अध्याय ५ "कर्मसंन्यासयोग"
(परमात्मभावना भावित कर्म )
चौथ्या अध्यायात सुरुवातीला कर्मयोगाची महती, नंतर कर्मातून ज्ञान, ज्ञानामुळं इंद्रियांच्या आसक्तीवर नियंत्रण आणि त्यामुळं निर्माण होणारा ज्ञानकर्मसंन्यासयोग आपण समजून घेतला.. भागवत भक्तिमार्गाचं अनुकरण केलं असता मोक्षप्राप्ती होते हे ही जाणलं.. अध्यायाच्या शेवटी 'अनासक्त होऊन कर्म कर म्हणजेच कर्मयोगाचं अवलंबन कर आणि युद्ध कर..' असा उपदेश श्रीभगवान अर्जुनाला करतात..
ह्या उपदेशानं गोंधळून गेलेल्या अर्जुनाच्या प्रश्नानं 'कर्मसंन्यासयोग' ह्या अध्यायाची सुरुवात होते.. 'कर्मसंन्यास' श्रेष्ठ का 'कर्मयोग'? हे सांगून झाल्यावर 'कर्मयोगी' म्हणजे काय? त्यांची लक्षणे काय असतात? ह्यावर हा अध्याय मुख्यत्वे भाष्य करतो.. कर्मयोगी ते ब्रह्मस्वरूप योगी हा प्रवास कसा घडतो आणि मोक्षप्राप्ती कशी होते हे सांगून ह्या अध्यायाची सांगता होते..
'अज्ञानामुळं तुझ्या मनात जे संशय निर्माण झाले आहेत ते ज्ञानरूपी शस्त्रानं छाटून टाक आणि कर्मयोगाचं अवलंबन कर आणि युद्ध कर..' असा उपदेश ऐकून गोंधळून गेलेला अर्जुन विचारतो, "हे कृष्णा, तुम्ही मला एकीकडं कर्माचा त्याग (कर्मसंन्यास) करायला सांगता आणि लगेचच भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता, आता ह्या दोन्हीपैकी अधिक श्रेयकर काय ते नेमके मला सांगाल का?" ह्यावर भगवान म्हणतात, "कर्मसंन्यास आणि भक्तिभावित कर्म हे दोन्ही मोक्षदायक आहेत.. परंतु ह्या दोन्ही मध्ये भक्तियुक्त कर्म म्हणजेच कर्मयोग कर्मसंन्यासापेक्षा श्रेष्ठ आहे.. कारण तो आचरणास सुलभ आहे .."
म्हणजेच, आत्मज्ञान मिळवण्यासाठी निवडलेला मार्ग मग तो ज्ञान असो कर्म असो कि भक्ती, सगळेच श्रेष्ठ आहेत.. पण प्रत्येक साधकाच्या कुवतीप्रमाणं ते आचरणास सुलभ किंवा कठीण असू शकतात, इतकंच..
भक्तीमार्गानं कर्माचरण केलं असता कर्मत्यागाचं फळ ही मिळतं.. कारण भक्तीमार्गात सर्व कर्म परमात्म्यालाच अर्पण केली जातात.. असा अनासक्त, कर्मफलाची अपेक्षा नसणारा कर्मयोगी, कर्म करत असला तरी तो कर्मबंधनातून मुक्त असतो.. तो कर्मसंन्यासीच असतो.. म्हणून भक्तियुक्तकर्म आणि कर्मसंन्यास हे एकच आहेत.. परंतू केवळ मुक्ती प्राप्त करण्यासाठी भौतिकसुखापासूनचा कर्मसंन्यास हा अपूर्ण संन्यास आहे कारण त्यात फलाची अपेक्षा आहे.. मुक्तीवरची ही मालकी सोडणं म्हणजे परिपूर्ण वैराग्य!!
थोडक्यात, कर्मयोगी शरीरानं कर्म करत असला तरी वृत्तीनं संन्यस्थ/संन्यासी असतो तर संन्यस्थ/संन्यासी सर्वसंग परित्यागी असतो..
भगवान म्हणतात, जो कोणाचाही द्वेष करत नाही, ज्याला कसलीही इच्छा नाही, जो मी-माझं ह्या पलीकडं गेला आहे, असा तो नित्य संन्यासी जाणावा.. कारण राग-द्वेष, सुख-दुःख ह्या द्वंद्वातून मुक्त झालेला तो सहजपणे भौतिक बंधनं पार करतो.. आणि कर्मबंधनातून मुक्त होतो.. मनानं निःसंग असल्यानं 'मी कर्ता आहे' हा विकार त्याच्यात नसतो.. त्यामुळे तो संसारात राहून सुद्धा त्याला कर्माचं बंधन नसतं.. प्राकृत जगात असून ही मुक्तच असतो..
असं असलं तरी सर्वसंग परित्याग करून, अंगाला राख लावून, ध्यानस्त बसणं हा संन्यास नव्हे.. केवळ सर्व कर्मापासून संन्यास घेतल्यानं कोणी सुखी होऊ शकत नाही..
भक्तियुक्त कर्म म्हणजेच कर्मयोग आणि ज्ञानयोग भिन्न असले तरी ते फलद्रुष्टीनं भिन्न नाहीत.. भौतिक अस्तित्वाच्या गाभ्याचा शोध ज्ञानयोगी घेतात तर त्या गाभ्याच्या अंतरी असणाऱ्या परमात्म्याची सेवा कर्मयोगी करतात.. एकात वृक्षाच्या मुळाचा शोध घेऊन मग पाणी घातलं जातं तर दुसऱ्यात वृक्षाच्या मुळाशी पाणी घातलं जातं.. दोन्ही मध्ये पाणी शेवटी मुळांनाच पोचतं.. म्हणजेच जे कर्मफल-परमस्थान-मोक्ष ज्ञानयोगींना मिळतं तेच कर्मयोगींना ही मिळतं.. हे ज्यानं जाणलं, त्यानंच खरं तत्व -आत्मस्वरूप- ओळखलं.. म्हणून तोच खरा ज्ञानी!!..
कर्मयोग ज्ञानयोगापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे भगवान पुढं सांगतात..
भक्तियुक्त कर्म करणारा कर्मयोगी आपली कर्तव्यं पार पाडण्यात आनंदी असतो.. कारण त्याला त्याच्या अंतिम धामाची, परमधमाची खात्री असते.. परंतु सांख्य, वेदांत तर्कवादाचं अत्यंत क्लिष्ट असं अध्ययन करण्यात मग्न ज्ञानयोगी कधी कधी ब्रह्मज्ञानाला कंटाळतो.. आणि आत्मसाक्षाकाराच्या मार्गावरून त्याचं पतन होऊन भौतिक चक्रात परत अडकत जातो.. म्हणून भक्तियुक्त कर्मात मग्न असलेले कर्मयोगी, 'ब्रह्म म्हणजे काय?' ह्याची चर्चा करणाऱ्या ज्ञानयोगींपेक्षा श्रेष्ठ आहेत..
मग, असा हा कर्मयोगी नेमका कसा असतो? त्याची लक्षणं काय असतात?
जो भक्तिपूर्ण कर्म करतो, ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे, ज्याने मन आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवले आहे, जो सर्व प्राणीमात्रात परमात्याचा अंश पाहतो असा कर्मयोगी कर्मबद्ध होत नाही.. म्हणजेच कर्माच्या बंधनात अडकत नाही.. त्याच्या मनात मीपणाची भावना नसते.. त्यामुळे 'मी कर्ता' हा अभिमान त्याला नसतो.. पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, खाताना-पिताना, झोपताना-चालताना, उठताना-बसताना, श्वासोच्छवास करताना, तसेच बोलताना, त्याग करताना, स्वीकारताना, डोळ्यांच्या पापण्या उघडझाप करताना, त्यांना माहिती असते कि ते फक्त शरीरधारी आहेत आणि ही सर्व इंद्रियकर्मे इंद्रियं चोखपणे करत आहेत..
तसेच हा कर्मयोगी सर्व कर्मे परमात्माठायी अर्पण करतो.. त्यामुळं तो कर्मे करून सुद्धा कमलपत्राप्रमाणं कर्मबंधनापासून अलिप्त राहतो, पापकर्मानं प्रभावित होत नाही.. आपलं शरीर, मन, बुद्धी आणि वाणीनं भौतिक जगतात यथाकथित सांसारिक कर्मे करत असला तरी तो मुक्तच असतो.. कारण इंद्रियांची आसक्ती सोडून केवळ आत्मशुद्धीकरता शरीरानं तो कर्मे करत असतो.. माऊलींच्या शब्दांत हा झाला 'देहव्यापार'!.. जी कर्मे मनाचा आणि बुद्धीचा वापर न करता केवळ शरीरानं केली जातात तो देहव्यापार..
असा निष्ठेनं कर्म करणारा, भक्तिमार्ग अवलंबणारा कर्मयोगी परमशांती मिळवतो.. कारण तो आपले कर्म आणि कर्मफल परमात्म्याला अर्पण करतो.. जो सर्व कर्मे यथासांग करतो आणि त्या कर्माचा 'मी कर्ता नाही' असे समजून फलेच्छा सोडतो, जो कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होता फक्त कर्म करत राहतो, असा योगी, नवद्वारं* असलेल्या आपल्या देहरूपी नगरात आत्मानंदात असतो..
ह्या देहरूपी नगराचा स्वामी म्हणजेच देहरूपी जीव ह्यानं करावयाची कर्म, त्याची कर्तृत्वशक्ती आणि कर्माशी असणारी फलांची जोड ह्या गोष्टी परमात्मा ठरवत नाही.. कारण तो अकर्ता आहे, तो कोणत्याही कर्माशी बद्ध नाही.. हा सगळा प्राकृतिक गुणांचा, मोहमायेचा खेळ आहे.. जोपर्यंत जीव देहरूपी नगरात असतो तोपर्यंत तो ह्या देहाचा स्वामी असल्यासारखा वागतो.. पण तो देहाच्या कर्मांचा, कर्मफलांचा ना स्वामी असतो ना नियंत्रक..
तसेच परमात्मा कोणतं ही पाप किंवा पुण्य ग्रहण करत नाही.. आपणच परमात्म्याला 'तो उत्पन्न करतो, तो पालन करतो, तो संहार करतो, तो पापपुण्य ग्रहण करतो असं मानतो.. पण ह्या सगळा प्रकृती, मायेचा खेळ आहे हे जेव्हा ज्ञात होतं तेव्हा परमात्म्याचं अकर्तेपण स्पष्ट दिसू लागतं.. आणि परमतत्व* हेच परमसत्य आहे ही जाणीव होते.. मग मन, बुद्धी, निष्ठा आणि आश्रय परमात्म्याठायी स्थिर होतात.. आत्मज्ञानाद्वारे सर्व किल्मिष, पातकं धुतली जातात आणि मोक्षपथावर उत्तरोत्तर प्रगती होते.. असा ज्ञानी, आत्मनिष्ठ योगी यांना सर्व प्राणीमात्रात ब्रह्म -परमात्म्याचा अंश- दिसतो.. मग तो विद्या-विनय संपन्न ब्राह्मण असो वा गाय, हत्ती, कुत्रा वा चांडाळ ह्या सगळ्यांकडं तो समदृष्टीनंच पाहतो.. जो समदृष्टी आहे, जो सर्वत्र ब्रह्म पाहतो, ज्याला ना 'मिळाल्याचा हर्ष' होतो ना 'गमावल्याच दुःख', जो फक्त परमात्मयाठायी स्थिर राहून कर्म करतो, जो मोहरहित आहे तो स्वतःच ब्रह्म असतो.. माऊली म्हणतात, "तोचि तो निरुता। समदृष्टी तत्त्वता। हरि म्हणे पंडुसुता। तोचि ब्रह्म।।"..
ही साम्यावस्था म्हणजे आत्मसाक्षात्काराचं लक्षणं.. आत्मसाक्षात्कारानं तो बद्ध जीवनातून, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो.. इहलोकीच पुनर्जन्म जिंकतो..
असा मुक्तयोगी भौतिक सुखांमध्ये आसक्त होत नाही तर तो स्वतःमध्येच सुखाचा अनुभव घेत सदैव समाधिस्थ असतो.. असा आत्मसाक्षात्कारी ब्रह्माच्या ठिकाणी स्थिरबुद्धी असल्यानं अमर्याद सुखाचा अनुभव घेतो.. विषय आणि इंद्रियांपासूनच्या सुखदुःखात असा ज्ञानी रममाण होत नाही.. ह्या सुखदुःखांना आरंभ आणि शेवट असतो हे माहिती असल्यानं तो ह्या जंजाळात तो अडकत नाही..
जो या लोकी देहत्याग करेपर्यंत इंद्रियांच्या आवेगाला, काम-क्रोधाला आवर घालू शकतो, तोच खरा योगी, तोच खरा सुखी होय.. आत्मसंतोष हे ज्याचं सुख, आत्मानंद हेच ज्याचं विश्रामस्थान, आत्मरूपज्ञान हाच ज्याचा प्रकाश असा योगी ब्रह्माची प्राप्ती करतो.. म्हणजेच ज्याचं सुख अंत:करणात आहे, अंतःकरणातच जो आनंद अनुभवतो, ज्याचं ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे.. तसेच जो संशयपासून निर्माण होणाऱ्या द्वंद्वापलीकडं आहे, ज्याचं मन अंतरातच रममाण झालं आहे, जो सर्व जीवांच्या कल्याणार्थ कार्य करण्यामध्ये व्यस्त आहे आणि जो सर्व पापांपासून मुक्त आहे तो ब्रह्मनिर्वाणरुप* मोक्ष प्राप्त करतो.. जो क्रोध आणि भौतिक इच्छांपासून मुक्त आहे, आत्मसाक्षात्कारी-आत्मसंयमी आहे असा योगी जिवंतपणी आणि मरणानंतर ही ब्रह्मस्वरूप असतो..
ब्रह्मनिर्वाणाच्या उपरोक्त तत्वाचं विवेचन करून झाल्यावर अष्टांगयोगाद्वारे ह्या अवस्थेप्रत योगी कसा पोचू शकतो हे श्रीभगवान पुढं सांगतात.. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही अष्टांगयोगाची आठ अंगं आहेत.. ह्या अध्यायात अष्टांगयोगाची प्राथमिक माहिती देऊन पुढील अध्यायात ह्या योगपद्धतीचं विस्तृत वर्णन श्रीभगवान करतात.. वैराग्यानं विषयसुखांचा त्याग करून, दोन भुवयांमध्ये दृष्टी एकाग्र करून, दोन नाकपुड्यातून वाहणाऱ्या श्वासाची गती सम ठेवून जो मन-इंद्रियं-बुद्धी संयमित करतो आणि भय-क्रोधापासून अलिप्त असतो, तो सदैव मुक्तच असतो..
प्रकृतीच्या मायाशक्तीच्या प्रभावाखाली असणारे बद्धजीव भौतिक जगतात शांती प्राप्त करण्यासाठी धडपड करत असतात.. अध्यायाच्या शेवटच्या श्लोकांत हे शांतिसूत्र सांगताना श्रीभगवान म्हणतात, "मी सर्व यज्ञ आणि तपस्येचा परमभोक्ता, सर्व देवलोक आणि देवतांचा परमेश्वर, सर्व जीवांचा हितकर्ता आणि सर्व जीवांच्या कल्याणाची इच्छा करणारा आहे.. आणि हे जो जाणतो त्याला अक्षय शांती लाभते.." म्हणजेच, भगवंत सर्व मानवी कार्यांचे परमभोक्ता आहेत.. सर्व देवदेवतांचे, ग्रहलोकांचे अधिपती आहेत.. बद्ध जीव ज्या भौतिक प्रकृतीच्या नियमांच्या अधीन आहेत त्या प्रकृतीचे ते स्वामी आहेत.. थोडक्यात, भक्तियुक्त कर्म करणं म्हणजेच परमात्मा हा सर्वांचा अधिपती आहे ह्या पूर्ण ज्ञानानं युक्त होऊन कर्म करणं होय.. भक्तिभावना म्हणजे 'स्वतःचा परमसत्याशी असणारा संबंध' ह्या पूर्ण ज्ञानानं युक्त होऊन कर्म करणं होय.. ही भावना म्हणजे भक्तियोग.. आणि भक्तियोगाकडं घेऊन जाणारा एक मार्ग आहे ज्ञानयोग.. अशी भक्तिपूर्ण सेवा हीच मानवजातीला शांती प्रदान करू शकते.. आणि हीच जीवनाची परमसिद्धी आहे..
ऐकून माहिती संन्यस्थाची, पुसे अर्जुन भगवंताशी
जर मोक्षप्राप्ती भक्तिमार्गे, का करावी अनासक्त कर्मे?
सांगते झाले भगवंत, न अंतर कर्मसंन्यास भक्तियोगात
जरी दोन्ही मोक्षदायक, असे सुलभ भक्तिमार्ग आचरणास ।।१।।
अर्पूनि कर्मे भक्तिभावे, अनासक्त जो करतो कर्माचरण
करुनि कर्मे ना कर्मबद्ध तो, असतो कर्मसंन्याशी हे जाण
संन्यस्थवृत्ती असा कर्मयोगी, जरी नसे सर्वसंग परित्यागी
'राग-द्वेष' 'सुख-दुःख' 'मी कर्ता' ह्या पार असे हा निसंगी ।।२।।
शोधती जरी ज्ञानयोगी गाभा भौतिक अस्तित्वाचा
घेती ध्यास जरी कर्मयोगी गाभ्यास्थित परमात्म्याचा
ज्ञानयोगी वा कर्मयोगी कर्मफल निश्चित परमस्थान
ओळखणे हे आत्मस्वरूप तत्व हेच खरे आत्मज्ञान ।।३।।
असे 'परमस्थान' फल एक तरी, ज्ञानयोग आचरण्या कठीण
सांख्य-वेदांत-तर्कवाद क्लिष्ट असती, मार्गपतन होण्या कारण
परमधाम निश्चित तयाचे, भक्तियुक्त कर्मात जो मग्न कर्मयोगी
न जाणिला ब्रहम तरी भक्तिभावे समर्पून, श्रेष्ठ हा परे ज्ञानयोगी ।।४।।
पाप-पुण्य, उत्पत्ती-संहार, पालन-पोषण खेळ हा प्रकृती-मायेचा
होई आत्मसाक्षात्कार, हे परमसत्य जाणता अकर्तेपणा परमात्म्याचा
धुवून पातके आत्मज्ञाने, होई मन-बुद्धी-निष्ठा- स्थित परमात्म्याठायी
होई मोक्षपथी प्रगती त्याची, जो समदृष्टी जाणे सृष्टी वसे ब्रह्माठायी ।।५।।
घालतो जो आवर इंद्रिय आवेगासी अन कामक्रोधासी
आत्मसंतोष ज्याचे सुख आत्मज्ञान प्रकाश तोच खरा योगी जाण
रममाण जो अंतरात अन व्यस्त कर्म करण्या कल्याणार्थ
आत्मसंयमी पापमुक्त जो इहलोकी-परलोकी होई ब्रह्मरूपनिर्वाण ।।६।।
जाणूनी हा 'कर्मसंन्यासयोग' प्रभुमुखातून
होऊ संन्यस्थ त्यजूनी प्रेम-द्वेष भय चिंता मनातून
ठेवुनी निष्ठा, होशी आत्मज्ञ, जाणता नाते परमतत्वाचे
करिता मानव सेवा भक्तिभावे, मिळे प्रदान परमशांतीचे ।।७।।
हरी ॐ तद् सद्
॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
********************
* नवद्वार :दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, एक तोंड, २ मलमूत्र विसर्जन द्वार..
* परमतत्व : ब्रह्म, परमात्मा, भगवान..
* ब्रह्मनिर्वाणरुप* मोक्ष : परब्रह्मात विलीन होणं..
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment