Tuesday, August 30, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं १४ ते १७)

 १४. युगंधरा.. सुमती क्षेत्रमाडे.. 


गेल्या महिन्यातच सुमती क्षेत्रमाडेंची 'महाश्वेता' झपाटल्यासारखी वाचली.. 'सुधा'चे गरुड अजुनी मनावर असताना परत दुसरी त्यांच्याच लेखणीतून उतरलेली ही व्यक्तिरेखा.. अकस्मितपणे 'युगंधरा' माझ्या हातात पडली आणि ४७५ पानांची कादंबरी ४ दिवसांत वाचून झाली.. 

स्त्री शक्तीचं परत एक वेगळं रूप.. 'युगा'.. सुशिक्षित आणि सुसंस्कृत अशी ह्या कथेची नायिका 'युगंधरा' म्हणजेच 'युगा'.. जी संयमी आहे पण दुर्बल नाही.. जिच्या सत्विकतेमध्येच तिची आत्मशक्ती दडली आहे.. अशी युगा अंतःकरणाला स्पर्शून जाते.. अंतर्मुख करून जाते.. जसं कशी कादंबरी पुढं जाते तसं तशी युगाची अनेक रूप समोर येतात.. स्वभावानं कोमल असलेली युगा प्रसंगी वज्राहून कठीण होताना दिसते.. सात्विक, एकनिष्ठ, मूक प्रीत जपणारी युगा.. पितृभक्त युगा.. हेकट आईला आणि स्वार्थी भावांना समजून घेणारी समंजस युगा.. मैत्री जपणारी युगा.. संपूर्ण आयुष्य मनाविरुद्ध जगावं लागलं तरी तक्रारीचा शब्द ही न उच्चारणारी युगा.. अशी तिची कितीतरी रूपं!.. 

युगा बरोबरच तिच्या आसपासची पात्रं सुद्धा सहजतेनं वावरताना दिसतात.. त्यांचं भावविश्व, त्याचे स्वभाव विशेष तितक्याच ताकदीनं लेखिकेनं मांडले आहेत.. मग त्या तिच्या जीवाभावाच्या मैत्रिणी सुलभा, जयश्री असोत किंवा शेजारच्या माई असोत किंवा तिचे आई वडील भावंडं असोत.. युगा आणि रुचिराचं फुलत जाणारं, उमलत जाणारं नातं सुद्धा अनोखं आहे.. एकाच व्यक्तीवर-अभीवर- प्रेम करणाऱ्या ह्या दोघी.. एक मूकपणे तर दुसरी बायको ह्या नात्याने.. पण कालांतरानं त्यांचं दृढ होणारं नातं.. त्यांचं एकरूप होत जाणं.. एकमेकींच्या सावल्या बनणं.. वाचताना वाटतं, असं नातं जोपासलं गेलं तर 'प्रेम' हे नेहमीच पवित्र राहील.. युगा बरोबरच रुचिरा पण आपल्याला आपली वाटू लागते.. जेव्हा युगा रुचिराला म्हणते कि तुझ्या पायगुणामुळं अभी इतक्या उच्च पदाला पोचला तेव्हा रुचिरानं दिलेलं उत्तर 'युगाताई तुम्ही ह्या घरचा पाया आहात.. मी तर आत्ता आली आहे..' आपल्याला तिच्या प्रेमात पाडतं.. 

एखाद्याचं आयुष्य हे फक्त दुसऱ्याचं करण्यासाठीच असतं.. तसंच काहीसं 'युगा'च ही.. ती सतत दुसऱ्याच्या सुखासाठी झटत राहते.. झिझून झिजून संपून जाते.. अचानक झालेला कादंबरीचा शेवट चुटपुट लावून जातो.. शेवट आवरता घेतला असं मला वाटलं.. अजुनी काही वेगळा शेवट करता आला असता का? असा विचार ही मनात आला.. युगापेक्षा महाश्वेतातील सुधा ही जगणं शिकवते.. परिस्थितीशी झगडून, दोन हात करून उभं राहायला शिकवते.. 

कादंबरी वाचल्यावर 'Spontaneous Overflow of Powerful Feelings' असं मलपृष्ठावर लिहिलेलं तंतोतंत पटतं.. 


-मी मधुरा.. 

***************************************************

१५. मृण्मयी.. गो. नी. दांडेकर.. 



गो. नी. दांडेकरांची मी वाचलेली ही पहिलीच कादंबरी 'मृण्मयी'.. ह्या पूर्वी त्यांचे ललितलेख, दुर्गदर्शन वाचलंय.. स्थळ, दुर्ग, डोंगर दऱ्या त्यांच्या लिखाणातून कश्या प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभ्या राहतात.. ही कांदबरी वाचल्यावर वाटलं, कोकणाचं वर्णन करावं तर गो. नी. दां.नीच!!.. 

ही गोष्ट आहे 'मनू'ची! मनोरमा गणपत खरे ची!.. 

गोष्ट सुरु होते ती तिच्या बाबांपासून.. लहानग्या गणू पासून.. कोकणावर निस्सीम प्रेम करणारा, सुंदर चित्रे रेखाटणारा, अत्यंत हुशार चुणचुणीत असा गणू.. मामाकडं शिकायला असणारा गणू.. असा हा गणू लहान वयातंच भागवत-ज्ञानेश्वरी-गाथा नुसतीच वाचत नाही तर ती आचरणात आणायला ही सुरुवात करतो.. पुढं व्हर्नाक्युलर फायनल ला तालुक्यात दुसऱ्या आलेल्या गणूचं मामीच्या नात्यातल्या मुलीशी सरस्वतीशी लग्न ही होतं.. हातावर हात देऊन पहिली दोन आपत्य गेल्यावर झालेलं हे शेंडेफळ 'मनू'.. आपल्या गोष्टीची नायिका.. अपुऱ्या दिवसाची.. वीतभर लांबीची.. मुडदूस झालेली.. किरकिरी मुलगी.. 

किरकिरी मनू ते विचारी, मनस्वी मनुताई हा प्रवास म्हणजे 'मृण्मयी'.. २५७ पानांच्या ह्या कादंबरी मध्ये कवितांचे रसग्रहण, ज्ञानेश्वरी-गाथा यांचे निरूपण, कोकणाचं निसर्ग वर्णन, कोंकणी आणि वर्हाडी भाषेचा बाज.. सगळंच कसं निगुतीनं एकत्र गुंफलंलय.. 

अर्थार्जनासाठी, कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी तात्या म्हणजेच गणू कोंकण सोडून विदर्भात जातात.. कोंकण सोडतानाची त्याची मनोवस्था तुकारामांच्या ओवीतून खूप छान सांगितली आहे.. रडक्या लेकीला शांत करण्यासाठी ते ज्ञानेश्वरी-गाथातील ओव्या म्हणत असत.. ह्यातून हळूहळू परवचा, ओव्या, श्लोक, अभंग, भूपाळ्या, भजनं यांची मनूला गोडी लागते.. वडिलांबरोबर ज्ञानेश्वरी गीतेतील अध्याय म्हणणं.. गाथेवर चर्चा करणं.. नवनवीन ग्रंथ वाचणं.. ह्यामुळं ती प्रगल्भ होत जाते.. वडिलांबरोबरच्या गप्पांतून, त्यांच्या सहवासातून तिच्यात कोंकण प्रेमाची बीज ही आपसूक रुजत गेली..
 
ऋणमोचन मध्ये झालेली मनू आणि गागडेबाबांची भेट.. तेथील वातावरण.. त्यांचे कीर्तन.. अगदी गुंतून राहायला होत..

अकस्मात वडिलांच्या निधनानंतर, घर चालवण्यासाठी, ज्ञानेश्वरी-गाथावर बोलणाऱ्या मनूची 'ज्ञानेश्वरी वाचणारी मनुताई' ही नवीन झालेली ओळख.. घर चालवण्यासाठी तिनं आणि तिच्या आईनं घेतलेले कष्ट.. कोंकण प्रेमापोटी दारुड्याशी केलेलं लग्न.. सासरी होणारा छळ.. लग्नानंतर वर्षभरातच तिला आलेलं वैधत्व.. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडतंय असं वाटत.. वेळोवेळी ज्ञानेश्वरी-गाथा तील आलेले दाखले मनूची अध्यात्मिक बैठक दर्शवतात.. 
'मृण्मयी' ही नुसती वाचायची कादंबरी नाही तर अनुभवायची आहे.. वडील-मुलगी, आई-मुलगी, मनू-दुर्गा, मनू-चित्रकार, दुर्गाचा नवरा' हे नातेसंबंध आत्म्याशी आत्म्याला जोडतात.. 

कादंबरीच्या शेवटी, मनूचा आणि तिच्यावर हपापलेल्या नजरेनं पाहणाऱ्या जोशींचा संवाद अंगावर काटा आणतो.. 

"काय हवय तुम्हाला? माझं शरीर? हा हाडांचा सापळा? ही दुर्गंधीची खाण? हे रोगांचं आगर? ही क्लेशतरुंची वाडी?... हे काय माझं उरलं आहे? छे छे! हा आहे श्रीहरींच्या रुपावरुन उतरलेला उतारा.. माझी सत्ता तिळमात्र राहिली नाही यावर.. तेव्हा घ्या हे.. विस्कटा.. टाका फाडून.. होऊद्या त्याच्या चिंध्या.. उधळा चहू दिशांना.. मात्र जे कराल ते माझ्यांच्या साक्षीनं होऊद्या.. या माडांच्या झावल्या डोलत असोत.. रातांब्याची पालवी हालत असो.. त्या अवघ्यांच्या कुशीत या शिवनिर्माल्याचं हवं ते होऊद्या.. " 

हे वाचल्यावर 'मृण्मयी' हे पुस्तकाचं नाव सार्थ वाटत.. समर्पण, गाढा विश्वास.. आणि त्यासाठी काहीही करायची तयारी.. म्हणजे मृण्मयी! 

*Thank you मीनू ह्या सुंदर भेटीबद्दल!!


-मी मधुरा.. 

*******************************************

१६. झिम्मा - आठवणींचा गोफ.. विजया मेहता.. 




'बॅरिस्टर नाटकात मावशीचं काम करणारी' इतकीच काय ती विजया मेहतांची ओळख.. ती ओळख ही अशीच ऐकून आणि वाचून.. मध्यंतरी झी वरच्या एका कार्यक्रमात रंगभुमीवर दीर्घकाळ काम करणार्‍या काही अभिनेत्री सुहास जोशी, स्वाती चिटणीस, नीना कुलकर्णी, उषा नाडकर्णी यांनी विजयाबाईंचं नाव आदराने घेऊन त्या गुरुस्थानी असल्याचं सांगितलं होतं.. तसंच विक्रम गोखले, नाना पाटेकर विजयाबाईंना गुरुस्थानी मानतात असं वाचनात आलं होतं.. त्यामुळं विजयाबाईंबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा होती.. 'झिम्मा' विजयाबाईंच्या आत्मचरित्राबद्दल कळल्यावर पुढच्या भारतभेटीत ते घेऊन वाचायचं नक्की केलं.. पण त्यासाठी आज उजाडावा लागला.. 

अगदी पाठपोठ 'कव्हर टू कव्हर' म्हणतात ना तसं 'झिम्मा' वाचून काढलं.. 'सेतू स्नेहाचे' या ऋणनिर्देशाच्या भागातलं पहिलंच वाक्य 'लेखन हा माझा प्रांत नव्हे'.. पण हे काही खरं नाही.. अगदी गप्पा माराव्यात असं त्यांचं लिखाण.. त्यात कुठेही आढ्यता नाही कि मानभावीपणा नाही कि खोटी नम्रता नाही.. 'मी लिहू लागते' ह्या प्रस्तावनेत 'मी हे का लिहित आहे' याचा एक स्वतःशीच झालेला संवाद वाचकांच्या साक्षीने त्या लिहितात.. आणि वाचकांना शुभेच्छा देऊन लेखक, दिग्दर्शक, कलाकार, प्रेक्षक आणि त्या स्वतः ह्या सर्वांनी मिळून खेळलेल्या नाटकरूपी झिम्म्याचा खेळ वाचकांच्या मनात गुंजत राहो अशी आशा व्यक्त करतात..  

हे आत्मचरित्र बेबी, विजू जयवंत, विजया खोटे आणि विजया मेहता चार टप्प्यांमध्ये लिहिलंय.. 'विजया मेहता' हे त्यांचं आजचं रुप.. आणि म्हणूनच बाकीच्या तिघींना त्या तृतीय पुरुषी एकवचनात संबोधतात.. त्यांचं स्वतःच्या ह्या रूपांकडं असं त्रयस्थ नजरेनं पहाणं मला खूप आवडलं.. बाईंची कारकिर्द सुमारे पन्नास वर्षांची.. त्यामुळे कामाचा आवाकाही मोठा.. त्यात शिक्षण, प्रायोगिक रंगभुमी, प्रशिक्षण वर्ग, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रकल्प, लोकमान्य रंगभुमी, माध्यमांतरं आणि संस्थांची संचालकपद.. शिवाय महत्त्वाच्या वैयक्तिक घटना.. ह्या सगळ्यांचा हा लेखाजोखा.. पण याचं नुसत दस्तैवजीकरण न करता गप्पांच्या रूपांत सांगितल्यानं उत्सुकता शेवट पर्यंत राहते.. 

सुरुवात होते ती बेबीच्या लहानपणापासून.. जयवंत परिवाराचा मोठ्ठा कुटुंबकबिला, त्यातील बाईंवर प्रभाव पाडून गेलेल्या व्यक्ती, त्यांचं भिवंडीचं घर, मुंबईचं घर, तिथलं वातावरण ह्यांची सुरेख वर्णनं.. ह्या सुरस गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडत आहेत असं वाटतं.. बेबीच्या काही आठवणी आणि निरीक्षणं तत्कालीन समाजाबद्दल तर आहेतच पण त्याचबरोबर त्या समाजात होणारे बदलही फार सूक्ष्मरीत्या टिपलेले आहेत..

विजू जयवंत आणि विजया खोटे ह्यांचा काळ म्हणजे स्वातंत्र्येत्तर काळ.. संपूर्ण भारतात ह्या काळात सांस्कृतिक 'चळवळी' सुरु होत्या.. जवळ जवळ सर्व कलाप्रकारांमध्ये चांगल्या गोष्टी घडत होत्या.. नवनवे कलाकार उदयाला येत होते.. आणि त्यांची पिढी अश्या वातारणात वाढली ही त्यांच्याकरता अतिशय भाग्याची गोष्ट असं त्या म्हणतात.. शिक्षण सुरु असताना अगदी न कळतच बाई नाटकात येऊन पडल्या, पुढे इथल्याच झाल्या.. नाट्य प्रवासाबरोबरच विजू जयवंत, विजया खोटे यांचं वैयक्तिक आयुष्य, नातेसंबंध ही हळूहळू उलघडत जातात.. त्यांनी मांडलेला मध्ययुगीन ते एकविसाव्या शतकात होणारा हा प्रवास फार रोचक आहे.. बाई स्वत: कुठही "आमच्या काळी... " किंवा "जुनं ते सोनं" चा सूर लावताना दिसत नाहीत.. उलट नवनवीन माध्यमांबद्दल अजूनही उत्सुकतेनं माहिती करून घेताना दिसतात.. 

विजया खोटे आणि मित्रमंडळींनी मिळून सुरु केलेल्या 'रंगायन'चा प्रवास.. सुरुवातीला केलेल्या पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसारख्या अतिशय भिन्नकुळी नाटककारांच्या एकांकिका करताना बाईंमधल्या अभिनेत्री आणि दिग्दर्शिकेची कस लागलेली पाहायला मिळते.. दिग्दर्शनाची विशिष्ठ पध्दत, नेपथ्याबाबतचा काटेकोरपणा, तालमींमधली शिस्त, भुमिकेमधली 'बॉडी इमेज' शोधण्याचे प्रयत्न, नाट्यसंहितेवर प्रयोग पूर्ण बसेपर्यंत केलेलं काम ह्या सगळ्या गोष्टी अतिशय सोप्प्या पध्दतीने उलगडून सांगितलेल्या आहेत.. वयानं आणि अनुभवानं लहान अश्या दिग्दर्शिकेनं  पु.ल. देशपांडे आणि विजय तेंडूलकरांसारख्या दिग्गजांना प्रसंगी संहितेत बदल करायला लावलेलं पाहून बाईंच्या ठाम विचारांचं आणि धैर्याचं कौतूक वाटतं.. नवर्‍याबरोबर इंग्लंडला असताना बाईंनी घेतलेलं नाट्यप्रशिक्षण, तिथले अनुभव, तिथं पाहिलेल्या नाटकांची अतिशय सुरेख वर्णनं पुस्तकात दिली आहेत.. रंगायनचा कालखंड त्रयस्थपणे आत्मपरिक्षण करुन जरी लिहिला असला तरीही लिहिताना बाईंच्या मनावर ताण असावा हे वाचताना नक्कीच जाणवतं.. रंगायनचं फुटणं, एकमेकांवर केले गेलेले आरोप हे जिव्हारी लागण्यासारखेच आहे.. म्हणूनच हा भाग आटोपता घेतला असेल.. 

रंगायन फुटल्यावर बाईंनी व्यवसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं.. ह्या रंगभूमीला 'व्यवसायिक' न म्हणता त्यांनी नाव दिलं 'लोकमान्य'..  ह्या लोकमान्य रंगभूमीला  बाईंनी 'मला उत्तर हवं', 'अखेरचा सवाल', 'जास्वंदी', 'महासागर', 'अजब न्याय वर्तुळाचा', 'संध्याछाया', 'हमिदाबाईची कोठी', 'बॅरिस्टर', 'पुरूष', 'वाडा चिरेबंदी' अशी अनेक सरस नाटकं दिली.. किती तरी वेगवेगळे विषय!..  ह्या नाटकांबद्दल, त्यांच्या संहितेबद्दल, नटसंचाबद्दल, नाटक बसवताना दिग्दर्शनाच्या दृष्टीने केलेल्या विचारांबद्दल, नेपथ्याबद्दल, नाटकांच्या शेवटाबद्दल, प्रयोगांदरम्यान आलेल्या अनुभवांबद्दल, तालमींबद्दल बाईंनी अगदी विस्तारानं लिहिलेलंय.. काही काही नाटकांबद्दल वाचताना अक्षरशः अंगावर काटा उभा रहातो..

स्वतःच्या चुकाही बाईंनी प्रांजळपणे काबुल केल्या आहेत.. इतक्या मोठ्या कारकिर्दीत आलेल्या चांगल्या अनुभवाबरोबरच खटकलेल्या गोष्टी ही तितक्याच सहजतेनं मांडल्या आहेत.. मग ती तेंडूलकरांबरोबरची तुटलेली युती असो किंवा भक्ती बर्वेंचा एकपात्री साच्यात अडकलेला अभिनय असो.. नेपथ्यकार गोडश्यांबरोबर झालेले मतभेद असोत किंवा वैयक्तिक आयुष्यातले प्रसंग.. इतकंच काय स्वतःच्या फसलेल्या/पडलेल्या नाटकांचा आढावा ही तटस्थपणे एका वेगळ्या प्रकरणात घेतलेला आहे..  

भारत आणि पूर्व जर्मनी दरम्यान असलेल्या सांस्कृतिक देवाण घेवाण करारा अंतर्गत केल्या जाणार्‍या कार्यक्रमांमध्ये बाईंनी अनेक संस्कृत, मराठी, जर्मन नाटकं भारतात तसेच जर्मनीत केली.. त्यानिमित्तानं त्यांनी अनेक मित्र जोडले.. नंतर नंतर तर त्यांना पूर्व जर्मनीतली गावं त्यांचं माहेरच वाटत होती.. ह्या सगळ्या प्रकल्पां दरम्यानचे अनुभवही अतिशय वाचनीय आहेत.. शांकुतल, मुद्राराक्षस, नागमंडल, हयवदन अशी अस्सल भारतीय नाटकं जर्मन कलाकार कसे सादर करत असतील ह्याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.. 

दूरर्शनकरता बाईंनी काही कार्यक्रम, काही त्यांच्या नाटकांवर आधारित चित्रपट ही केले.. हे वेगळं माध्यम हाताळताना स्वतःच्याच कलाकृतींमध्ये केलेला बदल, तो करताना आलेल्या अडचणी नमूद केल्या आहेत.. पुस्तकातील शेवटचे प्रकरण बाईंची एन.सी.पी.ए.च्या संचालक पदाची कारकीर्द.. ह्याबद्दल मात्र खूपच कमी लिहिलंय  असं वाटलं..  

ह्या पुस्तकाने खूप समृद्ध केले.. कलेचा आस्वाद कसा घ्यावा हे शिकवले.. म्हणूनच 'झिम्मा' हे केवळ आत्मचरित्र नाही तर एक संपन्न नाट्यानुभव आहे.. 

'झिम्मा' वाचल्यावर वाटलं 'सवाई' सारखाच नाट्यमहोत्सव व्हायला पाहिजे.. आणि बाईंच्या नाटकांना पुनर्जीवन मिळालं पाहिजे.. 


-मी मधुरा.. 

********************************************

१७.  चेकपॉईंट चार्ली.. डॉ माधवी मेहेंदळे.. 


डॉ माधवी मेहेंदळे यांचं हे १६५ पानी पुस्तक, त्याची लेखनशैली खूपच आवडली.. ह्या लेखन प्रकाराला काय म्हणतात माहिती नाही पण मी हे पुस्तक दोनदा वाचलं.. 

दोन पन्नाशीतील मैत्रिणी, एक अमेरिकेत खूप वर्ष वास्तव्यास असलेली आणि एक भारतीय.. दोघी जर्मनीला प्रवासाला जातात.. हा प्लॉट.. पण एकमेकींशी संवाद न करता फक्त त्यांच्या विचारातून ही कथा पुढे सरकत जाते.. लेखिकेला जे सांगायचं आहे ते वाचण्याची उत्सुकता शेवट पर्यंत अबाधित राहते.. 

वैदेही.. अमेरिकन.. उच्चपदस्त, स्त्रीवादी.. लिव्ह इन रेलशनशिप सध्या एकटी.. आणि दुसरी नेहा.. भारतीय.. संसार जपून स्वतःचा व्यवसाय करणारी.. एका मुलाची आई.. 

जरी दोन वेगळ्या स्त्रिया वेगळ्या राहाणीमानाचं प्रतीक असल्या तरी कोणत्या ही स्त्रीच्या मनातील ‘स्त्री’ म्हणून सतत होत असलेली आंदोलन, ‘स्त्री’ म्हणून त्यांचं असणारं अस्तित्व, जोडीदाराचं मानसिक आणि शारीरिक पातळीवरील स्वामित्व, रूढी परंपरा संस्कार झुगारु पाहणारी ह्या वयातील त्यांची बंडखोरी.. आणि त्याचवेळी नव्यानं सापडत जाणारे पर्याय खूप रंजक पद्धतीनं वाचायला मिळतात.. 

दोन मैत्रिणींचा जर्मन प्रवास दाखवणाऱ्या ह्या पुस्तकाचं असणारं ‘चेकपॉईंट चार्ली' हे नाव खूप बोलकं आहे.. दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीचे दोन भाग झाले पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनी.. आणि ह्या दोन्ही मध्ये उभी राहिली ती बर्लिनची मोठ्ठी भिंत.. ती ओलांडण्यासाठी उभे राहिले ३ चेकपॉईंट.. त्यातील एक ‘चेकपॉईंट चार्ली’.. भिंतीच्या एका बाजूला संपन्न-स्वतंत्र-विकसनशील पश्चिम जर्मनी तर दुसऱ्या बाजूला दरिद्री-वंचित-कुचंबलेलं पूर्व जर्मनी.. त्यामुळं पूर्व जर्मनी मधून प्रत्येक जण पश्चिम जर्मनीकडे जाण्यासाठी धडपडत असतो.. ह्या अर्थाने चेकपॉईंट चार्ली हे बंधनातून मुक्तीकडं जाण्याचं आशावादाचं प्रतीक मानलं जातं.. ज्या पद्धतीनं ह्या दोन मैत्रिणींचा मानसिक, भावनिक प्रवास दाखवला आहे त्याला हे नाव एकदम चपखल बसतं.. 

जर्मनचा अख्खा इतिहास खूप वेगळ्या पद्धतीनं वाचायला मिळतो.. त्यांची मानसिक स्थित्यंतरं दाखवताना हिटलरची मनोवस्था येते.. चार्ली चॅप्लिन मधूनच डोकावतो.. हिटलर आणि चार्ली चॅप्लिन मधील साम्य आणि फरक, ह्या कलाप्रेमी स्त्रियांमुळं पिकासो, दाली, मोझार्ट, जर्मन थिएटर भेटत राहतात.. 

ह्यातील कवितांना विसरून चालणार नाही.. 

पिकासोची बंडखोर वृत्ती पाहिल्यावर वैदेहीच्या मनातील विचार ह्या कवितेतून जाज्वल्यपणे उमटतात.. 

माझा झोका मीच बांधणार 
मीच बसणार 
व मीच झोका देणार 
उंच उंच उंच 
अवकाशाच्या सीमंतापर्यंत.. 

आणि हीच वैदेही प्रवासाच्या शेवटी तिला उमगलेलं जीवनाचं सत्य सांगताना म्हणते.. 

मी म्हणजे कोण?
मी म्हणजे 
निसर्गाच्या ऊर्जेचा एक छोटासा भाग.. 
 
डॉ माधवी मेहेंदळें मधील चित्रकार, कवयित्री आणि सुजाण लेखिकेने वाचकांना दिलेली मेजवानीच आहे.. 

-मी मधुरा..

*************************************

1 comment:

  1. छानच ,तीच पुस्तके पटपट आपल्या हातात पडावी आणि अधाशा सारखी वाचावी,इतकी उचुकता निर्माण तुझ्या लिखाणातून होते.

    ReplyDelete