ॐ
'पुरुषोत्तमयोग' जाणून घेताना, आपण अविनाशी असा देहातील जीवात्मा 'पुरुष' आणि त्याचा 'जीवात्मा ते ब्रह्मात्मा' हा प्रवास पाहिला.. शुद्ध आत्मतत्व म्हणजेच पुरुषोत्तम म्हणजेच ब्रह्म- अश्या पुरुषोत्तमाला जो ज्ञानप्राप्तीनं तत्वतः जाणतो, तोच खरा भक्त होय असं सांगून 'पुरुषोत्तमयोग' अध्यायाची सांगता होते.. ही ज्ञानप्राप्ती प्रेरक आणि अप्रेरक प्रकृतीवर अवलंबून असते.. ज्ञानाची प्राप्ती होईल अशी प्रेरक प्रकृती म्हणजेच दैवी संपत्ती (इष्ट कृत्ये) तर ज्ञानाच्या आड येणारी अप्रेरक प्रकृती म्हणजेच आसुरी संपत्ती (अनिष्ट कृत्ये)..
ज्ञानाची प्राप्ती किंवा हानी होण्यास कारणीभूत असणाऱ्या ह्या प्रकृतींबद्दल भगवंत ह्या 'दैवासुरसंपद्विभागयोग' अध्यायात सांगतात.. अध्यायाची सुरुवात दैवी आणि असुरी प्रवृत्तीच्या गुणांच्या वर्णनानं करतात..
निर्भयता, सात्त्विकता, ज्ञान व कर्मयोग या दोहोविषयी तत्परता, दानत, इंद्रियनिग्रह, यज्ञ, स्वधर्माप्रमाणं आचरण, तप, सरळपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्ती, त्याग, शांति, मनांत दुष्टबुद्धि नसणं, प्राणिमात्राविषयी दया, निर्लोभता, नम्रता, जनलज्जा (वाईट कृत्यांची), स्थिरता, तेजस्विता, क्षमा, धैर्य, शुचिर्भुतपणा, द्वेष/सन्मानापासून मुक्ती असे सव्वीस सद्गुण दैवी प्रकृतीच्या पुरुषास प्राप्त होतात..
तर आसुरी प्रवृत्तीच्या अंगी अहंकार, उर्मटपणा, गर्व, क्रोध, कठोरपणा आणि अज्ञान हे दुर्गुण आढळून येतात.. कोणतं काम करावं, कोणतं काम करू नये हे त्यांना समजत नाही.. शुचिर्भूतपणा, सदाचार आणि सत्य यांचा अभाव असतो.. आसुरी प्रकृतीचे लोक जग हे असत्य, निराधार, ईश्र्वररहित आहे आणि विषयोपभोगाकरितां उत्पन्न झालेलं आहे असं मानतात.. अशा प्रकारच्या विचारसरणीचा आश्रय घेऊन हे अल्प बुद्धि, क्रूरकर्मी, घातकी व जगाच्या नाशाचं कारण होतात.. कधीच पूर्ण न होणार्या कामवासनेचा आश्रय घेऊन गर्व, अहंकार व उन्मत्तपणा यांनी ग्रासलेले व अशुद्ध आचारविचार स्वीकारलेले आसुरी लोक मोहामुळं पापाचरण करण्यास प्रवृत्त होतात.. कामोपभोगाकरिता अन्यायाच्या मार्गांनी द्रव्यसंचय करतात..
मी सत्ताधीश, मी भोगी, मीच सिद्ध, मीच बलाढ्य व सुखी, मी श्रीमंत, मी कुलवंत, माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही.. मी यज्ञ ही करीन, दाने ही देईन, आणि मी चैन करीन अशा अज्ञानांत रममाण झालेले, नाना प्रकारच्या कल्पनांनी भ्रमित झालेले, मोहाच्या जाळ्यांत पूर्णपणे गुरफटलेले आणि विषयभोगांत लंपट झालेले हे आसुरी प्रकृतीचे लोक अखेरीस नरकांत जातात.. आपल्या व इतरांच्या देहांत वास करणार्या परमेश्वराचा, परमात्म्याचा द्वेष करणारे धर्माचे निंदक होतात.. असे ईश्र्वरद्रोही, क्रूर, घातकी, नराधम आसुरीयोनीत जन्म घेतात.. याप्रमाणे जन्मोजन्मी आसुरी योनीला प्राप्त झालेले हे मूर्ख लोक अधोगतीला जातात..
थोडक्यात, दैवी सद्गुण मोक्ष प्राप्तीला तर आसुरी दुर्गुण बंधनाला, जन्म-मृत्यूच्या फेऱ्याला कारक ठरतात.
काम, क्रोध व लोभ ही तीन नरकाची द्वारे आहेत, ती आत्मविघातक आहेत म्हणून त्यांचा त्याग करावा.. या तीन नरकद्वारांपासून विमुक्त झालेला मनुष्य स्वतःचं कल्याण करून उत्तम गतीला (मोक्ष) पोचतो.. जो शास्त्रोक्त विधीला सोडून मनसोक्त वर्तन करतो त्याला सिद्धि, सुख किंवा उत्तम गति प्राप्त होत नाही.. म्हणून कर्तव्य व अकर्तव्य यांचा निर्णय करण्याच्या कामी 'शास्त्र' हेच आधारभूत प्रमाण मानले पाहिजे.. असं सांगून ह्या अध्यायाची सांगता होते..
जाणूनी पुरुषोत्तमयोग
भक्तिरूपे मला भाजावे
आत्मतत्व-ब्रह्म-परमात्मा
असे एक, पार्था तू जाणावे ।।१।|
आत्मज्ञानी-अज्ञानी
खेळ असे प्रकृतीचा
इष्ट अनिष्ट भेद जाणूनी
मार्ग क्रमसी परमधामचा ।।२।।
सत्वगुणी कर्मे ज्याची
म्हणती त्याला दैवी प्रकृती
रजो-तमगुणी कर्मे करता
बद्धता त्याची असुरी प्रकृती ।।३।।
ऐक कौंतेया, सव्वीस दैवीगुण
मिळेल मोक्ष अंगीकारून तू जाण
कामक्रोधलोभमोह असुरी गुण
नेतील तुज अधोगतीस हे जाण ।।४।।
मी सत्ताधीश, भोगी आणि सिद्ध,
मीच बलाढ्य, सुखी आणि श्रीमंत
नसे दुसरा कोणी असा कुलवंत
म्हणे असुर जो रममाण अज्ञानात ।।५।।
असा अज्ञानी ईश्र्वरद्रोही नराधम
जन्म जन्मतो सदैव असुरी योनीत
अन फिरत राहतो, अखंड अविरत
जन्म मृत्यू आणि नरक फेऱ्यात ।।६।।
काम क्रोध लोभ नरकाची द्वारे
त्यजूनी सारी असुरी लक्षणे
कार्य-अकार्य भेद जो जाणे
परम सिद्धी अन मोक्ष तो पावे ।।७।।
जाणूनी हा ‘दैवासुरसंपद्विभागयोग’ प्रभुमुखातून
त्यागू असुरी गुण होऊनी सत्त्वगुणांचे पाईक
अभ्यासू प्रयत्ने कार्य-अकार्य शास्त्रविधींगत
होऊनी प्रगत करू सत्कर्मे अन मिळवू निजधाम ।।८।।
हरी ॐ तद् सद्
॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
********************
No comments:
Post a Comment