Thursday, September 29, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं १८ ते २३)

 १८. कोसला.. भालचंद्र नेमाडे.. 



कोणती पुस्तकं वाचायची याचा शोध घेत असताना, भालचंद्र नेमाडेंचं 'कोसला' हे 'must read'- 'वाचायलाच हवं' ह्या श्रेणीत होतं.. भालचंद्र नेमाडे हे नाव मी ऐकलेलं पण नव्हतं.. खरं सांगायचं तर मी मोजक्याच काही लेखकांचं साहित्य ह्यापूर्वी वाचलं होतं.. 'भालचंद्र नेमाडें' हे नाव गूगल केलं तर त्यांच्या बद्दल आणि ह्या कादंबरीबद्दल मिळालेली माहिती अचंबित करणारी होती.. ज्ञानपीठ आणि साहित्य अकॅडमी पुरस्कार विजेते पद्मश्री भालचंद्र नेमाडे.. मराठी साहित्यातील नावाजलेलं नाव आणि कोसला ही त्यांची पहिली आणि सर्वात जास्त विक्री झालेली कादंबरी!.. १९६३ मध्ये प्रकाशित झालेल्या 'कोसला'च्या आत्ता पर्यंत २५ पेक्षा जास्ती आवृत्ती असून त्याचं  आठ साऊथ एशियन भाषांबरोबरच इंग्लिश मध्ये भाषांतर झालंय.. अबब!!.. आणि भारतातून आणायच्या पुस्तकांच्या यादीत 'कोसला'ची नोंद झाली.. आणि शिपमेंट मिळायचाच अवकाश लगेचच वाचायला ही घेतलं..

खानदेशातील सांगवी नावाच्या खेड्यातून पुण्यात शिक्षणासाठी आलेला आपल्या कथेचा नायक 'पांडुरंग सांगवीकर'.. १९६० दशकातील तरुण प्रतिनिधी.. याचा जीवनप्रवास म्हणजे 'कोसला'.. First Person Perspective - प्रथम पुरुषी कथानकामध्ये हा जीवनप्रवास मांडल्यानं हे एक आत्मकथन म्हणून आपण वाचतो.. डायरी पद्धतीनं ह्यातील बराचसा भाग लिहिला आहे.. व्याकरण, प्रमाणभाषा ह्याला खाट मारून ग्रामीण बोली भाषा वापरल्यानं वेगळ्याच ढंगात हे आत्मकथन रंगतं.. पांडुरंगाच्या जीवनप्रवासात त्याचं कॉलेज, वस्तीगृह, मित्र आणि त्यांच्या टोळ्या, त्यांचा खोटेपणा, उथळ प्राध्यापक याचबरोबर वक्ते-पुढारी आणि त्यांचं समाजकारण, राजकारण, आध्यात्म, लग्न-नातेसंबंध असे अनेक विषय येतात आणि ह्यामुळं तुटत चाललेला पांडुरंग कधी उद्वेगानं, कधी गंभीरतेनं, कधी चिडून, कधी उपरोधानं, कधी तुच्छतेनं जगण्यातील विसंवाद, विसंगती मांडत राहतो.. हे पुस्तकं एका बैठकीत वाचून संपवण्यासारखं नक्कीच नाही.. काही प्रसंग वाचल्यावर पुस्तक बाजूला ठेवून त्यावर विचार करावासा वाटतो.. किंवा आता बास म्हणून पुस्तक मिटलं जातं.. पुस्तकाची सुरुवात म्हणजे पांडुरंगाचं बालपण हलकं फुलकं, मजेशीर पण थोडं खोचक असं आहे.. जशी कथा उभारत जाते तशी ती वाचकाच्या मनाचा ताबा घ्यायला सुरुवात करते.. पुस्तक संपता संपता emotionally drain व्हायला होत.. 

पुस्तकाच्या पहिल्या पानावरच 'शंभरातील नव्यान्नवास' असं लिहून लेखकानं कथेचा नायक पांडुरंग हा आपल्या सारखाच सर्वसामान्य आहे हे सांगितलं आहे.. खेड्यात राहणारा, खेड्यालाच आपले विश्व समजणारा आणि त्या विश्वात आत्मविश्वासानं वावरणारा सधन कुटुंबातील पांडू मॅट्रिक नंतर उच्च शिक्षणासाठी पुण्याला येतो.. डोळ्यांत भविष्याची उज्ज्वल स्वप्नं घेऊन.. पहिल्याच वर्षी कॉलेजच्या डिबेटिंग सोसायटीचा सेक्रेटरी, हॉस्टेलचा प्रीफेक्ट बनतो, गॅदरिंगला नाटक ही दिग्दर्शित करतो.. पण हे सगळं करताना तो त्याच्याच मित्रांकडून वाईटरित्या फसवला जातो.. शिक्षकांचा आणि घरच्यांचा विश्वास गमावून बसतो.. आणि कमीपणाची भावना न्यूनगंड निर्माण करते.. आणि त्यातूनच मग सुरु होते त्याची बंडखोरी.. बेजबाबदारपणा, टवाळक्या करणं.. ह्यात कॉलेजची वर्षे वाया जातात.. परिणाम अयशस्वी आयुष्य.. शिक्षण नसल्यानं नोकरी नाही.. आणि शहरात राहिल्यानं खेड्यात करमत नाही.. यातून त्याला आलेली जगण्यातील उदासीनता.. लहान बहिणीच्या अकस्मात मृत्यूनं तो आधीच भावभावनांपासून अलिप्त झालेला असतो.. त्यांत त्याचं साधू महंत यांच्या नादी लागणं, अध्यात्मिक वाचन आणि त्यातून अधिकच जगण्यातला फोलपणा जाणवू लागतो.. शिक्षणामुळं, पुण्यातील पुरोगामी विचारांमुळं त्याच्यातील बदललेल्या जीवनमूल्यांशी त्याला करावी लागणारी तडजोड.. शेवटी तो आहे त्या परिस्थितीला शरण जाऊन तटस्थपणे जीवन जगण्याचा निर्णय घेतो.. तो त्याच्या भोवती एक कवच तयार करतो.. हे कवच म्हणजेच ककून म्हणजेच कोशिटा म्हणजेच कोसला!.. 

ह्या कादंबरीची सफलता विषयाबरोबरच भालचंद्र नेमाडेंच्या लेखनशैलीची पण आहे.. इतका गंभीरविषय खूपच सचोटीनं मांडला आहे.. पांडुरंग आणि त्याच्या मित्रांच्या भटकंतीचे प्रसंग अंगावर रोमांच आणतात तर त्याच्या लहान बहिणीचा मृत्यू डोळे ओले करतात.. पांडुरंगाचा अस्वस्थपणा आपल्याला ही अस्वस्थ करून सोडतो.. 

वैयक्तिक सांगायचं झालं तर.. मी पण माझ्या शिक्षणासाठी लहान गावातून शहरात गेली आहे.. माझ्या आसपास अशी उदाहरणं ही पाहिली आहेत.. उदासीनतेमुळं तेव्हा ही टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या होत होत्या आणि आता ही होतात.. वर्षानुवर्षे, पिढ्या बदलल्यातरी हे होतच आहे.. समाज म्हणून आपण फोल गेलो आहोत का? ह्याकडं गांभीर्यानं पाहायला हवं.. 

-मी मधुरा.. 

***************************************************

१९. गोफ.. गौरी देशपांडे.. 


सासू आणि सून या नातेसंबंधातील गुंतागुंत, त्यातील वेगवेगळी भावस्पंदनं यांचा हा हृदयस्पर्शी गोफ.. 

'गौरी देशपांडे' विसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यिका.. पुरोगामी विचारसरणीचा वारसा असलेल्या धोंडो केशव कर्वे यांची नात.. प्रसिद्ध लेखिका, मानववंश शास्त्रज्ञ इरावती कर्वे यांची कन्या.. कौटुंबिक पार्श्वभूमी, पाश्चात्य देशातील वास्तव्य, सांस्कृतिक परिवर्तन यातून घडलेलं त्यांचे व्यक्तिमत्व.. आणि ते वेगळेपण सिद्ध करणारी, वाचकास अंतर्मुख करणारी अशी त्यांची लेखनशैली.. व्यक्तिस्वातंत्र्य, माणूसपणा, स्त्रीजाणिवा हा त्यांच्या लेखनाचा गाभा.. 
 
'गोफ'.. माँ (सासू) आणि वसुमती (सून) दोन सामर्थ्यवान स्त्रियांमधील परिस्थितीमुळं बदलत जाणाऱ्या नात्याचा विणलेला गोफ.. 'वसुमती' स्वतंत्र बाण्याची तडफदार नायिका.. तर 'माँ' एक पारंपरिक स्त्री.. घुंगट ही पाळून राहिलेली.. जगण्याच्या गरजेतून कर्तबगार झालेली.. दोघींचा लढा एकच.. व्यसनाधीन नवरा आणि त्याच्या मृत्यूनंतर मिळालेलं एकटीनं मुलाला मोठं करण्याचं आव्हान.. त्यात कोळपत गेलेलं तारुण्य.. पोटाच्या पोराला गमावल्यावर 'माँ'साठी हा प्रवास अजुनी ही खडतर..

'सुलक्षण'च्या मृत्यू बरोबरच माँ आणि वसुमती यांचं सुलक्षणशी असलेलं आई आणि बायको नातं संपून उरतं ते फक्त सासू-सून हे नातं.. जे नातं सुलक्षण असताना ही कधी आकारच घेऊ शकलं नाही.. ‘सुलक्षण’ गेला तो त्याच्या अति व्यसनांपायी  कमजोर होऊन.. पण 'सासूच्या लाडाकोडानं तो बिघडला' असं वसुमतीचं म्हणणं तर 'इतकी खमकी होती तर माझ्या मुलाला हिनं असं कसं जाऊ दिलं?' असं माँ च.. त्याच्या जाण्यानं उध्वस्त झालेलं दोघींचं जग, त्यांत उरलेल्या धागेदोऱ्यांना न जुमानता वसुमतीचं माहेरी राहणं, तिनं हट्टानं निवडलेलं तडजोडीचं आयुष्य, त्यातून मार्ग काढत तिला तिच्या हक्काच्या घरी आणण्यापर्यंतचा प्रवास लेखिकेनं मोठ्ठ्या ताकदीनं उभा केला आहे.. कालांतरानं सहवासानं सासू आणि सून हे नातं विसरून त्या कश्या एकमेकींकडं ‘माणूस’ म्हणून बघू लागतात आणि त्यातूनच मायेचा, प्रेमाचा, आपुलकीचा, समजुतीचा नवा गोफ कसा विणला जातो हाच या कादंबरीचा ‘धागा'.. 

कादंबरीत माँ आणि वसुमती ही दोनच पात्रं आहेत.. कथा उलघडत जाते अशी इतर पात्रं समोर येतात पण ती 'माँ' आणि 'वसुमतीच्या' निवेदनातून भेटत राहतात..  

'माँ': दोन पिढयांना समजून घेणारी, त्यांना स्वीकरणारी, आयुष्यातील टप्पेटोणप्यांना धीरानं सामोरी जाणारी, समजूतदार, पोक्त अनुभवी स्त्री.. लग्न म्हणजे काय हे कळायच्या आतच जेमतेम सोळाव्यावर्षी गर्भवती असलेल्या 'माँ' विधवा होतात.. जन्माच्या जोडीदाराबरोबरच संसारसुख ही गेलं.. पोटाच्या पोराला घेऊन कुठं जायचं? कोणाच्या तोंडाकडं पाहायचं? माहेरी जायचं का सासरी राहून मुलाला त्याच्या हक्क मिळवून द्यायचा?.. मुलाला त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्या सासरी राहून जीवाचं रान करतात पण हे सगळं मिळवत असताना बाकीचे कुटुंबीय मायलेकांत विष कालवतात.. ज्याच्यासाठी हे केलं तो ते सगळं लाथाडून नाटक सिनेमाच्या धंद्यात जातो.. स्क्रिप्ट रायटर म्हणून.. परस्पर लग्नही करतो.. पहिल्यांदा सासरी आलेल्या सुनेचं, वसुमतीचं स्वागत केलं ते ‘वसुमती, ये बेटा' म्हणून.. कोठेही नाराजी न दाखवता.. 'बेटा' हे शब्द ऐकल्यावर वसुमती खडीसाखरेसारखी विरघळली आणि सासूच्या पाया पडली.. किती तो धोरणीपणा, किती ती सुज्ञता, किती तो व्यवहारीपणा.. 

‘वसुमती’: चाळीशीला आलेली उच्चशिक्षित, १२ वर्षाच्या मुलाची आई.. तसा तिचा आणि सुलक्षणचा १४-१५ वर्षाचा संसार.. सुरुवातीचे नवनवालईचे दिवस संपतात ते सुलक्षणाच्या कुलक्षणाच्या ओळखीत.. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो.. आदित्यच्या जन्मानंतर काही वर्ष चांगली जातात.. पण एक रात्री बेशुद्ध अवस्थेत सुलक्षणला पाहून तिच्या लक्षात येतं की आता त्याला कोणीही वाचवू शकत नाही.. आपलं किंवा मुलाचं प्रेमही नाही! व्यसनी वडिलांची मुलावर सावली ही पडू नये म्हणून ती त्याला होस्टेलला पाठवते.. एका सुशिक्षित व्यसनी नवऱ्याच्या बायकोच्या वाट्यालाजे  येतं ते सारं वसुमतीच्या वाट्याला येतं.. सुलक्षण सारख्या बुद्धिमान माणसाचा असा ‘ऱ्हास’ व्हावा आणि तो मी उघड्या डोळ्यांनी बघावा त्याची चीड वसुमतीच्या मनात असते.. हळूहळू मृत्यूकडं सरकरणारा 'सुलक्षण' या जगातून निघून जातो.. जो वसुमतीच्या लेखी आधीच गेलेला असतो.. प्रत्यक्ष तिची आईही म्हणते 'सुटलीस बाई'.. पण तरीही खूप काही गमावल्याची भावना का सुलक्षण वरचा राग  तिला छळत राहतो.. अजुनी त्रासात राहिलो तर हा त्रास कमी वाटेल म्हणून कि काय ती आई आणि वहिनीच्या त्रासात माहेरी राहणे पसंत करते.. बाहेर नोकरी करून मोलकरणीसारखी घरची कामं पण करते..  

अश्या ह्या दोन सामर्थ्यवान स्त्रियांच्या नात्याचा गोफ विणण्याचं काम करतो 'धर्मकीर्ती'.. एक बुद्धधर्म स्वीकारलेला अमेरिकन.. धर्मकीर्ती बरोबरच 'आदित्य' वसुमतीचा  मुलगा, 'जसपाल' वसुमतीचा मित्र, 'आनंद' माँ चा मानलेला मुलगा आपल्याला भेटत राहतात.. धर्मकीर्तीच्या तोंडाची वाक्यं मनात घर करून राहतात..   
* "आपण ज्याला दान करतो, तोच आपल्यावर खरं तर उपकार करत असतो"
* "स्वतःशी इमानदारी करायची तर कधीतरी दुसर्याशी बेमानी करायलाच लागते"
* "आपसूक हाती आलेल्या गोष्टींची माणसाला किंमत वाटत नाही. वाटते, ती धडपड, कष्ट करून मिळवलेल्या श्रेयाची!"

१२० पानांचा हा गोफ एका दिवसांत वाचून संपवला.. 'गौरी देशपांडे' लिखाण समजायला कठीण असलं तरी मला ते खूप आवडलं.. आता 'एक एक पान गळावया..' च्या प्रतीक्षेत.. 


-मी मधुरा.. 

***************************************************

२०. बारोमास.. सदानंद देशमुख.. 



'बारोमास' सदानंद देशमुख यांची साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी.. शेतकरी आणि शेतीचे वास्तव दाखवणारी, ग्रामीण जीवनाचा व्यापक वेध घेणारी एक शोकांतिका.. कमालीचा ज्वलंत विषय पण सहज सोप्या बोलीभाषेतील कथात्मक लिखाणामुळं वाचली जाते.. विश्वास पाटलांचं 'झाडाझडती' वाचल्यानंतर असे सामाजिक विषय असणाऱ्या कादंबऱ्या वाचायचं टाळलं होतं.. पण नुकत्यात 'ब्र' वाचून प्रभावित झाल्यानं हे पुस्तक वाचायचं ठरवलं.. 

भारतासारख्या कृषिप्रधान देशातील कृषिव्यवस्था म्हणण्यापेक्षा भारतीय समाजव्यवस्था आणि गल्ली पासून दिल्ली पर्यंत चालणारं राजकारण.. आणि त्यांनी घेतलेले शेतकऱ्याचे बळी हे काही आपल्याला नवीन नाही.. शेतकरी कुटुंबाचा वारसा असलेल्या मला ह्या परिस्थितीची जाणीव होती पण त्याची आच कधी जाणवली नव्हती.. कदाचित पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाची शेती पाहिल्यानं असेल.. किंवा भरपूर पाण्याच्या आणि सुपीक जमिनीच्या वरदहस्तामुळं असेल.. पण जेव्हा पारंपरिक शेती-आधुनिक शेती अशा पेचात सापडलेल्या शेतकरी कुटुंबातील सुशिक्षित-संवेदनशील तरुणांच्या खडतर जीवनाचं चित्रण 'बारोमास' कादंबरीतून घडलं तेव्हा सुन्न व्हायला झालं.. सुशिक्षित पण लाच द्यायला पैसे नाहीत म्हणून केवळ शेती करणारा तरुण.. नोकरी नाही, शेतीत पैसा नाही म्हणून नाउमेद झालेला आणि बुवाबाजीच्या नादी लागलेला तरुण.. आर्थिक विवंचनेतून होणाऱ्या आत्महत्या.. शेती व्यवसाय करणाऱ्या मुलांचा विवाहाचा मुद्दा.. शेतकरी संघटना.. शेतकरी चळवळ.. पतसंस्था आणि त्यातील राजकारण.. अश्या अनेक गोष्टी आपल्याला अस्वस्थ करतात.. आणि हे अखंड सुरु आहे म्हणून कादंबरीचं नाव 'बारोमास' म्हणजे बारा महिने.. सतत, अविरतपणे सुरु असलेली शेतकऱ्याची परवड..  

चारशे पानांची भरघोस आणि घसघशीत जीवनदर्शन घडवणारी 'बारोमास' ही कादंबरी एका नायकाभोवती फिरत असली तरी त्या नायकाचं सगळं कुटुंब, त्याच्या आजूबाजूचा समाज हे कथेचं कथानक आहे.. आणि शेतीला पार्श्वभूमी आहे ती जागतिकीकरणानंतरच्या बदललेल्या सामाजिक परिस्थितीची.. तर कथेचा नायक एकनाथ तनपुरे.. एम.ए.बी.एड. झालेला सुशिक्षित तरुण.. कुटुंबात आई शेवंतामाय अस्सल शेतकरी, वडील सुभानराव माळकरी, लग्न झालेली मोठ्ठी बहीण मंगलाक्का, सुशिक्षित पण बेकार लहान भाऊ मधू आणि एकनाथची शहरी, शिकलेली बायको अलका जिनं एकनाथच्या शिकक्षणाकडं पाहून त्याच्याशी लग्न केलंय.. लाच न देऊ शकल्यानं एकनाथ वडिलोपार्जित शेती करू लागतो तर त्याचा धाकटा भाऊ शेती न करता गुप्तधनाच्या शोधार्थ लागतो.. नोकरीतून मिळणारं स्थैर्य व सुखासीनता शेतीमध्ये मिळू शकत नसल्यानं एकनाथची व त्याच्या कुटुंबाची घुसमट सुरु होते.. शेती व्यवसायाला नाराज अलका कायमची माहेरी निघून जाते.. शिक्षण आहे पण नोकरी नाही, शेती आहे पण पिकत नाही, लग्न झालंय पण संसार नाही अशी एकनाथची परिस्थिती.. आर्थिक स्थैर्याच्या अभावामुळं भावाभावात संबंध बिघडू लागतात.. गुप्तधन मिळवण्यात अपयशी झालेला मधू नोकरीच्या दलालाच्या जाळ्यात चांगलाच अडकतो आणि सुपीक शेती सावकाराकडं गहाण टाकतो.. ना नोकरी मिळते ना शेती परत मिळते.. ह्या धक्क्यानं वडील सुभानराव आत्महत्या करतात.. इकडं कर्जाला कंटाळून मंगलाक्काचा नवरा ही आत्महत्त्या करतो.. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेचा पाश एकनाथच्या कुटुंबाभोवती आवळला जातो.. आणि त्यात अख्ख्या कुटुंबाचा ऱ्हास होतो.. यात लहरी निसर्ग, सावकार, बॅंका, भ्रष्ट सरकार आणि त्यांचे राजकारण, रोजंदारीवरील गडी असे सगळेच घटक आपापली भुमिका अगदी चोख बजावतात..

खरं सांगायचं तर मला ही कादंबरी फारशी भावली नाही.. लिखाणांत ग्रामीण भाषेचा लहेजा वाचायला छान वाटला पण हा विषय अजुनी खूप वेगळा मांडता आला असता असं वाटलं.. शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांचं खडतर जीवन खोटं आहे असं अजिबातच नाही पण ज्या पद्धतीनं शेतकरी हा लढा लढतो आहे ती हिम्मत इथं दिसली नाही.. प्रत्येक ठिकाणी नकारात्मकता जास्ती जाणवली.. 

कादंबरी वाचल्यावर वाटलं- बास झालं आता.. 'इडा पीडा टळो आणि बळीराजाचं राज्य येवो..' 


-मी मधुरा.. 

***************************************************

२१उद्या.. नंदा खरे.. 



नंदा खरेंची 'अंताजींची बखर' आणि 'बखर अंतकाळाची' ही पुस्तकं माझ्या लिस्ट मधली.. ती उपलब्ध नसल्यानं आणि "नंदा खरेंच हे पुस्तक वाचून बघ" ह्या दुकानकारकाकांच्या सल्ल्यानं 'उद्या' ह्या पुस्तकाची वर्णी लागली.. २०२० मध्ये 'उद्या'ला साहित्य अकॅडमीचा पुरस्कार जाहीर केला होता पण नंदा खरेंनी तो नाकारला.. इति काका.. 'डिस्टोपियन नॉवेल' ह्या प्रकारात हे पुस्तकं मोडतं म्हणजेच भविष्यकाळाच्या गंभीर चित्रणातून जागतिक, सामाजिक, तांत्रिक, आर्थिक बदलांवर केलेली तीव्र टीका.. असं ह्याचं स्वरूप.. अजुनी काकाच बोलत होते.. वेगवेगळे लेखनप्रकार वाचणार आहेस ना मग हे वाचंच.. 

पुस्तक वाचायला घेतलं.. पहिल्या दोन पानांतच खूप कंटाळा आला.. काय वाचते आहे काहीच कळत नव्हतं.. अजुनी चार पानं वाचून पाहू म्हणून वाचत राहिले.. ना भाषेचा अंदाज येईना ना विषयाचा.. नुसते शब्दानंतर शब्द आणि वाक्यांनंतर वाक्य.. कधी ती प्रमाण मराठीत तर कधी ग्रामीण तर कधी हिंदीत तर कधी इंग्रजीत.. मध्येच कधी तरी पकड जाणवायची आणि लगेच सुटून जायची.. रोज २५-३० पानं वाचत कसंतरी २८५ पानांचं पुस्तक पूर्ण केलं..  

‘उद्या’ कादंबरी म्हणजे मनुष्याच्या तात्त्विक उत्क्रांतीचा कथात्मक शोध.. मानवाच्या मूल्यात्मक उत्क्रांतीचा पट.. एकूण १५ कथांचा हा पट.. सुरुवातीला कथा वेगळ्या वाटल्या तरी नंतर त्या एकमेकांत गुंतत जातात.. गुहेत राहणारा, शिकार करणारा माणूस सामाजिक-राजकीय व्यवस्था निर्माण करतो.. नंतर ह्या व्यवस्थेशीच त्याचा संघर्ष सुरु होतो..  ज्या तंत्रज्ञानाचा, ज्या व्यवस्थेचा आधार माणसानं घेतला त्याच तंत्रज्ञानाच्या, व्यवस्थेच्या सापळ्यात तो अडकत तर नाही ना?.. अनेक तत्त्वप्रणाली, अनेक राजकीय प्रणाली ह्यात त्याचं स्वातंत्र्य हरवत तर नाही ना?.. असं उद्या वाचताना जाणवतं.. 

वैश्विक पातळीवरचं साम्राज्यवादी जाळं हे या कादंबरीचं कथानक.. तांत्रिक सुखसोयींबरोबरच आलेला सर्वेलन्स, चेहऱ्यांवरचे बारीक हावभाव टिपणारं सॉफ्टवेअर, कॅमेरे, अस्तित्व-कार्ड ह्यामुळं हरवलेलं स्वातंत्र्य.. 'गर्ल्स हंटिंग', स्त्रियांचं घटतं प्रमाण.. शालेय शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत मूल्यवृद्धीच्या मोहात अडकलेले तरुण.. अशी पोट कथानकं.. मुख्य चार कथानकं.. वेगवेगळ्या प्रकारे एकमेकांत गुंफलेली..  

कथानकाची सुरुवात होते मुंबईकर लेखनिक-अनुवादक 'सुदीप जोशी'च्या कथेनं..  सुदीप, महानगरातील माणसांच्या लोंढ्यातील हा एक सुशिक्षित, पांढरपेशा कामगार.. ज्याला खाजगी आयुष्य असं नाहीच.. 'अस्तित्व' कार्ड हरवल्यावर त्याच डळमळलेलं अस्तित्व.. आणि आश्रयासाठी त्याचं एका राजकीय दलात सामील होणं.. हे ह्या कथेचं स्वरूप.. दुसरं कथानक विदर्भातलं.. तिनखेडा गावातलं.. कॉलेजच्या मुलांना उच्चशिक्षणाची, नोकरीच्या चांगल्या संधींची ओळख करून देणारे भाकरे गुरुजी.. जे त्यांचा बौद्धिक आणि मानसिक आधार आहेत.. तिसरं कथानक हैद्राबाद मधले उच्चपदावरचे सरकारी सनदी अधिकारी जोडपं 'अनू आणि अरुण सन्मार्गी'.. यशस्वी आणि सुखी.. अनू कायम आंतरराष्ट्रीय दौऱ्यांवर आणि अरुण 'एक्सप्रेशन रेकग्निशन' या नवीन तंत्रासाठी नावाजलेला तंत्रज्ञ.. जागतिक पातळीवरच्या घोटाळ्यात त्यांचं अडकणं.. आणि चौथं कथानक दिल्लीस्थित 'सानिका धुरू'च.. एक धाडसी पत्रकार जी एक हटके स्टोरीसाठी विदर्भाच्या नक्षलवादी भागातील एका जंगलातील गावात जाऊन राहते.. तिथे ती निराळीच जीवनपद्धती अनुभवते.. त्यावर पुस्तक लिहायचा निर्णय घेते.. पण नक्षलवाद्यांकडून मारली जाते.. 

ही सगळी कथानकं एकत्र येण्याचा हिंसक उत्कर्षबिंदू घडतो तो विदर्भातल्या जंगलात.. अत्यंत परिणामकारक शेवटातून..


-मी मधुरा.. 

***************************************************

२२. तिमिरपंथी.. ध्रुव भट्ट.. 
अनुवाद.. सुषमा शाळीग्राम..  


अंधारातील कृतिप्रवणता हीच जीवनशैली असणार्‍या जमातीवरील अनोखी कहाणी.. 

आशयघन कविता आणि गूढ-रहस्यमयी कादंबऱ्या लिहिणारे गुजराती साहित्यिक 'ध्रुव भट्ट'.. 'वाचायलाच हवेत असे लेखक' ह्यात अग्रक्रमांकावर असणारे, साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळवणारे, ज्यांच्या कथानकांवर चित्रपट बनतो असे हे 'ध्रुव भट्ट'.. ह्या लेखकाचं अजुनी एक वैशिष्टय म्हणजे ज्या प्रदेशातील कथा ते सांगतात तिथं स्वतः जाऊन, राहून, अनुभव घेऊन मगच लिहितात.. त्यामुळं त्यांच्या कथा प्रामाणिक आणि सत्याच्या जवळ जाणाऱ्या असतात.. अनुवादित लेखन प्रथमच वाचत असल्यानं, 'वाचताना मजा येणार का?' ही शंका नक्कीच मनात होती.. पण अगदी पहिल्या पानापासूनच पुस्तकाची पकड जाणवली.. 'बॉर्न क्रिमिनल्स' ही ओळख असणारा समाज, तिथली एक वेगळीच दुनिया आणि त्या दुनियेची एक वेगळीच दुनियादारी म्हणजे 'तिमिरपंथी' कादंबरी..

'तिमिरपंथी' म्हणजेच 'रात्रीचे प्रवासी'.. चौर्य (चोरी) कला हा व्यवसाय करणारी पण त्यात नैतिकता बाळगणारी, पोटापाण्यासाठी गावोगाव भटकणारी अशी ही भटकी जमात 'तस्कर' जमात.. अश्याच एका भटक्या पाड्यावर राहणारी, आई 'तापी'कडून गौरवर्णी लावण्य आणि पिता 'रघु'कडून चौर्य कामगिरीतलं कसब मिळालेली सरस्वती उर्फ सरसती उर्फ 'सती'.. जिज्ञासू, चौकस, धाडसी असणारी 'सती'.. समयसूचक आणि प्रसंगावधानी 'सती'.. ऐकलेल्या गोष्टींवर स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता असणारी 'सती'.. आपली कथानायिका.. पाड्यातील अशिक्षित सती ते पाड्यातील मुलांसाठी शाळा काढण्याचं स्वप्न पाहणारी सती ह्या तिच्या प्रवासाभोवती कथनाक फिरत राहते.. 

पाडीवर स्वच्छंद आयुष्य जगणारी अल्लड सती योगायोगानं, शहरातील ब्रिटिश सरकारनं अश्या जमातीसाठी तयार केलेल्या सेटलमेंट मध्ये, आपल्या आजीकडं राहायला येते.. सुरुवातीला गोंधळली सती लवकरच शहरातील नवीन वातावरणाशी जुळवून घेते.. आजीच्या पाठिंब्यामुळं थोडंफार लिहावाचायाला ही शिकते.. आजीच्या गोष्टीतून, सेटलमेंट मधल्या वातावरणातून सजग झालेल्या सतीला आपला समाज शिक्षणावाचून कसा उपेक्षित राहिला आहे ह्याची प्रकर्षानं जाणीव होते.. शोषित आणि भटक्या समाजाला, स्थिर समाजाच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्याला शाश्वत, संस्कारक्षम शिक्षण हाच एक पर्याय आहे.. म्हणून त्यासाठी ती पडेल ते कष्ट करायला तयार असते.. शाळा काढायला पैसा हवा आणि तो मिळवण्यासाठी ती तिचं चौर्यकलेचं कसब वापरायला मागंपुढं पाहत नाही.. दुनियेत सगळेच चोर आहेत तर मग त्या चोराकडं मी चोरी केली तर काय बिघडलं? असं तीच मत.. 

सतीनं केलेली गुजरात, कच्छ, राजस्थान प्रदेशातील व्यावसायिक भटकंती थक्क करणारी आहे.. भौगोलिक, सामाजिक बारीक सारीक तपशिलांसह केलेलं प्रवास वर्णन कथेत जिवंतपणा आणतं.. अधूनमधून व्यक्तिरेखांच्या तोंडात येणारी बोलीभाषा तिथल्या मातीशी वाचकाला जोडते.. २६० पानांची ही कादंबरी खूप छान खिळवून ठेवते.. लिहिण्यासारखं बरंच आहे पण रहस्यमयी कादंबरी असल्यानं शब्द आवरते घेते.. 😂
   

-मी मधुरा.. 

***************************************************

२३. ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी.. प्रतिभा रानडे.. 



दुर्गा भागवतांचं कुठलंच पुस्तक मी आजतागायत वाचलेलं नाही.. कदाचित क्लिष्ट विषय हाताळणारी लेखिका म्हणून असेल.. किंवा त्यांच्या सारख्या विदुषीचे विचार, काळाच्या पुढं जाऊन केलेलं लेखन समजणार नाही म्हणून असेल.. किंवा व्यासपर्व नंतर त्यांच्यावर झालेल्या टीकेमुळं असेल.. पण यंदाच्या भारतवारीत मिळालेल्या ह्या 'ऐसपैस गप्पां'च्या भेटीमुळं, मला दुर्गाबाई थोड्यातरी कळाल्या आणि आता त्यांच्या लेखनाबद्दलची उत्सुकता वाढलीय असं म्हणायला हरकत नाही.. Thank you मीनू माझी दुर्गाबाईंशी ओळख करून दिल्याबद्दल.. ह्या सुंदर भेटीबद्दल.. 

'ऐसपैस गप्पा' हा शब्दच किती बोलकाय!!.. अवकाश भरून उरलेल्या गप्पा.. अगदी दूरवरच्या आदिवासी पाड्या ते दुर्गाबाईंच्या मनात खोल रूजलेल्या गोष्टीं..  युगायुगांपासून चालत आलेली महाकाव्यं ते सद्यस्थितीतील भोवताल.. सामाजिक-राजकीय प्रश्न ते स्त्रियांचे प्रश्न.. बाईंचा लेखनप्रवास ते त्यांचे आदर्श.. त्यांचे कलागुण ते त्यांच्या जन्म-मृत्यूच्या संकल्पना.. कितीतरी प्रतलांना स्पर्शून जाणाऱ्या ह्या गप्पा आपली विचारदृष्टी व्यापक करतात हे मात्र नक्की.. सुरुवातीला जेव्हा पुस्तकाची अनुक्रमणिका पहिली तेव्हा हे पुस्तक डोक्यावरून जाणार असं वाटलं.. पण सगळी पुस्तकं वाचून पाहायची ह्या मनाशी बांधलेल्या खूणगाठीमुळं पुस्तक वाचायला सुरुवात केली.. 

दुर्गाबाई एक अजब रसायन.. पाच भागांच्या संवादातून दुर्गाबाईच्या व्यक्तिमत्वातील अव्यक्त कोपरे उलघडत जातात.. त्यांच्या साधेपणातला भव्य, सालस, सुसंस्कृतपणा आकार घेऊ लागतो.. सुरुवातीला रामायण-महाभारत, वेद-पुराण ह्यावर चर्चा करणाऱ्या विदुषी दुर्गाबाई अचानक फुलापानांत रमणाऱ्या, कविता करणाऱ्या हळव्या मनाच्या लेखिका म्हणून समोर येतात.. अखंड शिकण्याचा ध्यास घेतलेली ही लेखिका कलाकुसर, स्वयंपाक ह्या विषयांत ही तितकीच रमते.. माधव जुलिअन च्या कविता वाचल्यानंतर स्वतःच्या कविता कविता नाहीत, मी कवयत्री नाही हे त्या प्रांजळपणे स्वीकारतात.. आजारपणाशी सामना करताना जगायची उमेद नसताना एक वाऱ्याची झुळूक त्यांना जगण्याची शक्ती देऊन जाते आणि त्यांचं निसर्गाशी घट्ट नातं जोडलं जातं.. 'मी माझ्याकडं बाई म्हणून न पाहता माणूस म्हणूनच पाहिलं' किंवा 'मला जगण्याचं सुख वाटत बघ' हे वाचल्यावर अवाक व्हायला होत.. असं जगण्यावर प्रेम करणाऱ्या दुर्गाबाई आपल्या मृत्यूवर कविता करून मोकळ्या होतात.. आणि त्या कवितेनच ह्या गप्पांची सांगता होते..  

२२४ पानांचं दुर्गाबाईंच्या बरोबरच्या गप्पांचं पुस्तक पाच भागात विभागलं आहे.. 
भाग एक: 'संस्कृतीच्या पाऊलखुणा'.. संस्कृती म्हणजे काय बरोबरच स्त्रिया आणि संस्कृती, संस्कृतीच्या मिथ्यकथा आणि त्यांची निर्मिती, ईश्वर आणि त्याचे दशावतार, तांत्रिक मांत्रिक पंथ ह्यावर त्यांच्या गप्पा रंगतात.. मिथ्यकथा समाजाला स्थिरता देतात म्हणून जुन्या मिथ्यकथांच्या जागी विचारवंतानी, साहित्यिकानी नव्या कल्पना रचल्या पाहिजेत.. असं त्या आवर्जून सांगतात.. 
भाग दोन: 'साहित्य चिंतन'.. दुर्गाबाईनी कायमच परखडपणे आपले विचार मांडले.. विषय संपूर्णपणे समजून घेऊन, त्यावरच्या टीकाटिपण्या वाचून त्यांनी नेहमी लेखन केले.. त्यामुळं व्यासपर्वावरील टीकेला त्यांनी तितक्याच समर्थपणे तोंड दिले.. व्यासपर्व बरोबरच सीता आणि द्रौपदीचा मृत्यू, बाणभट्टांची कादंबरी, महाकाव्यं, श्लील-अश्लील वांग्मय, साहित्त्यिक आणि सांस्कृतिक चळवळ ह्यावर गप्पा मारल्या आहेत.. एक खूप गमतीची गोष्ट मला इथं समजली- 'कादंबरी' हा शब्द आपण कानडी भाषेतून उचलला आहे.. बाणभट्टांच्या कथेच्या नायिकेचं नाव कादंबरी.. आणि मग त्या लेखन प्रकारालाच 'कादंबरी' म्हटलं जावू लागलं..    
भाग तीन: 'बौद्धांचे योगदान'.. गौतमाच्या जन्मापासून नवबौद्धांपर्यंतच्या काळाचं अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे.. बौद्ध धर्म व पाली वाड्मयाचा खोलवर अभ्यास करुन काही ग्रंथांचं त्यांनी केलेलं मराठीमधील भाषांतर.. त्याच बरोबर महावीर आणि बुद्ध या दोघांच्या तत्वांमधला, विचारांमधला फरक.. मोक्ष-निर्वाण, स्वर्ग नरकाच्या कल्पना.. प्रत्येक धर्माची मृत्युबाबतची मते ह्यावरील विवेचन त्यांनी केलं आहे.. 
भाग चार: दुर्गाबाईंचा लेखन प्रवास.. शाळेतील हौशी कवयत्री दुर्गा ते साने गुरुजींच्या साधना मासिकात लेख लिहिणारी दुर्गा हा प्रवास.. त्यांचं समाजशास्र, मानववंशशास्त्र ह्यावरील लेखन.. आदिवासी तमासगीर समाजाचे त्यांचे अनुभव.. विणकाम,पाकशास्त्र, धर्मशास्त्र, स्त्रीमुक्ती.. शब्दांचा प्रत्यय.. अनेक लोककथा, लोकगीतातून वेगवेगळ्या प्रथा-परंपरांची माहिती, वेगवेगळ्या रांगोळ्या त्यांचं महत्व, त्यांचे अर्थ यांची माहिती या गप्पांमधून मिळते..
भाग पाच: एक परमगंभीर सत्य-मृत्यू.. ख्रिस्त, बुद्ध, श्रीकृष्ण, भीष्म, तुकाराम, गांधी, कर्ण ह्या सगळ्यांचे मृत्यू ह्यावर सविस्तर चर्चा करून समाधी घेणं म्हणजे काय तर आयुष्याच्या पराकोटीच्या कृतार्थ स्थितीला पोचल्यावर तिथेच शाश्वत राहाण्यासाठी निर्विकार मनाने पत्करलेला मृत्यू असं त्या म्हणतात.. इच्छामरणाचा हक्क त्या मानतात तसेच पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास असल्याचं ही सांगतात.. स्वतःच्या मरणाबद्दल तर्कनिष्ठ विचार करणाऱ्या बाई आपल्या बहिणीच्या मृत्युबद्दल बोलताना फार हळव्या होतात.. 

हे पुस्तक वाचताना त्यांच्या गप्पांत हरवून जातो.. ह्या गप्पांचं वैशिष्ठय म्हणजे प्रश्नातून उत्तर अन उत्तरातून प्रश्न ओघानं येत राहतात.. गप्पांमध्ये बाईच्या उत्तरानंतर कधीकधी प्रतिभाताई स्वतः अनेक नव्या गोष्टीही सांगतात आणि परत त्यावर बाईंची प्रतिक्रिया.. आपल्यासमोर दोघी गप्पा मारतायत असं वाटतं!.. 

दुर्गाबाईंच्या साहित्याच्या प्रतीक्षेत.. 


-मी मधुरा.. 

***************************************************

No comments:

Post a Comment