४२. लेखक आणि लेखने.. शांता शेळके..
शांता शेळके.. बापरे!.. साहित्यसृष्टीतलं एक थोर व्यक्तिमत्व!.. कथा, कादंबऱ्या, समीक्षात्मक लेखन, ललितलेख, व्यक्तिचित्रणं, अनुवाद, कविता असे अनेक लेखनप्रकार हाताळणाऱ्या साहित्यिका.. परंतु कविता आणि गीतलेखन माझ्या जास्त आवडचं आणि जवळचं.. 'पैठणी' कविता तर मी जगते माझ्या आजीच्या गोधडीत.. 'गजानना श्री गणराया’ ऐकलं कि दिवस कसा मंगलमय होऊन जातो.. ‘वल्हव रे नाखवा' ऐकलं कि मन कसं आनंदानं भरून जातं.. ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती?' असं म्हणत कुठल्याही संकटाला भिडायला तयार.. 'ऋतू हिरवा ऋतू बरवा' ऐकलं कि कसं मोहरून जायला होतं..
'शांता शेळके' माझ्या पन्नास पुस्तकांच्या वाचनात नाहीत असं कसं शक्यय.. त्यांचं 'लेखक आणि लेखने' वाचून बघ हा पुस्तकपेठच्या अनघा काकूंचा सल्ला.. मराठी साहित्यात वेळोवेळी ज्या लक्षणीय कलाकृती निर्माण झाल्या त्या संबंधीचं त्याचं हे लेखन.. स्वातंत्रपूर्व काळ ते १९८० पर्यंतच्या काळातील कथा, कादंबरी, ललितलेख, संकलन, कविता अश्या विविध साहित्याचा ह्यात समावेश आहे.. वेगवेगळ्या वैशिष्ठपूर्ण पुस्तकांविषयी त्या इथं वाचकांशी रसाळ गप्पा मारतात.. पुस्तकाच्या प्रास्ताविकात त्या म्हणतात, "पुस्तकाने दिलेला कलात्मक आनंद कुणाबरोबर तरी वाटून घेतल्याखेरीज तो आपण स्वतःही पुरतेपणी उपभोगला आहे असं मला वाटत नाही".. आणि हे मला तंतोतंत पटलं.. मला ही पुस्तक वाचून झालं कि त्या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केल्याशिवाय चैन पडत नाही.. ह्या लेखनांना त्या 'आस्वादक समीक्षा' असं संबोधतात..
'लेखक आणि लेखने' मधील पहिलं पुस्तक 'दत्तो अप्पाजी तुळजापूरकर' यांचं 'माझे रामायण'.. १९२७ साली प्रकाशित झालेलं हे एक आत्मकथन.. आत्मकथन ह्या लेखनप्रकारात अजुनी एका पुस्तकाचा समावेश आहे - 'दया पवार' यांचं 'बलुतं'- वयाच्या चाळीसाव्या वर्षी केलेलं हे आत्मकथन.. 'फकिरा' ही 'अण्णाभाऊ साठे' यांची दलित जमातीचं वास्तव्य दाखवणारी कादंबरी.. 'मनोहर शहाणे' यांची 'धाकटे आकाश' ही विकलांग मधुची कथा.. 'बाळकृष्ण प्रभुदेसाई' यांची कोकण पार्श्वभूमी असलेली 'जहाज' ही कथा.. 'पाचोळा' 'बोराडे' यांची शिंप्याच्या आयुष्यावरील कथा.. 'वसंत आबाजी डहाके' यांचा 'योगभ्रष्ट' कथासंग्रह.. अश्या विविध कथा-पुस्तकांचं समीक्षण आहे..
त्याचबरोबर 'निशब्द शारदा' हे मराठी रंगभूमी आणि मराठी संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या पत्रांचं 'हरिभाऊ मोटे'नी केलेलं संकलनात्मक पुस्तक.. 'आठवणीतल्या कविता' स्वातंत्र्यपूर्व काळातील कवितांचं संकलन.. तसेच 'नरहर कुरुंदकर' यांचा 'पायवाट' समीक्षात्मक लेखांचा संग्रह.. तर 'मुदगंध' 'इंदिरा संत' आणि 'आदिकाळोख' 'गुरुनाथ धुरी'यांचे ललितलेख संग्रह यांचे समीक्षण आहे.. 'आदिमाया' 'विं दा करंदीकर', 'पंखपल्लवी' 'कवी निकुम्ब' यांच्या कविता संग्रहावर भाष्य आहे.. हे वाचून कविता कशी वाचायची ह्याचा थोडाफार अंदाज आला.. 'कवितारती' ही 'विजया राजाध्यक्ष' याची काव्यसमीक्षा.. 'गीतयात्री' 'माधव मोहोळकर' यांनी हिंदी चित्रपट गीतांचा अनेक अंगानी घेतलेला वेध.. अशी विविधांगी, विविधरंगी पुस्तकांबद्दल वाचायला मिळालं..
ह्यातील चटका लावून गेलं ते 'चोरलकाठ'.. 'भालचंद्र राजाराम लोवलेकर' उणेपुरे ३४ वर्षाचं आयुष्य लाभलेला स्वातंत्रपूर्व काळातील कवी.. आणि त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झालेला त्यांचा कथासंग्रह 'चोरलकाठ'.. त्यांचा जीवनपट, त्यांच्या तारुण्यसुलभ कविता यांचा समावेश ह्या पुस्तकांत आहे..
शांताबाईंचं असं जरी हे पुस्तक नसलं तरी त्यांची लेखनवैशिष्ठ्य इथंही जाणवतात..
-मी मधुरा..
************************************************
४३. व्यासपर्व.. दुर्गा भागवत..
'व्यासपर्व'.. 'महाभारत' महाकाव्यातील व्यक्तिरेखा लिहिण्यामागचा व्यासांचा विचार म्हणजे 'व्यासपर्व'.. महाभारतातील व्यक्तिरेखांची असणारी पारंपारिक ओळख पुसून टाकणारा वेध म्हणजे व्यासपर्व.. महाभारत महाकाव्याचा असा आढावा घ्यावा तर तो दुर्गाबाईंसारख्या विदुषींच!.. सत्प्रवृत्तीच्या युधिष्ठिर-कृष्णापासून ते खलप्रवृत्तीच्या दुर्योधन-अश्वत्थाम्यापर्यंत, वैरागी प्रवृत्तीच्या भीष्म-विदुर पासून ते कुलवधू कुंती-द्रौपदीपर्यंत सर्व व्यक्तिरेखा आणि त्यांच्याद्वारे मानवी भावविश्वाचा रचलेला हा महापट व्यासांनी काय कौशल्यानं लिहिलाय हे दुर्गाबाई लिलया दाखवून देतात..
महाभारत म्हटलं कि कौरव-पांडव, त्यांच्यातील भाऊबंदकी, द्रौपदीचं वस्त्रहरण, पांडवांचा वनवास, युद्ध, श्रीकृष्णानं सांगितलेली गीता थोड्याफार फरकानं असं चित्र उभं राहतं.. यातील ज्ञानावर तत्वज्ञानावर बरीच पुस्तकं लिहिली गेली.. मृत्युंजय, युगंधर सारख्या पुस्तकांतून त्या व्यक्तिरेखेच्या नजरेतून संपूर्ण महाभारत विषद केलं गेलं.. पण 'व्यासपर्व' हे त्या सर्वांपेक्षा वेगळं ठरतं.. ह्या महापटातील दहा व्यक्तिरेखांवर दुर्गाबाई त्यांच्या दृष्टीकोनातून परिक्षण करत व्यासांच्या मनातील व्यक्तिरेखेपर्यंत पोचायचा प्रयत्न करतात..
तसंच, महाभारत म्हटलं की समोर येतं ते समाजशास्त्र.. आणि मानवी व्यवहार.. प्राचीन इतिहास, भारतीय संस्कृती याचा वेध महाभारतातून अभ्यासकांनी घेतलाय.. किंबहुना अशा प्रत्येक अभ्यासाचा महाभारत हा आधार राहिलाय.. कुणाला गीतेच्या अनुषंगानं तो धर्मग्रंथ वाटतो तर कुणाला त्यातलं नाट्य भावतं.. कुणाला राजकारण तर कुणाला नीतीशास्त्र.. प्रस्तावनेची सुरुवात 'त्या भारतीय विचार-विमर्षाच्या विश्वात महाभारताचा स्वीकार किंवा अ-स्वीकार का झाला असावा?' हे सांगत करतात.. त्या म्हणतात, “काव्यसमीक्षेचे प्रतिकूल अंग डावलून, अन्य यशोदायी धोरणांनी महाभारताचा अर्थ धोरणी तत्त्वज्ञांनी, पंडितांनी व राजकारणपटूंनी स्वतःच्या आवडीच्या जीवनक्षेत्राच्या समर्थनासाठी विविध प्रकारे लावला. त्यामुळे इतर अनेक क्षेत्रे उजळली. विचारांचे क्षितिज रुंदावले. संस्कृतीच्या कक्षा वाढल्या. परंतु त्यातले काव्यमय भाव मात्र झाकोळून गेले.”.. आणि म्हणूनच त्यांना महाभारतातील काव्य, व्यासांची लेखनशैली ह्यावर भाष्य करावंसं वाटलं असेल.. ११० पानी पुस्तकं, त्यातील पहिली २० पानं प्रस्थावना त्यात खूप अवघड अलंकारित मराठी..
