Friday, October 3, 2025

अध्याय १० 'विभूतियोग'

 
श्रीपरमात्माने नमः 
अध्याय १० 'विभूतियोग'
(श्रीभगवंतांचे *ऐश्वर्य )



आत्तापर्यंत आपण भगवद्गीतेच्या पूर्वखंडाचा अभ्यास केला.. पहिल्या अध्यायात आप्तस्वकीयांबरोबर युद्ध करणं अयोग्य असं वाटणाऱ्या 'अर्जुनाचा विषाद' पाहिला.. दुसऱ्या अध्यायात 'सांख्ययोग' म्हणजेच परमार्थयोग समजून घेताना कर्मयोग आणि ज्ञानयोग याचा अभ्यास केला.. तिसऱ्या अध्यायात 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' - केवळ 'कर्मयोग' पाहिला.. तर चौथ्या अध्यायात तेच कर्म ज्ञानासह अभ्यासलं.. पाचव्या अध्यायात योगतत्वास आरंभ झाला तर सहाव्या अध्यायात तेच योगतत्व आसनविधीपासून आत्म्याचं परमात्म्याशी ऐक्य होईपर्यंत विस्तारानं समजून घेतलं.. अष्टांगयोग आणि योगभ्रष्टास मिळणारी गति याचा अभ्यास केला.. सातव्या अध्यायात प्रकृतीचा उगम आणि परिहार, भक्तांचे चार प्रकार- आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी- हे पाहिलं.. आठव्या अध्यायात ब्रह्म, अध्यात्म यांचं स्पष्टीकरण करून अंत्यसमयी चित्तशुद्धी कशी करावी हे अभ्यासलं.. तर भौतिक जीवनातील सर्व दुःखापासून मुक्त होऊन स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठीची एक जीवनपद्धती, जीवनाचं खरं रहस्य नवव्या अध्यायात समजून घेतलं.. 

भगवद्गीतेच्या उत्तराखंडातील हा पहिला अध्याय *'विभूतियोग'.. 'विभूती' म्हणजे विशेष शक्ती, सामर्थ्य, तेज.. वि म्हणजे विशेष आणि भूती म्हणजे जीव.. असा जीव ज्यात काही विशेष आहे.. म्हणजेच आत्मा, चैतन्य, परमात्म्याचा अंश.. आणि आपल्यातील परमात्म्याला, चराचरातील भगवंताला जो जाणतो असा ज्ञानी म्हणजे विभूती.. म्हणून श्रीभगवान अर्जुनाला सांगतात कि जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे त्याठायी भगवंतभाव जाणणं म्हणजे 'विभूती' जाणणं.. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत आहे ते आणि ते जाणणारा दोघही विभूतीतत्वाला पोचतात.. 
नवव्या अध्यायात सांगितलेलं परम गोपनीय ज्ञान भक्तिपूर्वक आणि अभ्यासू वृत्तीनं अर्जुनानं ऐकल्यानं प्रसन्न झालेले श्रीभगवान ह्या अध्यायात मुख्यत्वेकरून त्यांच्या विभूतींबद्दल, त्यांच्या अभिव्यक्तीबद्दल, त्यांच्या विश्वातील अस्तित्वाबद्दल सविस्तरपणे सांगतात.. आणि 'जगात असं काहीही नाही कि जेथं माझं अस्तित्व नाही' असं सांगून ह्या अध्यायाची सांगता करतात.. 

'जन्म कर्म च मे दिव्यमेवं'- जन्म आणि कर्मांनी अलौकिक- असणारे श्रीभगवान अर्जुनाला ह्यापूर्वी सांगितलेल्या परमगोपनीय ज्ञानापेक्षाही श्रेयकर असं परमवचन ह्या अध्यायात सांगत आहेत.. आपल्या *ऐश्वर्याचं आणि आपल्या कार्याचं परमगोपनीय ज्ञान प्रदान करत आहेत.. ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणं श्रीकृष्णच स्वयं परमेश्वर आहेत.. त्यांच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही.. तेच सर्व कारणांचं कारण आहेत.. देवदेवता, महर्षी या सगळ्यांचं उत्पत्तिस्थान आहेत.. परंतु मोठमोठ्या देवदेवता, महर्षी सुद्धा भगवंतांच्या अशा अवतारांना, स्वरूपाला जणू शकत नाहीत.. अजन्मा, अनादि असणाऱ्या भगवंतांना, त्यांच्या ह्या स्वरूपाला जो कोणी जाणतो, त्यांना सर्वलोकांचा अधिपती म्हणून पाहतो तो अध्यात्मिक साक्षात्कार झालेला ज्ञानी होय..   

अध्यायाच्या सुरुवातीलाच भगवंत विश्वाची वंशावळ सांगतात.. ब्रह्मदेव हा भगवंतांच्या हिरण्यगर्भ नामक शक्तीपासून निर्माण झालेला प्रथम जीव.. ब्रह्मदेवापासून *चार महर्षी नंतर रुद्र आणि *सात ऋषी निर्माण झाले.. आणि  यांच्यापासून इंद्रादी लोकपाल.. या लोकपालांपासून पुष्कळ प्रकारचे जीव उत्पन्न झाले.. म्हणून सप्तर्षी आणि महर्षींना संपूर्ण ब्रह्माण्डातील जीवांचे प्रजापती असं म्हणतात.. 
जीवांच्या विविध गुणदोषांचं, विकारांचं, भावगुणांचं उत्पत्तिस्थान भगवंत आहेत.. प्राकृत आणि अध्यात्मिक जगताचा उत्पत्तिकर्ता ही भगवंत आहेत.. सर्वकाही त्यांच्या अधीन आहे.. हे जाणून जो भगवंतांना भजतो, भक्तीत लीन होतो, रममाण होतो, भगवंत सेवेसाठी समर्पित होतो तो शुद्ध भक्त होय.. 

पुढं श्रीभगवान 'बुद्धियोगा'बद्दल सांगतात.. परमात्मभावना भावित कर्म म्हणजे बुद्धियोग.. भक्तिभावानं परमात्म्याचा, भगवंतांचा स्वीकार करून भगवंतधामी जाण्याचा प्रयत्न म्हणजे बुद्धियोग.. जेव्हा ध्येय निश्चित होते तेव्हा ध्येयप्राप्तीचा मार्गावरून उत्तोरोत्तर प्रगती करत ध्येयाप्रत पोचता येते.. ह्या ध्येयाप्रत पोचण्यासाठी जो कर्मफलांत आसक्त असतो तो कर्मयोगी, जो ज्ञानाचा आधार घेतो तो ज्ञानयोगी आणि जो परमात्मभावनेत, भक्तीत संलग्न होतो तो भक्तियोगी किंवा बुद्धियोगी होय.. भक्तियोग किंवा बुद्धियोग हाच परिपूर्ण योग आहे.. जीवांची परमोच्च सिद्धावस्था आहे.. 
असा बुद्धियोगी जरी आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करण्या इतका ज्ञानी नसला तरी भगवंत त्याला त्याच्या अंतःकरणातून साहाय्य करतात.. म्हणून भगवंत भक्तीमध्ये युक्त असलेला भक्त कधीही अज्ञानी राहू शकत नाही..   

अजन्मा, अविनाशी, अनादि, तेजस्वी आणि सर्वव्यापक परमतत्वाबद्दल जाणल्यावर, परमतत्व आणि जीव ह्यातील भिन्नता समजल्यावर अर्जुन परब्रह्म, परमश्रेष्ठ श्रीभगवंतांपुढं त्यांच्या अद्भुत विभूतींबद्दल उत्सुकता व्यक्त करतो.. ज्या विभूतीच्या योगानं श्रीभगवान त्रैलोक्यात व्यापून राहिले आहेत त्या विभूती विस्तारानं सांगण्याची विनंती करतो.. 

अध्यात्मिक तसेच भौतिक जगतात भगवंतांच्या शक्ती विविध अभिव्यक्तींच्या आणि प्रतिनिधींच्या रूपानं विखुरलेल्या आहेत.. माऊली म्हणतात, 'अंगीचिया रोमा किती। जयाचिया तयासि न गणवती। तैसिया माझ्या विभूती। असंख्य मज।।'.. ज्याप्रमाणं आपल्या अंगावरील केस आपण स्वतः सुद्धा मोजू शकत नाही त्याचप्रमाणं त्यांच्या विभूती ही मोजता येणं शक्य नाही.. 
म्हणून साधारण मनुष्य ज्या विभूतींचा प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो फक्त त्याच विभूतींचं वर्णन श्रीभगवान पुढं करतात.. 
  • सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित परमात्मा मी आहे.. आणि सर्व जीवांचा आदी, मध्य आणि अंत म्हणजेच उत्पत्ती, स्थिती आणि लय ही मीच.. 
  • अदितीच्या बारा पुत्रांमध्ये म्हणजे आदित्यांमध्ये विष्णू मी.. तेजस्व्यांमध्ये किरणशाली सूर्य मी.. *मरुतगणांमध्ये *मरीची मी आणि नक्षत्रांत चंद्रमा ही मीच..
  • वेदांमध्ये सामवेद मी.. देवतांमध्ये स्वर्गाचा राजा इंद्र मी.. इंद्रियांतील मन मी आणि प्राण्यांमधील चैतन्य ही मीच.. 
  • अकरा रुद्रांमध्ये शंकर मी.. यक्षराक्षसांमध्ये कुबेर मी.. वसूंमध्ये अग्नि मी आणि पर्वतांमध्ये मेरु ही मीच.. 
  • पुरोहितांमध्ये इंद्राचं पौरोहीत्य करणारा बृहस्पती मी.. सेनापतींमध्यें कार्तिकेय मी आणि महर्षींमध्ये भृगू ही मीच.. 
  • देवर्षींमध्ये नारद मी.. गंधर्वांमध्ये चित्ररथ मी.. सिद्धपुरुषांमध्ये कपिलमुनी मी आणि वृक्षांमध्ये अश्वस्थ (पिंपळ) ही मी..
  • ध्वनींमध्ये ॐकार मी.. यज्ञांमध्ये जपयज्ञ मी.. अचल हिमालय मी आणि अथांग समुद्र ही मीच..
  • अश्र्वांमध्ये अमृतमंथनात उत्पन्न झालेला 'उच्चैःश्रवा' अश्र्व मी.. गजेंद्रामध्ये ऐरावत मी, गायींमध्ये सुरभी मी तर सर्पांमध्ये वासुकी मी.. 
  • शस्त्रांमध्ये वज्र मी.. प्रजोत्पत्ति करणारा कामदेव मी.. नागांमध्ये अनंत मी.. आणि जलाचारांमध्ये वरुण ही मी..  
  • मनुष्यांमध्ये राजा मी.. पितरांमध्ये आर्यमा मी आणि नियमन करणाऱ्यांत मृत्यूचा नियंता यमदेव ही मीच.. 
  • दैत्यांमध्ये भक्तराज प्रल्हाद मी.. दमन करणाऱ्यांत काळ मी.. पशूंमध्ये सिंह तर पक्ष्यांमध्ये गरुड मी.. 
  • पवित्र करणाऱ्यांत वायू मी.. शस्त्रधरांमध्ये राम मी.. जलचर प्राण्यांत शार्क मी आणि नद्यांमध्ये गंगा ही मीच.
  • सर्व सृजनांचा आदि-अंत-मध्य मीच.. सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मी आणि तर्कशास्त्रात निर्णायक सत्य ही मी.. 
  • वर्णमालेत 'अ'कार मी आणि समासांमध्ये *द्वंद्वसमास मी.. अविनाशी काळ मी आणि सृष्टीकर्त्यांत ब्रह्मदेव ही मीच..
  • सर्वहरण करणारा मृत्यू मी आणि भविष्यात अस्तित्वात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंचं कारण ही मीच..
  • कीर्ति, भाग्य, वाणी, स्मृति, बुद्धी, धैर्य व क्षमा ही स्त्रीवाचक ऐश्वर्ये ही मी.. 
  • सामवेदातील *बृहत्साम मी.. छंदांमध्ये *गायत्री मी.. मासांमध्ये मार्गशीर्ष तर ऋतूंमध्ये वसंत मी.. 
  • तेजस्व्याच तेज मी, विजय मी, साहस मी.. बालवानांचं बल मी आणि द्यूत, जुगार ही मीच.. 
  • यादवांमध्ये वासुदेव मी.. पाडंवांमध्ये धनंजय मी.. मुनींमध्ये व्यास तर कवींमध्ये शुक्राचार्य मी..
  • शासन करणाऱ्यांचं साधन 'दंड' मी.. जयाची इच्छा करणाऱ्यांमधली नीती मी.. रहस्यातील मौन मी आणि ज्ञानी लोकांचं ज्ञान ही मीच..
थोडक्यात, भगवंतांच्या दिव्य विभूतींना अंत नाही.. भगवंत संपूर्ण सृष्टीचे बीज आहेत.. संपूर्ण चराचराच्या अस्तित्वात ते आहेत.. 
"जे काही ऐश्वर्ययुक्त, शोभायुक्त किंवा प्रभावयुक्त आहे ते सर्व माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालं आहे असं समज.. हे संपूर्ण विश्व, मी माझ्या एका अंशानं व्यापून धारण केलं आहे.." असं सांगून श्रीभगवान ह्या अध्यायाची सांगता करतात.. 

ऐक अर्जुना, गुह्य ज्ञान सांगतो तुझ्या हितार्थ 

जाणून अभिव्यक्ती रूप माझे होईल जन्म कृतार्थ 

जाणती देवदेवता ऋषी-महर्षी उगमस्थान तयांचे 

असे मीच आदिकारण जाण मूळ बीज हे सृष्टीचे ।।१।।


जाणेल जो मज अजन्मा अनादी स्वामी सर्व जगताचा 

होईल पापमुक्त होता साक्षात्कार ह्या परमसत्याचा 

भजती जे मज शुद्ध अंतःकरणे होऊन संलग्न भक्तीत  

वसे चित्त मजठायी तयांचे करून जीवन सेवा समर्पित ।।२।।


आदि-मध्य-अंत अन सारा जगत पसारा मी 

जीवा अंतर्यामी स्थित चैतन्य परमात्मा ही मी 

मन मी, गंगा मी, सुरभी मी, अनंत अन वासुकी मी  

शिव-ब्रह्मा, देवदेवता, ऋषी मुनी उगमस्थान ही मी ।।३।।


ॐकार मी, जपयज्ञ मी, हिमालय अन सागर मी  

अश्वत्थ मी, गंधर्व मी, कुबेर मी, चंद्र-सूर्य ही मी

सामवेद मी, इंद्र मी, मेरू मी, वायू-अग्नी-वरूण मी 

वसे ब्रह्माण्ड माझ्यात अन अनंत विभूती ब्रह्माण्डात मी ।।४।।


जाणूनी हा 'विभूतीयोग' प्रभुमुखातून

होऊ परमभक्त परमज्ञानी भगवतकथा अन ऐश्वर्य श्रवणातून  

जे जे उत्तम उदात्त उन्नत उर्जित सुंदर त्यासी असती भगवंत कारण

उरे जीवात्मा-परमात्मा अंतर स्वीकारता हे परमगुह्य आदिकारण  ।।५।।


हरी तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  



*विभूती: अमरकोश शब्दकोशानुसार विभूती म्हणजे विलक्षण ऐश्वर्य.. 
*ऐश्वर्य: बल, यश, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य ही सहा ऐश्वर्ये.. आणि ह्या ऐश्वर्यांनी परिपूर्ण असं श्रीकृष्णाचं जीवन.. म्हणून भगवान श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान असं म्हणतात.. 
*चार महर्षी: सनक, सनंद, सनातन आणि सनतकुमार..  
*सात ऋषी: अगस्त, अत्री, भारद्वाज, गौतम, जमदग्नी, वशिष्ठ आणि विश्वामित्र..
*द्वंद्वसमास: संस्कृत भाषेत अनेक सामासिक शब्द आहेत.. उदा. रामकृष्ण या समासाला द्वंद्वसमास म्हणतात.. यामध्ये राम आणि कृष्ण हे दोन्ही शब्द प्रधान आहेत..   
*मरुतगण: वायूगण.. आकाशात पन्नास प्रकारचे विविध वायू प्रवाहित असतात.. 'मरीची' ही त्यांची देअधिष्ठात्री देवता, श्रीभगवानांचा प्रतिनिधी.. 
*बृहत्साम: एक अत्यंत मधुर असं गानसूक्त जे मध्यरात्री गायलं जातं.. 
*गायत्री: भगवत साक्षात्कारासाठी गायला जाणारा लयबद्ध वृत्तबद्ध असा गायत्री मंत्र..  


-मी मधुरा.. 

************************************************