ॐ
‘दैवासुरसंपद्विभागयोग’ अध्यायात ज्ञानप्राप्तीसाठी प्रेरक म्हणजेच दैवी संपत्ती आणि अप्रेरक प्रकृती म्हणजेच आसुरी संपत्ती ह्याबद्दल जाणून घेतलं.. दैवी संपत्ती(प्रवृत्ती) मोक्षाकडे घेऊन जाते तर आसुरी संपत्ती(प्रवृत्ती) जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकवते.. चांगल्या किंवा वाईट गोष्टींचं आचरण करण्यास, कर्तव्य किंवा अकर्तव्य ह्याचा निर्णय घेण्यास 'शास्त्र' हेच आधारभूत प्रमाण मानलं पाहिजे असं सांगून भगवान अध्यायाची सांगता करतात..
हे ऐकून, अर्जुनास प्रश्न पडतो, कोणतेही कर्म करण्यास शास्त्राशिवाय पर्याय नाही म्हणजे नेमकं काय? इतक्या प्रकारची कर्मं, इतक्या प्रकारची शास्त्रं, त्यांची एकवाक्यता कशी होईल?.. अश्या ह्या गोंधळलेल्या अर्जुनाचं शंकानिरसन म्हणजेच हा श्रद्धात्रयविभागयोग.. ह्या अध्यायात सात्विक, राजसिक आणि तामसिक ह्या त्रिगुणांचा मनुष्याच्या आयुष्यावर, दैनंदिन जगण्यावर, खाण्यापिण्यावर होणारा परिणाम मुख्यत्वे सांगितला आहे..
अध्यायाची सुरुवात अर्जुन उवाच नं होते.. अर्जुन म्हणतो, "हे कृष्णा, जे शास्त्राविधीचं पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची भक्ती कोणत्या प्रकारची असते? सात्विक, राजस की तामस?"
भगवान म्हणतात, "त्रिविधा भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा।".. म्हणजेच देहधारी आत्मानं, प्राप्त केलेल्या प्राकृतिक गुणांनुसार, मनुष्याची श्रद्धा तीन प्रकारची असू शकते.. सात्विक, राजस आणि तामस.. स्वाभाविक, शास्त्रीय संस्कार नसलेली ही श्रद्धा सत्व, रज व तम ह्या भेदांनी युक्त म्हणजेच 'त्रिगुणात्मक' असते.. तमोगुण वाढला की ती तामसी असते, राजस लोकांच्या ठिकाणी ती रजोगुणमय तर सात्विकांच्या ठिकाणी ती सत्वगुणमय असते.. थोडक्यात श्रद्धा ही पूर्वसंस्कारानुसार उत्पन्न होते.. म्हणूनच सात्विक लोकं देव-देवतांची, राजस यक्ष-राक्षसांची आणि तामस प्रेत व भूतगणांची पूजा करतात..
दंभ, अहंकार, कामना, आसक्ती, बळाचा अभिमान आणि शास्त्रविधी सोडून केवळ स्वतःच्याच कल्पनेनं घोर तप करून शरीराला आणि अंतःकरणांत असणाऱ्या परमात्म्याला त्रास देणारे असे अज्ञानी असुर असतात.. परंतु वैदिक ज्ञानाचा मार्ग दाखवणाऱ्या गुरूच्या मार्गदर्शनानं असे अज्ञानी परमगती ही प्राप्त करू शकतात..
म्हणून सात्विक श्रद्धा जतन करावी.. ज्ञानेश्वर माउली म्हणतात- तरि धरावा तैसा संगु। जेणे पोखे सात्विक लागु। सत्वबुद्धीचा भागु। आहारु घेपे।।.. म्हणजेच ज्या योगानं सात्विक श्रद्धा वाढेल, त्याचाच संग करावा आणि ज्या अन्नाच्या सेवनानं सात्विक बुद्धी वाढेल, तोच आहार सेवन करावा.. तेंवि जैसा घेपे आहारु। धातु तैसाचि होय आकारू। आणि धातु ऐसा अंतरू। भावो पोखे।।.. म्हणजेच जे अन्नपदार्थ आपण खातो त्यातून शरीराला पोषण मिळतं आणि त्या पोषणातून अंतर्भाव निर्माण होतो.. जसं सात्विक अन्नामुळं सात्विक भाव उत्पन्न होतो आणि राजस व तामस अन्नामुळं त्या त्या भावांची उत्पत्ती होते..
भगवान सांगतात, सत्वगुणी लोकांचा आहार (षड)रसयुक्त, स्निग्ध, पौष्टिक आणि हृद्य म्हणजेच मन-हृदय संतुष्ट करणारा असतो.. जो त्यांचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवनशुद्धी करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्रदान करतो..
रजोगुणी लोकांना कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, कोरडा आणि दाहदायक आहार प्रिय असतो.. असा आहार दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारा असतो..
तर, अर्धवट शिजलेलं, बेचव, आंबलेलं, शिळं, उष्ट आणि अपवित्र असं अन्न तमोगुणी लोकांना आवडतं..
प्रकृती प्रमाणं जसे भोजनाचे तीन प्रकार आहेत, तसेच यज्ञ, तप आणि दान हे ही तीन प्रकारचे आहेत..
फळाची इच्छा न करता शास्त्राविधीनं नेमून दिलेला यज्ञ कर्तव्य म्हणून करणं हा सात्विक यज्ञ होय..
फळाची इच्छा धरून दिखाव्यासाठी केलेला यज्ञ राजस यज्ञ होय..
शास्त्राला सोडून मंत्राशिवाय, अन्नदान न करता, दक्षिणा न देता आणि श्रद्धा न ठेवता केला जाणारा यज्ञ तामस यज्ञ होय..
देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे कायिक (शारीरिक) तप होय..
जे दुसर्याला न बोचणारे, सत्य व गोड, परिणामी हितकारक असे भाषण, तसेच वेदशास्त्रांचे अध्ययन आणि परमेश्र्वराचा नामजप हे वाचिक तप होय..
मनाची प्रसन्नता, शांत भाव, मौन, आत्मसंयम, सौजन्य आणि अंतःकरण शुद्धी हे मानसिक तप होय..
फळाची अपेक्षा न करता श्रद्धापूर्वक जेव्हा कायिक,वाचिक आणि मानसिक तप आचरले जातात त्याला सात्विक तप असे म्हणतात..
जे तप सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच स्वार्थासाठी किंवा पाखंडीपणानं केले जातात त्याला राजस तप असे म्हणतात.. ते अनिश्चित तसेच क्षणिक फळ देणारे असतात..
आणि जे तप मूर्खतापूर्वक, दुराग्रह धरून, मन, वाणी आणि शरीराला कष्ट देऊन किंवा दुसर्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जातात त्याला तामस तप असे म्हणतात..
कर्तव्य भावनेनं जे दान पुण्यक्षेत्री, पर्वकाळी व सत्पात्री आणि उपकार न करणाऱ्याला दिलं जातं ते दान सात्त्विक दान होय..
परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूनं किंवा फळाची इच्छा ठेवून केलं जातं ते राजस दान होय..
जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिलं जातं ते दान तामस दान होय..
इथं तिन्ही गुणांचा उल्लेख न करता, केवळ सत्वगुण सांगितले असते तरी चाललं असतं.. पण माऊली म्हणतात.. "तेथ भरंवसेनि तिन्ही। न सांगोचि ऐसे मानी। परि सत्व दावावया दोन्ही। बोललो येरे।।".. म्हणजेच सत्वगुण उत्तमरितीनं, उघडपणे दाखविण्याकरिता दुसऱ्या दोन गुणांचं वर्णन केलं आहे.. रज व तम गुणांचा त्याग करून सत्वगुणांच्या योगे, ॐ,तत्, सत् यांच्या साह्यानं सर्व कर्माचं आचरण केलं असता मोक्षप्राप्ती नक्कीच होते.. ॐ, तत्, सत् हे शब्द विशेषकरून परमसत्य परमात्मा यांचा निर्देश करतात.. त्यांपासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी उत्पन्न झाले..
म्हणून वेदवेत्यांच्या यथाशक्ती यज्ञ, दान व तप रुप क्रियांचा नेहमी 'ॐ' या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करुनच आरंभ होतो.. फळाची इच्छा न करता 'तत्' या नावानं संबोधिल्या जाणार्या परमात्म्याचंच हे सर्व काही आहे, या भावनेनं यज्ञ, तप व दान या क्रिया केल्या जातात.. 'सत्' या परमात्म्याच्या नावाचा सत्य व श्रेष्ठ भावनेनं प्रयोग करतात तसेच उत्तम कर्मात ही 'सत्' शब्द वापरला जातो.. यज्ञ, तप व दान यांमध्ये जी स्थिती असते, तत्परता असते त्याला ही सत् असं म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म यालाही 'सत्' असेच म्हणतात..
थोडक्यात, श्रद्धेशिवाय केलेलं हवन, दिलेलं दान, केलेलं तप आणि कोणतेही कर्म 'असत्'होय.. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होते ना परलोकात.. इतकं सांगून अध्यायाची सांगता होते..
जे पाळती शास्त्रनियम
त्यासी तू दैवी जाण
न पाळती ते असुर
जीवनी बद्ध श्रद्धाविण ।।१।।
जाणून हे भगवंत वचन
पुसता झाला अर्जुन
जो न पाळे शास्त्रनियम
काय म्हणावे त्या श्रद्धावान? ।।२।।
ऐक भारता, श्रद्धा असे त्रिगुणात्मक
राजस, तामस आणि सात्विक
प्राप्त होईल पूर्वकर्म, प्रकृती गुणानुरूप
उंचावेल शास्त्राभ्यासे अन् गुरुसंगतीत ।।३।।
आहार, यज्ञ, दान आणि तप
भेदतो सत्व-रजो-तम गुणानुरूप
आहार तसा भाव पोषणातून
श्रद्धा मिळे यज्ञ-दान-तपातून ।।४।।
कायिक वाचिक मानसिक तप
शास्त्रसंमत यज्ञ नसे फलासक्त
देशे-काले-पात्रे अनुरूप दान
हे सारे सात्विक, पार्थ तू जाण ।।५।।
मानस ज्याचा प्रसिद्धी अन् स्वार्थ
निश्चितसे ते कर्म राजसिक
अश्रद्ध अशास्त्र अनिष्ट अन् अतर्क
यज्ञ-दान-तप असे तामसिक ।।६।।
सांगितला रज-तम उलघडण्या सत्वगुण
दान, तप, कर्म, हवन 'असत्' श्रद्धेविणं
ॐ तद सद् संगे करता सर्व कर्माचरण
होईल फलदायी इहलोकी परलोकी जाण ।।७।।
जाणूनी हा ‘श्रद्धात्रयविभागयोग’ प्रभुमुखातून
त्यागून रज-तम गुण, करावा सत्वगुणांशी संग
नीरक्षीरविवेक बुद्धी, श्रद्धा-यज्ञ-तप अन् नामस्मरण
मोक्ष मिळण्या मनुष्य जन्म, करुनी सर्व कृष्णार्पण ।।८।।
हरी ॐ तद् सद्
॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
********************
No comments:
Post a Comment