( प्रहसन : वेळ १२-१५ मिनिटं)
ती: झोप लागलेली दिसतीय.. ह्याला असं शांत झोपलेलं पाहून (डोळे पुसते..)
(टेबल वर असलेला अल्बम हातात घेते.. सोफ्यावर बसते.. )
(अल्बम चाळता चाळता.. ) किती स्मार्ट दिसतोय.. अजुनी ही असाच दिसतो.. शरीर खंगलंय, डोळ्यांतली चमक कमी झालीय पण बोलण्यातला बाज अजुनी तसाच.. गाणं ऐकण्यांत दंगला की त्याच्याकडं पाहत राहावं असं वाटतं..
(फोटोकडं पहात त्याच्या आवडीचं गाणं गुणगुणते..)
(दरवाजाची बेल वाजते... )
तो: काय? कसे आहेत आमचे मित्रवर्य?
ती: अरे आधी आत तरी ये..
तो: (आत येत..) आज गुणगुणतीयेस.. (ती गालातल्या गालात हसते..) आराम पडलेला दिसतोय नवीन औषधानं..
ती: हम्म.. आत्ताच झोप लागलीय.. तू बस ना.. (पाणी देता देता).. चहा करू कि कॉफी?..
तो: काही नको.. चहा घेतला आणि निघालो.. तू कशी आहेस? (शेजारी पडलेला अल्बम हातात घेऊन..) च्यायला काय दिवस होते ना ते.. तो, मी आणि तू.. आमच्या दोघांत तू होतीस का तुम्हा दोघांत मी..
ती: हं.. तेच पहात होते.. वक्त को गुजरते.. पण काही गोष्टी बदलत नाहीत.. rather त्या बदलण्यासाठी नसतातच..
तो: (आपल्याच नादात..) हाच फोटो पाहून मगाशी गाणं गुणगुणत होतीस तर.. (मिश्किल हसतो) वेडाय तो.. चक्क वेडा.. शाळेच्या फेअरवेल ला काय गाणं म्हटलं होतं राव.. तुझ्यासाठी.. (ती: चल... ) सगळ्यांनी धरलेला टाळ्यांचा तो ताल आणि तुझं लाजणं.. त्यानं तुला स्टेजवर बोलावणं आणि तुमचा डांन्स.. (ऐसे ना मुझे तुम देखो, सीने से लागा लुंगा..) काय सही टाइमिंगला क्लिक केलाय हा फोटो.. किती एकमेकांत असायचात.. तुमचं एक वेगळं विश्व होतं.. आणि त्याचा अगदी छोटासा भाग मी.. निदान मला तसं वाटायचं..
ती: तो तर तू अजुनी आहेस.. आणि असणारच आहेस.. तुझ्याशिवाय आम्ही?? हे होणं नाही.. ए, तिसरीत होतो ना रे आपण? बाबांची बदली इथं झाली आणि आम्ही तुझ्या घरासमोरच्या बंगलीत राहायला आलो.. किती पटकन मैत्री झाली आपली!!.. तुमच्या जोडगोळीत मी कधी आणि कशी सामावले कळलंच नाही.. एकत्र शाळेला जाणं, अभ्यास करणं, खेळणं.. मैत्रिणी नव्हत्याच मला.. कधी तशी गरजच लागली नाही.. शाळा, कॉलेज, नोकरी, संसार, मुलंबाळं, आजारपणं सगळ्यांचा तूच तर साक्षी आहेस.. (उसासा सोडून)..आणि आता हे!.. त्यात ही तू त्याला सामील..
तो: अगं हो.. पण ऐकून तर घेशील? मी त्यात सामील आहे याचा अर्थ, मला शंभर टक्के पटलंय.. असा का घेतेस?
ती: (त्याचं ऐकून न घेताच)... आणि मुलं काय?..
तो: आता त्यांचं काय?..
ती: त्यांचं एकचं पालुपद.. इकडं ये.. नातवंडांत जीव रमव.. त्यांना सांभाळ.. (तो: हम्म.. ).. पण इथून पाय नाही रे निघणार.. इतक्या वर्षाचा संसार, हे घर, इथल्या आठवणी, आपली माणसं, आपलं गांव, आणि मुख्य म्हणजे तू..
(मोठ्ठा pause)
.. म्हणतात सगळं विकून टाकू.. पण मला काय हवंय, हे कोणी विचारतच नाही.. मला नाही विकायचंय हे सगळं.. आणि मला कोणाच्याही सोबतीची गरज नाहीय.. त्याच्या आठवणी, आम्ही एकत्र जगलेले दिवस, हे घर हीच माझ्या जगण्याची ऊर्जाय..
मान्यय, व्यवहारातलं मला फारसं काही कळत नाही.. त्यात कधी लक्षच घातलं नाही.. तशी वेळच आली नाही.. केवळ तो नाही म्हणून, हे सगळं विकून, मुलांपाशी जावून राहू? का?.. तरी तो म्हणायचा सगळं शिकून घे.. सगळं माहिती असावं..
तो: त्यावर तुझं ठरलेलं उत्तर.. तू आहेस ना.. मग झालं..
ती: ..कसं लक्षांत आलं नाही रे आपल्या?.. एकदम स्टेज फोर..
तो: त्याच्या सारख्या जगण्यावर प्रेम असणाऱ्याच..
ती: (त्याला तोडत.. ) ..हे कळल्यावर डॉक्टरना म्हणतो कसा.. काय ट्रीटमेंट बिटमेंट असेल ते लवकर सुरु करा.. चार दिवसापूर्वी RV घेतलीय.. देशभर फिरायचंय हिच्या सोबत.. आणि काही ट्रीटमेंट नसेलच तर किती दिवस राहिलेत ते सांगा.. काय?.. समुद्र किनारी, मावळत्या सूर्याच्या साक्षीनं पुढच्या जन्माचं वचन घ्यायचंय हिच्याकडून.. ते तेवढं घेतो.. (लहान पॉज..) ते वचन खुशी खुशी दिलं रे.. पण हे?... त्याच्यासाठी त्यालाच..
तो: अगं.. शांत हो..
ती: त्या दिवशी काय म्हणत होता माहितीयाय.. माझं जाणं आता अटळाय.. हे का झालं? मीच का? असा विचार करुन त्रास करुन घेण्यापेक्षा ही परिस्थिती स्वीकारून एकत्र ह्याचा सामना करूया.. ‘शोक मनाना’ म्हणतात ना, तसं करुन आपले दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करूया.. यात ही त्याचा विनोद!..
(पॉज..)
नाही बघवत रे त्याचे हाल.. माझ्या समोर मोठ्ठ्या लढवय्याचं बळ आणतो.. पण खचलाय तो.. स्वतःच्या तत्वावर स्वच्छंदी आयुष्य जगणारा.. सहा बाय अडीच च्या बेड वर.. (हुंदका/डोळे पुसते.. )
तो: ऐक आमचं.. असं काय करतेस.. अडकलाय गं तो तुझ्यात..
ती: सांग ना मग त्याला, मी आहे.. मुलं आहेत..
तो: मी सांगितलं नसेल का? आणि मुलांचं म्हणशील तर ती त्यांच्या त्यांच्या संसारात.. काही दुखलं खुपलं येतील, प्रेमानं करतील.. पण रोज? रोजचा दिवस कसा घालवशील? काय करशील?.. उगाच आयुष्य आहे म्हणून जगण्यापेक्षा ते आनंदानं, भरभरून जगावंस, असं वाटणं चुकीचं आहे का?
ती: अरे ते मी जगेनच.. कोणा एकाच्या जाण्यानं दुसऱ्यानं जगणं सोडायचं नाही.. तसं वचन दिलंय आम्ही एकमेकांना..
तो: अगं, तो नुसतं जगणं म्हणत नाहीयाय.. आणि खरं सांगू, जिगर लागतं असं वागायला.. इतकं convictionaly, खात्रीपूर्वक, विचार करून, मुद्देसुद बोलत होता ना की मला माझ्या मित्राचा अभिमानच वाटला..
ती: हम्म.. त्याच्या असं वागण्यानंच तर मी परत परत त्याच्या प्रेमात पडत राहते.. त्याच्यासाठीच जगावं असं वाटतं.. (pause..) तुला काय वाटतं?.. त्याला काय म्हणायचंय हे मला कळत नसेल?.. त्याच्या जागी मी असते तर मी ही हेच केलं असतं.. आणि तो ही माझ्यासारखंच वागला असता..
पाच दशकांपेक्षा जास्त सहवास आहे रे आमचा.. कळत ही नव्हतं तेव्हा पासून.. एकमेकांच्या सोबतीनं सुरु केलेल्या प्रवासांत, तो माझा भक्कम आधार कधी झाला आणि त्याच्यावर सारं सोपवून, आमच्या संसाराची वेल कशी फुलंत गेली कळालंच नाही.. 'तो आहे..' ह्या विश्वासानं निर्धास्त आणि बिनधास्त आयुष्य जगले मी.. आणि आता..
तो: थांब.. थांब.. 'आता पुढचं आयुष्य' असंच म्हणायचंय ना तुला?.. (ती मानेनच होकार देते..) अगं त्यासाठीच तर.. तुझ्या ह्या आयुष्यात, तो स्वतः सुंदर, रंगीत रंग भरण्याचा प्रयत्न करतोय.. तो नाही म्हणून तू उदास बसू नयेस.. तो नाही म्हणून तू एकटी पडू नयेस.. तो नाही म्हणून तू रसरसून जगायचं सोडू नयेस.. तो नाही म्हणून तू स्वतःला विसरू नयेस म्हणून..
(तो तिच्याकडे पाहतो.. ती शांतपणे त्याचं ऐकून घेत आहे..)
तू जगशील, आणि त्याच्या आठवणी तुझ्यासाठी पुरेशा असतील ही.. पण ती तडजोड असेल, तू आयुष्याशी केलेली.. आणि हेच त्याला नकोय.. आयुष्य सुंदर आहे आणि ते पूर्णपणे जगलं पाहिजे.. नवनवीन अनुभव घेत..
एक साथीदार मागं राहिला तर दुसऱ्या साथीदाराबरोबर आयुष्याचा प्रवास करायला काय हरकत आहे?
(तो तिच्या शेजारी येवून बसतो, तिच्या खांद्यावर/पाठीवर थोपटतो..)
अगं, त्याला रिप्लेस कर असं तो सांगत नाहीय तर, फक्त दुसरी एखादी सोबत बघ, असं सांगतोय.. ज्याच्या सोबतीनं तू तुझी स्वप्नं, पर्यायानं तुमची स्वप्नं पूर्ण करू शकशील.. एक आनंदी आयुष्य जगू शकशील.. बघ विचार कर..
(ती डोळे मिटून बसते.. तो अल्बम पाहत बसतो)
उठला वाटत म्हणत तो आत जायला निघतो..
ती: (डोळे मिटूनच.. डोळ्यावर हात) ह्यापूर्वी ही आपण कित्तेकदा ह्या विषयावर चर्चा केलीयाय.. हो ना? (तो मानेनच होकार देतो)..
(pause.. सावरून बसत..)
आता ऐक.. काल मला म्हणाला, तुला काय वाटत असेल हे मी समजू शकतो.. तू एकटी राहू शकणार नाहीस असं मला अजिबात म्हणायचं नाहीयाय.. तू कॉन्फिडेंट आहेस, तू आर्थिक दृष्ट्या सुद्धा स्वतंत्र आहेस.. तू एकटी आनंदात राहू शकतेस.. पण सोबत असेल तर तोच आनंद द्विगुणित होयील असं मला वाटतं.. आत्ता नाही पण अजुनी २-४ वर्षांनी कदाचित तुला सोबतीची, सहचाऱ्याची गरज जाणवू शकेल.. आणि मी असे पर्यंत जर का तुला कोणी भेटलं तर मी सुखानं डोळे मिटू शेकन.. इतकंच..
तो: हम्म
तेव्हा पासून ह्यावर विचार करतीय..
मला सांग, त्याच्यासाठी, मनावर दगड ठेवून, जरी मी हे पाऊल उचललं, तरी मला माझ्या baggage सकट, दुसरं कोणी सोबत करायला तयार होयील?
तो: असं का म्हणतेस?
ती: असो..
केवळ त्याच्या सुखासाठी, त्याच्या मन:शांती साठी मी नाईलाजानं हो म्हणायचं ठरवलंय..
सांग त्याला त्यानं सॉर्ट लिस्ट केलेल्यांना मी भेटायला तयार आहे.. पण अंतिम निर्णय माझाच असेल..
(तो अचंबित होवून तिच्याकडं पाहतोय.. )..
ती: जा तू.. भेट त्याला.. मी चहा घेवून येते..
-मी मधुरा..
************************************************
थोडी पार्श्वभूमी..
ही "तो" आणि "ती" सिरीज नाही..
ही आहे एक सत्यघटना.. आमच्या पोर्टलॅंड टू कोस्ट रेस गृप मधल्या एका जोडप्याची!.. ह्या गोष्टीतली "ती" आणि "ती"च्या नवऱ्यानं "ती"च्या साठी शॉर्टलिस्ट केलेला "तो".. असं हे जोडपं.. कोणत्याही नात्यात न बांधलेलं.. ना लग्न, ना लीव्हईन, पण एकमेकांचा आधार असणारं.. एकमेकांची आवड जपणारं.. एकमेकांना सोबत करणारं.. "तो" गेली २०-२२ वर्ष अश्या रेसेस करतोय.. पण "ती" त्याला सोबत म्हणून रेस ट्रैनिंगला सुरुवात करते काय आणि रेस मध्ये भाग घेते काय.. ते ही वयाच्या पासष्ठीत! सगळंच अजब.. थक्क करणारं..
निमित्य शाळेच्या गेट टुगेदरचं.. त्यांत मी ही जगावेगळी, विचारांना उद्युक्त करणारी गोष्ट मांडायची ठरवलं.. माझ्यासाठी नवीन असणाऱ्या स्किट फॉरमॅट मध्ये.. आणि ते सादर ही केलं..
*कथानकात थोडाफार बदल केला आहे पण गाभा त्यांचीच गोष्ट आहे..
************************************************
No comments:
Post a Comment