Tuesday, November 17, 2020

माझे मन तुझे झाले..





सती रमाबाई पेशवा स्मारक, थेऊर 



पेशवाईतील जितकी वलयांकित पण तितकीच नियतीनं अन्याय केलेली अशी ही स्त्री रमाबाई, 
यांनी पतीबरोबर सहगमन केले तो दिवस होता १८ नोव्हेंबर १७७२.. 

ऑडिओ ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

🌱



मुळा-मुठा नदीनं वेढलेला रम्य परिसर.. आणि चिंतामणी गजाननाच्या वास्तव्याननं पावन झालेली ही भूमी.. थेऊर.. 
 
ह्या चिंतामणी गजाननाच्या ओवरीत, अंथरुणावर निजलेला माधवरावांचा कृश देह.. इतरांनी करवली तरच हालचाल.. नारायणराव, रामशास्त्री, वैद्यराज गंगाविष्णू, श्रीपती, मैना सगळे सेवेच्या प्रतीक्षेत उभे.. 

गजानना, ह्या वेदना आता सहन होत नाहीत.. पण डोळ्यासमोरचे तुम्ही आणि रमाचा असणारा विश्वास, ह्या वेदना थोड्या हलक्या करतात इतकंच.. आज रमा कुठं दिसली नाही.. असेल इकडेच.. कुठले तरी नवस, उपास-तापास, व्रतवैकल्य.. आमची व्याधी तिच्यावर, तिच्या शरीरावर, तिच्या हळव्या मनावर ही.. तिचा ही क्षय.. गजानना.. 

विचार करण्यानं पण थकवा जाणवतोय.. माधवरावांनी अलगद डोळे मिटले..

छोटी रमा.. शनिवारवाड्यात आम्हाला शोधताना गांगरलेली रमा.. नऊवारी पैठणी सावरत, व्यायामशाळेत, काकांना आमच्या बद्दल विचारणारी रमा.. किती रागावलो होतो आम्ही तिच्यावर.. हीच आमची पहिली भेट.. असेल ती सात-आठ वर्षाची.. आणि आम्ही दहा-बारा वर्षाचे.. लाघवी, भोळ्या-भाबड्या रमेच्या प्रेमात कधी आणि कसे बांधले गेलो कळालंच नाही.. सातखणी वाड्यावर??.. कदाचित.. पर्वतीचे विहंगम दृश्य पाहतानाची तिची छबी लख्ख आठवते.. 

"काल पासून काही खाल्लं नाहीत आपण.. थोडी कांजी घ्याल का?" रमाच्या बोलण्यानं माधवरावांनी डोळे उघडले.. 

"रमा तू दिलेलं विष देखील आनंदाने घेऊ.."

हे ऐकून रमाबाईंचे डोळे अश्रूंनी डबडबले.. ते अश्रूंनी डबडबलेले डोळे, बरंच काही बोलत होते.. 
 
"सहजच बोललो आम्ही रमा.. इतकं मनाला लावून घेतलंस?"... 

"रमा, तुझ्या निष्ठेला, श्रद्धेला सीमाच नाही.. त्यापुढं नतमस्तक व्हावं वाटतं.. तुला सारं राज्य दिलं तरी अपुरं आहे.. पण मृत्युपत्र करताना, तुझ्यासाठी काही करायला मन धजावलं नाही.. का कोणास ठाऊक, पण आमच्यामागं तू राहशील असं कधी वाटतंच नाही.. "

माझे मन तुझे झाले 
तुझे मन माझे झाले 
माझे प्राण तुझे प्राण 
उरले ना वेगळाले..  

इतक्या बोलण्याने ही त्यांना खोकल्याची उबळ आली.. गजानना... 

रमाबाईंनी त्यांना शिंपलीन पाणी पाजलं.. 

"रमा, आज मन खूप व्याकुळ झालंय.. इतके दिवस, राज्याच्या कारभारामुळं न जाणवलेलं एकटेपण, आता ह्या मृत्यूच्या सावलीत नकोस वाटतंय.. वाटतं कोणाची तरी सोबत असावी.. झाला हा एकाकी प्रवास खूप झाला.. ह्यावर तू काय म्हणशील हे ही आम्ही जाणतो.. पण अशी अपेक्षा आम्ही का करावी? कारभारी म्हणून राज्याची जबाबदारी पेलत असताना, पती म्हणून तुझी काय जबाबदारी घेतली?.. पण हे मुद्दाम नाही केलं.. तशी उसंतच नाही मिळाली.. अकरा वर्षाच्या ह्या कारकिर्दीत चार कर्नाटकाच्या, दोन भोसल्यांच्या, दोन निजामाच्या मोहिमा.. राज्य स्थिर झाल्यावर उसंत मिळेल असं वाटलं.. पण आता ही व्याधी.. तुझ्याकडं लक्षच देता नाही आलं.. ना तू कधी काही मागितलस, ना हट्ट केलास, ना मी तुला काही दिलं.. तुझ्यावर फार मोठ्ठा अन्याय झाला.. "

खोकल्याच्या उबळीमुळे माधवरावांचा जीव कासावीस झाला.. 

"गजानना.. हे दुष्टचक्र आमच्या बरोबरच संपणार.."
 
"रमा, मराठी दौलतीचे स्वप्न साकार करताना संसाराचं स्वप्न मागंच राहिलं.. माफ करशील ना आम्हाला?.. पुढच्या जन्मी, तुझी सोबत मिळाली तर, अजाणतेपणी झालेला सारा अन्याय आम्ही भरून काढू.. रमा, देशील आम्हाला सोबत??"

"ईश्वर इच्छा प्रमाण!!".. रमाबाई त्यांच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या..  
  
मला लागे तुझी आस 
तुला जडे माझा ध्यास 
तुला मला चोहीकडे 
माझे तुझे होती भास.. 

बाहेरच्या गोंधळानं त्यांचं बोलणं तिथंच खुंटलं.. आपल्या लाडक्या श्रीमंतांना भेटण्यासाठी लोकांची रीघ लागली होती..  

रमाबाई सारं बळ एकवटून देवासमोर येऊन बसल्या आणि त्यांचा बांध फुटला.. त्यांचं शरीर त्या हुंदक्यानं गदगदत होतं.. अश्याच कितीतरी घटिका सारल्या.. भानावर आल्या ते एका निश्चयानंच.. 

🌱

गजानना..
 
रात्री कधीतरी माधवरावांच्या कण्हण्यानं रमाबाईंना जाग आली.. त्यांनी माधवरावांचा हात हातात घेतला.. "काय झालं?"

"रमा, ह्या अखेरच्या क्षणी, तुझ्या विचारानं जीव कासावीस होतो ग.. उसंत मिळते तेव्हा खूप बोलावसं वाटतं आणि डोक्यात काहूर माजतं.. आणि तुझ्यावर अन्याय... "

रमाबाईंनी त्यांच्या तोंडावर हात ठेवला.. "अन्याय वैगरे काही नाही.. आणि आपण जे म्हणता, त्यात मला कधी रस नव्हताच.. पेशव्यांच्या दरबारी असणाऱ्या सामान्य कारकुनाची मुलगी मी, भाग्यानं पेशवाईत सून म्हणून आले.. आणि आपल्यामुळे पेशवीणबाई सुद्धा झाले.. पण मला कधी राजकारणात रस नव्हताच, ना घरच्या ना बाहेरच्या.. ना माझ्या अंगी सासुबाई गोपिकाबाई किंवा मातोश्री राधाबाई सारखी विशेष कर्तबगारी होती.. आणि आपण ही तसा कधी आग्रह धरला नाही.. हे आपलं मोठ्ठेपण.. आपल्या शिवाय दुसरं विश्वच नव्हतं माझं.. आपण नसलात की, माझं मन देवधर्म करण्यात, तीर्थयात्रा करण्यात रमायचं.. आणि आपण ही माझं हे भावविश्व जपलत.. मी आपल्याला, माझ्या शिवाय वेगळं कधी समजलंच नाही.. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी पेशवाईची सूत्रे हातात घेऊन, आपण फत्ते केलेल्या मोहिमेंचा, उभारलेल्या दौलतीचा मला खूप अभिमान आहे.. आणि आपल्या खुशालीसाठी मी पण उपासतापास, व्रतवैकल्य करण्यात रमत गेले.. तेवढाच माझा हातभार.. तुम्ही जे दिलंत, जितकं दिलंत त्यात मी तृप्त आहे.." 

माझ्यातून तू वाहसी 
तुझ्यातही मी पाहसी 
तुझ्या माझ्यातले सारे 
गूज माझे तुझ्या मनी  

रमाबाई बराच वेळ माधवरावांचा हात हातात घेऊन बसून होत्या.. नुकताच त्यांचा डोळा लागला होता.. चेहऱ्यावर समाधानाची पुसटशी छटा जाणवत होती.. 

🌱

शेवट जवळ आल्याची चाहूल बहुतेक दोघांना ही लागली असावी.. 

माधवराव सर्व आप्तेष्ठांना भेटून कृतज्ञता व्यक्त करत होते.. सगळ्या जबाबदारीतून मुक्त होऊन, पैलतीरी जाण्याचे जणू आता वेध लागले होते.. 

रमाबाईं, तपस्वी योगिनी सारख्या भासत होत्या.. कपडेलत्ते -दागदागिन्यांची आवड अशी नव्हतीच.. पण स्वतः जवळ जे काही आहे ते सर्व दान करून, त्या विरक्त झाल्या होत्या.. अन्न वर्ज्य करून केवळ दुध आणि गोमूत्र प्राशन केल्याने प्रकृती क्षीण होत होती.. पण पैलतीरावरच्या एकत्र प्रवासाची आस मात्र त्यांच्या उराशी होती.. 

तुझी माझी पटे खूण  
तुझी माझी  एक धून
तुझे प्राण माझे प्राण 
माझे मन तुझे मन 

दोघांनी इहलोकीची यात्रा मनातून संपवली होती.. 

🌱

बुधवार, वद्य अष्टमी, पेशवाईतील एक काळा दिवस!!.. 

गाभाऱ्यात समया तेवत होत्या.. गजाननावर अखंड अभिषेक सुरु होता.. ब्राह्मणांचे अनुष्ठान सुरु होतं.. आणि ओवरीत, भूमिशैय्येवर कृश कुडीतून गजाननाचं नामस्मरण.. गजानना.. गजानना... गजानना..... आणि.. बधिर शांतता... एखाद्या योगी पुरुषा प्रमाणे माधवरावांनी इहलोक सोडला.. 

...पेशवाई वर दुःखाचा डोंगर कोसळला... सभामंडपात एकच आक्रोश.. अथांग जनसमुदाय दर्शन घेऊन जड अंतःकरणानं, हुंदके दाबत बाहेर पडत होता.. 

अचानक आक्रोश थांबला.. संथ पावले टाकत, रमाबाई येत होत्या.. सतीची वस्त्रं लेवून, घनगंभीर मुद्रेनं.. आक्रोशाचं, भवतालात उचंबळून आलेल्या आवेगाचं, कसलंच भान त्यांना नव्हतं.. जनसमुदायातून काही विस्मयानं पहात होते तर काहीं त्यांच्या धैर्याचं कौतुक करत होते.. काहींच्या डोळ्यात पाणी ठरत नव्हतं तर काही आपल्या पेशवीणबाईंना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या पायांवर लोळण घेत होते.. सती जाऊ नये म्हणुन अनेकांनी त्यांना विनवलं.. पण त्या निर्णयावर ठाम होत्या.. आता सोबत एकच!!.. 

आयुष्यातील अतिशय बिकट प्रसंगाला सामोरं जाताना, त्यांच्या मनात आता कोणताच किंतू उरला नव्हता.. उशालगत बसून, एकाग्र नजरेनं माधवरावांना न्याहाळत, पंख्यानं वारा घालत, साक्षात यमदेवतेलाच स्वतःच्या मृत्युचं आमंत्रण देत होत्या..

सर्व धार्मिक विधी पार पडले.. निग्रही चित्तानं, शांत मनानं त्यांनी चितारोहण केलं.. पतीचे मस्तक अलगद आपल्या मांडीवर घेतलं.. आणि स्वतःच्या हातानं त्या चंदनाच्या चितेला अग्नी स्पर्श केला.. 

... आणि नश्वर देह त्यजून रमा-माधव अनंताच्या प्रवासाला निघाले.. एकमेकांच्या सोबतीनं.. 

माझे मन तुझे झाले 
तुझे मन माझे झाले 
माझे प्राण तुझे प्राण 
उरले ना वेगळाले..  

चोवीस वर्षांचं अवघ आयुष्य.. वैवाहिक आयुष्य जेमतेम सात वर्षांचं.. पती सहवास त्यात काही महिन्यांचाच.. आणि हे संपूर्ण समर्पण.. सारं थक्क करणारं आहे.. 

एका लोकविलक्षण प्रेमकहाणीचा हा, खरंच सुखांत की दुःखांत???.. 



-मी मधुरा..  
१८ नोव्हेंबर २०२०

ऋणनिर्देश: गीतकार सुधीर मोघे.. माझे मन तुझे झाले.. 

1 comment: