🌸सातवी माळ - दोन घराच्या दोन लेकींची 'नणंदा-भावजयां'ची!!... 🌸
फोटो सौजन्य: डॉ. सौ. अंजली गुप्ते
( माझ्या नणंदेकडचे नवरात्र )
नणंदा भावजया दोघी जणी
घरांत नव्हतं तिसरं कुणी..
शिंक्यावरच लोणी खाल्लं कोणी?
नणंद:- आता माझा दादा येईल गं.. वहिनीचं गाऱ्हाणं सांगीन गं... ‘दादा तुझी बायको चोरटी'...
दादा:- घे काठी लगाव पाठी
नणंद:- घरादाराची लक्ष्मी मोठ्ठी..
हे भोंडला, हादगा मध्ये म्हटलं जाणार गाणं, ‘नणंद-भावजय’ नात्याबद्दल बरचं काही सांगून जातं..
एकमेकींवर, अगदी अधिकारानं केलेल्या रुसव्या फुगव्यात, चुगल्यात, कधीही टोकाचा वाईटपणा येणार नाही हा विश्वास असलेलं, नणंद-भावजयीचं असं मैत्रीचं पण खट्याळ नातं..
वहिनीचं गाऱ्हाणं दादाशी करताना, दादानं वहिनीला सजा सुनावली तर लगेच वहिनीच्या लक्ष्मीपणाची आठवण, दादालाच करून देणारी त्याची लाडकी बहीण, घराचं चैतन्य..
वहिनीची कायम कठोर समीक्षक आणि समर्थक असणारी अशी ही नणंद..
नणंद आपल्या आयुष्यात येते तो क्षण किती मार्मिक असतो ना?.. बोहल्यावर चढलेली नववधू, डबडबलेल्या डोळ्यांनी वरमाला घालते.. आणि वराच्या मागे करवली म्हणून उभी असलेली नणंद तिला दिसते.. पुढे येऊन आश्वासक नजरेनं कलाशातल्या पाण्याची दोन बोट नववधूच्या डोळ्याला ती लावते.. जणू काही वहिनीच्या डोळ्यातलं पाणी पाण्यानच पुसून, या नात्यातला ओलावा प्रस्थापित करते.. दिव्यानं ओवाळून तिचं नवीन घरात स्वागत करते.. आणि नवसंवादाचं, अधिक अधिकाराचं, नवऱ्याच्या खास लाडाचं नणंदेचं नातं, आपला बाज दाखवत नववधूच्या आयुष्यात येतं..
कधी भरजरी तर कधी रंगीबेरंगी, कधी टोचणारे तर कधी रेशमी, कधी मखमली, कधी कडक तर कधी मायेनं चिंब भिजवणारे, कधी टचकन डोळ्यात पाणी आणणारे तर कधी भरलेले डोळे टिपणारे.. असे नणंदपणाचे अनेक पदर आपल्या दैनंदिन जीवनात आपसूक गुंततात.. आणि भावबंधांची रेशमी वीण गुंफत जाते..
सुखदु:खात धावून येणारी.. सणासमारंभात, कार्यात आपलं अस्तित्व ठळकपणे जाणवून देणारी.. आली नाही तर कमी जाणवणारी.. कायम भावजयीला अप्रत्यक्षपणे धाकांत ठेवणारी.. आणि टाळू म्हटलं तरी मनापासून टाळता येणं शक्य नसणारी.. रागावली तर मनांला हुरहूर अन् सुखावली तर धन्यता वाटेल.. अशी विदूषी म्हणजे नणंद.. या विदूषीचं मन सांभाळणं फारसं कठीण ही नसतं.. नणंदच्या मनातलं माहेर भावजयीनं जपलं की हे नातं कसं छान बहरतं जातं..
भाऊ तो आपला, भावजय का लोकाची?
माहेरी जाऊन मनं राखावी दोघांची...
अशी नणंद असेल तर त्याच्यातील नातं नणंद, मैत्रीण, बहीण ह्या चौकटी बाहेर फुलतं.. मग ह्या नात्याला वय नसतं.. तिचा प्रेमळ हवाहवासा वाटणारा दरारा नात्याबरोबर सुरू होतो आणि आपल्याबरोबरच संपतो..
अर्थात नणंदेनं सुद्धा भावजयीला तो मान देणं आवश्यक असतंच.. तिच्या आईवडिलांची काळजी घेणारी, माहेर समृद्ध करणारी, भावाची सहचारिणी म्हणून.. एकानं प्रेम दिलं अन् दुसऱ्यानं प्रतिसादच नाही दिला तर.. प्रेम म्हणजे प्रतिसाद.. नणंद भावजय जेव्हा एकमेकींना प्रतिसाद देतात, तेव्हाच या नात्याचे सुरेल पडसाद उमटतात..
नणंद-भावजय-भाऊ या त्रयीतील गोडवा, माधुर्य, स्निग्घता 'शिक्यातलं लोणी अगदी राजरोसपणे खाऊन' जपूया..
नातं प्रेमाचं, नातं मैत्रीचं
नातं आपुलकीचं, नातं विश्वासाचं
नातं साऱ्या बंधना पलीकडचं
.... असं नातं असतं नणंद-भावजयीचं..
थोडं हसरं, थोडं रूसवं
थोडं बोलकं, थोडं रडकं
असतं मात्र खेळीमेळीचं
.... असं नातं असतं नणंद-भावजयीचं..
दोन घरच्या दोन लेकी
होऊन जातात एकरूपी
जगता हे बंधन प्रेमाचं
.... असं नातं असतं नणंद-भावजयीचं..
ह्या नणंद-भावजयीच्या चिरंतर नात्याला शतशः प्रणाम! 🙏
-मी मधुरा..
२३ ॲाक्टोबर २०२०
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
No comments:
Post a Comment