२४. हृदयस्थ.. डॉ. अलका मांडके..
'हृदयस्थ' ही कहाणी आहे सुप्रसिध्द हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नितू मांडके यांची.. त्यांचं शल्यकौशल्य, कामाचा झपाटा, संवेदनशीलता आणि त्यांनी पाहिलेलं कार्डियाक हॉस्पिटलचं भव्य स्वप्न हे सारं यथार्थपणे उभं केलंय त्यांची सहचारिणी डॉ. अलका मांडके यांनी!.. एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाबरोबर तीन दशकांपेक्षा जास्त काळ अनुभवलेल्या सहजीवनाचा हा आलेख.. दृश्य-अदृश्य, मुलायम-काटेरी, विनम्र-करारी असे कितीतरी परस्पर विरोधी कंगोरे असलेला हा सहजीवनाचा पट मनाला भिडला नाही तर नवलच!..
'हृदयस्थ'ची भाषा साधी, सरळ, प्रवाही असणं हे ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य.. डॉ. अलकाताई, डॉ. नीतू मांडके यांच्या आयुष्यात सहाध्यायी, मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, गृहिणी, समव्यवसायी अश्या विविध नात्यांनी वावरल्या.. त्यांच्या निवेदनात पतीविषयी नितांत विश्वसनीयता तर आहेच पण पारदर्शकताही दिसून येते.. डॉ. नीतू बरोबर स्वतःच्या व अन्य व्यक्तींच्या गुणदोषांची मोकळेपणानं केलेली चर्चा.. कोठेही आत्मप्रौढी नाही कि दोष मांडताना कचरणं नाही.. गरुडझेप, गगनभरारी यासारख्या शब्दांचा अर्थ हे पुस्तक वाचताना नक्कीच कळतो.. 'हृदयस्थ' हे नाव सर्वार्थाने सार्थ वाटतं..
सुरुवातीला दोघांकडची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगत बी. जे. मेडिकल कॉलेजला नीतू बरोबर घालवलेले मोहवून टाकणारे क्षण, त्याचं चिडणं, प्रेमानं पत्रं लिहिणं, सडेतोड पण फटकळ स्वभावामुळं घडलेले किस्से यातून नीतू मांडके यांचं महत्वाकांक्षी पण प्रेमळ व्यक्तिमत्त्व समोर येतं.. अभ्यासाव्यतिरिक्त फुटबॉल आणि बॉक्सिंगसारख्या अनेक क्रीडाप्रकारांमध्ये त्यांचा सहभाग, त्यांची तीक्ष्ण ग्रहणशक्ती, आत्मविश्वास, निर्भीडपणा, कष्टप्रवृत्ती, सहनशक्ती, आध्यात्मिकता, सकारात्मकवृत्ती, नेतृत्व, कला, वाचनाची आवड, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यामुळं घडलेलं त्यांचं अष्टपैलु व्यक्तिमत्व दिसून येतं..
एम.बी.बी.एस. नंतर डॉ नीतू यांनी हृदयविकार आणि हृदयशस्त्रक्रियांसंबंधीचं शिक्षण घेतलं तर डॉ अलका मांडके यांनी अॅनेस्थेशीयाचं.. हृदयविकारासंबंधी सखोल माहिती घेण्यासाठी, अद्यावत तंत्रज्ञान शिकण्यासाठी प्रथम ते ब्रिटनला गेले.. काही वर्षे तिकडे राहून नंतर अमेरिकेला गेले.. जगविख्यात डॉक्टर पिकासीओ आणि मागधी याकुब यांचे पुर्ण मार्गदर्शन त्यांना मिळाले.. परदेशात राहून जास्त पैसे कमावण्याचा पर्याय न स्वीकारता आपल्या देशाची सेवा करण्यासाठी ते परत भारतात आले.. ज्ञान मिळवण्यासाठी त्या दोघांनी केलेला स्ट्रगल वाचून अंगावर काटा येतो..
त्यांच्या कामाचा वेग, चपळाई, व कामातील सफाई बघून बाकीचे सर्जन लोकं अवाक होत.. अतिशय कार्यक्षम, सेवातत्पर, प्गाअनेक प्रसिध्द खेळाडुंच्या, नेते व अभिनेत्यांच्या वधानी, रूग्णांबद्दल आत्मीयता व तळमळ असलेले डॉक्टर म्हणून त्यांची किर्ती सगळीकडे पसरु लागली.. काही महिन्यांच्या बालकांपासून ते वृध्दांपर्यंत अनेक अवघड शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी करून दाखविल्या.. बाळासाहेब ठाकरे ते अनेक प्रसिध्द खेळाडू, नेते-अभिनेते ते सामान्य नागरिक असे अनेक रुग्ण मृत्युच्या दाढेतुन बाहेर काढले.. त्यांचा हा प्रवास काही सोपा नव्हता.. ह्याकाळात अलकाताईंमधील स्त्री प्रतिभेचं दर्शन घडतं..
डॉ नीतू मांडके यांची स्वप्न पाहण्याची, महत्वाकांक्षीपणाची कक्षा खुपच भव्य दिव्य होती.. हृदयविकारांशी व हृदयशस्त्रक्रियांशी संबंधित आधुनिक व अद्ययावत सोयी सुविधांनी, आपत्कालीन यंत्रणांनी सुसज्ज असलेलं सुपर स्पेशॅलिटी रूग्णालय बांधणं हे ते स्वप्न.. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याचा या जिद्दीने पेटून उठलेले डॉ नीतू.. हृदयविकारावरील उपचाराची किंमत पाहता शिक्षक, कलाकार आणि गरीब जनता ह्याकडून ते फी घेत नसत.. गरिबांवर आणि सर्वसामन्यांवर उपचार करण्यासाठी बांधत असलेलं २०० कोटीची गुंतवणूक असलेलं १८ मजली हॉस्पिटल.. बऱ्याच राजकीय सामाजिक व्यत्ययानंतर, बरेच चढउतार अनुभवून एकदाचं बांधकाम सुरु झालं.. पण त्याचं काम अर्ध्याहून अधिक पुर्ण होत असतानाच त्यांना देवाज्ञा झाली.. लाखो लोकांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांचा हृदयाच्या झटक्यामुळं अवघ्या ५२ व्या वर्षी मृत्यू व्हावा हे दुर्दैव!.. त्यांच्या पश्चात डॉ. अलका मांडके यांनी त्यांचं स्वप्न रिलायन्स ग्रुपच्या मदतीनं साकारलं.. कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल या नावानं.. 'कोणाच्या मदतीनं का असेना पण नीतूचं स्वप्न सत्यात उतरलं' हे वाचताना खूप वाईट वाटतं.. पण तिथल्या कॉन्फरन्स रूम ला डॉ. नीतू मांडकेंचं नाव हे योग्य वाटतं..
काळाच्या प्रवाहात पुढं वाहत जाण्याशिवाय पर्याय नसतो.. पण अशी काही माणसं असतात की जी स्वच्छेनं असं वाहणं डावलून आपल्या प्रवाहाची दिशा ठरवतात आणि पोहत राहतात.. असंच डॉ. नीतू मांडके हे एक व्यक्तिमत्व.. 'हृदयस्थ' हातात पडल्यापासून एका विलक्षण अवस्थेत दिवस गेले.. कधी गंभीर, कधी कणखर तर कधी डोळ्यांच्या कडा पाणावल्या.. 'माणूस किती जगला यापेक्षा तो कसा जगला' हे जरी कितीही खरं असलं तरी डॉ. नीतू मांडकेंचा शेवट चुटपुट लावून जातो.. एका हृदयरोगतज्ज्ञांचा शेवट हृदयक्रिया बंद पडून व्हावा हे वाचून मन हेलावून गेलं..
अलौकिक जीवन गुणांचा ठसा उमटविणाऱ्या डॉक्टर नीतू मांडके यांच्या पवित्र स्मृतीला शतश: प्रणाम!!
-मी मधुरा..
************************************************
२५. हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव.. श्याम मनोहर..
श्याम मनोहर आफळे.. मराठी कथा-कादंबरीकार व नाटककार.. कादंबरीचे रूढ आकृतिबंध झुगारणारा, कादंबरीच्या नावातही वेगळेपणा जपणारा अवलिया लेखक.. माझ्या लिस्ट मधलं 'शंभर मी' हे त्यांचं पुस्तक.. पण उपलब्धतेअभावी 'हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव..' ह्याची वर्णी लागली.. त्यांचा लेखनप्रकार समजायला क्लिस्ट असतो अश्या अभिप्रायामुळं जरा घाबरतच हे पुस्तक वाचायला घेतलं.. मलपृष्ठावरून पुस्तकाचा अंदाज बांधता येईना.. पहिलं पान उलटलं आणि "तू माझ्याशी चांगलं वागलास की मी तुझ्याशी चांगलं वागतो, तू माझ्याशी वाईट वागलास की मी तुझ्याशी वाईट वागतो, मग माझं म्हणून काय असतं?" हे वाचून 'मानवी वर्तन' किंवा 'तत्वज्ञान' हा तर विषय नाही ना?.. अशी शंका आली.. चंद्रशेखर जहागीरदार ह्यांनी लिहिलेली प्रस्तावना वाचल्यावर तर अधिकच गोंधळून गेले.. १५ पानी प्रस्तावना वाचायला आणि ती समजून घ्यायला मला दोन दिवस लागले..
सतत वावरणारी १५-२० पात्रं आणि त्याचा एकमेकांशी होणारा संवाद हे कादंबरीचं एकंदरीत स्वरुप.. कधी ही कथानायक विरहित कादंबरी वाटते तर कधी 'घडलेली घटना' हेच कथानायक वाटते तर कधी सगळी पात्रं कथानायक म्हणून आलटून पालटून समोर येत राहतात.. समाजातील वेगवेगळ्या स्तरांतून आलेली ही पात्रं, त्यांचे एकमेकांशी येणारे संबंध, परस्परक्रिया, त्यांतील विसंगती, गुंतागुंत हे सगळं माणसां संबंधीची आस्था न सोडता आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्घतीनं लेखकानं व्यक्त केलंय.. पात्रांचे त्यांच्या जगण्यातून अनुभवास येणारे नैतिक प्रश्न, एखाद्या घटनेनंतर त्यांना होणारी अस्वस्थतेची तीव्र जाणीव त्याच्यातील संवादातून समोर येते.. पुस्तक जसजसं वाचत गेले तसतसं कथेचा, लेखनशैलीचा, 'बिटवीन द लाईन्स' वाचण्याचा अंदाज येत गेला आणि कथेत छान रमत गेले..
श्याम मनोहरांची ही कथा प्रामुख्यानं दोन पात्रांमधील एका घटनेभोवती फिरत राहते.. आणि संवादरूपानं पुढं पुढं सरकत राहते..
तर, साल-१९८३.. घटना स्थळ- तालुका स्तर बी-बियाणं ऑफिस.. ईश्वरराव आणि पुरुषोत्तमराव उच्चपदस्थ अधिकारी आणि मित्र.. सुखदेव, आत्माराम, काणे, यार्दी, खामकर, भोसले, जालिंदर, जोशी हे इतर कर्मचारी.. कथेच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांमधील संवाद.. 'एखादी गोष्ट केली किंवा झाली कि संपलं असं का होत नाही??..' ह्या बोलण्यातून ऑफिसमध्ये एक खळबळजनक घटना घडलेली आहे हे कळतं.. मध्येच एकजण 'ईश्वरराव थोबाडीत मरणाऱ्यातील नाहीत' असं म्हणतो.. तर लगेच दुसरा '...आणि पुरुषोत्तमराव खोटं बोलणाऱ्यातील नाहीत'.. मग तिसरा उत्स्पुर्तपणे म्हणतो 'ईश्वररावांनी खरोखर पुरुषोत्तमरावांच्या थोबाडीत दिली?'.. ह्या घटनेचा प्रत्येकाच्या विचारांवर, आयुष्यावर, परस्पर संबंधावर झालेला परिणाम हा पुस्तकाचा आशय.. ह्या बरोबरच प्रत्येकाच्या खाजगी आयुष्यातील घटना घडताना दिसतात.. यार्दीच्या नवजात बालकाच्या मृत्यूनं सगळ्यांच्या मनावर विचारांवर घेतलेला ताबा आणि त्यामुळं आलेली आयुष्याच्या लघुतेबद्दलची समजूतदार चमक कथेच्या शेवटी पाहायला मिळते.. साधं सरळ कथानक सवांदातून ज्या पद्धतीनं खुलवलंय ते वाचायला मजा येते..
-मी मधुरा..
***********************************************************
२६. साद देती हिमशिखरे.. कै. जी. के. प्रधान..
अनुवाद.. डॉ. रामचंद्र जोशी..
'साद देती हिमशिखरे'- कै. जी. के. प्रधान यांच्या Towards the Silver Crest of Himalayas' ह्या इंग्रजी कादंबरीचा डॉ रामचंद्र जोशी यांनी केलेला हा अनुवाद.. Towards the Silver Crest of Himalayas.. काहीतरी भन्नाट प्रवास वर्णन असणार.. मी केलेल्या ट्रेक शी मिळतंजुळतं वाचायला मिळणार म्हणून पुस्तक हातात घेतलं.. मलपुष्ठ वाचलं आणि गोंधळून गेले.. मलपृष्ठ न वाचताच एखादं पुस्तक घेतलं कि असंच होतं.. 'संसार टाकून परमार्थाची कास धरावी आणि अखेरीस हिमालयातील गुहेत, जेथे नियतीने आपली जागा राखून ठेवली आहे आणि जी आपणास स्वप्नात दिसली होती, तेथे जाऊन परमात्म्यासी अनुसंधान साधावे अशी ओढ एका अत्यंत बुध्दिमान आणि दर्जेदार खेळाडू असलेल्या तरुणाला लागते.'.. हे वाचल्यावर पुढं काय वाढून ठेवलं आहे ह्याची जाणीव झाली.. तत्वज्ञान, परमार्थ-अध्यात्म ह्याचं वावडं आहे असं नाही.. दासबोध, भगवद्गीता, भागवत हे मी वाचून समजून घेण्याचा प्रयत्न ही करते आहे.. आत्ता अश्या प्रकारचं पुस्तक वाचावं असं अजिबात वाटत नव्हतं.. पण पुस्तक आणलंच आहे तर वाचायचं म्हणून वाचायला सुरुवात केली.. तत्वज्ञानाचा काही भाग दोन-तीनदा वाचून सुद्धा डोक्यावरून गेला..
'माधव' हा ह्या कादंबरीचा नायक.. कथेची सुरुवात होते ती माधवला पडलेल्या एका स्वप्नानं.. स्वप्नांत तो एका हिमशिखरावर फिरत असतो.. तिथलं सौंदर्य डोळ्यांत भरून घेत असतो.. अचानक अंदाज चुकून दरीत पडणार इतक्यात एक साधूपुरुष त्याला सावध करतो.. घाबरलेला माधव त्यांच्या बरोबर एका गुहेत जातो.. गरम गरम दूध पिऊन हुशारी आल्यावर माधव जेव्हा जायला निघतो तेव्हा साधूपुरुष त्याला म्हणतो ही गुहा तुझीच आहे.. तुझ्या येण्याची आम्ही वाट पाहू.. आणि माधवला जाग येते.. ह्या विलक्षण स्वप्नानंतर त्याला सुखद अनुभूतीची जाणीव होते.. अभ्यासात खेळात अग्रेसर माधव ह्या घटनेचा साधुपुरुषाचा सतत विचार करू लागतो.. एक दिवस मित्राला सोबत म्हणून तत्वज्ञानावरील व्याख्यानाला गेलेला माधव व्याख्याता स्वामीजी आणि स्वप्नातील साधुपुरुष ह्यांच्यातील साम्य भेद शोधायचा प्रयत्न करतो.. स्वामीजींच्या बोलण्यानं भारावलेला माधव तत्वज्ञानाची पुस्तकं वाचायला सुरुवात करतो.. ह्यातून तो अध्यात्माकडं ओढला जातो.. गूढतत्वज्ञान आणि अध्यात्म ह्यांच्या मूलतत्वाचा शोध घ्यावा असं त्याला वाटू लागतं.. त्यामुळं तो त्याचा अधिकतर वेळ स्वामीजींच्या सानिध्यात घालवायला सुरुवात करतो..
पुढं स्वामीजींचे गुरुदेव आणि माधव यांची भेट होते.. गुरुजींच्या विचारांनी प्रभावित माधव त्याच्या सानिध्यात राहू लागतो.. गुरुदेवांच्या तत्वज्ञानातून त्याला चिरंतर सुखाचा मार्ग सापडतो.. सांसारिक भौतिक सुखं सोडून अध्यात्माचा ध्यास घेऊन अखेरीस 'हिमालयातील त्या गुहेत' जिथं नियतीनं जागा राखून ठेवली होती, जी जागा स्वप्नात दिसली होती, तिथं जाऊन माधवच परमात्म्याशी अनुसंधान होतं..
सुख-समाधान-शांती, तंत्र-मंत्र-साधना, गुरुचं महत्व, श्रद्धा-भक्ती-समर्पण, सत्य-असत्य, ईश्वरचं असणं-नसणं, ऐहिक-अध्यात्मिक-पारमार्थिक सुख ह्यावर गुरुदेवांनी वेळोवेळी केलेली प्रवचनं, चर्चा ह्यातून माधवाचा अध्यात्मिक प्रवास घडत जातो.. ही प्रवचनं, ह्या चर्चा ह्याचा सविस्तरपणे पुस्तकांत उल्लेख केला आहे.. एकंदरीत अध्यात्मिक मार्गातील साधकांना, अध्यात्म मार्गाचा शोध घेणाऱ्या शोधकाला हे पुस्तक म्हणजे समृद्ध करणारा अनुभव आहे..
-मी मधुरा..
************************************************
२७. रामनगरी.. राम नगरकर..
'रामनगरी' ह्या पुस्तकाचा उल्लेख जेव्हा 'must read' पुस्तकांत आला तेव्हा हे नेमके कोण राम नगरकर म्हणून मी गूगल केलं.. पण 'रामनगरी' वगळता त्यांच्या बद्दल फारशी माहिती मिळाली नाही.. निळू फुलें बरोबरच्या काही चित्रपटात त्यांचं नाव दिसलं तर 'विच्छा माझी पुरी करा' ह्यात दादा कोंडकें बरोबर.. 'रामनगरी' पुस्तक - 'रामनगरी' चित्रपट - 'रामनगरी' एकपात्री प्रयोग ते ही फक्त मराठीत नाहीत तर इंग्रजीत ही!.. आणि त्यामुळं 'रामनगरी'ला आत्मचरित्रांतला एक मानदंड समजलं जातं.. हे वाचून माझी 'राम नगरकर' ह्या व्यक्तिमत्वाबद्दलची उत्सुकता वाढली..
'रामनगरी' हे पुस्तक वाचायला घेतलं.. रामची रामनगरी - पु.ल.देशपांडे.. अशी प्रस्तावना वाचल्यावर 'राम नगरकर' ह्या माणसाच्या उंचीचा अंदाज घेणं अवघड झालं.. केवळ २०० पानाच्या ह्या आत्मकथेला पु.लं.ची ५ पानी प्रस्तावना.. अजब आहे सगळं.. असं म्हणत मी पुस्तक वाचायला सुरुवात केली.. (दिवाळी असल्यानं) एका बैठकीत नाही पण दोन दिवसात वाचून काढलं.. विनोदी ढंगानं लिहिलेली ही आत्मकथा मनाला चटका लावून गेली..
राम नगरकरांचे वडील पेशानं न्हावी तर आई तमाशाची पार्श्वभूमी असलेली.. संगीत तसं त्यांच्या रक्तातच.. तमाशा-कलापथक-लोकनाट्य-नाटक-सिनेमा हा प्रवास घडतो तो ह्या 'रामनगरी'त.. ह्या नगरीतील रामाचं जगणं, ते जगणं जगताना आलेले नानाविध अनुभव, अपमानाचे प्रसंग, आलेली कटुता, झालेली फजिती हे वाचताना पोट धरून हसू ही येते तर माणसाच्या स्वभावातील विसंगती, अहंकार, उपेक्षा, समाजातील जातींच्या उतरंडीनं आलेले मानहानीचे प्रसंग वाचताना चिमटे ही बसतात..
एका सोंगाड्यानं, एका विनोदी माणसानं स्वतःच्या आयुष्याची गुणदोषांनीयुक्त अशी सांगितलेली ही गोष्ट.. ह्या जीवनकहाणीचा कालावधी फार मोठ्ठा नसल्यानं ह्याला आत्मचरित्र न म्हणता आत्मकथा म्हणणं योग्य होईल असं मला वाटतं.. ह्या कथेत आज्जा मारुती, वडील विठोबा, आई गोदा, बायको राधा यांचा उल्लेख वारंवार येतो.. स्वतःचा जन्म आणि शेजाऱ्याच्या घराला लागलेली आग, बापाचं हा जन्मताच पळून जाणं त्यामुळं मिळालेलं पांढऱ्यापायाचं हे बिरुद.. आजोळी मामाच्या तमाशातलं त्याच सोंगाड्यापण.. रेडिओवर गाण्यासाठी घरातून पळून जाणं.. तिथं अपयश आल्यावर परत येऊन पोष्ट खात्यात नोकरी करणं.. गाणं-नाटकामुळं राष्ट्रसेवादलाशी झालेली ओळख.. आणि नंतर बदलत गेलेलं आयुष्य म्हणजे रामनगरी..
रामनगरीतील काही प्रसंग जसं त्यांचं रेडिओमधील नोकरीसाठी घरातून पळून जाणं, स्वतःच्या लग्नाला जाताना त्यांनी घेतलेली थडग्यावरची विश्रांती असं काही लेख रूपात पूर्वी वाचलं होतं..
चांगभलं! ऋणनिर्देशला दिलेलं नाव.. स्वतःच्या आयुष्याचा देवतेसमोर, जोतिबासमोर नाचणारी काठी असा केलेला हा उल्लेख.. 'सुजाण वाचकांच्या रंगशिळेसमोर माझी काठी नाचवायला मी उभा आहे '.. असं त्यांचं म्हणणं किती सार्थ आहे हे पुस्तक वाचल्यावर कळतं..
'राम नगरकर यांची रामनगरी' हा एकपात्री प्रयोग ऑडिओ रूपात youtube वर आहे.. त्यांच्याच आवाजात त्यांचा हा प्रवास नक्कीच ऐकायला आवडेल..
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment