Tuesday, November 9, 2021

कालाय तस्मै नमः

कृष्णा पंचगंगेच्या तीरावर, वसलेलं माझं छोटसं गांव
मिरवत असते अभिमानानं, लावून त्याचे नांव 
विचारलंच कोणी तर सांगते,
हो, आवडतं मला माझं गांव, तेवढीच माझी त्याच्याशी नाळ.. 

ओलांडता पूल, लागेल खडकाळ वाट 
जाईल ती, हिरव्या शेतातून, दुतर्फा चिंचेच्या झाडातून.. 
पोहचेल थेट वेशीत..  
मग काढेल मार्ग गणपती, महादेव, विष्णू, मारुती, शाकंबरी देवतांच्या गर्दीतून..   
थबकेल जराशी, वाचनालयापाशी.. पोहचेल इतक्यातच माझ्या अंतरीच्या नाळेपाशी..  

दिसेल दिमाखात उभं.. माझं घर..  
काळ्याशार दगडाचं, रुपेरी गजाच्या दाराचं 
सुंदर रंगीत कमानींचं, सोप्यातील विश्वस्त झोपाळ्याचं 
बहरलेल्या अंगणाचं, दारापुढल्या तुळशी वृंदावनाचं..

स्वप्नवत असं माझं नांदत गोकुळ.. 
तीन पिढ्यांच्या नात्याचं, नात्यांच्या गुंतागुंतींच, 
भरलेल्या माणसांचं, येणाऱ्या जाणाऱ्या, अडल्या नडल्याचं
आबांच्या प्रेमळ धाकाचं,आजीच्या गोड गोष्टींचं आणि नित्यकर्माचं
आई-काकूच्या अथांग मायेचं, बाबा-काकांच्या भक्कम अधाराचं 
ताई-दादाच्या शीतल छायेचं, बहीण-भावंडांच्या रुसव्या फुगव्याचं..   

निगुतीनं विणलेलं, प्रेमानं फुलणारं  
सुख-दुःख्ख सगळं काही एकत्र वाटून घेणारं 
भुकेल्याला दाणा देणारं, मायेची उब पांघरणारं
रितीरिवाज, व्रतवैकल्याबरोबर माणुसकी जपणारं 
रामनाम, अन्नदान, भक्तिमार्ग ह्यातून परमार्थ साधणारं 

कालचक्राबरोबर माझं घर ही बदलत गेलं.. 
नवनवीन साज लेवत गेलं.. काही उतरवत गेलं तर नवीन काही चढवत गेलं.. 
आपुलकी, माणुसकीचा गाभा न सोडता, सगळे बदल स्वीकारत गेलं.. 
आबा-आजी मंडळी पडद्याआड गेली.. 
ओघानं आत्यांचं माहेरी येणं कमी झालं, भावंडांचं आजोळी येणं ही लांबत गेलं..
शिक्षणं, उद्योगधंदा, लग्न ह्यामुळं आम्ही मुलं घराबाहेर पडलो.. देश-विदेशात स्थिरस्थावर झालो..
शरीराच्या अंतराबरोबरच हळूहळू मनाची अंतरं ही वाढू लागली.. 
पण ही मनाची अंतरं कधी जाणवली नाहीत कारण घर ह्या नाळेशी आम्ही बांधले गेलो होतो..
सण समारंभ, सुट्ट्यांना तिथं भेटी व्हायच्या... 
लग्न, मंगळागौरी, डोहाळजेवणं, बारशी निमित्त्यानं परत गोकुळ नांदल्याचा आभास ही व्हायचा.. आणि गत आठवणींना उजाळा देत नवीन आठवणी निर्माण करायचा प्रयत्न ही.. यातूनच पुढच्या पिढीची सुद्धा घराशी नाळ जुळत गेली.. 
काळानुरूप बदलाशी जुळवून घेत आई-बाबा, काका काकू ही बाहेर पडले.. 
नांदत्या गोकुळाची स्वप्न पाहत माझं घर मात्र तिथंच उभं राहिलं.. 

एकदा भारतवारीत आईला म्हणाले.. चल घरी जाऊन येऊ, आजी-आबांना भेटून येऊ.. 
ते नसले तरी काय झालं? त्यांच्या आठवणीत थोडं विसावून येऊ.. 
पूल कधी ओलांडला, वेशीतून कधी आलो, मंदिरं कधी गेली काहीच कळालं नाही..
गाडी एका जीर्ण वास्तू समोर उभी राहिली.. 
कुलूप उघडल्यावर, कुरकुरत्या दरवाज्यानं आमचं स्वागत केलं.. भंगलेलं तुळशी वृंदावन पाहून मन उदास झालं.. 
खंगलेली झाड पाहून वाटलं, ह्यांना कधीच येणार नाहीत का फुल?
गंजलेले तावदान, कुजलेली खिडकी, धुळीने माखलेली भांडीकुंडी पाहून मन पिळवटून गेलं.. 
माझं घर.. माझी ओळख.. माझं बालपण.. माझी नाळ.. सगळं एका हुंदक्यानिशी धूसर झालं.. 
अचानक मला माझं घर एका तपस्वी योगी सारखं दिसू लागलं.. चांगला वाईट भूतकाळ स्वतःत सामावून घेऊन, वर्तमानात तेवढ्याच ताकतीनं उभा असलेला कर्मयोगी!
आणि माझं घर.. सरकारांचं घर.. ह्या वास्तूभोवतीची सारी वलयं, निदान माझ्या पुरती तरी, गळून पडली.. 
पिढ्यानपिढ्या अश्वथासारखा उभा असलेला वास्तूपुरुष 'शुभम भवतु' म्हणताना दिसू लागला.. आणि त्याच्याशी माझं वेगळं नातं जोडलं गेलं.. 

माझं घर, आता परत कात टाकतंय.. एखाद्या नागराजासारखी!... 
कात टाकताना होणाऱ्या वेदना, जखमा तनामनावर होतील ही.. पण त्यात नवनिर्मितीचा आनंद ही असेल.. 
अनेक नवीन कुटुंबं, आता ह्या वस्तूला जोडली जातील.. तिथं फुलतील, बहरतील.. छोट्या छोट्या गोकुळांचं नंदनवन होईल.. 
आणि खऱ्या अर्थानं माझं घर, 'माझं घर' न राहता सगळ्यांचा 'आधारवड' बनेल.. आणि 'शुभम भवतु' हा आशीर्वाद देत राहील.. 






-मी मधुरा.. 
९ नोव्हेंबर २०२१

No comments:

Post a Comment