Tuesday, August 27, 2024

अध्याय १५ 'पुरुषोत्तमयोग'

श्रीपरमात्माने नमः  
अध्याय १५ 'पुरुषोत्तमयोग
( परम पुरुषाचा योग ) 

'अश्वत्थ':मला समजला तसा

मोक्ष प्राप्तीसाठी ज्ञान आवश्यक आहे आणि ज्ञान प्राप्तीसाठी शुद्ध मन.. आणि ह्या ज्ञानाचा टिकाव लागण्यासाठी वैराग्याशिवाय पर्याय नाही.. थोडक्यात, वैराग्याशिवाय मन शुद्धी (गुणातीत) नाही आणि मनशुद्धी शिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मोक्ष नाही.. 


वैराग्य मिळवण्यासाठी 'संसार अशाश्वत आहेहे जाणणं आवश्यक आहे.. संसार अशाश्वत आहेमिथ्या आहे हे सांगताना भगवंतांनी ह्या अध्यायात संसाराला वटवृक्षाची उपमा दिली आहे.. जो उलटा आहे ज्याची मुळं वरफांद्या खाली आहेत आणि ज्याची वाढ खालच्या बाजूस आहे.. ह्या संसाररूपी वटवृक्षानं जगात जितकी म्हणून जीवसृष्टी आहे ती सारी व्यापली आहे.. हा विश्वाकाररुपी वृक्ष म्हणजे 'अश्वत्थ'.. 'अश्वत्थजो क्षणभर ही एकसारखा नसतो.. संसाररूपी वृक्षाची पण अशीच स्थिती असते.. प्रत्येक क्षणास तो बदलत असतो..   


अश्या ह्या 'अश्वत्थ' वृक्षाच्या मुळाशी 'ब्रह्म' आणि 'माया' वास करतात.

'ब्रह्मज्याला ना आदि आहे ना मध्य, ना अंत.. जे कार्य ही नाही आणि कारण ही नाही.. जे केवळ ज्ञान असून सूक्ष्मरितीनं सर्वत्र भरून राहिलं आहे.. 

जेव्हा जीवात्म्यातील ह्या ज्ञानाची जागा अज्ञान घेतं, जेव्हा जीवात्म्यातील ब्रह्माला आत्मस्वरूपाचा विसर पडतो, तेव्हा 'माया' जागृत होते.. आणि स्वप्न जागृती ह्याच बरोबर सत्व-रज-तम हे त्रिगुण उत्पन्न करते.. हे त्रिगुण आणि पंचमहाभूते ह्यांनी देह, पंचेंद्रियं, त्याचे विकार उत्पन्न होतात.. आणि हा संसारवृक्ष वाढत जातो.. 


प्रलयकाळाच्या शेवटी ह्या संसाररूपी वृक्षाच्या, देहरूपी शाखा गळून पडतात आणि पुन्हा जगदुत्पत्तीच्या वेळी नव्यानं अंकुरतात.. त्याचं हे नाश पावून नव्यानं अंकुरणं समजल्यानं अज्ञानी यास शाश्वत मानतात.. परंतु ह्या संसाररूपी वृक्षाचं मर्म जाणून हा क्षणिक आहे आणि असंख्यवेळेला उत्पन्न आणि लय पावतो हे जो जाणतो तो सर्वज्ञ आहे.. तो वेदातील सिद्धांत जाणणारा आहे असं समजावं.. 


जेव्हा 'मनुष्यजातीरूपी' शाखेचा रजोगुणाशी संबंध येतो तेव्हा विधिनिषेधरूपी पानं वेदवाक्यं ह्यांची पालवी फुटते.. अर्थ काम यांचा विस्तार होऊन क्षणिक सुखाचे कोंब फुटतात.. इंद्रियांमुळं इच्छा उत्पन्न होऊन विषयरूपी नवी नवी पानं येत राहतात.. 

जेव्हा तमोगुण वाढतात तेव्हा वाईट वासना उत्पन्न होऊन कुकर्माच्या डहाळ्या फुटू लागतात.. 

आणि जेव्हा सत्वगुण वाढतात तेव्हा बुद्धीचे फोक विस्तारून स्फुर्तीचे, सदाचररुपी अंकुर फुटतात.. वेदोक्त आचरण, नानाप्रकारची यज्ञयागादी कर्मे अशी पानावर पानं फुटतात.. तापाच्या डहाळ्या फुटतात आणि वैराग्यरूपी कोवळ्या शाखा अंकारु लागतात.. तप ज्ञान यांच्या साह्याने मोक्षरूपी पालवी फुटते.. 

