४६. रावण राजा राक्षसांचा.. शरद तांदळे..
अनार्य दासीपुत्र दशग्रीव ते त्रिलोकीचा राजा, राक्षसांचा राजा रावण हा प्रवास अद्भुत करणारा आहे..
लेखकाच्या लेखणीतून रावण जेव्हा त्याच्या आयुष्याचा लेखाजोखा मांडतो तेव्हा त्याच्या व्यक्तिमत्वाचे ज्ञात असलेले सर्व गडद रंग हळूहळू फिकट होत जातात आणि समोर उभा राहतो तो "महानायक".. दैत्य, दानव, असुर आणि कित्येक भटक्या जमातींना एकत्र करून राक्षस संस्कृतीची निव ठेवणारा महानायक... "रक्ष: इति राक्षस:".. रक्षण करणारा रक्षक म्हणजेच राक्षस ही विचारधारा जपणारा महानायक.. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत भेदभाव नसलेली संस्कृती उभी करणारा राक्षस संस्कृतीचा जनक असणारा महानायक..
अनार्य दासीपुत्र असल्याने जन्मदात्यानं नाकारलेलं त्याचं आर्यपण.. आर्य का अनार्य हा "स्व"चा शोध घेण्यात भरकटलेलं बालपण.. धर्माला महत्व देणाऱ्या धर्मनितीमुळं बिथरलेल्या बालपणात शापित आयुष्य संपवण्याचा निर्णय.. कर्तृत्वावर नाही तर कुळावर श्रेष्ठत्व ठरवणाऱ्या दांभिकांकडून झालेली उपेक्षा, अवहेलना, अपमान आणि ह्यातून तयार झालेला बंडखोर.. ज्या बंडखोरीला अफाट ज्ञानाची बैठक ही आहे..
हे सगळं वाचताना मनात एक कल्लोळ उठतो.. त्याच्यामुळं आयुष्य उध्वस्त झालं अश्या बंदिवान कुबेराला गुरुदक्षिणा म्हणून सोडून देणं, इंद्रादी देव, शनी ह्यांना बंदिस्त करणारा रावण संपूर्ण कादंबरीत कुतूहल निर्माण करतो..
असुर आणि भटक्या जमातीवर अंकुश ठेवण्यासाठी सुमाली आजोबांनी दिलेलं दशानन हे नाव.. दहा डोकी आणि २० हात असणारं ते रूप.. खरंच किती सार्थ होतं.. बुद्धिबळ, रुद्रवीणा, रावणसंहिता, कुमारतंत्र, शिवतांडव स्त्रोत्रा बरोबरच दर्शन शास्त्र, व्यापार, राज्यशास्त्र, आयुर्वेद ह्या सारख्या अनेक विषयातील असलेलं पांडित्य.. सगळं अचंबित करणारं आहे.. हे एक मेंदू असलेल्या एका डोक्याचं काम नव्हे..
माता कैकसीनं दिलेलं ध्येय.. सुमाली, पौलत्स्य आजोबांनी दाखवलेली प्रकाशवाट.. प्रहस्त मामानं दिलेली लढायची उर्मी.. भावांचे वैचारिक संभाषण.. स्वसंवादातून झालेलं बौद्धिक द्वंद्व.. ब्रह्मदेवाचं मार्गदर्शन.. नारदमुनींचा सल्ला.. महादेवांनी दिलेली संघर्ष करायची प्रेरणा.. असे उल्हसित करणारे, रोमहर्षक प्रसंग यामुळं उपेक्षित राहिलेल्या रावणाच्या व्यक्तिमत्वाला न्याय दिला गेला आहे..
आईच्या अपमानाचा प्रतिशोध घेणारा मुलगा, सख्खे सावत्र बहीण भाऊ सगळ्यांना बांधून ठेवणारा कुटुंबवात्सल्य पुरुष, जनतेची कुटूंबाप्रमाणे काळजी घेणारा आदर्श राजा.. शिव आराधना करणारा निस्सीम भक्त.. हे ही व्यक्तिमत्वातील पैलू प्रभावीपणे दाखवले आहेत..
स्त्री वर शस्त्र उचलणं हा अधर्म.. ह्यातून शूर्पणखावर झालेल्या अत्याचाराच्या सूडाच्या भावनेतून सीतेचं केलेलं अपहरण.. अधर्म, अनीती ह्यावर त्याचं स्वतःशीच सुरु असलेलं द्वंद्व.. हे वाचताना अंगावर काटा येतो.. आप्तस्वकीयांच्या मृत्यूचे कारण, मेघनाद च्या मृत्यूनंतर झालेली हळहळ वाचून हृदयाला पीळ पडतो.. "लंकेत प्रत्येकाला जगण्याचं, धर्माचं, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे तर मला माझ्या पतीसोबत सती जायचं स्वातंत्र्य हवं आहे" हे सुलोचनाच वाक्य हादरून टाकतं..
रावणाचा पराजय समोर दिसत असताना मंदोदरीनं त्याच्याशी केलेला संवाद विशेष उल्लेखनीय आहे..
मृत्यूशैय्येवर असताना, आपल्या मुलाच्याच वध करणाऱ्या लक्ष्मणाला शिष्य म्हणून स्वीकारायचं अलौकिक धाडस, औदार्य रावणाकडं होतं.. शेवटी न राहून रावण म्हणतो "लक्ष्मणा तुझ्या भावाला सांग, दोन बुद्धिमान पुरुषांनी संवाद न करता लढलं तर त्यात धूर्त आणि लबाड लोकांचा फायदा होतो.. जसा सुग्रीव आणि बिभीषणाचा होणार आहे.. कपटी लोकांचा आधार घेऊन मिळालेला विजय निराशेचा गर्तेत नेत असतो.. "
रावणाचं हे वाक्य रामायणाचे आयाम बदलून टाकतं..
No comments:
Post a Comment