Monday, October 16, 2017

"आजीचा खाऊ"

शाळा सुरु होऊन महिना झाला सुद्धा! अडीच महिन्याच्या सुट्टी नंतर, जेव्हा शाळा सुरु होते, मुले शाळेत जातात , तेव्हा जीवाला थोडी शांतता मिळणार म्हणून एकीकडे मन खुश असते तर दुसरीकडे 'आता रोज डब्यात काय?' ह्या प्रश्नाला सामोरे जाताना थोडी धाकधूक हि असते. पण ह्यावेळी ऋचाने हा प्रश्न स्वतःहून सोडवला.. 'महिन्याचे लंच आणि स्नॅकचे कॅलेंडर' करून डायरेक्ट माझ्या हातात टेकवले... इतके व्यवस्थित कॅलेंडर पाहून मी थक्कच झाले. अगदी ब्रेकफास्ट पासून ते दुपारच्या स्नॅक पर्यंत सगळे त्यात होते. खाली तळटीप dinner : 'aai's choice' :-) हे झाले वीकडे चे... वीकएंड साठी 'आजीचा खाऊ' (असे मराठीत) किंवा eating out/special dinner असे लिहिले होते.. बापरे.. आता 'आजीचा खाऊ'  हि काय भानगड आहे? इथे कुठून आणू आजी? आणि ती हि खाऊ करणारी....



भारतात असते तर दोन्ही आजीनी वीकेंड च काय तर वीकडेला पण रोज वेगवेगळा खाऊ करून दिला असता.... भूक लागली असे म्हणायची वेळच आली नसती.. शिरा, पोहे, उपमा, वेगवेगळे लाडू.. नुसती ऐश.. wait a minute.. खरंच मी ऐश लिहिले का? आत्ता हि ऐश वाटते आहे पण त्यावेळी किती माजात आईला सांगायचे, 'आई भूक लागली आहे पण मला ते नेहमीचे शिरा-पोहे, चिवडा-लाडू नको.. काही तरी वेगळे कर..'... बिच्चारी आई.. मग ती कधी खमंग भाजणीचं थालीपीठ (वर छान लोण्याचा गोळा) तर कधी धिरडी तर कधी गुळपापडी असे करून द्यायची... घरी सतत कोणाचे न कोणाचे उपवास असल्याने शाबुदाणा खिचडी हा ऑपशन तर असायचाच.. तूप मेतकूट भात, फोडणीचा भात तर शिरा पोहे पेक्षा जास्त जवळचा वाटायचा.. आत्ता मिळणारे मॅग्गी, इन्स्टंट सूप असले पर्याय कधी नव्हतेच.. बाहेर जाऊन खायला रेस्टोरंट नव्हती पण ती कमी कधी जाणवली नाही. काही बदल, काही नवीन खावे वाटले तर आई नामक जेनी घरीच इडली, डोसा, पराठे, टोमॅटो ऑम्लेट, भेळ, पावभाजी असे प्रकार करायची.

अजुनी हि जेनी प्रत्येक भारतवारीच्या वेळी "मधा, तुला काय काय घेऊन जायचे आहे त्याची यादी पाठव हं.. म्हणजे माझ्या सवडीने मी सगळे करून ठेवेन". असे न चुकता सांगते. तिला कितीही सांगितले, आई तू नको हा व्याप करू, मी विकतचे घेऊन जाईन. ह्यावर तिचे ठरलेले उत्तर.. "मी आहे तोवर घेऊन जा नंतर आहेच विकतचे" कधी कधी प्रश्न पडतो का करतात आया असे? का इतके करतच राहतात? असो. विषयांतर नको.. नाहीतर ह्या विचारात "आजीचा खाऊ" मागे राहायचा..

शेवटी मी ऋचाला विचारले "आजीचा खाऊ" म्हणजे नक्की काय? तर म्हणाली अग, नाही का मला आवडते म्हणून आजीने ते काय काय दिले आहे, ते म्हणजे "आईचा खाऊ!" मला तिच्या उत्तराची कमाल वाटली.. खरंच ऋचाला आवडते म्हणून आई काय काय देत असते... थालीपीठाची भाजणी, चकली भाजणी, आंबोळ्यांचे पीठ, धिरड्याचे पीठ, लिंबाचे गोडे लोणचे, मेतकूट आणि ते  हि सगळे स्वतःच्या हातचे.. घरी केलेले. नाही म्हणून चालतच नाही. अग तुझ्यासाठी नाही माझ्या नातीसाठी करते आहे. तुझी मुलगी, ना कसल्या पोळ्या खाते ना कसले लाडू, ना कसल्या खिरी. जे खाते ते तरी घेऊन जा.. असे बोलून निरुत्तर करते... हो बाई कर.. तू केल्या शिवाय तुझ्या नातीला काही चांगले चुंगले खायला मिळायचे नाही. असे म्हणण्याशिवाय पर्याय राहत नाही.

ऋचाने दिलेले "आजीचा खाऊ" हे नाव एकदम पटले!! आजी जे कौतुकाने खाण्यासाठी देते तो खाऊ, "आजीचा खाऊ".. आपली खाद्य संस्कृती समृद्ध करून पुढच्या पिढीत ती पोचवणाऱ्या ह्या माउलीला हे सांगायलाच हवे.... पण त्या आधी आई ब्रँड सॉरी सॉरी आजी ब्रँड गोडामसाल्याची गरम आमटी, आजी ब्रँड  भाजणीत घोळवलेले वांग्याचे काप आणि भात असा फक्कड बेत करते... आणि मग तृप्त मानाने सांगते "तू ह्या जगातील बेस्ट कूक आहेस.. we love you and we love your खाऊ "आजीचा खाऊ"!!"

-मी मधुरा...
१५ सप्टेंबर २०१९


Friday, October 6, 2017

आई निघाली शाळेला..

'आई निघाली शाळेला' असे वाचून गम्मत वाटली असेल ना? आजकालच्या मुलांना आई शाळेत जाणे काही नवीन गोष्ट राहिली नाही. कधी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन साठी तर कधी जॉब मधील नवीन स्किल्स आत्मसात करायला आईला शाळेत जावे लागते. पण आमच्याकडे आई काही वेगळ्याच कारणासाठी शाळेत चालली आहे.. आमची हि आई 'योगा टीचर ट्रैनिंग' करणार आहे. ह्यातील 'टीचर' ह्या पार्ट बद्दल अजुनी ती शाशंक असली तरी योगाचे पूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी ती आतुर आहे. हि आई दुसरी कोणी नसून खुद्द 'मी'च आहे.


तर मी २०० तासाचे योगा टीचर्स ट्रेंनिंग करते आहे. साडेचार महिन्याच्या ह्या प्रवासाची सुरुवात उद्यापासून होईल. कोर्सला ऍडमिशन घेतल्यापासून 'दिल योगा योगा हो गया' असे काहीसे झाले आहे. वह्या, पुस्तके, नवीन कपडे,नवीन योगा मॅट त्याच बरोबर हे सगळे घेऊन जायला एक दप्तर काही विचारू नका... नवीन पुस्तकांचा वास किती छान असतो ना? हा वास मला नेहमी शाळेच्या दिवसात घेऊन जातो... तसे शाळेच्या तयारीचे हे मंतरलेले दिवस दरवर्षी जूनच्या सुरवातीला आठवतात. शाळेने दिलेल्या पुस्तके वह्याच्या लिस्ट बरोबर मारुतीच्या शेपटी प्रमाणे माझी वाढत जाणारी लिस्ट हि आठवते.. कंपासपेटी, नवीन युनिफॉर्म, नवीन दप्तराची खरेदी, लंच बॉक्स वॉटर बॉटल बरोबरच रेनकोट, छत्री, गमबूट...  


ह्या सगळ्यात माझी आवडती गोष्ट कोणती असेल तर वह्या पुस्तकांना कव्हर घालणे. अगदी लहान असताना बाबा पुस्तकांना कव्हर घालून द्यायचे. त्यांचे पाहून हळू हळू मी पण एकदम प्रो झाले. बाबांना दर शुक्रवारी सुट्टी असायची. त्यामुळे शाळा सुरु होण्या आधीचा शुक्रवार खास कव्हर घालण्यासाठी राखीव असायचा. विटकरी रंगाचा मोठ्ठा पेपर रोल आणला जायचा. कात्री, चिकटपट्टी, नावाचे स्टिकर्स सगळे घेऊन आम्ही मदत करायला सज्ज व्हायचो. हा कार्यक्रम चांगला दोन तीन तास चालायचा. नवीन वह्या पुस्तकाच्या वासाच्या धुंदीत वेळ कसा जायचा तेच कळायचे नाही. शाळा संपली आणि हे मंतरलेपण हि संपले. ऋचाला शाळेची पुस्तके घरी मिळत नसल्याने परत कधी कव्हर घालायची वेळच आली नाही. पण आता माझी कोर्स बुक्स पाहून परत कव्हर घालायची इच्छा होते आहे.. निदान एखाद्या पुस्तकाला तरी कव्हर घालून बघेन.


सगळी तयारी झाली असली तरी शाळेच्या पहिल्या दिवशीची हुरहूर मनात आहेच. क्लासमेट्स कोण असतील? टीचर्स कसे असतील? बाकी सगळे सांभाळून हे करायला जमेल ना? असे असंख्य प्रश्न मनात आहेत. पण उत्साह हि तेवढाच आहे.आता हि आई विद्यार्थिनींची जबाबदारी किती समर्थपणे पेलते हे पाहायचे..


-मी मधुरा...
६ ऑक्टोबर २०१७


Tuesday, October 3, 2017

परवलीचा शब्द/ संकेताक्षर

आज खूप दिवसांनी मायबोली साईटवर फेरफटका मारला तेव्हा 'परवलीचा शब्द' हे वाचून कोण आनंद झाला म्हणून सांगू.. ह्या शब्दाशी माझी पहिली ओळख मायबोलीमुळेच झाली आणि पहिल्या भेटीतच हा शब्द खूप भावला.. पासवर्ड ला मराठीत 'संकेताक्षर' म्हणतात हे माहिती होते पण 'परवलीचा शब्द' हे जरा हटकेच वाटले. अजुनही मला 'परवली' चा नेमका अर्थ माहिती नाही. तरी हि हा शब्द आपलासा वाटतो.


खरंच ह्या 'परवलीच्या शब्दा' ने आपले आयुष्य किती बदलले आहे ना.. आपले दैनंदिन आयुष्य अगदी व्यापून टाकले आहे. डिजिटल की, फिंगर प्रिंट हि मंडळी ह्याच भावकुळीतील!! माझा ह्या शब्दाशी परिचय झाला तो १९९२-९३ मध्ये! सांगलीत कॉम्पुटरचे वारे नुकतेच वाहू लागले होते.. आमच्या सारख्या कॉमर्स ग्रॅज्युएट साठी टायपिंग स्पीड बरोबर कॉम्पुटर ऑपरेटिंग येणे हा हुकमी एक्का होता. मग काय आमचे पाय आपसूकच त्या दिशेने वळाले. रितसर क्लासला ऍडमिशन घेतली... क्लास म्हणजे, एक ए.सी. रूम, रूम मध्ये आठ दहा कॉम्पुटर आणि त्या कॉम्पुटर वर त्या मशीनचे नाव आणि पासवर्ड.. आता आपला कॉम्पुटर आपण पासवर्ड वैगरे टाकून सुरु करायचा, wow!! किती छान!! असे नाही कि कॉम्पुटर कधी पहिला नव्हता पण कॉम्पुटरशी फक्त आणि फक्त गेम खेळण्यापुरता संबंध होता आणि तो हि बाबा तो सुरु करून द्यायचे. असो. तर त्यावेळी पासवर्ड हे प्रकरण उघडे पुस्तक असायचे. कधी कोणी मुद्दाम पासवर्ड बदलायचे..उगाचच त्रास देण्यासाठी.. आणि मग ह्या मशीनचा पासवर्ड काय म्हणून दंगा चालायचा. प्रोजेक्टसाठी जेव्हा स्वतः एक पासवर्ड प्रोग्रॅम केला तेव्हा लै भारी फीलिंग आले होते.

माझा स्वतःचा सिक्रेट पासवर्ड मिळाला तो १९९६ मध्ये जेव्हा मी emial account काढले. आणि तो गमतीचा शब्द, गमतीचा न राहता सिक्रेट झाला. मग हळू हळू ह्या शब्दाचे महत्व वाढतच गेले. बँक, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, सेल फोन्स, कॉम्पुटर, लॅपटॉप्स अश्या अनेक गोष्टींची किल्ली म्हणजे हा पासवर्ड झाला.. जितकी साधने तितके पासवार्ड्स.. आणि ते लक्षात ठेवण्याची जबाबदारी हि! काही पासवार्ड्स फक्त अंकांचे तर काही अंक आणि अक्षरे यांती युती दर्शवणारे! कमीतकमी इतकी अक्षरे, इतके अंक असे नियम पळत एकदाचा पासवर्ड तयार होतो. काही काही वेळा ठराविक कालावधी नंतर नवीन पासवर्ड तयार करावा लागतो. दरवेळी काय करणार नवीन??.. स्वतःचे नाव, आसपासच्या सगळ्यांची नावे, जन्मतारखा, मुळगाव, शाळा इरुन फिरून गाडी तिकडेच येते. कल्पनाशक्तीचा कस लागतो. पासवर्ड विसरला तर तो परत मिळवतानाची कथा वेगळीच. अमुक तमुक प्रश्नाची उत्तरे द्या आणि मिळावा तुमचाच पासवर्ड तुम्ही परत..

ऋचा लहानपणी पासवर्ड नामक गेम खेळायची. आजचा पासवर्ड सांग मग तुला पप्पी देईन.. पासवर्ड सांग मग उठेन.. पासवर्ड सांग मग मी तुला जाऊ देईन.. असे काही. पण जाम मजा यायची. मुद्दाम चुकीचा पासवर्ड सांगायचा आणि मग ती मला तीन चान्स द्यायची तो ओळखायला तर ठीक नाहीतर आता तू माझ्यावर प्रेमच करत नाहीस असे म्हणून ओठ काढून बसायची. पासवर्डचा असा गेम हि होऊ शकतो असा विचार कोणी तरी केला असेल का?

एकूण काय आपण सगळे ह्याच्या जाळ्यात अडकलेले क्षुद्र जीव आहोत.


-मी मधुरा...
२ ऑक्टोबर २०१७