'पन्नास पुस्तकं वाचन संकल्प' सफल संपूर्ण.. अजुनी खरंच वाटत नाहीय कि मी बारा महिन्यात पन्नास पुस्तकं वाचलीत.. नुसती वाचली नाहीत तर त्या पुस्तकांचा आढावा ही घेतला..
पन्नास पुस्तकं वाचण्याचा संकल्प केला खरा पण तो पूर्णत्वास जाणार कसा??.. त्यात कोणतीही पन्नास पुस्तकं नाहीत तर फक्त मराठी पुस्तकं.. विविध लेखन/साहित्य प्रकार.. कविता, प्रवासवर्णन, आत्मचरित्र, कादंबऱ्या, नाटक.. शक्यतो न वाचलेले लेखक.. आणि न वाचलेली पुस्तकं.. असं ही घालून घेतलेलं बंधन.. ते ही इथं अमेरिकेत राहून.. मोठठं आव्हानच होतं..
बारा महिन्यात पन्नास पुस्तकं म्हणजे प्रत्येक महिन्याला साधारण चार पुस्तकं.. म्हणजे आठवड्याला एक.. बापरे!!.. इतकं घड्याळ्याच्या काट्यावर पुस्तकं वाचायची सवय ही नाही.. इकडं आल्यापासून पुस्तकं वाचली ती गम्मत म्हणून.. शक्यतो दिवाळी अंक किंवा भेट म्हणून मिळालेली पुस्तकं.. शुद्ध आनंदासाठी.. पूर्णपणे स्वान्तसुखाय!.. किंवा कधी कधी लेखनात संदर्भ शोधण्यासाठी.. एकदा वाटलं, ताकदी पेक्षा मोठठं आव्हान घेतलं का?.. पण, 'एक बार कमीट किया तो खुदकी भी नाही सुनते' असं म्हणत हे आव्हान कसं पेलता येईल ह्याचा विचार करायला सुरुवात केली..
पहिलं आव्हान इतकी पुस्तकं मिळवायची कशी? आणि दुसरं म्हणजे वाचनासाठीचा वेळ.. घरात असलेल्या एक दोन पुस्तकांनी संकल्पाची सुरुवात तर झाली.. दुपारचा वेळ वाचनासाठी पक्का केला.. कोणती पुस्तकं वाचायची ह्याची यादी तयार करायला घेतली.. लायब्ररी, मैत्रिणींची बुक शेल्फ्स, बुकगंगा.कॉम सारख्या वेबसाइट्स धुंडाळायला सुरु केले.. पाहता पाहता पुस्तकांची यादी आकार घ्यायला लागली.. त्याच बरोबर पहिल्या महिन्यात पाच पुस्तकं वाचून ही झाली.. आणि 'मैं कर सकती हैं'.. हा आत्मविश्वास आला..
जुलै मधली भारतवारी.. म्हणजे तत्पूर्वीच्या साधारण दहा बारा पुस्तकांची 'कोणी पुस्तक देता का पुस्तक' असं म्हणत सोय केली.. नुसत्या दुपारच्या वाचनानं कदाचित इतकी पुस्तकं वाचून होणार नाहीत म्हणून शाळेच्या pickup line मध्ये, waiting room मध्ये, रात्री झोपण्यापूर्वी, वेळ मिळेल तेव्हा फक्त पुस्तक वाचन.. सतत बरोबर पुस्तक असण्याची सवय झाली.. ह्या दोन तीन महिन्यात वाचन इतकं अंगात भिनलं होतं की विमान उडायच्या आधीच झोपणारी मी, जवळ जवळ संपूर्ण प्रवासात वाचत होते.. परिणाम, मुंबई येईपर्यंत 'क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता' हे ३८० पानांचं पुस्तक वाचून संपलं देखील..
पुण्यात गेल्यावर पहिली भेट दिली ती 'पुस्तकपेठे'ला.. तिथल्या नव्याकोऱ्या पुस्तकांच्या वासानं कसं मंत्रमुग्ध व्हायला झालं.. पुस्तकं हातात घेऊन वाचण्यातलं सुख किंडल मध्ये नक्कीच नाही.. पुस्तकांचा तो स्पर्श, त्यांचा तो वास, त्यातील अक्षरांचं जिवंत होऊन तुमच्याशी बोलणं.. एक वेगळाच कनेक्ट जाणवतो.. नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या पुस्तकांत त्यांचं प्रेम जाणवत राहतं..
तीन डझनाहून अधिक नवी कोरी पुस्तकं.. ती शिस्तीत लावण्यातला आनंद.. त्या पुस्तकांच्या सामायिक गंधानं भरून गेलेलं वातावरण.. अनेक लेखक आणि विषय-वैविध्य.. आणि इतकी पुस्तकं एकत्र पाहिल्यावर आलेलं उत्साह मिश्रित दडपण..
.. पण आज पन्नास पुस्तकांच्या संकल्पपूर्ती नंतर जाणवतंय की हे ध्येय अवघड असलं तरी अशक्य नव्हतं.. थोडं रुटीन बदलायची गरज होती.. वाचनाला प्राधान्य देण्याची गरज होती.. आणि पुस्तक आवडलं नाही तरी शेवट पर्यंत नेटानं वाचण्याच्या संयमाची ही गरज होती..
जेव्हा मी हा 'वाचन संकल्प सफल संपूर्ण' म्हणते तेव्हा ह्या वाचनाचं फलित काय?.. हा प्रश्न समोर येतोच.. मुळात वाचनाच्या भौतिक लाभांपेक्षाही वाचनामुळं समृद्ध होणारं जीवन अधिक मोलाचं असतं.. पुस्तकातल्या विचारांनी समृद्ध तर झालेच.. पण ह्या वाचनातून मिळालेला आत्मिक आनंद अधिक मोलाचा वाटतो जो कालातीत असेल..
... 'पुस्तक वाचन' इथं नक्कीच थांबणार नाही.. आता ते जगण्याचा एक भाग बनलं आहे.. रोजचा निदान अर्धा तास तरी वाचनासाठी! हा मंत्र जपायचा..
*आचार्य अत्रेंचं 'कऱ्हेचें पाणी' वाचायला घेतलं आहे.. आठ ही खंड मिळाल्यानं पुढचे काही महिने आचार्यांच्या सोबतीत..
मी वाचलेली पन्नास पुस्तकं..
व्यक्तिरेखा..
ओंकाराची रेख जना.. मंजुश्री गोखले
क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता.. मृणालिनी गडकरी
ऐसपैस गप्पा : दुर्गाबाईंशी.. प्रतिभा रानडे
मैत्रेयी.. डॉ अरुणा ढेरे
दास डोंगरी राहातो.. गो. नी. दांडेकर
लेखक आणि लेखने.. शांता शेळके
रावण राजा राक्षसांचा.. शरद तांदळे
साद देती हिमशिखरे.. कै. जी. के. प्रधान (अनुवाद.. डॉ. रामचंद्र जोशी)
आत्मचरित्र..
जगाच्या पाठीवर.. सुधीर फडके
झिम्मा - आठवणींचा गोफ.. विजया मेहता
रामनगरी.. राम नगरकर
हृदयस्थ.. डॉ. अलका मांडके
कॉलनी.. सिद्धार्थ पारधे
अमलताश.. डॉ. सुप्रिया दीक्षित
स्मृतिचित्रे.. लक्ष्मीबाई टिळक
सामाजिक..
एका तेलियाने.. गिरीश कुबेर
"मी अत्रे बोलतोय".. प्रल्हाद केशव अत्रे
ब्र.. कविता महाजन
कादंबरी..
बारोमास.. सदानंद देशमुख
दुनियादारी.. सुहास शिरवळकर
नातिचरामि.. मेघना पेठे
कादंबरी : एक.. विजय तेंडुलकर
महाश्वेता.. डॉ. सुमती क्षेत्रमाडे
युगंधरा.. सुमती क्षेत्रमाडे
मृण्मयी.. गो. नी. दांडेकर
पडघवली.. गो. नी. दांडेकर
कोसला.. भालचंद्र नेमाडे
बहुरूपी.. नारायण धारप
शाळा.. मिलिंद बोकील
हे ईश्वरराव.. हे पुरुषोत्तमराव.. श्याम मनोहर
उद्या.. नंदा खरे
रहस्यमय, थरार ..
शोध.. मुरलीधर खैरनार
बाजिंद.. पै. गणेश मानुगडे
ते चौदा तास.. अंकुर चावला
तिमिरपंथी.. ध्रुव भट्ट (अनुवाद सुषमा शाळीग्राम)
अकूपार.. ध्रुव भट्ट (अनुवाद अंजनी नरवणे)
तत्वमसि.. ध्रुव भट्ट (अनुवाद अंजनी नरवणे)
वंशवृक्ष.. डॉ. एस. एल. भैरप्पा (अनुवाद सौ. उमा कुलकर्णी)
विश्वस्त.. वसंत वसंत लिमये
कथासंग्रह..
गोफ.. गौरी देशपांडे
सो कुल.. सोनाली कुलकर्णी
प्रेमातून प्रेमाकडे.. डॉ. अरुणा ढेरे
एकेक पान गळावया.. गौरी देशपांडे
ललितलेख..
परिपूर्ती.. इरावती कर्वे
नाटक..
युगांत.. महेश एलकुंचवार
विज्ञानकथा..
यक्षांची देणगी.. जयंत नारळीकर
प्रवासवर्णन..
चेकपॉईंट चार्ली.. डॉ माधवी मेहेंदळे
अपूर्वरंग ४ जपान.. मीना प्रभू
महाभारत..
व्यासपर्व.. दुर्गा भागवत
पर्व.. डॉ. एस. एल. भैरप्पा (अनुवाद सौ. उमा कुलकर्णी)
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment