🌿🌼🌿 विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!!🌿🌼🌿
दत्तमहाराज सीमोल्लंघन सोहळा, कुरुंदवाड
'नवरात्र नात्यांचे' साजरं करताना, रोज एक नातं तुमच्या बरोबर जगताना, काही पडद्याआड गेलेल्या नात्यांना आठवणींच्या रूपाने परत पाहताना, असलेली नाती परत अनुभताना हे नऊ दिवस कसे संपले कळालंच नाही..
एकत्र कुटुंबामुळं असेल किंवा माणसांच्या गोतावळ्यामुळं असेल, मी ही सगळी नाती अगदी जवळून, मनापासून आणि भरभरून जगले.. जगते आहे..
Thank you all for enriching my life ❤️
जरी मी नवरात्रात, नात्यांमधील देवींबद्दल, शक्तींबद्दल लिहिलं असलं तरी, ह्या सर्व 'शक्तीं'ना नात्यातील 'शिवां'ची जोड असते असं मला वाटतं.. प्रत्येकवेळी ह्या 'शक्तीं'बद्दल लिहिताना त्यांतील 'शिवा'च्या आठवणी तरळून जायच्या.. आजी-आबा, आई-बाबा, काका-काकू, आत्या-काका, मावशी-काका, मामा-मामी, भाऊ-भावजय, बहीण-मेव्हणा, मित्र-मैत्रिणी, मुलगा-मुलगी-सून-जावई, सासू-सासरे, नणंद-दीर.. हे कधी मला एकटे दिसलेच नाहीत.. ह्या जोड्यांमधील प्रत्येक नातं दुसऱ्या नात्याचा भक्कम आधार आहे..
नात्यांतील देवींबद्दल लिहिताना..
आबा आले तिकडून
विसरू नकोस बाळा मला
म्हणाले काहीसं खाकरून
कोडकौतुक करता तुझं
आनंदात चिंबचिंब भिजलो..
बालपण तुझ्यात पाहताना
मनोमन नितांत सुखावलो..
नात्यांतील देवींबद्दल लिहिताना..
दिसला बाबा, काहीसा दमलेला थकलेला
भविष्याचा विचार करत, वर्तमानाच्या गणितात अडकलेला..
म्हणाला, पोरी हे सारं करतोय तुझ्यासाठी, आपल्यासाठी
काढशील का माझी आठवण, एकदातरी दिवसाकाठी...
नात्यांतील देवींबद्दल लिहिताना..
दिसला काका, त्या कोपऱ्यात, मिश्कीलपणे माझ्याकडे पाहताना
म्हणाला, बब्बू, नाव नको देऊ तुझ्या माझ्या नात्याला..
माझी परी, माझी परी म्हणून, फिरलो जगभर, घेऊन तुला खांद्यावर
गोड छबी तुझी, टिपत राहिलो कधी कॅमेरावर तर कधी खोल मनावर..
नात्यांतील देवींबद्दल लिहिताना..
उभा होता मामा, मांडवा बाहेर
डोळ्यातील पाणी लपवत, कृतार्थपणे मला न्याहाळत...
नजरेनंच म्हणाला मला,
छानसा संसार कर, सासर-माहेर जपताना आजोळची ही आस धर..
घेऊन ये पोराबाळांना परत तुझ्या आजोळी
करून पाठीचा घोडा, जगेन साऱ्या आठवणी..
नात्यातील देवींबद्दल लिहिताना...
होता भाऊ बाजूलाच बसलेला,
थोडासा खोडकर पण तितकाच जबाबदार
हलकेच हातात हात घेऊन म्हणाला,
असशील तू माझी ताई किंवा असेन मी दादा
दिसेन मी तुला, तुझ्याच बाजूला सदासर्वदा
घे तू झेप, मार तू भरारी, घे कवेत ते उत्तुंग शिखर
अन ये परत माघारी, तुझ्या हक्काच्या घरी, तुझ्या माहेरी..
'शक्तीं'च्या मागे खंबीरपणे उभे असणाऱ्या नात्यांतील सर्व 'शिवां'ना शतशः प्रणाम!! 🙏
आज ह्या 'शिव-शक्तीं'बरोबर विजयादशमी साजरी करूया..
नात्यातील नकारात्मकता, हेवेदावे, द्वेष-मत्सर, गैरसमजुती ह्यांचं रावणाबरोबर दहन करून नात्यांतील राम जपूया..
पुन्हा एकदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!!
-मी मधुरा..
२५ ऑक्टोबर २०२०
No comments:
Post a Comment