मावळतीच्या संधीप्रकाशात स्वतःबरोबर वेळ घालवणं, स्वतःतल्या चांगल्या वाईट बदलांकडं, आलेल्या अनुभवांकडं तिऱ्हाईत होऊन पाहणं मला आवडतं.. मग त्यासाठी कोणता खास दिवस हवा असं ही नाही.. पण वर्षभरात काय केलं आणि येणाऱ्या वर्षात काय करायचं ह्याचा आढावा घेण्याचा दिवस मात्र नक्कीच ठरलेला आहे 'माझा वाढदिवस'.. अधेमधे स्वतःकडं त्रयस्थ होऊन पाहणं गरजेचं असतं असं मला वाटतं.. त्यामुळं स्वतःतील गुण-दोष, स्वतःची बलस्थानं-कमकुवत स्थानं डोळसपणे पाहता येतात.. आणि त्यावर काम करणं सोपं जातं..
२०२३ तसं माझ्यासाठी खासंच.. एकतर माझं अर्ध-जन्मशताब्दी वर्ष.. ऋचाचं हायस्कूल ग्रॅज्युएशन, कॉलेज ऍडमिशन, कॉलेज नामक तिच्या नव्या आयुष्याची नवी सुरुवात थोडक्यात proud mom moment हे ही ह्याच वर्षात.. आणि त्यानंतर सुरु होणारी माझी सेकेंड इंनिंग.. ऋचा लांब जाण्यानं, जरी माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण होणार असली, तरी ह्या 'सेकेंड इंनिंग' बद्दल खूप कुतूहल, उत्सुकता होती.. आयुष्याला नवा आकार देण्याचं स्वप्न ही होतंच.. कदाचित ह्यामुळं ऋचाचं नसणं थोडं सुसह्य झालं..
"ही वाट दूर जाते" ह्या कार्यक्रमासाठी निवेदन, कविता वाचन केले.. एका फॅशन शो मध्ये पण भाग घेतला.. 'साडीची बदलत जाणारी रूपं' ही ह्या फॅशन शो ची थिम.. माझं नऊवारी प्रेम जगजाहीर (पोर्टलॅंड जाहीर) असल्यानं मला विचारलं.. नऊवारी पण हटके स्टाईल म्हणून मी 'देवसेना ड्रेप' ठरवला.. ड्रेप थोडा कॉम्प्लिकेटेड असला तरी शिकायला मज्जा आली..
"छूमंतर" मराठी नाटक.. लेखन, दिग्दर्शन, कलाकार सगळं पोर्टलॅंडकर्स.. ह्या नाटकाचं सहाय्यक दिग्दर्शन करायची संधी मला मिळाली.. माझ्या कवितेला पण ह्या नाटकाचा भाग होता आलं.. हा अनुभव समृद्ध करणारा होता.. नाटक, नाटकाचं लिखाण हे कलाकार, प्रेक्षक आणि दिग्दर्शक ह्या तिघांच्या नजरेतून पाहता आलं.. ह्या आधी बॅकस्टेज केलं होतं पण दिग्दर्शकाला मदत करणं म्हणजे सगळ्या आघाड्यावर लढण्यासारखं होतं.. कलाकारांना डायलॉग साठी मदत, अबसेन्ट कलाकारांचे डायलॉग म्हणणं, क्लू देणं.. आणि सगळ्यांत महत्वाचं टाईम कंमिटमेन्ट सगळ्यांआधी यायचं आणि सगळे गेल्यावर जायचं.. ते दोन तीन महिने मंतरलेले होते..
इतक्या सगळ्या चांगल्या अनुभवांना एक गालगोट लागलंच.. आयुष्याला नवा आकार देण्याचं स्वप्न तर पाहिलं पण चॉईस पॉईंट ला थोडी गडबड झाली.. स्वप्न पाहताना नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी लक्षातच आल्या नाहीत.. हे अपूर्ण स्वप्न एक दिवस नक्की सत्यात उतरेल कारण ह्या स्वप्नाचा हात मी अजुनी सोडलेला नाही.. ह्या स्वप्नाबद्दल नंतर परत कधी..
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment