Friday, December 30, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं ३३ ते ३६)

 ३३. अकूपार.. ध्रुव भट्ट.. 
अनुवाद.. अंजनी नरवणे.. 



आशयघन कविता आणि गूढ-रहस्यमयी कादंबऱ्या लिहिणारे गुजराती साहित्यिक 'ध्रुव भट्ट'.. 'वाचायलाच हवेत असे लेखक' ह्यात अग्रक्रमांकावर असणारे, साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळवणारे, ज्यांच्या कथानकांवर चित्रपट बनतो असे हे 'ध्रुव भट्ट'.. ह्या लेखकाचं अजुनी एक वैशिष्टय म्हणजे ज्या प्रदेशातील कथा ते सांगतात तिथं स्वतः जाऊन, राहून, अनुभव घेऊन मगच लिहितात.. त्यामुळं त्यांच्या कथा प्रामाणिक आणि सत्याच्या जवळ जाणाऱ्या असतात.. ह्यापूर्वी त्यांची 'तिमिरपंथी' ही कादंबरी वाचली असल्यानं 'अकूपार' बद्दल खूप उत्सुकता होती.. 'अकूपार' ही ध्रुव भट्ट या सिद्धहस्त गुजराती लेखिकाची चौथी कादंबरी.. आपल्या सहज सुंदर लेखन शैलीतून अतिशय उत्कटतेनं चितारली एका चित्रकाराच्या आत्मशोधाची, त्याला सापडलेल्या 'गीर'ची विलक्षण कांदबरी!!..  

ध्रुव भट्टांच्या शिरस्तेप्रमाणे कथानायकाला ह्या ही कादंबरीत नाव नाही.. तर चित्रकार कथानायक पंचमहातत्त्वांपैकी एक असणार्‍या पृथ्वी या महातत्त्वाचं चित्र काढण्यासाठी मुंबईहून गीरच्या अभयारण्यात जातो.. आणि 'गीर'चाच होऊन जातो.. ह्या प्रवासात त्याचा मार्गदर्शक असतो तो त्याचा 'अंतर्मनाचा आवाज'.. हा प्रवास अतिशय तरल, भावोत्कट आणि प्रसंगी भाबडा वाटावा असा आहे.. 

"खमा गीर तुला" (दुःखी नगं होऊ गीर).. हे कादंबरीतील पाहिलं वाक्य.. आईमा नावाच्या एका 'गीर'वर प्रेम करणाऱ्या वृद्धेच्या तोंडचं.. पण आईमा असं एका जंगलाला का म्हणाली? हा कथानायकाला पडलेला प्रश्न आणि ह्या प्रश्नातून निर्माण होणारे असंख्य प्रश्न हा कादंबरीचा प्रवास.. पण जसजसा हा प्रवास पूर्णत्वास येत जातो तसतसं  त्याच्या मनातील प्रश्न, शंका, द्वंद्व यांचं शमन होत जातं.. आणि एका समृद्ध जाणिवेचा त्याला साक्षात्कार होतो.. 

गीर, गीरची जादू, माणूस आणि प्राणी यांचं नातं, माणूस आणि निसर्ग यांचं नातं "खमा गीर तुला" ह्या भावनेतून हळू हळू उलगडत जातं.. सगळं जग सोडून हा चित्रकार नेमका 'गीर'लाच का येतो..'सांसाई', 'आईमा', 'डोरोथी', 'धानू' यांसारखी माणसंच का भेटतात.. त्यानं काढलेल्या 'पृथ्वी'च्या चित्रांमधून मानवी जीवनाच्या विविधरंगी छटाच का रेखाटल्या जातात.. अश्या अनेक सुखद योगायोगांनी ध्रुव भट्ट वाचकांना खिळवून ठेवतात.. संसाई, मुस्तफा, आईमा, अहमद, विक्रम ही पात्रं शेवटपर्यंत वाचकांसोबत राहतात.. 

आईमानं सांगितलेली पृथ्वीतत्वाच्या कासवाची गोष्ट विचार करायला लावणारी आहे.. असा समज आहे कि शेषनागाच्या डोक्यावर पृथ्वी उभी आहे आणि शेषनाग अकुपार नावाच्या कासवावर.. आणि ह्या दोघांनी मिळून पृथ्वीला तोलून धरलंय.. माणूस, प्राणी, जंगल, नद्या, समुद्र ह्या सगळ्यांचं एक संतुलित प्रमाण असतं.. आणि हे प्रमाण हाताबाहेर गेलं, अकुपार आणि शेषनाग ह्यांना सहन होईनास झालं कि ते पृथ्वीला सांगतात, कि मा, आता हे ओझं सहन होत नाही काही तरी मार्ग काढ.. मग पृथ्वी परमेश्वराकडं धाव घेते आणि मग कोणत्या ना कोणत्या रूपानं तो अवतार घेतो.. कधी मासा, कधी वराह, कधी नरसिंह.. आणि आत्ता ही आपण हेच संतुलन राखण्याच्या प्रयत्नात आहोत.. असो.. 

पृथ्वीतत्त्वाची चित्र काढणाऱ्या चित्रकाराचा प्रवास म्हणून हे 'अकुपार' ज्याच्यावर हे पृथ्वीतत्त्व उभं आहे.. 


-मी मधुरा.. 

************************************************

३४. एकेक पान गळावया.. गौरी देशपांडे.. 


'गौरी देशपांडे' आत्मभान जागवणारी, विसाव्या शतकातील आधुनिक स्त्रीवादी साहित्यिका.. जीवनातील वास्तवता व सत्यावर आधारित असणारी, वाचकास अंतर्मुख करणारी अशी त्यांची लेखनशैली.. व्यक्तिस्वातंत्र्य, माणूसपणा, स्त्रीजाणिवा हा त्यांच्या लेखनाचा गाभा.. 'गोफ' वाचल्या नंतर तर मी त्यांच्या लेखनच्या प्रेमातच पडले..  त्यांच्या स्त्रीवादी लेखनातून, स्त्री मनाची स्पंदने टिपताना स्त्री स्वातंत्र्यापेक्षा वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर त्यांचा असणारा भर मला जास्ती भावतो.. स्त्रीवादी रोमॅंटिझिम, इंटेलेक्चुअल रोमॅंटिझिम किंवा रोमॅंटिक लीगसी यांसारख्या संकल्पना मराठी साहित्यात आणण्याचं धाडस गौरी देशपांडे यांनी केलं.. 'एकेक पान गळावया' हा त्यांचा तीन कथांचा कथा संग्रह.. त्यातील स्त्रीव्यक्तिरेखा काय सांगतील? कश्या अश्या असतील? ह्या बद्दल मोठ्ठी उत्सुकता होती.. 

एकेक पान गळावया' या पुस्तकातील कथा १९८० च्या दशकातील भारतीय स्त्रीच्या भावविश्वाचा आढावा घेतात.. ह्या कथांमधील नायिका स्वतंत्र आहे, तिला स्वतःचे विचार, स्वतःची मतं आहेत जी ती आत्मविश्वासानं मांडते.. चुकीच्या वागण्याची, चुकीच्या निर्णयांची कबुलीही ती तितक्याच प्रांजळपणे देते.. आणि त्या वागण्याचं, विचारांचं विश्लेषणही करते.. ह्या कथेंतील सगळ्यांचं स्त्री व्यक्तिरेखा 'आदर्श स्त्री' च्या चौकटीबाहेर पडून आयुष्य जगताना दिसतात..

गौरी देशपांडे याचं लिखाण सहज, सोप्प असं नक्कीच नाहीये.. ते पचनी पडायला वेळ लागतोच..  
कथा १: 'कारावासातून पत्रे'- निम्म्याहून अधिक गोष्ट वाचेपर्यंत सगळं 'डोक्यावरून'च गेलं.. पण नंतर त्या लेखनातील मेख लक्षात आल्यावर वाचायला मजा आली.. सुरुवातीला कथेच्या नावावरून वाटलं की पत्ररूपी संवाद असेल.. पण ही पत्रं आहेत एकतर्फी लिहिलेली.. नायिकेनं, अमेरिकेतल्या मित्राला मनू ला लिहिलेली.. ही नायिका तिच्या जीवनात घडणाऱ्या इतंभूत बातम्या मनूला पत्रातून लिहीत असते.. मनूनं तिला कधी पत्र लिहिलं का नाही ह्याचा अंदाज मात्र शेवट पर्यंत येत नाही.. तिची त्या बाबत काही हरकत किंवा तक्रार हि दिसत नाही.. त्यामुळं कदाचित हे डायरी लेखन असेल का असं ही वाटतं.. नायिकेच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येकांची नावं कळतात पण नायिकेचं नाव गूढच राहतं.. कदाचित ती अश्या अनेक स्त्रियांचं प्रतिनिधीत्व करत असेल.. तर ही घटस्फोटित नायिका मनू नावाच्या विवाहित माणसाच्या प्रेमात पडते.. आणि त्याच्या बरोबर livein मध्ये राहू लागते.. काही वर्षानंतर मनू नोकरीसाठी परदेशी जातो.. तो गेल्या नंतर तिच्या आयुष्याबद्दल, तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक पुरुषाबद्दल ती त्याला पत्रानं कळवत राहते.. तिच्या लैगिक सुखाबद्दल सुद्धा ती त्याच्याशी मोकळेपणानं बोलते.. त्याच्या विरहाबद्दल बोलते.. कथेच्या शेवटी  ताजा कलम मध्ये 'कारावासातून पत्रे' ह्या शीर्षकाचा उलगडा होतो..  
कथा २: 'मध्य लटपटीत'- सुशिक्षित, नोकरी करणारी, आपल्या संसारात सुखी असणारी मध्यम वयीन नायिका.. आपला नवरा जयंत बरोबर कामानिमित्य परदेशी जाते.. सुरुवातीचे नाविन्यपूर्ण दिवस संपतात आणि वास्तवाची जाणीव होते.. सगळं सुख असून सुद्धा आयुष्यात पोकळी जाणवू लागते.. बोर्डिंग मध्ये असणारी मुलं, मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि परदेशातील एकाकीपणा.. नेमकं आयुष्यात काय हरवलंय याचा शोध घेत भारतात परत येते.. हा शोध घेता घेता कथेच्या शेवटी तीच तिला  गवसते आणि तिच्या मनात तरळतो एक चिरंतन आनंद.. ह्या ही कथेत ही नायिका अनामिक च आहे.. 
कथा ३: 'एकेक पान गळावया'- 'राधा' कथा नायिका.. पेशानं लेखिका.. भरपूर शिकलेली, विचारी.. तिचा प्रियकर, सहचारी, पती माधव, भारतीय दूतावासात नोकरी करणारा.. माधवच्या नोकरीमुळं भरपूर फिरलेली अनुभव संपन्न राधा.. आणि ह्या अनुभवाच्या बैठकीतून तिचं आसणारं लेखन.. उतारवयातील माधवच्या आकस्मित मृत्यूनंतरचं राधाचं आयुष्य, आधीच्या आयुष्याचे उतारवयावर होणारे पडसाद म्हणजे 'एकेक पान गळताना..' फिरतीच्या नोकरीमुळं बोर्डिंग मध्ये, एकाकी वाढलेली मुलं, परदेशातील त्याचे मित्र मैत्रिणी, तिथलं आयुष्य, भारत आणि परदेश ह्या दोन स्तरावरील असलेले आयुष्यातील बंध.. म्हटले तर सोपे म्हटले तर क्लिष्ट.. नवरा बायको, आई-वडील-मुलं, मित्र यांच्यातील भावबंधपण लेखिकेनं अगदी सहजतेनं उलगडलेले आहेत.. ही कथा वाचताना त्या-त्या जागी उभं राहून विचार करायला लावते. 


-मी मधुरा.. 

************************************************

३५. मैत्रेयी.. डॉ अरुणा ढेरे..


मैत्रेयी.. पौराणिक कथांमधली विदुषी.. खरं तर ह्या खेरीज मैत्रेयी बद्दल मला फारशी अशी माहिती नव्हतीच.. 'मैत्रेयी' हे पुस्तक वाचंच असा आग्रह ही झालेला.. इतकी मोठ्ठी विदुषी आणि ८८ पानांचं पिटुकलं पुस्तक.. नेमकं काय लिहिलं असेल ह्या पुस्तकात?ही उत्सुकता पण होतीच.. पुस्तकाच्या पहिल्या पानावर 'उपनिषदांनो-- मैत्रेयी तुमच्यातून आली' इतकंच.. आणि दुसऱ्या पानावर 'माझ्या मनातील मैत्रेयी' ही अरुणाताईंनी स्वतः लिहिलेली पुस्तकाची प्रस्थावना.. सुरुवातीलाच त्या लिहितात हि काही कथा, कादंबरी नाही.. जे काही मैत्रेयीबद्दल वाचलं, ऐकलं त्यातून जशी ती भावली तशी ती लिहिली.. ह्या लिखाणाला ऐतिहासिक तसंच उपनिषदांचा संदर्भ नक्कीच आहे.. 

याज्ञवल्क ऋषींच्या दोन भार्या एक कात्यायनी आणि दुसरी मैत्रेयी.. मैत्रेयी, जनक राजाचा प्रधान 'मित्र'ची कन्या.. जनक दरबारात सीतेसह सहभागी असणारी युवती.. दरबारात ब्रह्मज्ञानच्या चर्चेसाठी आलेला 'याज्ञवल्क', त्याला मैत्रेयीनं पाहिलं, ऐकलं आणि प्रभावित होऊन वरलं सुद्धा!.. ऐहिक ऐश्वर्य मागे ठेवून ती त्याच्या आश्रमात प्रवेशली.. आणि त्याच्या जीवनाशी समर्प्रित झाली.. वेदांपासून उपनिषदापर्यंतचा तिचा याज्ञवल्क बरोबरचा विचार प्रवास, याज्ञवल्क बरोबरचा तिचा वैवाहिक जीवन प्रवास, त्यांच्या जगण्यातील जाणिवांचे रंग ह्यातून याज्ञवल्कच्या आयुष्यातील मैत्रेयी आकार घेते..

याज्ञवल्क आणि मैत्रेयी यांच्या तात्त्विक, वैचारिक चर्चेतून त्यांच्या सहजीवनाचं सुंदर काल्पनिक विश्व अरुणाताईंनी निर्माण केलं आहे.. अगदी आठवणीत रममाण होण्यापासून ते रतिक्रीडा, सौंदर्य आणि सौंदर्याच्या कल्पना मग त्या देहाच्या असोत मनाच्या, अनुभवानं विचारात होणारे बदल, आत्मज्ञान ते यज्ञसंस्था.. असे कितीतरी विषय.. 'सौंदर्य म्हणजे काय तर पाहणाऱ्याच्या मनाचाच खेळ..' किती बरोबर आहे ना?.. कोणी कोणाला सुंदर दिसते किंवा दिसत नाही.. सौंदर्य म्हणजे व्यक्तिसापेक्ष कल्पना.. रतिक्रीडेला तर यज्ञकर्म म्हटलं आहे.. पण ती विवेकानं व्हायला हवी.. ही चर्चा वाचण्याजोगी आहे.. 

मला आवडलेलं.. 'विसंवादातून नवा संवाद उभा राहतो.. फक्त हा विसंवाद दुबळा नको.. सुंदर संवादाची ओळख व्हायची असेल तर सबळ विसंवादाचं स्वागत व्हायला हवं.. आज आपण सुंदर आयुष्य जगत असू तर ते मागे अनेक विसंवादाला तोंड दिल्यामुळेच.. किती प्रगल्भ विचार आहे हा.. 
आणि दुसरं आवडलेलं.. याज्ञवल्कला सूर्य आवडतो तर मैत्रेयीला चंद्र.. याज्ञवल्क म्हणतो सूर्य आवडावा कारण त्यात तेज आहे.. सूर्य जीवनदायी आहे.. सूर्य जागवतो.. त्यामुळं सूर्य आवडायला हवा.. त्यावर मैत्रेयी म्हणते आवड वेगळी आणि गरज वेगळी.. सूर्य तर विकासाच्या सलगतेत आधीच थांबतो.. एकदा जी वाढ झाली ती झाली.. विकासाच्या बिंदूवर तो कायमचा स्थिरावला आहे.. पण चंद्राचं असं नाही.. उत्पत्ती-स्थिती-लय हा विकास त्यात आहे.. लय म्हणजे संपणं नव्हे.. त्यापुढं उत्पत्ती आहे.. त्यामुळं हे दुष्टचक्र नाही.. जन्म-जीवन-मृत्यू हे जीवनाचं सत्य म्हणजे चंद्र.. 

ह्या सगळ्या चर्चा, तर्क-वितर्क वाचताना अरुणाताईंच्या विचारांची कमाल वाटते.. याज्ञवल्क आणि मैत्रेयी हे दोन वेगळ्या विचारधारांची व्यक्तिमत्व.. ह्या दोन्ही बाजूंचे विचार तितकेच स्वच्छ असायला हवेत.. लिहिण्याआधी ते स्वतःत रुजवायला ही हवेत.. ह्या विचारांत स्थैर्य ही हवं.. आणि ही विचारांची बीज वाचकांत रुजायला ही हवीत.. खरंच हे पुस्तक म्हणजे छोट्या पाकिटात मोठ्ठा धमाका असं आहे.. कधी ही कोणतं ही पान उघडावं आणि वाचावं..

माझ्यासाठी आत्ता ह्या आयुष्याच्या टप्प्यावर महत्वाचं.. जीवनाला काळाचं कसलं बंधन.. व त्याच्या गतीनं अखंड ऋतुचक्र फिरवतच राहणार.. आपण कसे वाढतो आहोत, उमलतो आहोत हे आपलं आपल्याला कळायला हवं.. कणाकणातून अनुभावगंधाच्या वादळानं तेजाचे कळे धुमारायला हवेत.. प्रसन्नतेचा दीप्तिगोल अंतर्बाह्य फुलायला हवा.. असं स्वतःच मनोमन उमलण अनुभवलं की आपोआप काळाचं भान विसरायला होतं.. थोडक्यात age is just a number.. भरभरून जगणं महत्वाचं..    


-मी मधुरा.. 

************************************************

३६. अमलताश.. डॉ. सुप्रिया दीक्षित.. 


'अमलताश'.. बहावा.. पिवळ्या धमक झुंबरांनी फुलणारं सुंदर झाड.. प्रसिद्ध लेखक प्रकाश संत आणि डॉ. सुप्रिया दीक्षित यांचं खास आवडतं.. म्हणून त्यांच्या ह्या जीवन कथेचं नाव ही 'अमलताश'.. एक साधंसुधं, सौम्य आणि निर्मळ आत्मकथन.. खुप सकारात्मक आणि समाधान देणारं.. व्यवसायानं डॉक्टर असणाऱ्या सुप्रिया दीक्षित, लेखिका नाहीत हे कोठेही जाणवत ही नाही.. जाणवत राहतं ते फक्त उत्कट प्रेम आणि जीवन जगण्याचा उत्साह..   

'लंपट'च वेड लावणारे प्रकाश संत.. त्यांच्या 'वनवास', 'चांदण्यांचा रस्ता' ह्या पुस्तकाची झालेली पारायणं.. अश्या लेखकाबद्दल त्यांच्या सहचारिणीनं काय लिहिलं असेल?    प्रकाश संत आणि इंदिराबाई संत ह्याचं असलेलं मायलेकाचं नातं.. त्यांचे असलेले एकत्रित भावबंध.. हे जाणून घेण्याची तीव्र उत्सुकता आणि त्याच बरोबर मनात असलेल्या  त्यांच्या प्रतिमेला तडा तर जाणार नाही ना ही धाकधूक.. फक्त दोन अपवाद वगळता लेखकांच्या बायकांच्या मनोगतांचा मी धसकाच घेतलाय.. आपल्याला भावलेला लेखक हा त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो.. तो माणूस म्हणून नवरा म्हणून त्या लेखकाच्या कोनाशी सुसंगत असेलच असं नाही.. परत ते कथानक कसं मांडलय, कथानकाला काय सांगायचंय ह्यावर त्या माणसाकडं पाहायचा दृष्टीकोन बदलतो.. आणि प्रकाश संतांच्या बाबतीत मला ही रिस्क नको होती.. 
  
डॉ. सुप्रिया दीक्षितांच्या मनातले संत एकदम लख्ख आणि उजळ आहेत.. त्यामुळं काही सायास न करता 'जसं घडलं तसं सांगितलं' इतक्या सहजतेनं प्रवाहीपणे हे आत्मकथन लिहिलंय.. स्वतःचं बालपण, बालमित्र संत आणि संतांसोबतचं सहजीवन, कौटुंबिक भावविश्व, मित्र परिवार, मुलांचं कौतुक या सर्वांबद्दल कोणताही आविर्भाव न ठेवता त्या आपल्याशी बोलतात.. आयुष्यात आलेल्या असंख्य कटू प्रसंगांचं भांडवल न करता त्यांना पानाच्या डाव्या बाजूइतकंच महत्व आहे असं त्या म्हणतात.. माणसं माणसांसारखीच वागतात.. म्हणून त्यांची वैगुण्ये अधोरेखित करू नयेत.. हे त्याचं मला भावलेलं वाक्य.. 

'अमलताश'.. म्हणजे संतांच्या सोबतीनं जगलेल्या आयुष्याबद्दलची कृतज्ञता.. संतांच्या अभिव्यक्तीला डॉ. सुप्रियांच्या सशक्त सहकार्यामुळं, त्यांच्यातील ऋजुतेमुळं आणि संतांवरच्या निर्व्याज प्रेमामुळं प्रवाहीपण आलं असं मला वाटतं.. 


-मी मधुरा.. 

************************************************ 
 



   


No comments:

Post a Comment