल्कलं जीन परिधान करणारे 



फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ।
           पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ॥१८॥           

फलमूलाशिनौ : फल+मूल+अशिनौ (फळं-कंदमूळं भक्षण करणारे)    दान्तौ : इंद्रियं दमन करणारे जितेंद्रिय
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
फळं-कंदमूळं भक्षण करणारे, तपस्वी, ब्रह्मचारी, असे दशरथ राजांचे पुत्र हे बंधू राम लक्ष्मण



शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्।
रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ॥१९॥

शरण्यौ : शरण देण्याजोगा   सर्वसत्वानां : सर्व प्राणिमात्र  
*अनुष्ठूप छंद

अर्थ- 
सर्व प्राणिमात्रांचं आश्रयस्थान असलेले, सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ, असुरकुळांचा नाश करणारे हे उत्तम रघुकुलोत्पन्न आमचं रक्षण करोत..

श्रीराम-लक्ष्मण यांची श्लोक क्र १७, १८, १९ या तीन श्लोकांत आलेली १६ विशेषणं.. १) तरुण, २) रुपसंपन्न, ३) सुकुमार, ४) अतिशय बलवान, ५) कमलाप्रमाणे विशाल नेत्र असणारे, ६) वल्कले,कृष्णाजीन परिधान करणारे, ७) कंदमुळं फळं सेवन करणारे, ८) जितेंद्रिय, ९) तपस्वी, १०) ब्रह्मचारी, ११) दशरथाचे दोन पुत्र, १२) एकमेकांचे भाऊ, १३) सर्व प्राण्यांचं आश्रय स्थान असलेले, १४) सर्व धनुर्धारी योद्ध्यात श्रेष्ठ, १५) राक्षसकुलाचा नाश करणारे आणि १६) रघुकुलोत्पन्न.. 
.. आमचं रक्षण करोत..


आत्तसज्जधनुषाविषुस्पृशा वक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ।
              रक्षणाय मम् रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्॥२०॥              

आत्तसज्जधनुषौ : आत्त (धारण केलेलं)+सज्ज+धनुषौ+ईषुस्पृशौ(बाण)  
अक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ : अक्षय(कधीही न संपणारा)+आशुग(पुढं जाणारा)+निषङ्ग (भाता)+सङ्गिनौ(जवळ) 
रामलक्ष्मणावग्रतः : रामलक्ष्मणौ + अग्रतः(पुढं)
*त्रिष्टुप छंद

अर्थ-
धनुष्य धारण करून नेहमी सुसज्ज असणारे तसेच पुढं जाणाऱ्या बाणांचा अक्षय भाता जवळ असलेले श्रीराम व लक्ष्मण माझ्या रक्षणाकरिता माझ्या मार्गामध्ये नेहमी पुढं चालत राहोत..

विवरण- 
धनुष्य हे ज्ञानाच प्रतीक तर बाण हे विवेकाचं असं मानलं जातं..           
आत्तसज्जधनुषौ- धनुष्य धारण केलेले श्रीराम हनुमंताच्या हृदयी नेहमी विराजमान असतात.. असं तुलसीदासांनी वर्णन केलं आहे.. आणि त्याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणतात.. मारुतीरायानंच तशी श्रीरामाना विनंती केली होती की कपिकुलातील मला हृदयात, मनात केव्हा विकार येतील हे सांगता येणार नाही.. आणि हे विकार दूर करण्यासाठी श्रीरामांना विलंब नको म्हणून त्यांनी धनुष्य बाण घेऊन बसावे.. 

ह्या श्लोकांत धनुष्य सज्ज असणारे, बाणांना स्पर्श करणारे आणि अक्षय बाणांचा भाता असणारे अशी तीन विशेषणं आहेत.. 

**राम लक्ष्मण आपल्या मार्गातील पूर्व अडथळे दूर करून आपले रक्षण करतात म्हणून असं म्हणतात की रस्त्यानं एकटं जाताना, प्रवासामध्ये हा श्लोक म्हणावा..



संनद्धः कवची खड्गी चापबाणोधरो युवा।
            गच्छ्न् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः॥२१॥            

संनद्धः : निरंतर सज्ज  कवची : चिलखत घातलेला.  खङग : तलवार 
*अनुष्ठूप छंद

अर्थ- 
निरंतर सज्ज असलेले, अंगात कवच (चिलखत) घातलेले, हाती खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारे हे तरुण राम आणि लक्ष्मण आमच्या मनोरथाचं रक्षण करोत..


*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं..     
एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत.. 
*त्रिष्टुप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ११ अक्षरं..  
एक महत्त्वाचा वैदिक छंद.. वेदमंत्रांमध्ये गायत्री छंदानंतर त्रिष्टुप हा सर्वाधिक वापरला जाणारा आणि लोकप्रिय छंद मानला जातो.. श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक श्लोक या छंदात रचलेले आहेत.. 


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************

No comments:

Post a Comment