Tuesday, November 29, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं २८ ते ३२)

 २८. ते चौदा तास.. अंकुर चावला..
अनुवाद: मृणालिनी नानिवडेकर



मुंबई ताज हॉटेल हल्यावर बरीच पुस्तकं लिहिली गेली.. वेगवेगळ्या अँगलनं.. 'Black Tornado' कमांडोंच्या अँगलनं तर 'The Siege' हल्ल्याचा संपूर्ण दस्तऐवज..  अजमल कसाबच्या भारतातील खटल्यातील अप्रकाशित कागदपत्रांपासून ते ताज मधील २६/११ पूर्वीचे आणि नंतरचे दैनंदिन व्यवहार ते तिथले ग्राहक, त्यांनी अनुभवलेलं २६/११ ह्या सगळ्यांचा समावेश.. हे पुस्तक मी पूर्वी वाचायला घेतलं होतं पण ते वाचवलं नाही.. नंतर कधीतरी भारतवारीत 'ते चौदा तास' हे पुस्तक वाचून तरी बघू  म्हणून घेऊन ठेवलं.. आणि आता हल्ल्याच्या १४ वर्षांनंतर हा थरार वाचला..  

'14 Hours An Insider's Account of the 26/11 Taj Attack' हे पुस्तक म्हणजे 'अंकुर चावला' यांचा 'Taj Attack Surviver' ह्या भूमिकेतून लिहिलेला अनुभव.. आणि सकाळ वृत्तपत्राच्या पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी त्याचा केलेला अनुवाद म्हणजे 'ताज हल्ला आतून अनुभवताना.. ते चौदा तास'.. ताज मध्ये ऑपरेशन्स मॅनेजमेंट ट्रेनी असणाऱ्या अंकुरच्या अनुभवांची रोलर कोस्टर राईड म्हणजे हे पुस्तक.. लेखनात परिपक्वता नसली तरी त्यावेळचा प्रसंग, त्या भावना वाचकांपर्यंत पोचवण्यात अंकुर चावला यशस्वी झाला आहे.. १३० पानांचं डायरी स्वरूपात लिहिलेलं हे पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही.. 

प्रस्तावनेमध्ये 'अंकुर चावला' चा थोडक्यात परिचय होतो.. मूळचा दिल्लीचा रहिवासी असणारा अंकुर हॉटेल मॅनेजमेंट करण्यासाठी सिमल्याला जातो.. तेथून मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून ताजमहाल पॅलेस हॉटेल मुंबई येतो.. ताजच्या वैभवाचा, खानदानी ऐटीचा, शाही इतमामाचा तो एक भाग बनतो.. दिल्ली आणि मुंबई ह्या दोन शहराच्या राहणीमानातील तफावत अनुभवत, ताज मधले काम, तिथली शिस्त ह्याचे धडे घेत, नवीन मित्रांबरोबर मजा करत ट्रैनिंग चे चार महिने पूर्ण होतात.. आणि उजाडतो २६ नोव्हेंबर २००८.. तो काळा दिवस.. बार मध्ये आज त्याच लेबलिंगचं काम.. कस्टमर बरोबर 'माल्ट' विषयी बोलत असताना एक मोठ्ठा धमाका होतो.. वेळ रात्री ९ वाजून २४ मिनिटे.. काय झालं हे पहायला तो बाहेर जातो.. आणि पाहतो अस्ताव्यस्त रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं एक शरीर आणि राखाडी रंगाची बॅकपॅक घेतलेला रायफलधारी माणूस.. पाठोपाठ गोळ्यांचे आवाज.. आणि सुरु होतं एक थरारक नाट्य.. 

सुरुवातीचा काही भाग खूपच कंटाळवाणा वाटतो.. पहिल्या २०-२५ पानांनंतर पकड वाढते, वेग वाढतो आणि वाचकाला पूर्णपणे भावनिक उच्च पातळीवर घेऊन जातो.. मृत्यूचे भय, डोळ्यासमोर आयुष्याचा दिसणारा सरलेला सारीपाट, रक्तपात, निपचित पडलेले निरपराध लोकं, मानसिक शारीरिक त्रासातून जाणारी जीव मुठीत धरून असणारी माणसं यांचं शक्तिशाली आणि मार्मिक केलेलं चित्रण.. ह्या सर्व त्रासदायक वावटळीत थरारात हॉटेलच्या स्टाफचं कर्त्यव्यापासून कधीही परावृत्त न होणं.. ह्यात आपण गुंतत जातो..  

-मी मधुरा.. 

************************************************

२९. कॉलनी.. सिद्धार्थ पारधे.. 


पुन्हा एकदा आत्मकथा!.. एका व्यासंगीक कॉलनीच्या अपत्याची.. कॉलनीनं पाहिलेल्या, कॉलनीनं घडवलेल्या, कॉलनीच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या एका व्यक्तिमत्वाची!!.. साहित्यिकांनी एकत्र नांदावं म्हणून आचार्य अत्रे आणि अनंत काणेकर साकारलेल्या साहित्य सहवासातील एका कष्टकऱ्याची.. 'सिद्धार्थ पारधे' नामक एका वाचमनच्या मुलाची!!!... ज्या कॉलनीत साक्षात सरस्वती नांदते, त्या कॉलनीच्या परिसस्पर्शानं एका पारधी जमातीच्या मुलाचं कसं सोनं झालं याची ही कथा.. 

पारधी समाज.. बाकी समाजाच्या दृष्टीनं बदनाम झालेली भटकी जमात.. गांवाबाहेर राहणारी, भीक मागून, चोऱ्यामाऱ्या करून पोटाची खळगी भरणारी जमात.. एका  गांवचा शेर संपला कि पुढचं गांव.. सतत भटकत राहणारी.. पुलिसांच्या रडारवर असणारी.. अश्याच पुलिसांच्या, सावकाराच्या त्रासाला कंटाळून लक्ष्मण भिकाजी पारधे आपली पत्नी  कोंडाबाई आणि मुलांना घेऊन मुंबई गाठतात.. आणि साहित्य सहवास कॉलनीच्या बांधकामावर बिगारी मजूर म्हणून काम करू लागतात.. खाडी बुजवणं ते बिल्डिंगची पायाभरणी ते बांधकाम ते स्लॅब टाकणं ते मिस्त्री/प्लम्बर अशी काम करत तिथंच तयार होणाऱ्या बिल्डिंगपाशी झोपडी टाकून राहू लागतात.. बायको मुलंबाळं ही इथंच काम करू लागतात.. जसजश्या बिल्डींग्स तयार होत गेल्या, माणसांनी गजबजू लागल्या तसं त्यांच्या कामाचं स्वरूप पण बदलू लागलं.. लक्ष्मण आता ह्या कॉलनीचा वाचमन म्हणून काम करू लागला तर कोंडाबाई कॉलनीच्या घराची धुणीभांडी तर सिद्धार्थ दूध-वर्तनामपत्रं लाईन, गाड्या पुसणं अशी काम.. सगळं कुटुंब साहित्य सहवास मध्ये दिवसभर राबू लागलं.. आपलं काम संपल्यावर सिद्धार्थ तिथल्या मुलांबरोबर खेळात असे.. त्यांच्या बरोबर खेळण्या बोलण्यातून तो घडत गेला.. शिकत सावरत गेला..  

बिगारी मजुराचा मुलगा ते एक उच्चशिक्षित नोकरदार हा सिद्धार्थचा प्रवास थक्क करणारा आहे.. ह्या प्रवासात जे काही अनुभवलं, भोगलं, सहन केलं आणि अपार दारिद्र्यावर मात करून स्वतःला कसं घडवलं हे प्रांजलपणानं, मनमोकळेपणानं कथन केलंय, सांगितलंय.. त्याच्या वडिलांचं लक्ष्मणचं कॉलनीत येणं ते त्यांचा मृत्यू असा ह्या आत्मकथनाचा प्रवास.. त्यामुळं ही गोष्ट 'लक्ष्मण पराधे'ची पण आहे..

सिद्धार्थ पराधेंच हे कथन वाचकाच्या मनाशी संधान बांधत.. हे सगळं आपल्या भोवतीच घडतंय असं वाटतं.. सचिन तेंडुलकर, वि.वा. करंदीकर, व.पु.काळे ही नावं ह्या खडतर प्रवासात गार वाऱ्याची झुळूक बनून येतात.. 


-मी मधुरा.. 

************************************************

३०. बहुरूपी.. नारायण धारप.. 


'बहुरूपी'.. खरं तर मला 'प्रशांत दामलें'च 'बहुरूपी' वाचायचं होतं.. मराठी 'स्टींफन किंग', नारायण धारप यांचं नाही.. कॉलेज जीवनात 'नारायण धारप' भरपूर वाचलं.. उगाचंच इंग्लिश कादंबरी वाचल्याचा फील येऊन भारी वाटायचं.. आणि नुकत्यातच 'ग्रहण' वाचलं.. बहुतेक मालिकेचा परिणाम असावा.. त्यामुळं आत्ता ह्या पन्नास पुस्तकांच्या लिस्टमध्ये नारायण धारप नव्हतेच.. बहुतेक सारख्याच नावानं घोळ झाला.. ('एक बहुरूपी' नावाचं अशोक मामांचं आत्मचरित्र पण आहे..)    

नारायण धारपांच्या 'बहुरूपी'नं खूपच निराश केलं.. अतिशय सुमार कथानक आणि लेखन पण.. नुसतीच म्हणायला रहस्य कथा.. कोणताही ट्विस्ट नाही.. कोणतेही थ्रिल नाही.. अगदी अपेक्षेप्रमाणं सगळं घडत जातं.. 'अजय' ह्या कथेचा नायक.. जो पेशानं नट आहे.. एक संस्थान वाचवण्यासाठी तो त्या राणीसाहेबांचा मुलगा म्हणून नाटक करायला तयार होतो.. आणि ह्या प्रवासात तो कशी वेगवेगळी रूपं घेतो आणि ते संस्थान वाचवतो अशी हि कथा.. 

कोणतेही पुस्तक मध्यात सोडायचं नाही म्हणून कसंतरी वाचून पूर्ण केलं.. चेटकीण, ४४० चंदनवाडी, ग्रहण, स्वाहा लिहिणारे नारायण धारप हेच का इतकी शंका निर्माण व्हावी इतपत हे पुस्तक टुकार आहे..  


 -मी मधुरा.. 

************************************************

३१. पडघवली.. गो. नी. दांडेकर.. 


'पडघवली'.. गो.नी.दांच्या भाषेतून रेखाटलेलं कोकणातील एका समृद्ध खेड्याचं शब्दचित्र!!.. १९५०चं दशक.. आठ वर्षाची अंबा लग्न होऊन खोतांची सून अंबावाहिनी म्हणून पडघवलीत प्रवेशते.. आणि तिच्याच जीवनपटातून उलगडत जाते ही 'पडघवली'.. निसर्गानं आपलं वैभव अनंत हस्ते जिच्यावर उधळलंय अशी ही 'पडघवली'.. 

सुरुवातीलाच आत्येसासूबाईनी अंबावहिनीला सांगितलेल्या गोष्टींतून या गावाचा रंजक इतिहास वाचकाला समजतो.. समृद्ध वारसा असणारी, जीवाला जीव देणारी माणसं  असणारी, शेजारधर्म पाळणारी, पाप-पुण्याला अनन्यसाधारण महत्त्व असणारी 'पडघवली'.. 'पडघवली'चं रक्षण करण्यासाठी इथं गिऱ्होबा आहे आणि भरभरून आशीर्वाद देणारा गेंगण्याचा मारुतीराया सुद्धा आहे.. ह्या गोष्टी ऐकत ऐकत, माडा-पोफ़ळीच्या बागेतून फिरत फिरत, गावातील प्रत्येक व्यक्तीशी नातं जोडत आपसूकच आपण पडघवलीकर होऊन जातो.. ही गोनीदांच्या लेखन शैलीची कमाल.. ब्राह्मणी भाषा, कुलवाड्यांची भाषा एवढी अफलातून सादर केलीय की आपल्या समोरच संभाषण घडतंय, आपण गावातून फेरफटका मारतोय असं वाटावं.. सगळ्या व्यक्तिरेखा आजूबाजूला जिवंतपणे वावरत असतात.. जशी पडघवलीची लाडकी खोतीण 'अंबावहिनी'.. मनमिळावू, प्रेमळ, गावाविषयी आत्मीयता असणारी.. झाडपाल्याच्या औषधांनी गाववाल्यांना बरं करणारी अनेक बाळंतिणींना सोडवणारी.. आडल्या नडल्यांना मदत करणारी.. गावाचा भक्कम आधार असणारी.. तिच्यात आपल्याला आई आजी दिसू लागते..

जसजशी कथा पुढं सरकत जाते, पिढी बदलत जाते तसतसा गावातला आपुलकीचा झरा आटत जातो.. व्यंकूभावोजींसारख्या लोभी, हव्यासी आणि गावात दबदबा असण्याऱ्या माणसांमुळं आणि इतरांच्या हतबलतेमुळं पडघवलीला लागलेली उतरती कळा मनाला चटका लावून जाते.. अंबूवहिनीचा नवरा महादेव, गावाचा खोत असूनही त्याच्या नाकर्तेपणामुळं, व्यंकूवरच्या आंधळ्या विश्वासामुळं तो ही काही करू शकत नाही.. ह्यातच हाय खाऊन महादेवाचा अंत होतो.. रया गेलेली, माणुसकी हरवलेली  पडघवली सोडून मुलाकडे मुंबईला जाण्याचा निर्णय अंबावाहिनी घेते.. 

'पडघवली' ही फक्त कथा नाही तर आपल्या देशातल्या गावांची प्रातिनिधिक स्वरूपात मांडलेली शोकांतिकाच म्हणावी लागेल.. आपल्या देशातल्या गावाचं चित्र आजही पडघवलीपेक्षा वेगळं नाही.. 

विजय देव, वीणा देव, रुचिर कुलकर्णी आणि मधुरा देव यांनी साकारलेलं 'पडघवली'चं अभिवाचन storytell वर उपलब्ध आहे.. 


-मी मधुरा.. 

************************************************

३२. सो कुल.. सोनाली कुलकर्णी.. 



'सो कुल..' ह्या हटके नावानं आणि पुस्तकाच्या मुखपृष्ठानं माझं लक्ष वेधलं.. २००५ ते २००७ ह्या दोन वर्षात लोकसत्ताच्या पुरवणीत तिनं केलेल्या स्तंभलेखनाचं हे संकलन.. ह्या संवेदनशील अभिनेत्रीनं नेमकं काय लिहिलंय ह्याची उत्सुकता तर होतीच.. मृणाल कुलकर्णी नंतर आता सोनाली कुलकर्णी काय म्हणतीय म्हणून पुस्तक लगेच चाळायला घेतलं.. पहिल्या 'हस्तांदोलन' ह्या लेखानं झालेली सुरुवात मस्तंच.. मग फावल्या वेळेत जेव्हा मोठ्ठी मोठी पुस्तकं वाचण्याइतका वेळ नसेल तेव्हा हे लेख वाचत राहिले.. एकूण १०२ लेखांचं हे संकलन आज वाचून पूर्ण झालं.. 

ललित लेखनाकडं झुकणारी लेखनशैली.. चित्रपट क्षेत्रातील अनुभव, आसपासच्या व्यक्ती, प्रसंग, घटना, दैनंदिन आयुष्यातील स्ट्रेस पासून ते मैत्री, स्त्रीचं स्त्री असणं, ते  निसर्ग, संगीत, वाढदिवस, फॅशन अश्या अनेक विषयांवर केलेलं हे लेखन.. घेतलेला वैचारिक वेध.. बरेच लेख अंतर्मुख करतात.. एक अभिनेत्री अशी असलेली तिची  इमेज गळून जाणवते ती संवेदनशील व्यक्ती.. जाणवतो तो अभिनयाबरोबरच आयुष्याकडं ही गांभीर्यानं पाहणाऱ्या सुसंस्कृत अभिनेत्रीचा हा मनमोकळा संवाद.. स्वत:शी आणि वाचकांशीही!!..


-मी मधुरा.. 

************************************************

No comments:

Post a Comment