दिवस: आजचाच.. काही वर्षापूर्वी
स्थळ: 'ती'चं घर
वेळ: दुपारचे साडे चार पाच
व्हॉट्स ऍप नोटिफिकेशन वाजतं..
.. आणि 'ती'चा चेहरा खुलतो..
तो: शुक शुक
ती: hey.. कसा आहेस? परवा तुला मीटिंगला भेटून छान वाटलं.. आलास ते बरं झालं.. तू मीटिंगला येणार नाही म्हणालास तेव्हा..
तो: typing….
ती: इतकं काय टाइप करतो आहेस? ए, येशील ना माझ्या बरोबर venue पाहायला?
तो: ओ बाई आमचं चॅनेल वेगळं लागलंय..
ती: म्हणजे?
तो: तयारी बियारीचं तुमचं तुम्ही बघा.. मला त्यात इंटरेस्ट नाही..
ती: मग?
तो: ऐक ना, मला कन्फेस करायचंय.. आज नाही सांगितलं तर परत कधी सांगू शेकन माहिती नाही..
ती: आता हे काय? कोणी मिळालं नाही का सकाळपासून?
तो: शाळेत असताना तू माझा क्रश होतीस.. आवडायचीस तू मला..
ती: मला तर तू अजुनी ही आवडतोस..
तो: पण तुला सांगू नाही शकलो.. खूप प्रॅक्टिस करायचो..
ती: (डबडबलेले डोळे) म्हणजे मी बरोबर होते.. तुला ही माझ्याबद्दल वाटत होतं.. ते एकतर्फी नव्हतं.. मी एकटीच तुझ्याकडं बघत बसायचे.. वेड्यासारखी.. तेव्हा का नाही सांगितलंस?
तो: रोज आरश्यात पाहून डोळे मिचकावण्याची प्रॅक्टिस करायचो आणि आज नक्की असं ठरावयाचो ही.. पण हिंमत नाही झाली..
अगं येडे, मी पण बघायचो की.. कितीतरी वेळा आपले डोळे लॉक पण झालेत..
ती: आपण संपर्कात नसलो तरी मला तुझी आठवण यायची.. परत शाळेच्या बाकावर जावून बसावं आणि तू मला आवडतोस असं तुला सांगावं वाटायचं..
तो: त्यावेळी ह्या भावना काय आहेत हे कळण्या इतकं शहाणपण नव्हतं.. आणि कोणी सांगणारं ही नव्हतं..
ती: ऐक ना.. हे मला तुझ्या तोंडून ऐकायचंय.. कॉल?
तो: पाच मिनिटं दे..
ती पाच मिनिटं 'ती'ला युगासारखी वाटली होती..
****************
कट टू..
तो दिवस आणि आजचा हा दिवस..
तीच तारीख.. तेच 'तो' आणि 'ती'.. प्रेम ही तेच.. फक्त बदललेली ती प्रेमाकडं पाहण्याची त्यांची नजर..
स्थळ: चाट रूम..
वेळ: आज उद्विग्न मनानं दिवसभर 'ती' इथंच आहे.. 'तो'ची वाट पहात.. निदान आज तरी 'तो' येईल ही 'ती'ची वेडी आशा..
पूर्वी ही अधूनमधून नाराजी, अबोला व्हायचा.. मोठ्ठी भांडणं, वादावादी झाली कि पॉज ही घेतला जायचा.. कधी तो काही तासांचा असायचा तर कधी एकदोन दिवसांचा.. पण इतका मोठ्ठा पॉज कधीच नव्हता.. ह्यावेळचा मुद्दा तसा नाजूकच होता.. नात्याला नांव देण्याचा 'तो'चा हट्ट 'ती'ला मान्य नव्हता.. 'ती'ला नात्याच्या बंधनात प्रेमाला अडकवायचं नव्हतं.. हा वाद इतक्या टोकाला गेला कि अनियमित काळासाठीच्या पॉजचं कारण बनला..
तो: आपली प्रतलं आता वेगळी आहेत.. चिडचिड केली, वाद घालून, चर्चा करून पाहिलं.. पण त्यातून काहीच तोडगा निघाला नाही.. मला काय हवं ते तू देवू शकत नाहीस आणि तुला काय हवं ते मी.. हे मी स्वीकारलंय आणि तू ही स्वीकारावंस.. let's be practical..
आपल्याकडं इतक्या सुंदर आठवणी आहेत.. त्या आठवणींचा एक सुगंधी रुमाल हृदयाच्या कप्यात ठेवायचा, कतारवेळी तो बाहेर काढायचा, हुंगायचा आणि गालात मंद स्मित करुन आपापल्या आयुष्याला भिडायचं..
थोडक्यात वेगळं व्हायचं.. move on करायचं..
ती: इतकं सोप आहे का हे? त्या आठवणी, ते क्षण, सोबतीनं चाललेली काही पावलं जी तनामनावर खोलवर उमटली आहेत.. कायमची.. माझ्या जगण्याचा, माझ्या अस्तित्वचा भाग बनून.. प्रेम इतकं दुबळं असतं का कि त्याला नात्याच्या आधाराची गरज असावी?.. एकमेकांबद्दलची आपुलकी, काळजी, ओढ पुरेशी नाही का?.. प्रॅक्टिकल व्हायचं म्हणजे सगळं सोडून द्यायचं? प्रेमाचं एकदम un-प्रेम? move on व्हायचं म्हणजे टाटा बाय बाय.. तू कोण मी कोण? असं प्रेम संपतं का?
तो: अगं पण मी माझं तुझ्यावर प्रेम नाही असं कुठं म्हणतोय.. प्रेम आहे म्हणूनच तर तू मला कायमची माझी म्हणून हवी आहेस.. माझ्या आयुष्याचा भाग होऊन.. आणि त्यासाठी नात्याला नांव द्यावं लागेल.. समाजात राहायचं तर ही बंधनं आलीच.. पण तुला ते नकोय.. आणि माझं हे म्हणणं बदलणार नाही..
ती: वचनांच्या बंधनात बांधून, त्याला एक नांव देऊनच नातं बनतं कसं कुठंय?.. मला सांग, आपल्यात जे होतं, जे आहे ते नातं नाही का?.. खऱ्या नात्याला ना बंधन असतं ना नांव.. आपल्याला अश्या बंधनांची कधी गरज ही वाटली नाही.. मग आता का?
तो: मला शब्दांत, बोलण्यात अडकवू नको.. तू मला कायमची माझ्याबरोबर हवी आहेस.. आणि तसं होणार नसेल तर मला हे नाही जमणार.. आपण ब्रेक घेऊ.. काही महिन्यांचा.. शांतपणे विचार कर आणि मला सांग.. तो पर्यंत मला संपर्क नको करूस..
ती: अरे पण त्यासाठी इतका मोठ्ठा ब्रेक का?.. “तू फक्त आस”.. इतकंच माझं मागणं आहे.. तुझं आजूबाजूला असणं सुद्धा माझ्यासाठी पुरे आहे..
तो: मला चर्चा नकोय..
ती: बरं.. तुला move on व्हायचं ना?, तू हो.. पण हे सगळं तुला का संपवायचंय?
तो: तुझं उत्तर हो असेल तरच मला ई-मेल कर..
ती: अरे असं काय करतोस?..
ती: ?
ती: ohh.. offline.. 😔
ती: तुला जायचं तर तू जा.. पण मी कुठंही जाणार नाहीय.. मी इथंच आहे.. आपल्या प्रेमाच्या ह्या अद्भुत दुनियेत.. तुझी वाट पहात.. जिथं प्रेम ना रोगी आहे ना निरोगी.. प्रेमाला ना नैतिकतेचे बंधन आहे ना कसले निकष.. जिथं प्रेम ही फक्त तरल भावना आहे.. एका जीवापासून दुसऱ्या जीवापर्यंत जाणारी.. जिथं फक्त समर्पण आहे.. जिथं अद्वैत आहे.. एकदा ह्या अद्वैताची अनुभूती आल्यावर प्रतलं वेगळी असल्यानं काय फरक पडतो?
मी वाट पाहीन.. अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत..
मी आहे.. इथंच कायमची.. 💞
🤝🤝🤝🤝🤝
हे 'तो' आणि 'ती'तील शेवटचं संभाषण.. स्वतःच स्पष्ट मत सांगून 'तो'नं चाट ब्लॉक केला..
आता ब्लॉक्ड चॅटरूम वर 'ती' एकटीच येते.. तासंतास इथंच असते.. आधीच्या गप्पा वाचत.. कुठं चुकलं? ह्याचा विचार करत..
'ती'ला विश्वास आहे एक दिवस 'तो' येईल आणि त्यांची भिन्न प्रतलं एकमेकांना भेदून त्यातून एक नवीन प्रतल तयार होईल.. ते फक्त त्यांचंच असेल..
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment