Monday, August 12, 2024

वाढतं वजन - एक समस्या.. (भाग १)

सौजन्य:गूगल

गुटगुटीत, खात्यापीत्या घरची, हेल्दी, आडव्या हाडाची अश्या कितीही गोंडस, नानाविध उपमा दिल्या तरी लहानपणापासूनच मी वजनाच्या झुकत्या मापातलीच.. 'वाढत्या चणीची' ह्या वयात वजन नामक भूताशी माझी तोंड ओळख झाली.. 

शाळा कॉलेजच्या दिवसांत 'श्रीदेवी', 'जुही', 'माधुरी' यांचा बोलबाला असल्यानं ह्या भुताच्या अ-'करिश्मा' पासून मी लांबच होते.. पंजाबी सूट, चुदीदार फार फार तर लाँग स्कर्ट आणि क्वचित कधी तरी जीन्स आणि बॅगी टॉप्स अश्या कॅज्युअल वेअर मध्ये ‘फिगर’ हा प्रॉब्लेम ही नव्हता.. आजूबाजूला थोडफार फरकानं सगळे असेच.. त्यामुळं आयुष्य एकदम साधं सरळ सोप होतं.. 

सांगली (मोठ्ठं खेडं) शहर ते पुणे मोठ्ठं शहर (अजुनी ते मेट्रो व्हायचं होतं) ते अमेरिका एकदम परदेश ह्या प्रवासांत माझी वजन ह्या भूताशी नव्यानं ओळख झाली.. आणि त्यानं माझी मानगुट पकडली.. वेस्टर्न कपड्यांत आपण बसणं खरंतर मावणं हा एक टास्क आणि ते घालून वावरणं, ते कॅरी करणं हा दुसरा.. ह्या
 भूतानं पुढं ‘डाएट’ मायानगरीच्या चक्रव्यूहात आणून सोडलं.. 

लग्न मानवणं, परदेशातील हवा, अमेरिकेचं लक्झरी लाइफ वजनाचा आकडा वाढवत राहिले.. जेवणापूर्वी एक दोन भांडी पाणी पिणं, भात न खाणं अश्या घरगुती टिप्सनी डाएटचा श्रीगणेशा झाला.. आणि रोज सकाळी ग्राउंड ला फेऱ्या आणि ११ सूर्यनमस्कार ह्यानं व्यायामचा.. मग हळूहळू जिम, नवनवीन डाएट रेसिपी बुक्स, रामदेवबाबांचा योग आणि इंटरनेट क्रांती नंतर एका क्लिक वर मिळणारी धोधो माहिती यांनी वजन किती ही वाढलं तरी ओबीस नाही होवू दिलं.. अमेरिकेत आल्यावर late 90s मध्ये ज्यूस डाएट केल्याचं पण आठवतंय.. तीन दिवस ज्यूस प्या आणि अमुक अमुक वजन कमी करा..

प्रेग्नंसी नंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मॅरेथॉन ट्रेंनिंगला सुरुवात केली.. वर्षाला एक हाफ मॅरेथॉन (२१ किमी) करणारी मी काही वर्षांतच वर्षाला तीन हाफ मॅरेथॉन करू लागले.. बरोबरीनं स्ट्रेंथ ट्रेंनिंग ही होतंच.. झिरो फिगरच्या ट्रेंड मध्ये बसत नसले तरी मी फिट होते.. 

हायपोथायरॉईड ची गिफ्ट घेऊन चाळीशी आली आणि सगळं ढासळायला लागलं.. अकस्मात वाढलेल्या वजनानं थायरॉईडच निदान झालं.. ते वाढलेलं वजन नंतर कमी झालंच नाही.. योग्य आहार, व्यायाम आणि औषधं घेऊन वजनाशी लढा सुरु होता.. दीक्षित, दिवेकर, प्रत्येक चौथ्या दिवशी फास्टिंग, आहारतज्ञाचा वैयक्तीक सल्ला असे अनेक डाएट प्रकार ही करून झाले.. पण वजन कश्यालाही बधायला तयार नव्हतं..   

मॅरेथॉन आणि बाकी ऍक्टिव्हिटीज पूर्वीसारख्या सुरु असल्यानं मी हे वाढलेलं वजन शेवटी कबूल केलं.. एकीकडं strength, flexibility, endurance ह्या तिन्ही पातळीवर मी फिट होते आणि दुसरीकडं वजन वाढत होतं.. त्याबरोबर डायबिटीसचा धोका ही.. HbA1C वाढत वाढत ६ च्या घरात ठाण मांडून बसलं.. योग्य ते सगळं करून सुद्धा वजन कमी होत नसलं तरी ब्लेम करायला माझ्याकडं थायरॉईड, हार्मोन्स, प्रीमोनोपॉज ही कारणं होती.. strength training (weights), running मुळं muscle mass वाढण्याची गोड शक्यता 
ही.. इतक्या वर्षांत Annual check up म्हणजे रडारडी हे समीकरण माझ्या आणि डॉक्टरच्या ओळखीच झालं.. डॉक्टरकडं माझ्या समस्येचं उत्तर नव्हतं.. माझं वजन इतकं हट्टी होतं कि एव्हरेस्ट बेस कॅम्प, अन्नपूर्णा सर्किट ट्रेक्स केले तरी १ औन्स पण कमी झालं नाही..

वाढलेल्या वजनाचा थेट प्रभाव माझ्या आवडीवर, योगावर होणं हे खूप हृदयद्रावी होतं.. चरबीमुळं लवचिकता, डौल कमी झाल्यानं काही काही आसनं करणं आव्हानात्मक झालं.. त्यामुळं योगाभ्यास करणं आणि शिकवणं दोन्ही सोडून दिलं.. प्राणायाम आणि मेडिशन मात्र सुरु ठेवलं.. 

वाढत्या वजनाचा 'स्वः'वर होणारा नकारात्मक प्रभाव, शरीरा बरोबरच मानसिक आणि भावनिक पातळीवर असणारा ताण, समाजात वावरतानाचा तणाव हा लढा तर रोजचाच.. त्यात थायरॉईड आणि आता हे वाढलेलं वजन, बाकी व्याधींना आमंत्रण तर देणार नाही ना ही भीती, टाईप २ डायबिटीसची फॅमिली हिस्टरी असल्यानं ती टांगती तलवार ह्या सगळ्यांमुळं येणारा ताण तर आहेच.. स्पेशल ओकेजन्स, व्हेकेशनला ठिकाय पण रोज सकाळी उठल्यावर सुद्धा काय कपडे घालू? कश्यात फिट बसेन? हा विचार खूप त्रासदायक असतो.. वजन, डाएट हे विषय इतके सेंसेटिव्ह होतात कि त्याबद्दल कोणी बोललं तरी आपल्या बद्दलच आहे असं वाटतं.. दुकानातून खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन करणं सुखकर वाटतं.. कधी कधी कुठं जायचं, कोणांत मिक्स व्हायचं म्हटलं तरी रडायला येतं.. आपण बरं आणि आपलं लाईफ बरं.. 

पण योगाभ्यासामुळं ह्याकडं पहायची वेगळी दृष्टी मिळाली.. 'Being comfortable in your own skin' हे जरी शिकत असले तरी सगळे दिवस सारखे नसतात.. रोलर कोस्टर सुरूच असतं.. ह्यात स्टेबल, ग्राऊंडेड राहायला मॅरेथॉन, रेस ट्रेनिंग्स मदत करतात.. काहीतरी मिळवल्याचं, स्वतःला सिद्ध केल्याचं समाधान मिळतं.. 
 
Skin मध्ये कितीही comfortable झाले तरी वाढत्या वजनाचा धोका काही कमी होत नाही.. त्यामुळं वाढतं वजन, त्याचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक परिणाम आणि माझे अयशस्वी प्रयत्न ह्याला कंटाळून शेवटी येत्या भारतवारीत आयुर्वेदिक उपचार घेण्याचं ठरवलंय.. 
 
नोव्हेंबर २०२३: 
सगळे ब्लड रिपोर्ट्स नॉर्मल असले तरी HbA1C ६.३ 😳.. 
नेहमीप्रमाणं ब्लेम करायला माझ्याकडं emotional stress, stress of empty nester ही कारणं असली तरी काळजी नव्हती.. कारण आता भिस्त होती ती आयुर्वेदिक उपचारांवर.. 
तीन महिन्यांनी परत टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टरनं दिला.. आणि मी खुशीखुशी भारतवारीला निघाले.. 


(to be continued...)
-मी मधुरा.. 

************************************************


No comments:

Post a Comment