‘व्यासपर्व’मध्ये दुर्गाबाईंनी टिपलंय ते महाभारताचं हे काव्यमय आणि तत्सम भावांचं, रंगांचं वैशिष्ट्य.. एकेका व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवत.. कृष्णापासून सुरू होणारा हा प्रवास द्रौपदी या एकमेव स्त्री व्यक्तिरेखेपाशी येऊन थांबतो.. एकेका व्यक्तिरेखेसाठी योजलेले शीर्षकच मुळी वाचकाशी बोलू लागते – 'पूर्णपुरूष' अर्थात कृष्ण, 'मोहरीतली ठिणगी' द्रोण.. यात एकलव्य प्रामुख्यानं येतो.. 'कोंडलेले क्षितीज' अश्वत्थामा, 'व्यक्तिरेखा हरवलेला माणूस' दुर्योधन, 'एकाकी' कर्ण, 'परीकथेतून वास्तवाकडे' अर्जुन, 'मुक्त पथिक' युधिष्ठीर, 'अश्रू हरवल्यावर' भीष्म, 'माणसात विरलेला माणूस' विदुर आणि 'कामिनी' द्रौपदी.. कृष्ण ते कृष्णा ह्या प्रवासात धृतराष्ट्र, नकुल, सहदेव, भीम, कुंती भेटत राहतात..
थोडक्यात 'व्यासपर्व' म्हणजे एक मुक्त चिंतन म्हणायला हरकत नाही..
-मी मधुरा..
************************************************
४४. प्रेमातून प्रेमाकडे.. डॉ. अरुणा ढेरे..
'प्रेमातून प्रेमाकडे'.. दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या, वयाच्या त्या त्या टप्प्यावरच्या मैत्रीचा ज्येष्ठ कवयित्री-लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांनी घेतलेला वेध.. स्त्री-पुरुषांमधील मैत्र अलगदपणे उलघडत त्यांच्यातील माणूसपणाचा तळ शोधण्याचा त्यांनी केलेला प्रामाणिक प्रयत्न.. स्वामी विवेकानंद-भगिनी निवेदिता, गोपाळ कृष्ण गोखले-सरोजिनी नायडू, गांधीजी-सरलादेवी चौधुराणी-मेडेलिन स्लेड(मीरा बेन), रविंद्रनाथ टागोर-अन्नपूर्णादेवी-कादंबरीदेवी, सुभाषचंद्र बोस-एमिली, सेनापती बापट-अॅना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर-फॅनी, अॅनी बेझंट, श्रीधर व्यंकटेश केतकर-नागूताई, हरी नारायण आपटे-काशीबाई कानिटकर, बाबुराव गोखले या दिग्गजांच्या आयुष्यातील उत्कट मैत्रीच्या भावबंधांचे नाजूक पदर हळूवारपणे डॉ. ढेरे यांनी उलगडून दाखविले आहेत..
‘प्रेमातून प्रेमाकडे’ हा पहिला लेख समर्पित आहे तो गुरु-शिष्याच्या एका जोडीला.. स्वामी विवेकानंद आणि भगिनी निवेदिता यांना.. गुरू-शिष्यांमधला निखळ, निर्मळ, परस्परांविषयीच्या अतीव आदर आणि विशुद्ध स्नेहभाव यांनी जोडलं गेलेलं हे नातं.. लंडनमध्ये स्वामीजींचं व्याख्यान ऐकून प्रभावित झालेली मार्गारेट १८९८ मध्ये ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा घेऊन आपला देश, धर्म, संस्कृती मागं सोडून 'निवेदिता' या नावानं या देशात आली, इथेच रमली आणि आपल्या गुरुचं चिरंतन स्मारक आपल्या कार्यातून उभं केलं..
भारतसेवक समाजाची संकल्पना मनाशी बाळगून राष्ट्राच्या सर्वांगीण उन्नतीचे स्वप्न पाहणारे, समाजाच्या उत्कर्षाची साधना करणारे थोर लोकसेवक गोपाळ कृष्ण गोखले यांच्या कार्याला बंगालमध्ये, तिथल्या विद्वानांच्या वर्तुळात मानाचे स्थान होते.. इथेच त्यांना भगिनी निवेदिता, सरोजिनी नायडू आणि सरला रॉय भेटल्या.. 'मैत्र जीवांचे' ह्या लेखात ह्या सौहार्दाच्या मित्रत्वाबद्दल लिहिले आहे.. भगिनी निवेदितांच्या निधनानंतर श्रद्धांजलीच्या भाषणात आपल्या भावना व्यक्त करताना गोखले म्हणाले कि ‘सृष्टीतल्या एखाद्या शक्तीचा साक्षात्कार व्हावा तशी त्यांची भेट असे’.. तर ‘स्नेहस्निग्ध आश्वासन’ या लेखात गोखले व सरोजिनी नायडू यांच्यातल्या स्नेहभावाविषयी वाचायला मिळते.. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देशसेवेसाठी सर्वस्व पणाला लावलेल्या उभयतांना कसोटीच्या काळात रक्ताच्या नात्यापलीकडच्या स्नेहसंबंधातून कसं बळ मिळालं याचा प्रत्यय येतो..
‘एका आध्यात्मिक प्रेरणेचा उदयास्त’ या लेखात महात्मा गांधी आणि त्यांची आध्यात्मिक पत्नी सरलादेवी चौधुराणी यांच्या मैत्रीतल्या नात्यावर डॉ. ढेरेंनी प्रकाश टाकला आहे.. परस्परविरोधी स्वभावामुळं नि राजकीय मत भिन्नतेमुळं त्यांच्या एकत्र येण्यातच दुराव्याची नांदी होती.. त्या क्रांतिकारी विचारांच्या, स्वयंभू तेजानं तळपणाऱ्या तर गांधीजी सत्य-अहिंसेचा मार्ग चोखाळणारे.. एवढा विरोधाभास असूनही या मैत्रीची उत्कटता एवढी होती की ते आध्यात्मिक पतिपत्नीच्या नात्यापर्यंत पोचले.. ‘उत्कट प्रेमभक्ती’ या लेखात गांधीजी आणि मेडेलिन स्लेड (मीरा बेन) यांच्यातल्या नात्याविषयी वाचायला मिळतं.. ब्रिटनमधल्या गर्भश्रीमंत घरात जन्माला आलेली ही मुलगी गांधीजींचं चरित्र वाचून भारावली.. ती भारतात आली त्यावेळी ती तेहतीस वर्षांची तर गांधीजींनी वयाची साठी पार केली होती.. दांडीयात्रेत सामील होण्याचं भाग्य लाभलेल्या आणि गांधीजी या व्यक्तीमध्ये गुंतलेल्या मेडेलिनाचे मानसिक गुंते उलगडून दाखवत तिच्या आणि गांधीजींच्या व्यक्तिमत्वातील अनेक पैलूंचं दर्शन लेखिकेनं घडविलं आहे..
‘नलिनी- द लोटस फ्लॉवर’, ‘मानसलक्ष्मी’ आणि ‘मावळतीची रानभूल’ या तीन लेखांमधून विश्वकवी रविंद्रनाथ टागोर यांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर भेटलेल्या अन्नपूर्णा तर्खड, त्यांची भावजय कादंबरीदेवी आणि व्हिक्टोरिया ओकॅम्पो यांच्याबरोबरच्या तरल आणि उत्कट मैत्रीच्या नात्याविषयी अरुणा ढेरेंनी लिहिले आहे.. या मैत्रीच्या प्रवासात त्यांच्या मैत्रिणींचे आणि पत्नीचे आयुष्य कोणत्या वळणावर येऊन उभे राहिले, याचे दर्शन घडविताना त्यांच्या प्रतिभेतील आणि व्यावहारिक आयुष्यातील अनेक पापुद्रे डॉ. ढेरेंनी सूक्ष्मपणे उलगडून दाखविले आहेत..
‘वादळी रणातलं नाजूक नातं’ ही सुभाषचंद्र बोस आणि एमिली शेकेल यांच्या मैत्रीची कथा.. स्वातंत्र्यलढ्यातील वादळांनी लटेपून गेलेल्या आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या ध्येयानं झपाटलेल्या सुभाषबाबूंच्या जीवनात या मैत्रीचं नेमकं स्थान काय होतं याविषयी या लेखात वाचायला मिळतं.. ‘एका हरीण पाडसाची गोष्ट’ ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना लंडनमध्ये भेटलेली फॅनी यांच्या मैत्रीची कथा.. विचारांशी आणि जीवनध्येयांशी जोडल्या गेलेल्या या मैत्रीचं स्वरूप किती वेगळं, समृद्ध, संपन्न आणि प्रगल्भ होतं हे वाचताना जाणवतं.. ‘माझा की जीव भाजला’ या लेखात सेनापती बापट आणि त्यांच्या वीरवृत्तीवर, साहसावर प्रेम करणारी त्यांची रशियन मैत्रीण अना खोस यांच्यात निर्माण झालेल्या भावबंधांचे दर्शन घडतं.. चार्ल्स ब्रॅडलॉ आणि अॅनी बेझंट यांच्या मृत्युंजयी मैत्रीविषयीही या पुस्तकात वाचायला मिळतं..
‘उजेड आणि अंधार’ या लेखात ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर आणि नागूताई जोशी यांच्या न जुळलेल्या मैत्राविषयी लेखिकेनं लिहिलं आहे.. नागूताईंचा नकार जड अंतःकरणानं पचविलेल्या केतकरांनी इंग्लंडमध्ये भेटलेल्या एडिथ कोहन यांच्याशी लग्नाचा निर्णय घेतला.. ‘घरगुती वासाचा’ हा लेख ह.ना. आपटे व काशीबाई कानिटकर यांच्यातल्या निरभ्र हृदयसंवादा विषयी खूप काही सांगणारा आहे..
अश्या या थोर स्त्री-पुरुषांच्या नाजूक व अवघड अशा आंतरिक भावसंबंधांचा मागोवा घेणं ही एक जोखीमच होती.. आपल्या मनावर, विचारांवर ठसा उमटवणारे हे सारे थोर पुरुष.. त्यांच्याकडं अश्या दृष्टीनं पाहणं, वाचणं, लिहिणं ही सोपी गोष्ट नाही.. डॉ. अरुणा ढेरेंनी आपल्या संशोधन-अभ्यासातून यशस्वीपणे हे पार पाडले आहे..
-मी मधुरा..
************************************************
४५. "शाळा".. मिलिंद बोकील..
शाळा.. मिलिंद बोकील यांची अतिशय गाजलेली कादंबरी.. ह्या कथानकावर आधारित 'शाळा' ह्या मराठी चित्रपटातील गाणी सोडली तर आवडावं असं काहीच नव्हतं.. त्यामुळं पुस्तकाकडून फारश्या अपेक्षा नव्हत्याच.. शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील हळवा कोपरा असतो असं म्हणतात.. तसं मला शाळेबद्दल अतीव प्रेम, हळवा कोपरा वैगरे असं काही नव्हतं.. शाळेच्या शेवटच्या दिवशी सुद्धा शाळा संपणार पेक्षा मैत्रिणी बरोबर नसणार ह्याची खंत जास्त होती.. त्यामुळं कोणत्या भावनिक ओढीसाठी हे पुस्तक आवर्जून वाचावं असं ही नव्हतं.. पण वाचून पहायला काय हरकत आहे म्हणून 'शाळा' हातात घेतलं..
मलपृष्ठावरील एका वाक्यानं मात्र माझा लगेच ताबा घेतला.. "शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.." .... अगदी अगदी.. माझ्या ही मनात रोज एक वेगळीच शाळा भरायची.. त्यात गणित नसायचं.. सन सनावळी नसायच्या.. ना भाषेचे नियम असायचे ना नियमात गुरफटलेलं शास्त्र.. ना PT ची परेड ना सामाजिक शिक्षणाचं भान.. मुक्त संचार असलेलं एक प्रांगण मनात असायचं.. अशी शाळा एक दिवस तरी असावी असं वाटायचं..
पहिली ३०-४० पान वाचायला खूप जड गेली.. कदाचित भाषेमुळं असेल.. पण त्या नंतर एका दमात पुस्तक वाचून काढलं.. कधी मी माझ्या शाळेतल्या बाकावर जाऊन बसले माझं मलाच कळालं नाही.. माझ्या वर्गात मला गोष्टीतली सगळी पात्र ही दिसायला लागली.. चिवचिवणाऱ्या चिमण्या.. स्टायलिश आंबेकर.. आपल्या हिरोची धडकन शिरोडकर.. पासून ते जोशी, चित्रे, बॅक बेंचर्स मुलं.. सगळं माझ्या डोळ्यांसमोर घडत होतं.. हेड मास्तर अप्पा, मांजरेकर सर, बेंद्रे मॅडम, गणोबा शिपाई सगळे अवती भोवती वावरत होते..
मिलिंद बोकीलांच्या शाळेतील विद्यार्थी कधी झाले माझं मलाच कळलं नाही.. अख्ख ९ ब चे वर्ष मी परत जगले.. काही जगलेले.. आणि काही जगायचे राहिलेले...
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment