Wednesday, September 3, 2025

अध्याय १३ 'क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग'

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय १३ 'क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग'
(प्रकृती, पुरुष आणि चेतना)


भगवदगीतेचे पहिले सहा अध्याय 'जीव आणि जीवांच्या स्थिती' ज्यामुळं तो भगवंतांना जाणू शकतो ह्यावर भाष्य करतात तर मधले सहा अध्याय भगवान आणि भक्तीच्या संदर्भात आत्मा आणि परमात्मा यांच्या संबंधावर भाष्य करतात.. आता तेराव्या अध्यायापासून 'जीव' भौतिक प्रकृतीच्या संपर्कात कसा येतो आणि सकाम कर्म, ज्ञानाचं अनुशीलन आणि भक्ती द्वारे भगवंत जीवाचा उद्धार कसा करतात याचं विवरण करण्यात आलं आहे.. जीवात्मा जरी शरीरापासून पूर्णपणे भिन्न असला तरी शरीराशी कसा जोडलेला असतो ह्याचं विश्लेषण ही करण्यात आलं आहे.. 

बाराव्या अध्यायात, आपण परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भक्तीयोग समजावून घेत सांगताना भक्तांचे अनेक प्रकार, भक्तीचे निरनिराळे मार्ग याबरोबरच परिपूर्ण भक्त कसा असतो हे ही पाहिलं.. भक्तियोग जाणून घेतल्यावर अर्जुन 'प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय' ह्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करतो.. आणि त्याच्या इच्छेची परिपूर्णता म्हणजेच हा अध्याय होय.. सुरुवातीला भगवंत क्षेत्र आणि त्याचं स्वरूप, त्याची निर्मिती, त्यात होणारे बदल, त्याचा ज्ञाता, क्षेत्रज्ञाचा प्रभाव ह्यावर भाष्य करतात.. नंतर क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि परमात्मा ह्यातील भेद, मोक्षमार्गानं परमलक्ष्याची प्राप्ती कशी करायची, अध्यात्मिक साक्षात्कारातील गुरुचं महत्व विस्तारानं सांगतात..

अर्जुनाच्या प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, ज्ञान आणि ज्ञेय हे जाणून घेण्याच्या जिज्ञासेनं अध्यायाची सुरुवात होते.. श्रीभगवान म्हणतात, "हे कुंतीपुत्रा, ह्या देहाला 'क्षेत्र' असं म्हणतात आणि ह्या क्षेत्राला जो जाणतो त्याला 'क्षेत्रज्ञ' असं म्हणतात.." 
देह म्हणजे बद्ध जीवांचं कार्यक्षेत्र.. बद्ध जीवाच्या इंद्रियोपभोग घेण्याच्या कुवतीनुसार त्याला देह किंवा कार्यक्षेत्र मिळतं म्हणून देहाला क्षेत्र असं म्हटलं जातं.. आणि ह्या क्षेत्राचा, ह्या देहाचा स्वामी 'जीवात्मा' म्हणजेच क्षेत्रज्ञ.. 'मी माणूस', 'मी स्त्री', 'मी कुत्रा', 'मी मांजर' ह्या झाल्या क्षेत्रज्ञांच्या उपाधी.. परंतु क्षेत्रज्ञ हा देहापासून भिन्न असतो.. थोडक्यात जो शरीर धारण करतो तो क्षेत्रज्ञ आणि ते शरीर म्हणजे क्षेत्र..

प्रत्येक शरीरामध्ये दोन आत्मे असतात.. एक ह्या शरीराचा भोक्ता असणारा 'जीवात्मा' आणि दुसरा, शरीर व जीवात्मा ह्या दोघांचा परमनियंत्रक असा 'परमात्मा'.. एक च्युत- ज्याचं पतन होऊ शकतं असा 'जीवात्मा' तर दुसरा अच्युत- ज्याचं कधीही पतन होतं नाही असा 'परमात्मा'..
परमात्मा म्हणजे भगवंत नाही तर भगवंताचं विस्तारित रूप आहे.. म्हणजेच परमात्मा म्हणून भगवंत सर्व प्राणीमात्रात वास करतात.. म्हणून श्रीभगवान स्वतःला सर्व प्राणिमात्रांच्या देहांतील क्षेत्रज्ञ असल्याचं म्हणतात.. सर्व प्राणिमात्रांची शरीरं आणि त्या शरीरांचे स्वामी (जीवात्मा) दोघांनाही भगवंत जाणतात म्हणून त्यांना सर्व क्षेत्रांचा क्षेत्रज्ञ म्हणजेच 'परमक्षेत्रज्ञ' असं म्हणतात.. क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि परमक्षेत्रज्ञ या स्वरूपाला पूर्णपणे जाणणं म्हणजे खरं ज्ञान.. 

*पंचमहाभूतं, अहंकार, बुद्धि आणि अव्यक्त प्रकृति, पाच *ज्ञानेंद्रियं, पाच *कर्मेंद्रियं, पाच *इंद्रियविषय, इंद्रियांचा स्वामी असणारं मन हे अंतरेंद्रिय, इच्छा, द्वेष, सुख-दुःख हे विकार, चेतना व धैर्य अश्या चोवीस तत्वांच्या समूहाला 'क्षेत्र' असं म्हणतात.. 
उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश अशी सहा स्थित्यंतरं क्षेत्रामध्ये म्हणजेच शरीरांत होतात.. ह्या सर्वांपासून ह्या क्षेत्राचा स्वामी क्षेत्रज्ञ भिन्न आहे.. हे ज्ञान मिळवणं आणि ह्या ज्ञानपद्धतीचा अवलंब करणं कठीण असल्यानं अध्यात्मिक गुरु असणं आवश्यक आहे असं श्रीभगवान म्हणतात..

हे ज्ञान मिळवण्यासाठी नम्रता, अहिंसा, क्षमाशीलता, सरळपणा, गुरुसेवा, शुचिर्भूतपणा, मनोनिग्रह, आत्मसंयमन, इंद्रिय विषयांचा त्याग, निरहंकार वृत्ति हे गुण साधकानं अंगी बाळगावेत.. जन्म-मृत्यू-वार्धक्य-व्याधी हे आपल्यामागं लागलेले दोष आहेत असा त्याचा दृष्टीकोन असावा.. घरदार-मुलंबाळं-पतीपत्नी संसार ह्याबद्दल अनासक्ती असावी.. योग्य-अयोग्य गोष्टींबाबत समचित्त असावं.. भगवंताठायी अनन्य भक्ति असावी.. एकांतवास प्रिय असावा.. सामान्यलोकांपासून, विषयी लोकांपासून त्यानं दूर राहावं.. आणि आत्मसाक्षात्कारानं परमात्म्याचा तत्वज्ञानात्मक शोध घ्यावा.. हे खरं ज्ञान.. ही खरी ज्ञानपद्धती.. 
या ज्ञानपद्धतीचा स्वीकार केला तर परमसत्याची प्राप्ती नक्कीच शक्य आहे.. 

हे ज्ञान विविध ऋषीमुनींनी विविध वैदिक ग्रंथामध्ये कारण-परिणामांसहित वेदांत सूत्रात सांगितलं आहे.. 
भगवदगीतेत भगवान ब्रह्माच्या तीन संकल्पना सांगतात.. कार्यक्षेत्र म्हणून प्रकृती ब्रह्म आहे आणि ह्या भौतिक प्रकृतीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करणारे जीवात्मा ही ब्रह्म आहेत.. आणि ह्या दोघांचा नियंत्रक परमात्मा ही ब्रह्मच आहे.. जीवात्मा हा 'विज्ञानब्रह्म' तर परमात्मा 'आनंदब्रह्म'.. हे अनादी, सत-असतच्या पलीकडं असणारं ब्रह्मज्ञान जाणल्यानं साधक अमृतमयी जीवनाचा आस्वाद घेऊ शकतो.. 
  • जीवात्मा हा नित्य आहे.. त्याला विशिष्ट जन्मकाल नाही तसंच तो भगवंतांपासून कधी व्यक्त झाला हे ही कोणी सांगू शकत नाही.. जीवात्मा म्हणजेच क्षेत्रज्ञ हा कधीच जन्मत नाही आणि मृत ही होत नाही.. तो ज्ञानमयी आहे..  
  • ब्रह्मदेवापासून ते सूक्ष्म कीटकांपर्यंत सर्व जीव, त्यांची असंख्य मस्तकं, हात-पाय, डोळे, कान परमात्म्याठायी स्थित आहेत.. म्हणून परमात्मा सर्वव्यापी आहे.. परमात्मा सर्व इंद्रियांचं उगमस्थान असला तरी तो इंद्रियरहित आहे.. तो सर्व जीवांचा पालनकर्ता असला तरी अनासक्त आहे.. तो गुणरहित असून सर्व गुणांचा उपभोग घेणारा आहे.. तो सर्व जीवांच्या, सृष्ट पदार्थांच्या आत ही आहे आणि बाहेर ही.. तो अचल ही आहे आणि चल ही.. तसेच दूर ही आहे आणि जवळही.. तो सूक्ष्म असल्यामुळं भौतिक इंद्रियांनी जाणता येत नाही.. सर्व प्राण्यांच्या रूपात विभागलेला दिसला तरी तो विभक्त नसतो.. तो प्राणिमात्रांचं उत्पत्तिस्थान, धारण पोषण करणारा असला तरी तो सर्वांचा संहारकर्ता ही आहे.. चंद्रसूर्यादिकांना प्रकाश देणारा हा परमात्मा अज्ञानरूप अंध:काराच्या पलीकडचा आहे.. तो ज्ञानस्वरूप आहे.. ज्ञेयस्वरूप आहे.. ज्ञानानं मिळण्याजोगा आहे.. आणि सर्वांच्या हृदयात परमनियंता म्हणून स्थित आहे..  
क्षेत्र, क्षेत्रज्ञ यांच्यावर भाष्य करून झाल्यावर भगवंत प्रकृती आणि पुरुष म्हणजे काय हे सांगतात.. 
शरीर हे भौतिक 'प्रकृती'पासून बनलेलं आहे.. आणि हे शरीर धारण केलेला, शरीराच्या कार्याचा उपभोग घेणारा जीव म्हणजे 'पुरुष'.. 
माऊली म्हणतात.. पै क्षेत्र येणे नावे। जे सांगितले आघवे। तेचि एथ जाणावे। प्रकृती हे गा।। .. आणि क्षेत्रञु ऐसे। जयाते म्हणितले असे। तो पुरुष हे अनारिसे। न बोलो होई।। ... म्हणजेच क्षेत्र म्हणजे प्रकृती आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष.. 
प्रकृती (क्षेत्र) आणि पुरुष (क्षेत्रज्ञ) ही भगवंतांचीच शक्तितत्त्वं.. त्यांच्या ऐक्यातून सृष्टीची निर्मिती होते.. प्रकृती आणि पुरुष नित्य आहेत अर्थात ते सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी ही अस्तित्वात होते.. 

जेव्हा जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा मन, बुद्धी, इंद्रियं यांचे विकार म्हणजेच राग, द्वेष, मत्सर, मोह आणि त्रिगुण सत्व-रज-तम यांची उत्पत्ती होते.. हे विकार, त्रिगुण यातून इच्छा, कामना जागृत होतात आणि प्रकृती कार्यरूप होऊन तिचा गुणांशी संयोग होतो.. सत्वगुणांच्या संयोगातून 'सत्कर्म', रजोगुणातून 'काम्यकर्म' तर तमोगुणातून 'निषिध्दकर्म' उत्पन्न होतं.. याप्रमाणे चांगली-वाईट कर्मे प्रकृतीकडून, देहाकडून घडत राहतात आणि जीव, पुरुष वेगवेगळी सुखदुःख भोगत राहतो.. आणि  इंद्रियवासनांमुळं, निरनिराळ्या इच्छांमुळं, भौतिक जगातील आसक्तीमुळं एका देहातून दुसऱ्या देहात तो स्थित्यंतर करत राहतो.. भौतिक इच्छांच्या प्रभावामुळं जीवाला कधी देवता, कधी मनुष्य, कधी पशु-पक्षी-कीटक असा जन्म मिळत राहतो आणि हे जन्म-मृत्यूचं कालचक्र अखंड सुरूच राहतं.. 

जीव जेव्हा शरीरात राहून ही सुखदुःखं अनुभवत असतो तेव्हा जीवा बरोबर सदैव वास करणारा परमात्मा हे सारं पहात असतो.. भगवंतांचा प्रतिनिधी असणारा परमात्मा शरीराचा उपभोक्ता ही नसतो आणि शारीरिक क्रियांचा कर्ता ही नसतो तर तो साक्षी, देखरेख करणारा, अनुमती देणारा असतो.. प्रत्येक जीव हा भगवंतांचा नित्य अंश असला तरी प्रकृतीच्या संपर्कात येऊन तो बद्ध होतो.. प्रकृतीवर प्रभूत्व गाजवण्याचा प्रयत्नात जीवाला त्याचं मूळ अस्तित्व, त्याच्या बरोबर वास करणारा परमात्मा यांचा विसर होतो.. 
पण जो हे परमात्मा तत्व जाणतो, गुणांसह प्रकृतीला जाणतो, पुरुष/जीव निर्गुण तर प्रकृती सगुण आहे हे जाणतो तो सर्व प्रकारची कर्मं करत असला तरी जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकत नाही.. कोणी ध्यानाद्वारे शुद्ध झालेल्या मनानं, समबुद्धीनं परमात्म्याला पाहतात तर कोणी ज्ञानयोगानं तर कोणी कर्मयोगानं परमात्म्याला जाणतात.. ज्यांना आत्म्याचं, परमात्म्याचं ज्ञान नाही असे गुरुमुखातून हे ज्ञान ऐकून परमतत्वाची उपासना करतात आणि ते देखील मृत्यूला तरुन जातात.. 

थोडक्यात,   
सर्व देहांमध्ये साथ देणाऱ्या ह्या परमात्म्याला जो पहातो, नश्वर देहातील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधी ही विनाश होत नाही हे जाणतो तो यथार्थ ज्ञानी होय.. 
आत्मा हा अकर्ता आहे आणि भौतिक प्रकृतीद्वारे शरीर सर्व कर्मं करतं हे जो जाणतो तो खरा तत्वज्ञ.. चराचरातील सर्व प्राणिमात्रांचा, जीवांचा असलेला भिन्नपणा न पाहता जीवांचा कसा विस्तार झाला आहे हे जो पाहतो, परमात्मा सर्वत्र कसा भरला आहे हे तत्व जो जाणतो तो उत्तम गतीला पोचतो, ब्रह्माची प्राप्ती करतो..
परमात्मा अनादि, निर्गुण, अकर्ता, अविनाशी आहे.. त्यामुळं तो कशानंही बद्ध होत नाही.. ज्याप्रमाणं सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो त्याप्रमाणं शरीरात असणारा जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो.. चेतना हे जीवात्म्याचं लक्षण आहे.. जीवात्म्याची चेतना जरी गुणात्मक दृष्टीनं परमचेतनेशी एकरूप असली तरी ती श्रेष्ठ नाही.. एका विशिष्ट शरीरातील चेतना दुसरं शरीर व्याप्त करू शकत नाही.. हाच परमचेतना आणि जीवचेतनेतील फरक आहे.. 

ज्ञानचक्षूनं जे क्षेत्र, क्षेत्रज्ञ यातील भेद पाहून भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग जाणतात ते परमलक्ष्याची प्राप्ती करतात हे सांगून श्रीभगवान अध्यायाची सांगता करतात.. 

शरीर असे क्षेत्र अन क्षेत्रा जाणे तो क्षेत्रज्ञ 

बद्ध शरीरी वसती आत्म्यासंग परमात्मा भगवंत 

परमात्मा जाणे आत्मा अन आत्मा जाणे शरीर 

भगवंत असे परमक्षेत्रज्ञ जाणे आत्मा अन शरीर ।।१।।


चोवीस तत्वांच्या कार्यक्षेत्रा म्हणती शरीर 

उत्पत्ती-विकास-स्थिती-प्रजनन-क्षय-विनाश स्थित्यंतरं

जीवात्मा असे अनादि, अविनाशी, अकर्ता, निर्गुण  

राहून शरीरी ही असतो भिन्न, नसती त्यासी स्थित्यंतरं ।।२।।


जीवात्मा-परमात्मा असती नित्य, ना त्यांसी जन्मकाल 

जीवात्मा वसतो शरीरी अन परमात्मा व्यापक चराचरी 

जीवात्मा ज्ञानमयी तर परमात्मा ज्ञेयस्वरूप परमनियंता

उद्धरे साधक अभ्यासता सत-असतपरे प्रकाशमयी ज्ञाना ।।३।।


प्रकृती-क्षेत्र अन पुरुष-क्षेत्रज्ञ शक्तितत्त्वं भगवंतांची

अनादि अनंतकाले ऐक्याने करतात निर्मिती सृष्टीची

आकार घेती कर्में संयोगता त्रिगुण अन इंद्रियविकार

वासना-इच्छा-आसक्ती सुरु राही जन्म-मृत्यूचा फेर ।।४।।


जाणूनी हा 'क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग' प्रभुमुखातून

होऊ ब्रह्मज्ञानी पाहून परमात्मा क्षेत्र-क्षेत्रीय भेदातून 

असे आत्मा निर्गुण अकर्ता अन करे प्रकृती सारे कर्म 

राहून तटस्थ जाणणे प्रकृतिकार्य हा परमलक्ष्याचा मार्ग ।।५।।


हरी तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  

 


*पंचमहाभूतं : पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश 
*ज्ञानेंद्रियं : कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा 
*कर्मेंद्रियं : वाणी, पाय, हात, उपस्थ आणि गुदा   
*इंद्रियविषय :शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध  


-मी मधुरा.. 

************************************************