अश्याप्रकारे ह्या संसाररूपी वृक्षाच्या फांद्या त्रिगुणांनी वाढलेल्या आणि विषयवासनांच्या पालवीनं युक्त अशा असून वर सत्यलोकापर्यंत (सत्वगुण, मोक्ष, ब्रह्मत्व) आणि खाली पाताळलोकापर्यंत (तमोगुण, कुकर्म, जीवन-मरण फेरा) पसरलेल्या आहेत.. आणि मनुष्यलोकात ह्या वृक्षाची कर्मसंबंधी मूळं एकमेकांत गुंतून राहिली आहेत.. 


अध्यायाच्या सुरुवातीला भगवंत 'अश्वत्थ'रुपी संसारवृक्षाचं वर्णन करतात.. नंतर जीवात्म्याची उत्पत्ती कशी होते? त्याचा प्रवास कसा असतो? हे सांगतात.. आत्मस्वरूपाला जाणून जीवात्मा, पुरुषोत्तमाला (परमात्म्याला) जाणू शकतो आणि ब्रह्मत्वाला पोचू शकतो हे सांगून ह्या अध्यायाची सांगता करतात.. 


* मला समजला तसा 'अश्वत्थ'चा फोटो मी वर टाकला आहे..      



ना आदी ना अंत

मीच असे चित्रकार 

ना आधार ना वास्तव

असा हा उलटा वृक्षाकार ।।१।।

  

वेदांची पानं, वासनांची मूळं  

मीच असे रचनाकार

त्रिगुणांच्या शाखा, इंद्रियांच्या डहाळ्या 

असा हा अद्भूत वृक्षाकार ।।२।।


छाटून ह्याची सकाम मूळं 

मिळतो मानवा परमधाम 

जन्म-मृत्यूचा बेडा पार 

शाश्वत असे हे निजधाम ।।३।।


ना सूर्य-चंद्र ना अग्नी-वीज 

स्वयं प्रकाशित तरी असे

येता अश्या परमधमा

परतून कोणी जात नसे ।।४।।


नित्य संघर्ष बद्ध जीवनी 

मनाशी अन इंद्रियसुखाशी 

घेऊन जाती आशा आकांक्षा 

ह्या देहातून त्या देहाशी ।।५।। 


दुसरे शरीर धारण करण्या

मनात ठेवून विषयवासना 

पहिल्याचा तू त्याग करसी

कळे हे अज्ञानी विमूढांसी ।।६।।  


म्हणून हवेत ज्ञानचक्षू 

पाहण्या त्रिगुणांचा प्रभाव 

हवेत आत्मसाक्षात्कारी 

जाणण्या आत्म्याचे देहांतर ।।७।।  


सूर्य चंद्र अग्नी मी तेजवसी 

ग्रहमंडले ही कक्षेत स्थिरवसी 

पंचप्राण मीच असे चराचरी

अन *वैश्वानर सर्वभूता शरीरी ।।८।।


मीच स्मृती, ज्ञान, विस्मृती 

वेदांचा ज्ञाता अन अधिपती 

मीच एक परमात्मा परमपुरुष 

त्रिलोकांचा पालनहार स्वरूप ।।९।।


भौतिक सुखांत रममाण *क्षर 

अध्यात्माशी संलग्न ते *अक्षर 

जरी क्षराक्षर माझेच अंश स्वरूप 

तरी सर्वश्रेष्ठ मी पुरुषोत्तमरूप ।।१०।।


जाणूनी हा 'पुरुषोत्तमयोग' प्रभुमुखातून 

भजूनी *निरुपाधिक श्रीकृष्णाचे हे रूप 

प्रयत्ने तोडूनी माया मोहपाश 

होऊ पुरुषोत्तमाचे बुद्धिमान सिद्ध साधक ।।११।।  


हरी  तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************


*वैश्वानर: जठराग्नी रूपातील भगवंतांचा विस्तारित अंश..

*क्षर: च्युत *अक्षर:अच्युत 

भगवंतांचे सनातन अंश असलेल्या असंख्य जीवांचे च्युत आणि अच्युत ह्या दोन वर्गात विभाजन होते.. भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येणारे जीव च्युत(क्षर) तर भगवंतांशी एकरूप आहेत ते अच्युत(अक्षर).. 

*निरुपाधिक : क्षर (नाशवंत) आणि अक्षर (अविनाशी) यांच्या पलीकडचं

 



-मी मधुरा.. 

************************************************

No comments:

Post a Comment