🌼पाचवी माळ - 'मावशी' आणि 'मामी' ह्या आजोळ समृद्ध करणाऱ्या नात्यांची.. 🌼
फोटो सौजन्य: अरुण लागू
(मावशीकडचे नवरात्र)
झुक झुक झुक करत आपल्या नात्यांची गाडी आता आजोळी येऊन थांबली.. आईच्या बरोबरीने आपल्यावर मायेची पाखरण करणारे कोणीतरी या जगात आहे, याची जाण देणारे हे ठिकाण.. शक्यतो आईच्या बाजूच्या नात्यांकडे म्हणजे काकापेक्षा मामा, आत्यापेक्षा मावशी, आजोळचे आजी-आबां यांच्याकडे आपला ओढा जास्ती असतो. ‘माय मरो मावशी उरो’ सारखी म्हण याची साक्ष देते. याचा अर्थ असा नाही की आईची काही किंमत नाही.. आईची जागा कोणीच भरून काढू शकत नाही.. पण तिच्यासारखे प्रेम देणारी, काळजी घेणारी एक व्यक्ती असते ती म्हणजे आपली 'मावशी'!
मावशी, जिच्यात आईचा भास असतो.. 'माँ के जैसी, ती मा-सी'!... जिच्याशी एक सुंदर भावनिक नाते असते.. बरेचदा आईला एखादी गोष्ट पटवायला मावशीच मदतीला येते.. “तू सांग ना तिला! ती आमचे नाही पण तुझे ऐकते” ही मस्केबाजी हमखास कामी येते.
मावशी या नात्याला वय नसतं.. 'काकू' म्हटलं तर “माझे काय वय झालेय का” किंवा न आवडल्याचा कटाक्ष असतो.. पण 'मावशी' म्हटलं तर चेहऱ्यावर स्मित हास्य पाहायला मिळतं.. आपण सहजपणे आईच्या मैत्रिणीला 'मावशी' तर मैत्रिणीच्या आईला 'काकू' म्हणतो..
खूपदा, दोन बहिणींच्या शिस्तीच्या कल्पना परस्परविरोधी पाहायला मिळतात.. त्यामुळे मावशीच्या घरी भाचरे कायमच खुश.. मावशी जर लहान असेल तर ती आईपेक्षा मॉडर्न किंवा मोकळ्या विचारांची वाटते तर आईपेक्षा मोठी असणारी जास्त शांत आणि प्रगल्भ.. काहीही असो पण हे नातं मात्र खास असतं..
नकळतपणे ती भाचरांची रोल मॉडेल बनते.. तिची फॅशन, कपड्याची स्टाईल, केसांची ठेवण असो वा तिच्या हातचा एखादा पदार्थ.. मनात कुठेतरी घर करून जातो..
अशी काही नाती असतात, जिथे आपण 'असे का वागतोय' याचा खुलासा करायची गरज पडत नाही.. त्या नात्यात एक नाते नक्की असते.. ते 'मावशी'चे!!
तगडग तगडग घोडोबा..
घोड्यावर बसले लाडोबा..
लाडोबाचे लाड करतंय कोण?
आजी-आबा अन मावश्या दोन..
हे झालं मावशीचे कौतुक पण.. आजोळी आपले लाड करणारी, अजुनी एक व्यक्ती असते ती म्हणजे आपल्या लाडक्या मामाची मामी..
आपल्या बडबडगीतातील 'शिकरण खाऊ घालणारी', 'भाच्यांना पोरटी म्हणणारी'.. अशी ती, एका बंगाली बडबडगीतात तर चक्क मारकुटी आहे.. माझ्या एका बंगाली मैत्रिणीने माझ्या मुलीला ते गीत शिकवलं होतं..
ताय ताय ताय मामा र बारी जाय.. (टाळ्या टाळ्या टाळ्या मामाच्या गावाला जाउया)
मामा दिलो दूधो भातो, दुयरे बोशे खाय.. (मामा देईल दूध भात, अंगणात बसून खाउया)
मामी आयी दंडिया निये, (मामी आली काठी घेऊन)
पलाय पलाय पलाय... (पळा पळा पळा)
पण खरंच मामी अशी असते का?.. तिला असे व्हिलन का बरं केलं असेल? आई आणि आजी यांचं तिच्याशी असलेलं नातं? का त्यांची मामाबद्दलची असुरक्षितता?..
आईला माहेरपण देणारी, वन्स-ताई म्हणत मागंमागं असणारी, अडीअडचणीला लगेच धावून येणारी, कार्यात बॅकस्टेज सांभाळणारी.. मामी..
वर्षभर भाचरांची वाट पाहणारी.. तुम्ही आलात कि घर कसं गोकुळ होतं म्हणणारी.. न्हाऊ माखू घालणारी, आवडीचा खाऊ करणारी... मामी..
ठेवणीतले पैसे काढून भाचरांचे लाड पुरवणारी, कौतुक करणारी, सुट्टीतल्या सिनेमा-नाटकांचा, छोट्या छोट्या सहलींचा हक्काचा सोबती... मामी..
एकीकडे उच्छाद मांडलाय नुसता म्हणणारी पण शांतता होताच कावरी बावरी होणारी, आंब्याच्या दोन कोयी भाचरासाठी बाजूला काढून ठेवणारी.. मामी..
भाची मोठ्ठी होत असताना नकळत दागिना देणारी, लग्नात 'मुलीला आणा' म्हणता क्षणी मामाच्या मागे उभी राहून डोळ्याला पदर लावणारी... मामी..
प्रेमाच्या विविध छटा असणारी मामी.. तुसी ग्रेट हो...
आजोळ समृद्ध करणाऱ्या मावशी आणि मामी तुम्हाला शतशः प्रणाम!!🙏
-मी मधुरा..
२१ ऑक्टोबर २०२०
🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
No comments:
Post a Comment