Sunday, November 23, 2025

अध्याय ११ 'विश्वरूपदर्शनयोग'

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय ११ 'विश्वरूपदर्शनयोग' 




दहाव्या 'विभूतियोग' अध्यायात श्रीभगवानांनी आपल्या अनंत विभूतीबद्दल, विश्वातील त्यांच्या अस्तित्वाबद्दल भाष्य केलं.. जगात असं काहीही नाही कि जिथं श्रीभगवंतांच, परमात्म्याचं अस्तित्व नाही.. भगवंत हे सर्व कारणांच आदिकारण आहेत.. उगमस्थान आहेत.. असा परमगुह्य अध्यात्मिक ज्ञानोपदेश ऐकल्यावर अर्जुन श्रीभगवानांना आपला मोह नष्ट झाल्याचं सांगतो आणि इथंच 'विश्वरूपदर्शनयोग' अध्यायाची सुरुवात होते..

'विश्वरूपदर्शन' माऊलींनी ज्ञानेश्वरीत खूप छान रंगवून विस्तारून सांगितलं आहे.. ते ह्या अध्यायाला 'भगवंतांचं विश्रंतीस्थान' असं म्हणतात.. कारण ह्या अध्यायात भगवंतांनी त्यांचं विश्वरूप दाखवलंय.. अर्जुन ते पाहतो आहे आणि संजय त्याचं वर्णन महाराज धृतराष्ट्रांना सांगतो आहे.. एकूण ५५ श्लोकांपैकी १०-१२ श्लोकच भगवंतांच्या मुखी आहेत.. शांत आणि अद्भुत रसांनी परिपूर्ण असं हे विश्वरूपदर्शन.. सुरुवातीला ही चराचर सृष्टी उत्पत्ती रूपात शांतरसात श्रीभगवंतांत सामावलेली दिसते तर नंतर सृष्टीचा लय होताना रौद्ररूपात अद्भुत रसात सामावताना दिसते.. हे दोन रस जरी मुख्यत्वे दिसत असले तरी भक्तीरस, करुणारस, भयरस असे नऊ रस इथं आहेत.. माऊली त्याला 'नवरसांची निवाळी' असं म्हणतात.. मीनले गंगे यमुनेचे ओघ। तैसे रसा जहाले प्रयाग। म्हणोनि सुस्नात होत जग। आघवे एथ।।- म्हणजेच गंगा यमुना नद्यांप्रमाणं शांत आणि अद्भुत दोन्ही रस मिळून हा अकरावा अध्याय प्रयाग झाला आहे.. माजी गीता सरस्वती गुप्त। आणि दोन्ही रस ते ओघ मूर्त। या लागी त्रिवेणी हे उचित। फावली बापा।।- ह्या दोन्ही रसांच्या संगमात गीतारूपी तिसरी सरस्वती गुप्त आहे. म्हणून हा अध्याय त्रिवेणी संगमाचा योग आहे.. ह्या तीर्थात भक्तिभावनेनं स्नान करून, भगवंताच्या विश्वरूपाचं दर्शन घेऊन जन्ममरणरूप संसाराला तिलांजली द्यावी असं ह्या अध्यायाची माहिती सांगताना माऊली म्हणतात..

तर अध्यायाची सुरुवात अर्जुन उवाचन होते.. अर्जुन म्हणतो, माझ्यावर कृपा करण्यासाठी तुम्ही मला जो परमगुह्य असा अध्यात्मिक उपदेश केला, त्यानं माझं अज्ञान, माझा सर्व मोह नाहीसा झालाय.. मी-माझं ह्या फेऱ्यात अडकून मी माझ्या देहाचा अभिमान बाळगून होतो.. कौरवांना आप्त समजून, त्यांना मारून होणाऱ्या पापानं घाबरलो होतो.. पण तुम्ही मला जागृत केलं.. जीवाची उत्पत्ती-लय, जीवाची जीवनप्रणाली कर्म-ज्ञान-भक्ती याबद्दल मी तुमच्याकडून सविस्तर ऐकलं.. तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती घेतली.. तुम्ही वर्णन केल्याप्रमाणं ह्या भौतिक सृष्टीतील तुमचं व्यापक रूप पाहण्याची माझी इच्छा आहे.. आणि ते पाहण्याची माझी योग्यता आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्या अविनाशी स्वरूपाचं मला दर्शन घडवा.. 

अर्जुनाचे हे बोल ऐकून उल्हासित झालेले श्रीभगवान त्यांचं अलौकिक ऐश्वर्य, नानावर्णांनी युक्त अशी सहस्रावधी रूप दाखवण्यासाठी सज्ज झाले.. नातरी चंद्रबिंब वाटोळें।देखोनि क्षीरसागर उचंबळे। तैसा दूणेही प्रेमबळें। उल्लसितु जाहला।। म्हणजेच ज्याप्रमाणं चंद्रबिंब पाहून क्षीरसागराला भरती येते त्याप्रमाणं अर्जुनाचे बोल ऐकून प्रेमानं  श्रीभगवान उचंबळले.. आणि आपल्या शेकडो, हजारो नाना प्रकारच्या, नाना रंगाच्या, नाना आकाराच्या अलौकिक रूपाचा पिसारा फुलवला.. आणि म्हणाले, आता देखें अवघें भरिलें। माझ्याचि रूपीं। माझ्याच स्वरूपात सर्व जग भरलेलं आहे हे बघ.. माझ्या ह्या रूपांचा पार लागणारा नसून, ह्या एक एक रूपाच्या, एक एक अवयवावर सर्व जग भरलेलं आहे ते तू बघ.. माझ्यामध्ये अदितीच्या बारा पुत्रांना, आठ वसूंना, अकरा रुद्रांना, दोन्ही अश्विनीकुमारांना आणि एकोणपन्नास मारुद गणांना बघ.. पूर्वी कधीही पहिली नाहीस अशी आश्चर्यकारक रूपं ही बघ.. माझ्या शरीरात एकत्रित आलेलं चाराचारासह संपूर्ण विश्व आणि त्या विश्वापलीकडचं तुला आणखी काही पाहायची इच्छा असेल तर ते पण बघ.. 
परंतु ह्या विश्वरूपाला चर्मचक्षूंनी पाहणं शक्य नाही म्हणून श्रीभगवान अर्जुनाला दिव्यदृष्टी देतात की जिच्या साहाय्यानं तो ईश्वरी योगशक्ती पाहू शकेल.. 
अशीच दिव्यदृष्टी संजयला ही मिळाली होती - महाराज धृतराष्ट्रांना युद्धभूमीवरचं वर्णन ऐकवण्यासाठी.. आणि त्यामुळंच संजयला ही भगवदगीता ऐकण्याचं आणि विश्वरूपदर्शनाचं भाग्य लाभलं आणि संजयामुळं महाराज धृतराष्ट्रांना..  

ह्या विश्वरूपाचे वर्णन करताना संजय म्हणतो- 
महायोगेश्वर आणि सर्वपापांचा नाश करणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला ऐश्वर्ययुक्त दिव्यस्वरूप दाखवलं.. असंख्य मुखं, असंख्य नेत्र असलेलं, अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेलं, दिव्य वस्त्रं आणि माळा धारण केलेलं, तसंच अनेक दिव्य गंधानं विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्यानं युक्त, अनंतस्वरूप, तेजस्वी आणि सर्वव्यापी विराटस्वरूप परमदेव परमात्मा.. असं विश्वरूप ज्याला आदि ना अंत.. 
अर्जुनाची स्थिती वर्णन करताना माऊली म्हंणतात, बाहेर दिठी उघडोनि पाहे। तव आघवे मूर्तिमय देखत आहे। मग आता न पाहे म्हणोनि उगा राहे। तरी आतूही तैसेचि।।.. म्हणजेच, हे दिव्यरूप पाहून भांबावलेल्या अर्जुनानं डोळे मिटून घेतले पण तरी त्याला अंतर्यामी विश्वरूपच दिसू लागले.. बाहेर-मनात सर्वत्र विश्वरूप व्यापून राहिले.. 

संजय पुढं म्हणतो, आकाशात हजार सूर्य एकदम उदयाला आले तर जो प्रकाश पडेल, तो त्या विश्वरूप परमात्म्याच्या तेजाशी कदाचित बरोबरी करू शकेल.. अशा तेजस्वी परमात्म्यात एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनेक ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्माण्डाची विस्तृत रूपं.. अनेक भागांत विभागलेल्या संपूर्ण सृष्टीचं भगवंतांच्या शरीरात एकत्रितपणे सामावणं.. हे पाहून आश्चर्यचकित झालेल्या अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले.. आणि तो त्या प्रकाशमान विश्वरूप परमात्म्यासमोर श्रद्धा आणि भक्तीनं नतमस्तक झाला.. 
 
कुरुक्षेत्री युद्धभूमीवर आप्तस्वकीयांना समोर पाहून दुविधेत सापडलेल्या अर्जुनाचं मनोबल वाढवण्यासाठी श्रीभगवानांनी गीतोपदेश करायला सुरुवात केली.. आत्मा अमर आहे.. त्याला कोणीही मारू शकत नाही.. त्यामुळं तू तुझं कर्म कर.. फळाची इच्छा करू नको.. सगळं कर्म मला अर्पण कर.. माझ्या इच्छेशिवाय जगात काहीच होत नाही.. सर्वत्र मीच भरून राहिलो आहे.. श्रीभगवान ज्ञान देत गेले आणि अर्जुन प्रश्न विचारून शंकांचं समर्थन करून घेत गेला.. आणि आता ह्या अंतिम सत्याचं, परमब्रह्म परमात्म्याचं विश्वरूपातील दर्शन झाल्यावर, त्या रूपापुढं अर्जुन नतमस्तक होतो आणि म्हणतो-  
"हे भगवन, मी आपल्या दिव्य देहात, सर्व देवांना तसंच अनेक प्राण्यांच्या समुदायांना, कमलासनावर विराजमान ब्रह्मदेवाना, कैलासावर पार्वतीसह श्रीशंकराना, सर्व ऋषींना तसंच दिव्य सर्पांना पाहतो.. आपल्याला अनंत बाहू, अनंत उदरे, अनंत मुखं आणि अनंत नेत्रं तसंच सर्व बाजूनी अनंत रूपं आहेत.. मला आपला ना आरंभ दिसत आहे ना मध्य ना अंत.. मी आपल्याला मुकुटधारी, गदा व चक्रधारी, तेजपुंज, सर्व बाजूनी दैदिप्यमान, प्रज्वलित अग्नी आणि सूर्याच्या तेजानं युक्त, पाहण्यास अतिशय कठीण, आणि सर्व बाजूनी अमर्याद असं पाहतोय.. आपणच जाणण्याजोगे परब्रह्म परमात्मा आहात.. आपणच ह्या जगाचे परम आधार आहात.. आपणच शाश्वत धर्माचे रक्षक आहात.. आपणच अविनाशी सनातन पुरुष आहात असे मला वाटतं.."  

"आपण आदि, मध्य आणि अंतरहित, अनंत सामर्थ्यानं युक्त असे आपले अनंत बाहू, चंद्र व सूर्य हे आपले नेत्र.. आपल्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तेजानं तप्त करत आहे.. तुम्ही एकट्यानंच संपूर्ण अंतरिक्ष, ग्रहलोक आणि त्यांच्यातील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत.. आपलं हे अलौकिक आणि भयंकर रूप पाहून तिन्ही लोक अत्यंत भयभीत झाले आहेत.. देवगणांचे काही समुदाय आपल्यात शिरत आहेत तर काही भयभीत होऊन हात जोडून आपल्या नावांचं व गुणांचं वर्णन करत आहेत.. तसंच महर्षी व सिद्धांचे समुदाय 'स्वस्ति - सर्वांचे कल्याण होवो' अशी मंगलाशा करून उत्तोमोत्तम स्तोत्रं म्हणून आपली स्तुती करत आहेत.. रुद्रगण, आदित्यगण, वासूगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनीकुमार, मरूदगण, पितृगण तसेच गंधर्व, यक्ष, राक्षस हे सर्व मोठ्या उत्कंठतेनं आपलं विश्वरूप पाहात आहेत.. 
आपले अनेक नेत्र, मुखं, भुजा, जांघा, पाय, उदरे, आणि अनेक अक्राळविक्राळ दाढा असणारे महाकाय रूप पाहून सर्व लोक व्याकुळ होत आहेत.. तसेच मी ही व्याकुळ झालो आहे.. अनेक तेजस्वी वर्णानी युक्त आपण, आकाशास भिडलेली आ वसलेली आपली मुखं आणि तेजस्वी विशाल असे नेत्रं पाहून माझं अंतःकरण भयभीत झालंय.. आणि माझं धैर्य आणि शांती नाहीशी झाली आहे.. मी गोंधळून गेलो आहे.."

आधीच भयभीत झालेल्या, गोंधळलेल्या अर्जुनाला धृतराष्ट्रपुत्र, भीष्म, द्रोण, कर्ण, उभय पक्षातील योद्धे आणि सैन्य त्या भयंकर आ वसलेल्या मुखांत मोठ्ठया वेगानं शिरताना दिसतात तर काही दातांच्या फटीत अडकलेले तर काहींच्या मस्तकाचा चुराडा झालेला दिसतो.. 
अनेक प्रज्वलित मुखांनी सर्वांना गिळंकृत करून जिभल्या चाटणारं, प्रखर तेजानं संपूर्ण विश्व होरपळून टाकणारं उग्ररूप पाहून तुम्ही नेमके कोण आहात? अशी विचारणा अर्जुन करतो..  
श्रीभगवान म्हणतात, "जगताचा नाश करणारा मी काळ आहे.. आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी इथं आलो आहे.. तू युद्ध केलं नाहीस तरी तुम्ही पांडव वगळता उभय सैन्यातील सर्व योद्धांचा विनाश होणारच आहे.. म्हणून तू उठ, युद्धास तयार हो.. यशप्राप्ती कर.. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे.. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत.. तू फक्त निमित्तमात्र हो.. व्यथित न होता केवळ युद्ध कर.."

श्रीभगवंतांचं हे वचन ऐकून भारावून गेलेला, त्यांचं उग्ररूप पाहून भयभीत झालेला अर्जुन सद् गतीत होऊन थरथरत्या हातानं त्यांना नमस्कार करतो.. 
हे अनंता, हे देवाधिदेवा, हे जगन्निवासा, ब्रह्मदेवापेक्षा ही श्रेष्ठ असे आदिसृष्टीकर्ता आपण आहात.. ह्या भौतिक सृष्टीच्या पलीकडं असणारं ब्रह्म आपण आहात.. परम अविनाशी सर्व कारणांचं कारण आपण आहात.. ह्या जगताचं आश्रयस्थान आहात.. सर्वज्ञ आहात, जे जे ज्ञेय आहे ते आपण आहात.. संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापून आहात.. वायू, अग्नी, जल, चंद्र-सूर्य आहात.. आदिजीव, ब्रह्मदेव, परमपिता ही आपणच आहात.. अनंतवीर्य, अपार शक्तींचे स्वामी असणाऱ्या सर्वव्यापी आपणाला पुढून, पाठीमागून आणि सर्वबाजूंनी नमस्कार असो..  

श्रीभगवंतांचा महिमा न जाणता, एक जिवलग सखा म्हणून मित्रसंबंधातून घडलेल्या अनौपचारिक कृतींबद्दल, अनादराबद्दल अर्जुन क्षमायाचना मागतो.. पिता जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे, पत्नी जसे आपल्या पतीचे अपराध पोटात घेते तसेच आपण ही माझे अपराध पोटात घ्या असं म्हणतो.. पूर्वी न पाहिलेलं आपलं हे आश्चर्यकारक विश्वरूप पाहून आनंदित झालो असलो तरी भयानं व्याकुळ ही झालो आहे त्यामुळं माझ्यावर प्रसन्न व्हा आणि आपलं पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा अशी विनंती करतो.. मुकुट धारण केलेलं, शंख चक्र गदा पद्म धारी चतुर्भुजरूप पाहण्याची इच्छा ही व्यक्त करतो.. 

योगशक्तीच्या प्रभावानं परम तेजोमय आणि आद्य असं आपलं विराटरूप श्रीभगवंतांनी अर्जुनाला ह्या प्राकृत जगतातच दाखवलं.. परमश्रेष्ठ असं हे विश्वरूप ना वेदाध्ययनानं ना यज्ञानं-दानानं ना पुण्यकर्मानं ना उग्र तपश्चर्येन पाहता येत.. विश्वरूप, चतुर्भुजरूप आणि नंतर द्विभूजरूप.. जे रूप पाहण्यासाठी देवतासुद्धा संधीच्या नित्य प्रयत्नात असतात.. हे केवळ अनन्य भक्तियोगानेच शक्य आहे.. जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संगातून मुक्त होऊन विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो भगवंताप्रीत्यर्थ कर्म करतो, भगवंताला जीवनाचं परमलक्ष्य मानतो आणि सर्व प्राणिमात्रांशी मित्रत्वानं वागतो तो निश्चितपणे भगवंताला प्राप्त होतो.. असं सांगून श्रीभगवान अध्यायाची सांगता करतात.. 

म्हणे अर्जुन, ऐकून अव्ययी विभूति वर्णन 

दूर मोह-माया-देहाभिमान अन मी-माझा अज्ञान

इच्छा मज मनी अनुभवावे हे व्यापक रूप 

असे योग्यता दावावे अविनाशी स्वरूप ।।१।।


दिव्य दृष्टी देतो पार्था तुजला पाहण्या विश्वस्वरूप 

सहस्र वदने, सहस्त्र बाहू, आश्चर्ययुक्त अनंतस्वरूप   

दिव्य शस्त्र-वस्त्र-गंध विभूषित, तेजस्वी विराटस्वरूप 

ना आदि ना अंत असे अंतर्बाह्य ऐश्वर्ययुक्त दिव्यस्वरूप ।।२।।


अगणित रवी तेजाने झळाळले परमात्म्याचे रूप  

एका परमात्म्याठायी दिसे विस्तृत ब्रह्माण्डाचे रूप 

जाणून परमसत्याचे रूप झाला नतमस्तक धनंजय 

पाहून दिव्यदृष्टी विश्वरूप धृतराष्ट्रा सांगे संजय ।।३।।


सर्वव्यापक, अलौकिक, भयंकर, महाकाय हे रूप 

वसलेल्या मुखात दिसती उभयपक्षातील लोकं 

गिळंकृत करून चिरडून रक्ताळलेल्या उग्र जिव्हा 

होरपळून टाकती पूर्ण विश्वा प्रखर तेजस्वी लाव्हा ।।४।।


देवा तुम्ही नेमके कोण? थरकापे, पुसे अर्जुन

असे मी काळांचा काळ, करण्या आलो संहार 

वधले आधीच सारे, केवळ तू निमित्य

करून युद्ध, मिळावं विजय होता व्यथित ।।५।।


जाणूनी हा 'विश्वरूपदर्शनयोगप्रभुमुखातून

होऊ विशुद्ध भक्त होऊन मुक्त सकाम कर्म अन तर्कवादातून     

यज्ञ-दान, पाप-पुण्य, तप-अध्ययन मार्ग हे निजधामाचे     

जन्म-मरण कर्म-अकर्म असती भगवंत कारण कारणांचे ।।६।।


हरी  तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥




-मी मधुरा.. 

************************************************