Friday, May 2, 2025

Reflecting on Another Year of Life..

कैलास मानसरोवर यात्रा, सप्टेंबर २०२४ 


 Happy Birthday to Me!!

आणखी एक अनुभवसंपन्न वर्ष!.. 
भावनिक चढउतारांनी, भावनिक आंदोलनांनी, भावनिक गदारोळांनी परिपूर्ण असं वर्ष!!.. 
सेल्फ हिलिंग शिकवणारं.. स्वतःवर प्रेम करायला शिकवणारं.. 'स्व'चा शोध घ्यायला शिकवणारं.. असं हे वर्ष!!!.. 
चांगल्या वाईट अश्या असंख्य अनुभवांनी भरलेलं.. ह्या अनुभवांनी मला बरंच काही शिकवलं असलं, घडवलं असलं तरी ह्यातून जाणं सोपं तर नक्कीच नव्हतं.. नाही.. आणि नसेलही.. पण ह्याकडं नवीन काही शिकायची, स्वतःमध्ये बदल घडवायची, स्वतःला जोखायची संधी म्हणून पाहिलं तर?.. आयुष्य नक्कीच समुद्ध होईल.. आणि अश्या ह्या अनुभवसंपन्न आयुष्याबद्दल, जीवन जगण्याच्या ह्या वरदानाबद्दल मी आज कृतज्ञता व्यक्त करते.. 

सुरुवातच 'वजन घटावो' ह्या अशक्यप्राय वाटणाऱ्या आव्हानानं झाली.. प्रत्येक दिवस येईल तसा स्वीकारत, त्यातील छोट्या छोट्या आव्हानांचं व्यवस्थित नियोजन करत, 'एक बार ठान ली, तो खुद कि भी नहीं सुनती' ह्यावर 'दटे रहो' करत तब्बल १७ किलो वजन कमी केलं.. आणि आज ८ महिन्यानंतर ही त्याच कमी झालेल्या वजनावर असणं ही माझ्या आयुष्यातली सगळ्यांत मोठ्ठी achievement आहे!! 

एका हळव्या, उदासीन, व्याकुळ अश्या वळणावर 'भगव
द् गीता' नव्यानं माझ्या आयुष्यात आली आणि पाठोपाठ कैलासपती ही..
गीतेमुळं अव्यक्त भावना, अव्यक्त प्रेम-ममता यांना एक दिशा मिळाली तर कैलासामुळं आयुष्याकडं पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन.. एक तत्वज्ञानातून काही सांगू पहात होतं तर तर दुसरं total surrenderness- संपूर्ण समर्पण, भक्तिभाव ह्यातून.. द्वैतातून अद्वैत आणि अद्वैतात ही, 'मी' आणि 'तो' एक असलो तरी 'मी' म्हणजे 'संपूर्ण तो' नाही.. त्या ब्रह्मतत्वाचा मी एक अंश आहे.. हे द्वैत उमजणं आणि समजून ते आत्मसात करणं.. अजुनी ह्या द्वैत-अद्वैताचा हिंदोळा सुरूच आहे..

कैलास-मानसरोवर यात्रा खरोखरच 'Journey of a Lifetime' होती.. सद् गुरुच्या शब्दांत सांगायचं तर शिवाच्या अंगाखांद्यावरून केलेला जीवनाचं सत्य जाणण्याचा हा प्रवास.. तीन दिवस कैलासाच्या अंगणात बागडल्यावर, त्याच्या सहवासात राहिल्यावर, त्याचंच रूप स्वतःत पाहिल्यावर, आयुष्यात काही बाकी राहिलंय असं आता वाटतंच नाही.. पण त्याच्या सहवासाच्या गोडीचा हावरटपणा मात्र नक्कीच वाढला आहे.. 

सद् गुरू एका सत्संगात म्हणाले होते, संपूर्ण कैलासच तुम्ही तुमच्यात साठवून घेऊन जावू शकता तर आठवण म्हणून पाणी, माती, खडा असं का घेऊन जायचं? कैलास तत्व तुम्ही तुमच्या पंचतत्वात सामावून घेतलंत तर बाकी भौतिक तत्वांची गरजच काय?.. 
खरंच आहे.. जेव्हा मन अस्वस्थ असतं, भरकटलेलं असतं तेव्हा हाच कैलास दीपस्तंभ होतो.. आणि जेव्हा मनात काहूर माजून सगळं ठवळून निघतं, तेव्हा तुरटी होऊन सगळा गाळ खाली ठेवण्याचं, स्वच्छ आणि स्पष्ट विचार देण्याचं काम ही करतो.. आणि हा खाली बसलेला गाळ काढायला मदत होते गीतेतील तत्वज्ञानाची.. पण प्रत्येक दिवस, प्रत्येक परिस्थिती सारखी नसते.. आणि त्याचवेळी माणूस म्हणून आपल्याकडं असणाऱ्या ताकदी बरोबरच आपल्यातलं खुजेपण ही लक्षात येतं..    
  
कैलास अनुभवताना त्याच्यापुढचं आपलं असणं नसण्यातच जमा असतं.. पण जेव्हा कैलासाची अनुभूती येते तेव्हा असण्या-नसण्यातलं अंतरच संपतं.. काठमांडूपासून 'मधुरा पटवर्धन' from Oregon, USA असा सुरु झालेला माझा प्रवास.. नंतर हळूहळू नात्यांची, सोशल-इकॉनॉमिक स्टेटसची गळून पडलेली लेबल्स.. मधुरा-स्त्री हा लिंगभेद विरून मधुरा व्यक्तीत आणि नंतर फक्त एका जीवात्मात झालेलं रूपांतर आणि कैलासला पोचेपर्यंत ह्या जीवात्म्याचं तिथल्या ऊर्जेत सामावून जाणं.. हा १०-१२ दिवसांचा प्रवास अचंबित करणारा होता.. कोणतीही अपेक्षा न ठेवता, मोकळ्या मनानं आणि तिथल्या उर्जेला संपूर्णपणे शरण जाण्याच्या भावनेनं केलेला हा प्रवास.. त्यामुळं हा प्रवास फक्त एक अनुभव न होता ती अनुभूती झाली असावी.. दीराफूक मधील त्या दिवसांत, 'मी-शरीर' आणि 'मी-चैतन्य' हा भेद आणि भेद असूनही त्यांच अभेद्य असणं अनुभवू शकले.. 'I'm just a Portal of that Devine Love and Light' ह्याची अनुभूती घेऊ शकले..   

ब्रह्मतत्वाच्या ऊर्जेचा मी एक छोटासा अंश आहे.. त्या ऊर्जेनं नेमून दिलेलं काम करण्यासाठी, मी जीवात्मा म्हणून  'मधुरा पटवर्धन' नावाच्या घरांत वास्तव्यास आहे.. ह्या घराचा करार संपला कि दुसरं घर.. आणि दिलेलं काम झाल्यावर परत त्या ऊर्जेत सामावून जाईन.. ही माझी तिथं, मला नव्यानं झालेली ओळख!!..  
आणि नेमून दिलेलं काम फलासक्तीची अपेक्षा न करता, सेवाभावनेन करणं ही झाली गीतेची शिकवण.. 
आणि प्रत्येक परिस्थितीत ही जागरूकता कायम ठेवून कार्यरत राहणं ही झाली साधना..

मला नक्कीच माहितीय, हे लिहा-वाचायला सोपं असलं तरी, जाणीवपूर्णक आयुष्यात उतरवणं, सजगपणे प्रत्येक परिस्थितीत ते अवलंबवणं खूप कठीण आहे.. खूप मोठ्ठी साधना आहे.. 
आता निदान ह्याकडं मी डोळसपणे पहायला, जागृततेनं विचारात, स्वतःत बदल घडवायला सुरुवात केलीय.. कदाचित आयुष्यात सुरु असणाऱ्या घडामोडींमुळं ही असेल.. पण प्रयत्न करतीय.. परिस्थिती बदलल्यावर असंच पुढं सातत्यानं सुरु ठेवणं ही आव्हानात्मक असेल.. पण करत राहीन हा विश्वास ही आहे..    

हे वर्ष full of surprises च होतं.. काही आपल्यांनी अचानक साथ सोडणं, काही अपरिहार्य कारणानं मित्रपरिवार तुटणं, यामुळं निर्माण झालेल्या पोकळीत अनेक प्रश्न भेडसावू लागले.. ही अशी नाती, टिकणारच नसतील तर हे नातेसंबंध का निर्माण होतात? त्यांचं नसणं इतकं त्रासदायक का होतं?.. तसंच कितीतरी व्यक्ती आपल्या दैनंदिन आयुष्यात येत जात असतात.. काही बराच काळ आपली सोबत करतात तर काही अगदीच थोडा काळ.. काही प्रसंगी अचानक येऊन निघून जातात.. पण तरी ही ह्या व्यक्तींचा आपल्या आयुष्यावर ठसा उमटत असतो.. मग ह्या सगळ्या व्यक्तीं आपल्या आयुष्यात का येतात? त्यांच्या येण्याचा उद्द्येश काय? ह्याचा शोध घेता घेता 'Your Soul's Plan' हे पुस्तक माझ्या वाचनात आलं आणि सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांची उकल व्हायला सुरुवात झाली.. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती उगाचच येत नाही तर ती येण्यामागं एक प्रयोजन असतं.. त्या व्यक्तीमुळं, त्या व्यक्तीशी निगडित परिस्थितीमुळं तुम्ही काही तरी शिकत असता, घडत असता.. तसंच तुम्ही त्या व्यक्तीला ही शिकवत असता.. हे ह्या व्यक्तींमधलं 'Soul Contract' असतं.. आणि ही देवाण देवाण-घेवाण म्हणजेच आयुष्य.. 'Soul Contracts' म्हणजे काय, ती कशी घडतात हे वाचणं खूप गंमतशीर आहे.. It's a good book to read..  
ह्या पुस्तकामुळं 'Self Healing' - Self Healing मुळं Sound Bath Therapy, Mantra Therapy सारख्या Vibration Based Therapies, Meditation Using Lights and Different Modalities अनुभवता आल्या.. बरीच कवाडं उघडली.. बागडायला एक नवीन जग मिळालंय.. त्यामुळं येणाऱ्या नवनवीन अनुभवांनी आकार घेणाऱ्या आयुष्याबद्दलची उत्सुकता ही वाढलीय.. 
आता 'Your Soul's Gift वाचायला घेईन.. पण अजुनी मुहूर्त लागायचाय :)..     
   
.. मी गतवर्षात रेंगाळतेय आणि ऋचा माझ्या वाढदिवसाचं नियोजन करतीय.. ती, मी आणि फ्लोरिडा बीच.. आज तिच्या finals पण संपतील.. त्यामुळं double celebration!!.. 
खरं सांगायचं तर, मला वाढदिवसाबद्दल कधी अप्रुप्य वाटलंच नाही.. लहानपणी औक्षण आणि जेवणात आवडीचा एखादा पदार्थ इतकाच मर्यादित वाढदिवस पुढं हॉटेल मध्ये जाऊन जेवणं इथवर येऊन थांबला.. वाढदिवसाचा सोहळा का? हा प्रश्न मला तेव्हा ही होता आणि आत्ता ही.. पण मी माझ्यापरीनं ह्याच उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय.. 
गीतेत सांगितलंय, 'न जायते म्रियते वा कदाचिन'.. आत्म्यासाठी जन्म ही नाही आणि मृत्यू ही नाही.. मग, आजचा वाढदिवस?.. 
.. मला वाटतं मी या दिवसाकडं, 'ऊर्जा' आणि 'शरीरा'च्या सहयोगाचा दिवस.. नेमून दिलेलं कार्य, प्रगती, उत्क्रांती ह्यासाठी, शरीरानं दिलेल्या साथीबद्दल, कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस.. म्हणून पहावं.. 
..so, 

Happy Birthday Madhura!!! 

आज आपल्या एकत्र प्रवासाला ५२ वर्षे पूर्ण झाली.. मी तुला मोठ्ठ होताना, धडपडून सावरताना, प्रगती करताना पाहते तेव्हा, मला तुझा खूप अभिमान वाटतो.. गेल्या ५ दशकांत, एकमेकींबरोबर आयुष्याचा आनंद घेत असताना, आपण चुका ही केल्या.. आणि त्यापासून शिकलो ही खूप..  
माझ्या काही निर्णयामुळं तू त्रास सहन केलास, सोसलंस.. कधी कधी तुझी काळजी न घेऊन, तुला गृहीत धरून मी तुझ्यावर अन्याय ही केला.. पण आज मला तुला सांगायचं आहे, तुझ्या पाठिंब्याशिवाय, तू असल्याशिवाय 'मी-ऊर्जा'-'मी-चैतन्य' काहीच करू शकत नाही.. तुझ्या असण्यातच माझ्या प्रगतीची मेख आहे..    
So, Thank you so much for being there.. 
And I'm excited to experience the future that awaits for US..

तर, चल मग, 
कृतज्ञता, आशा आणि अढळ विश्वासानं भरलेल्या आयुष्याचं स्वागत करूया..


-'मी मधुरा'तली.. 

************************************************

No comments:

Post a Comment