Wednesday, March 25, 2020

माझी पाऊलवाट

शोधते आहे अशी एक पाऊलवाट, जी असावी 
स्वतःला दिसणारी अन् स्वत:मध्येच रमणारी
नागमोडी वळणांनी अनंतापर्यंत जाणारी….

शोधते आहे अशी एक पाऊलवाट, जेथे 
मुक्त भावनांचे गर्द निळे आकाश असावे
असंख्य स्वप्नांचे राजहंसी थवे दिसावे...  
सुप्त जाणिवांचा, नितळ मनाचा डोह असावा 
अन् स्व प्रतिमेत ही आश्वासक सोबतीचा भास व्हावा... 

शोधते आहे अशी एक पाऊलवाट, जेथे 
छेडता यावा स्वश्वासांचा सुरेल मल्हार 
थिरकावे मन होऊन स्वछंद, बेधुंद नृत्याविष्कार...
व्हावा परिसस्पर्श त्या मृदू भावनांना 
अन् झंकारावा रोमारोमात नाद गंधार तव स्मृतींचा...

शोधते आहे अशी एक पाऊलवाट, जेथे 
लकलकावेत आठवणींचे अनंत काजवे 
जादुई प्रकाशात विरून जावेत सारे रुसवे फुगवे... 
गरज न उरावी कोण्या सोबतीची
ओळख होता स्वतःचीच स्वतःशी...  

शोधते आहे अशी एक पाऊलवाट, जेथे 
अनुभवावे असे मुक्त, स्वानंदी क्षण 
अन् परतावे सुसज्ज होऊन जगण्या दैनंदिन जीवन…


-मी मधुरा..
२२ मार्च २०२०

No comments:

Post a Comment